Friday 4 September 2015

कृती

फेसबुकवर अनेक जण अत्यंत पोटतिडकिने काही प्रश्न मांडत असतात. शेतकर्यांचे प्रश्न, सामाजिक दाहक प्रश्न, राजकारण्यांची विविध प्रश्नांवरची अनास्था वैगेरे. अगदीच नावं लिहीत नाही, पण संवेदनशील आहेत हे सगळे. व्यासंग आहे, अभ्यास आहे आणि चाड आहे. पण ही मंडळी प्रश्न मांडताना त्यावरच्या उत्तराची responsibility मात्र घेत नाही. उदाहरणर्थ: शेतकरी सधन व्हायला हवा, हे वाक्य. बरोबर नक्कीच व्हायला हवा. कुणाला वाटणार नाही ते. शेवटी अन्नदाताच तो. आईचं जेवढं स्थान आपल्या आयुष्यात तितकंच राष्ट्राच्या बाबतीत शेतकर्याचं. तो श्रीमंत न व्हावा, सधन न व्हावा असं वाटणारा एक ही जण शोधून सापडणार नाही. पण हे कसं व्हावं. यावर कुणी चर्चा करत नाही. कारण मग या उत्तरात कटुता येते. शेती उद्योगाला उद्योग म्हणून काय काय करावे लागेल याचा उहापोह व्हावा. बरं माझ्यासारख्या पुर्ण आयुष्य नागरसंस्कृतीत गेलेल्या, भारत हा कृषीप्रधान देश आहे यापलीकडे शेतीचं काहीही ज्ञान नसलेल्या, पण शेतउद्योग यातल्या उद्योग प्रकारावर थोडी माहिती असलेल्या माणसाने चार शब्द लिहीले की त्यावर शेतकरी बांधव तुटुन पडतात. म्हणजे आमचे प्रॉब्लेम हे आमचे प्रॉब्लेम, त्यात तुम्ही काही बोलायचं नाही कारण तुम्हाला त्यातलं काही कळत नाही अशी भूमिका घेतली की लोकं गप्प बसतात. गेले कित्येक वर्षाचा इतिहास सांगतो आहे की ज्या पद्धतीने शेतउद्योग हा विषय हाताळला जातो त्याने शेतकरी आज काय परिस्थितीला येऊन पोहोचला आहे. परवा इंटरव्ह्यू घेतले. ५० एक इंजिनियर पोरांपैकी किमान ३० मुलं शेतकर्याची होती. मी विचारलं त्यांना, शेती का नको? त्यांनी जी उत्तरं दिली ती लॉजीकल होती. पण त्यांनी जे सांगितलं त्यावर अभ्यास करण्यासाठी आजचे फेसबुकीय शेतीविषयक अभ्यासकांकडे काही ठोस उपाय आहेत का? दुर्दैवाने त्याचं उत्तर नाही असं आहे. असो.

विषय मनात आला तो आजच्या लोकसत्तातील मुरूगानंदम वरील लेखावरून. आधी वाचलं त्यांच्याबद्दल. सॅनिटरी नॅपकिन वापरण्याची चळवळ कशी उभी केली याची अत्यंत प्रेरणादायी कथा उलगडते. स्त्रिया स्वच्छतेबद्दल उदासीन आहेत इतकं चार वेळा लिहून मुरूगानंदम गप्प बसू शकले असते. पण नाही, त्यांनी प्रश्नाचा मागोवा घेतला आणि एक सशक्त सोल्युशन देशाला दिलं.

वैयक्तिकरित्या असे प्रश्न आणि सोल्युशन्स दैनंदिन जीवनात मांडले पण ज्यांच्यासमोर मांडले त्यांनी त्याला एकतर विरोध केला नाहीतर दुर्लक्ष. त्याला मोडून पुढे रेटण्याची अक्कल आणि धारिष्ट्य माझ्यात नव्हतं, म्हणून मी कोषात जाऊन बसलो. फेसबुकच्या पानांवर झळकत राहिलो. मुरुगानंदम सारखी लोकं मात्र वर्तमानपत्रावर झळकतात.

फेसबुकवरून वर्तमानपत्रात झळकण्याचा मार्ग खडतर आहे खरा.

No comments:

Post a Comment