Friday 18 September 2015

अरे काय चाललय काय

काय यंग्राट ट्रीप झाली चायनाची. कँन्सल करणार होतो पण आमचे हरदास बुवा म्हणाले जा बिनधास्त. मी म्हंटलं आता डॉक्टरच म्हणतोय तर जावं. ए़यर इंडियाच्या गडबडीनंतर रात्री दोनला पोहोचलो. पुडॉंग एयरपोर्टला. टॅक्सीवाला कुठे? तिथेही आपल्यासारखा गराडा पडला ना "साब, कहा छोडू" मॅरियटवाला म्हणाला मी करून देतो कॅब. हो नाही करता करता आला आमचा बाबा, प्लाकार्ड घेऊन.

पोहोचलो हॉटेल. सोमवार अख्खा मस्त गेला. मंगळवारही काही प्रॉब्लेम नाही. रात्री रिट्रोव्हिल ०.२५  मारली की एका क्वार्टर ची नशा.

मंगळवारी दुपारी जेवलो, सुशी आणि त्याच्याबरोबर वसाबी म्हणून चटणी. चटणी नाही आग. पण जमलं व्यवस्थित. मिटिंगा झाल्या. रात्री जेवलो. नॉनव्हेज खायचंच नव्हतं. सॅलड वर जोर. दोन म्हणजे दोनच घोट रेड वाईन घेतली. नको म्हंटलं. रूमवर आलो झोपायला अन रात्री गंमत चालू झाली. छातीत धडधड. तळव्याला घाम. खाली आलो. जेफ, जिम आणि हॉवर्ड या तिघांना फोन करून झाले. जरा रात्री साथ मिळाली तर बरं. तर तिघंही ढाराढूर. तसंही अमेरिकनानंना एका बेडमधे दुसरा पुरूष चालतच नाही. रात्री ११ ला गरम पाण्याचा शॉवर घेतला. अथर्वशीर्ष म्हणून झालं, भीमरूपी म्हंटलं, मंत्रपुष्पांजली झाली पण जीवाला काही घोर नाही. पण रिट्रोव्हिल काही रंग दाखवेना. मुकुंदशी आणि अनामिकाशी चॅटिंग करत होतो तोच काय दिलासा. वैभवीशी बोलावं म्हंटलं आणि हे काही लिहीलं तर राडा.

बुधवार उजाडला. काही सुधरत नव्हतं. ब्रेकफास्ट रूमला आलो. काही खायची इच्छाच नव्हती. फोर्डचे गजानान कोथळकर भेटले. त्यांना सांगितलं, म्हंटलं तब्येतीचा लोच्या झालाय. रात्री मदत लागली तर बोलवेल तुम्हाला. काहीतरी खाल्ल्यासारखं केलं. ऑफिसला पोहोचलो, काही सुधरना तरी. जेसी म्हणून ताई आहे ऑफीसमधे अन हॉवर्ड अमेरिकन चायनीज. मला म्हणाले हॉस्पीटला ला घेऊन जातो. फाटलीच होती, मग बोललो न्या बुवा. शांघायचं जियानडिंग सबअर्ब मधलं अगडबंब हॉस्पीटल. बीपी चेक केलं १३०/८०, पहिला दिलासा. चेहर्यावर इस्त्री फिरवल्यासारख्या डॉक्टरीणबाई. सुदैवाने फाईल नेली होती. बाईनं इसीजी काढायला सांगितला. वरात तिकडं आमची. तोही हळदीचा कार्यक्रम झाला. काढलेली मेंदी घेऊन परत डॉक्टरीण बाईकडे. इस्त्री फिरवलेल्या चेहर्यावर हास्य फुललं. म्हणाली पहिलेपेक्षा खुपच भारी इसीजी आहे. हार्ट तर गुलाबी आहे. तरीही अशीच परिस्थिती राहिली तर बाकी काही चेक करावं लागेल. हे सगळं मँडेरिन भाषेत. जेसीताई समजावून सांगत होती.

आलो ऑफीसला तरीही अस्वस्थ वाटत होतं. मिटिंगमधे बसलो तरी काही सुधरेना. दुपारी परत सॅलड अन सुप. सर्व बंधुंना सांगितलं, मी हॉटेलला जातो. पहिले १९ सप्टेंबरचं रिटर्न तिकीट १७ करून घेतलं. १६ला नव्हती फ्लाईट. झोपायचा निष्फळ प्रयत्न केला. ६:३० काही फळं खाल्ली. अमेरिकन गप्पा छाटत होते. माझं काही मन लागत नव्हतं. अस्वस्थपणा जात नव्हता. मी आलो रूमवर. फोर्डच्या कोथळकरांना फोन केला. म्हंटले या रूमवर.

कोथळकर, पटेल आणि गोपी असं त्रिकूट होतं. त्यांच्याशी गप्पा चालू झाल्या अन अचानक माझा अस्वस्थपणा कमी झाला. त्यांनी रूममधेच कुकरमधे भात बनवला होता. मला म्हणे खा दोन घास. ते बाहेर जेवतच नव्हते. भात आणि साऊथ इंडियन चटणी अन साईड डिश म्हणून वेफर्स. गप्पा मारताना मी पण ओके झालो अन डोळ्यावर परत झोप तरळू लागली. कचकावून झोपलो.

गुरूवारी १७ सप्टेंबरला सॉलीड फ्रेश झालो. आदल्या दिवशी राहिलेले मुद्दे जोरकसपणे मिटिंगमधे मांडले. रात्री दहाला विमान पकडलं. जाताना जेसीला म्हंटलं "जस्सी जैसी कोई नही"

आता पोहोचलो आहे पुण्यात.

गणपती बाप्पा मोरया!

(रा रा मुकुंद भोकरकर आणि अनामिकाला कळलं नसेल दोन दिवस राजेश चॅटिंगला का चटावलाय ते. लक्ष वळवण्याला तोच पर्याय होता. दिलसे धन्यवाद) 

No comments:

Post a Comment