Tuesday 8 September 2015

आत्मानंद

अंगात तशा काही फार कला नाहीत. म्हणजे शास्त्रोक्त वैगेरे. पण चार टाळक्यांची मैफल जमली की कंठ फुटतो. आणि संगीत लागलं की पाय थिरकतात. परवा चारूहास म्हणाला "मनस्वी मंडलिक पाहायचे असतील तर त्यांना कविता म्हणताना पहावे"  त्यावेळेस अण्णासारखा दिग्गज माणसाला मी साथ देत होतो. एका पालटून एक कविता येत गेल्या. अऩ साथीला डॉ मोहन. साधा आवाज असलेला हा गृहस्थ जेव्हा सूर छेडायचा अन तोही कवितेवर अप्रचलित पद्धतीने, अक्षरश: आसंमतात ते सूर गुंजत रहायचे.  रेकोर्डेड तानपुर्याला साथीला घेऊन जेव्हा सुर लागायचा तेव्हा रोमांच प्रत्येकाच्या अंगांगात उठला. काय भावना असेल ही तादात्म्य पावायची. होतं असं कधी. कधी ऐकताना, कधी म्हणताना, कधी नाचताना. सभोवताल, सृष्टी, चराचर सगळं विसरतो आपण.

खरंतर प्रसंग धांगडधिंगणाचा. गणपतीची विसर्जनाची मिरवणूक. आमचा ताशावाला सेमच असायचा दरवर्षी. मिरवणूक ३०० मीटरच असायची. सुरू झाली, हळूहळू रंग भरू लागला. मी नाचण्याची गति वाढवत गेलो ढोलताशा बरोबर. तो, सुरेश, ताशा वाजवणारा सॉलीड पेटला. माझी आणि सुरेशची जुगलबंदी जुंपली. पोरांनी पैसे ओवाळले आणि ह्रिदम चढत गेला.  कुणीही हरायला तयार नाही.

आणि ते वाद्य टिपेला पोहोचलं आणि मी ही बेधुंद होऊन नाचत होतो. मग ते घडलं, सुरेश जो कडाकड ताशा वाजवत होता त्याने हळूच ताशा गळ्यातून काढून दुसर्याच्या गळ्यात टाकला अन तो माझ्याबरोबर नाचू लागला, बेफाम. वाद्याची गति हळूहळू कमी झाली. थांबली. अन त्या सुरेशने अक्षरश: मला मिठी मारली. म्हणाला "मानलं तुम्हाला. इतकी वर्षं ताशा वाजवतोय, इतक्या जणांना नाचवलं. पण तुमच्या नाचातला जोश पाहून मलाही नाचावसं वाटलं"

जुन्या काळी सुद्धा रात्रभर मैफिली सजायच्या याचं कारण तेच असावं. आत्मानंदाच्या अवस्थेची अनूभूती आली की काळ, वेळ, स्थळ याचा विसर पडतो आणि आपण त्या अनन्यभावात डुंबत राहतो.

हे आत्म्यातून येणारा आनंद हा वेगळाच प्रकार असेल.

असं होतं ना बऱ्याचदा की एखादं गाणं आपल्याला प्रचंड आवडतं. इतकं की ते गाणं ऐकलं की आपण अक्षरश: सैरभैर होऊन जातो. कधी गळा दाटून येतो तर कधी डोळ्यातून पाणी येतं, एका वेगळ्याच अनुभूतीत  आपण डुंबून जातो. का होत असावं असं? कारण हे प्रत्येक गाण्याला किंवा कवितेला होत नाही, काही निवडक कलाकृती वाचल्यावर किंवा ऐकल्यावर होतं. तेच गाणं जर काही दिवसांनी दुसऱ्या कुणी म्हंटल तर कदाचित तितकं भावणार नाही.

मला असं वाटतं का कोण जाणे, पण एखादी कविता किंवा गाणं जेव्हा बनतं तेव्हा तो गीतकार, संगीतकार, गायक एका आत्मिक आनंदाची अनुभूती घेत असावेत. अशी भट्टी जुळून यावी तशी सगळी सूत्रे हलतात, आणि मुशीत ते गाणं चपखल बसतं. तेच जेव्हा कुणी कॉपी करतं तेव्हा तो सोल किंवा ते जीवन त्यात नसावं आणि म्हणून ते आपल्याला भावत नसावं. 

मुकुंद, हे असं हरवणं कदाचित हरवत चाललं आहे. तुझ्या दोन चार स्फुटांवरून हे सुचलं. मी घेईन तो आनंद परत. "देव देव्हार्यात नाही" "हृदयी जागा तु अनुरागा" "टाळ बोले चिपळीला" "शूर आम्ही सरदार" "ऋणानूबंधाच्या" ऐकीन ही गाणी परत आणि न्हाऊन घेत जाईन.........आत्मानंदात.


No comments:

Post a Comment