Friday 18 September 2015

एयर इंडिया

बर्याच जणांनी सांगितलं की आता एयर इंडिया स्टार अलायन्सची पार्टनर आहे. सुधरली आहे खूप. १३ सप्टेंबर ला चायना ला जायचं होतं. तिकिट ही स्वस्त मिळालं. अर्थात तो आपला पहिला क्रायटेरिया एअरलाईन ठरवायचा. मग काढलं तिकीट. एयर इंडियाचा पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रवास.

दिल्लीपर्यंत व्यवस्थित जमलं. दिल्लीला शिरलो विमानात. बोईंगचं ड्रीमलायनर म्हणे. उशीर झालाच होता. सॉलीड गरम होतं विमान. दहा मिनीटात लोकं बोंबटायला लागले, एसी काम का करत नाही म्हणून. साहजिकच आहे म्हणा. तर हवाई परिचारक म्हणतो कसा, "साब, बाहर टेम्परेचर ज्यादा इसलिए केबिन ठंडा हो नही रहा" त्याला वाटलं असेल बालवाडीतल्या पोरांची ट्रीप आहे. पाणी पाजलं. मग म्हणे एका कुठल्यातरी पॅसेंजरला विमानात त्रास चालू झाला म्हणून डिप्लेन करावं लागलं. त्या सोपस्कारात तास एक गेला. हो नाही करता सव्वा अकराचं विमान साडेबारा पाऊण च्या सुमारास उडलं. कुठल्याही ड्रायव्हर ने स्टार्टर मारला की मी झोपतो, तसा झोपलो. पंधरा मिनीटात उठलो. सध्या मी व्यसनापासून दूर असा दुर्व्यसनी माणूस आहे. त्यामुळे मदिरेच्या नादाला न लागता विचारलं "Tomato juice please" तर तोच हुशार परिचारक म्हणाला "We serve only orange juice". वो ही सही.

 बेटा पिक्चर लावला. माधुरीचं धकधक गाणं लागणार तितक्यात अनाऊन्समेंट झाली. "राईट इंजिनमे तकनीकी कारण के वजहसे विमानको वापस दिल्ली हवाईअड्डा ले जा रहा है" बोंबला तिच्यामारी. माधुरीची धकधक पाहण्याऐवजी माझ्याच हृदयाची वाढली. पण नुकतीच प्लंबिग होऊन वाहिनीत reinforcement झाल्यामुळे सगळं आलबेल होतं.

लखनौरून परत दिल्लीला आलो. काही मंडळी सॉलीड पेटली. वादावादी होऊन आम्हाला डिप्लेन करण्यात आलं. भूकेने पोटात आगडोंब उसळला होता. अशा वेळेस शक्यतो एअरलाईन काही खायला देतं. पण आपण अतिथी देवो भव वाले. म्हणजे इथे अतिथी तिकीटाचे पैसे देतो. बास, पुढे काही नाही. एयर इंडियाने आमच्या तोंडाला पानं पुसली.

पूर्ण सहा तासाच्या डिलेनंतर विमान उडलं आहे. तासाभरात जेवण आलं. मी विचारलं "orange juice please" तर उत्तर आलं "We already served you in first take off" हसावं की रडावं ते कळलं नाही.  जेवण जेवलो. सहा तासाच्या प्रवासात बाकीच्या एयरलाईन्स जितकी बडदास्त ठेवतात त्याच्या ५०% ठेवली.

चायनासारख्या देशात, जिथे इंग्रजीचा गंध नाही तिथे मी रात्री दोन वाजता पोहोचलो. गंमत आहे. यापेक्षा विचित्र परिस्थिती माझ्या कोपॅसेंजरची होती. शिरस्त्याप्रमाणे तोही पुरूषच होता. हा सदगृहस्थ, सुंग नाव आहे,  शुक्रवारपासून भारताच्या बाहेर जायचा प्रयत्न करतो आहे. शुक्रवारी आणि शनिवारी त्याचं फ्लाईट कँन्सल झालं. आणि आज ही परिस्थिती. चायनात जाऊन तो आपले काय गुणगान गाईल हे वेगळं सांगायला नको.

आपले पंतप्रधान अन मुख्यमंत्री जगभर फिरत ढोल वाजवत आहेत, आमच्या इथे पैसे टाका, इन्व्हेस्टमेंट करा. आमच्या इथे यंव संधी आहेत अन त्यंव बिझीनेस आहे. तुम्हाला सांगतो, जगाला तुम्ही ओरडून सांगितलं ना की आम्ही सुधरलो आहे तरी त्याच्यापेक्षा हे सुंगसारखी माणसं जगभर फिरत असतात, ते एकमेकांच्या कानात आपल्या देशाचं गुणसंकीर्तन करतात त्याने देशाची प्रतिमा ठरते. तुम्ही मार मॅडिसन स्क्वेयरला जाऊन, दुबईला जाऊन अमिताभच्या स्टाईलमधे, हो गुजरातचा अँबेसेडर झाल्यावर हे बाकी बरीक शिकलात, डावा हात वर करून आश्वासनांची खैरात करता ते छानच आहे. पण हे तुमचं घर इन ऑर्डर केलं नाही तर २०१९ नंतर नागपूरला चिंतन शिबीरात कारणं शोधावी लागतील हे लक्षात असू दंयावे. नाहीतरी वर्षभरात चार बाहेरच्या कंपन्यांनी गाषा गुंडाळला आहे हे कळलंच आहे. त्याबद्दल दुसर्या पोस्ट मध्ये.

बाकी डॉक्टरांची परमिशन घेऊन आलो होतो. औषधांचा स्टॉक होता. तरीही गडबड उडालीच. ती नंतर कधीतरी.

बाकी स्टार अलायन्सचं काही ऑडिट असतं की आमच्या आयएसओ सारखी खिरापत वाटत फिरतात. तिथंही आपल्या मंडळींनी तोडपाणी करून सेटिंग लावून ठेवलं आहे बहुधा! 

No comments:

Post a Comment