Saturday 26 September 2015

तो

तो आला. असेच चुरगळलेले कपडे होते अंगावर. गणेश आला, म्हणाला त्याला हेल्परचं काम हवंय. मी सांगितलं, ठीक आहे थांबायला सांग. तो थांबला. माझी मिटींग झाली अर्ध्या पाऊण तासाची. तोवर तो असाच थांबून होता, कंपनीच्या दरवाजात.

मिटींग संपली. मला तो दिसला. मी बोललो, ये. केबिनमधे बोलावलं आणि विचारलं "हा बोल, काय काम करायचं आहे" तर म्हणाला "काहीही, तुम्ही सांगाल ते. हेल्परचं वैगेरे" मी विचारलं, "काय शिकला आहेस?" तर बायोडाटा काढून दिला. आश्चर्य वाटलं, कारण हेल्परचं काम मागणारे शक्यतो बायोडाटा घेऊन फिरत नाही. ते आपलं तोंडीच सांगतात. "आठवी पास किंवा दहावी नापास" वैगेरे.

बायोडाटा उघडला आणि तीन ताड उडालो. शिक्षण: DETC, Diploma in Electronics and Telecommunication. मी बोललो "काय रे, तु तर डिप्लोमा आहेस, मग हेल्परचं काम का मागतो आहेस" तर म्हणाला "काय करणार सर, जॉबची खुप शोधाशोध केली. मिळतच नाही आहे. मग हेल्परही सही" मी बोललो "अरे हेल्परचा पगार कितीसा असा. तुला नाही अॅक्सेप्ट होणार" तर बोलला "द्याल त्या पगारावर काम करेन"

अवसान गोळा करून मी त्याला म्हणालो "वेडा आहेस का तु? डिप्लोमा आहेस तु चांगला. हेल्परचं काम का मागतोस. काम कुठलंही वाईट नाही हे कळतं मला, पण तु शिकला आहेस, त्याला न्याय देणारं काम निवड."

तर डोळ्यात पाणी आणून म्हणाला "सर, जॉबची खूप गरज आहे. काहीतरी करा" आणि मग घरची शेती, दुष्काळ, कर्ज हे ही सगळं सांगितलं.

मी बोललो "हे बघ, मी तुला हेल्पर म्हणून तर ठेवू शकत नाही. माझी मेकॅनिकल कंपनी. माझ्याकडे मशीन ऑपरेटर म्हणून जॉईन व्हायला आलेल्या पोरांना मी  इंजिनियरचंच काम करायला सांगितलं. तु इलेक्ट्रॉनिक्सचा इंजिनियर. त्यामुळे तुझ्या आवडीचं कामही माझ्याकडे नाही."

कागद ओढला. आजूबाजूच्या इलेक्ट्रॉनिक्स संबंधित आठ एक कंपन्यांची नावं लिहीली. तिथल्या माहितीतल्या लोकांचे नंबर दिले. सांगितलं "या कंपन्यात जा आणि जॉब आहे का विचार इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरचा. कुठे ना कुठे मिळेल चान्स."

जाताना सांगितलं "आणि हे बघ, जॉब मिळाला की पेढे द्यायला ये" अर्ध्या तासाच्या संभाषणात पहिल्यांदाच त्याच्या चेहर्यावर हास्य उमललं.

Thank you म्हणत गेला खरं तो आणि इतक्या वेळाचं सांभाळलेलं धैर्य मी मुक्तपणे ओघळू दिलं.

मनातून हादरलो नसल्याचा अभिनय यशस्वी झाला.

तो.....गडबडीत नावही विचारायचं राहिलं माझं. काही हरकत नाही, पेढे द्यायला येईल, तेव्हा विचारेनच मी.

No comments:

Post a Comment