Tuesday 29 September 2015

अश्रू

मध्ये आमच्या खर्डेघाशी ग्रुपचं गेट टुगेदर झालं होतं. आमचा एक यंग मेंबर आहे. विलास ठेवू यात नाव. स्वत:ची ओळख करून देताना विलास म्हणाला "माझं माझ्या भावनेवर नियंत्रण नाही आहे. कुठे अगदी साधं बोलताना माझ्या डोळ्यातून पाणी येतं." हे बोलताना ही तो पाणावला होता.

मलाच हायसं वाटलं. मला वाटलं, फक्त मीच असा आहे की काय. पण नाही जगात असतात अशी लोकं.

 परवा एका घरगुती कार्यक्रमाला गेलो होतो. लग्नाचा ५०वा वाढदिवस. शिल्पा, उत्सवमुर्तींची मुलगी अगदी व्यवस्थित आई वडिलांच्या आयुष्याचा पट उलगडून सांगत होती. पण मला राहून याचं आश्चर्य वाटत होतं की शिल्पाच्या बोलण्यामध्ये विलक्षण स्थितप्रज्ञता होती. म्हणजे बोलताना आई वडिलांबद्दल प्रेम दिसत होतं, आदर ही जाणवत होता, पण हे सगळं हसत खेळत.

सिद्धार्थ जाधव ने एकदा लक्ष्मीकांत बेर्डे च्या गाण्यावर मेडले सादर केला होता. त्याचं कौतुक करायला महागुरू सचिन आला होता. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बद्दल अत्यंत भावूक बोलला. प्रेक्षकातले कित्येक कलाकार आसवं ढाळत होते पण स्वत: सचिन मात्र निर्विकारपणे बोलत होता.

मला नाही जमत. काहीही चांगलं बोलताना आवंढा येतोच येतो. अगदी काहीही. कंपनीत सेल्स टार्गेट अचिव्ह झालं, एक्स्पान्शन म्हणून चेन्नई ब्रांच ओपन झाली, नातेवाईकांच्या कार्यक्रमात चार शब्द बोल म्हणून कुणी सांगितलं, शाळेच्या आठवणी सांगताना, अगदी कुठलीही आनंददायी गोष्ट सांगताना घसा चोक होतोच होतो. जॉब मागायला लोकं येतात. त्यांचा इंटरव्ह्यू घेताना लोकं त्यांची कहाणी सांगतात. ते निवांत पणे सांगतात. अन मी आतल्या आत ढासळत असतो.

वाघेला माझा बिझिनेस पार्टनर. त्याच्या मुलीचं लग्न. सोयरे लंडनचे. चांगले ४०-४५ जण. त्यात एक बाबुभाई म्हणून मुलाचे काका, वय ८० वर्ष. म्हातार्याशी काय सुत जुळलं पण चार दिवसांच्या साथ संगतीनंतर बाबुभाई आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून "आपके बेटे के रूप मे मुझे भगवान मिला है" म्हणत गदगदून रडू लागले. मलाही विचित्र वाटत होतं पण डोळ्यातल्या धारा काही मी थोपवू नाही शकलो.


तसं म्हंटल तर मी बोलू शकतो चारचौघात. पण ह्या रडक्या भावनेवर नियंत्रण नसल्यामुळे सगळा लोच्या होतो. मग मी बोलायचं टाळतो. आता कंपनीत प्रवचन द्यायचं काम माझ्याकडे असतं. बराच अभिनय करत मी ते पार पाडतो.

अर्थात हे वयोपरत्वे बदलू ही शकेल. हेच पहा ना, वैभवीकडे कुणी लहान मुल रक्त काढायला आलं की ती बाळाला मांडीवर घेऊन बसायचं काम करते. रक्त तिच्या lab चा टेक्निशियन काढतो. कारण का? तर ती आजकाल भावूक होते. आता ह्याच वैभवीने १९९२ साली सह्याद्री एक्स्प्रेस च्या धडकेत निधन पावलेल्या ४० एक लहान मुलांचं पोस्टमार्टेम निर्विकारपणे पार पाडलं होतं यावर तिचा स्वत:चा विश्वास बसत नाही.

इथे फेसबुकवर सुद्धा काही, पण अगदी काहीच, पोस्ट वाचून मी भावूक होतो. आता तो स्वभाव आहे. त्याला इलाज नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. अश्रू  ढाळण्याच्या बाबतीत इतका उदार असणारा मी हसण्याच्या बाबतीत मात्र फार कंजूष आहे. डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसणे हे गेल्या कित्येक महिन्यात मला आठवत नाही. आमचा एक मित्र आहे अतुल वाघ. तो आला की हसवतो बा. पण बाकी आनंद. चला हवा येऊ द्या बघताना वैभवी खदाखदा हसत असते आणि मी मात्र माझं स्मित जणू २५००० रुपये तोळा असल्यासारखं जपून वापरतो.

तर हा माझा प्रकृतीदोष आहे का? मला नाही वाटत. असतो एकेकाचा स्वभाव. म्हणून तर जग बनतं ना! आता सगळीच मंडळी एकसारखी असली असती तर चाललं असतं का?


No comments:

Post a Comment