Monday, 30 December 2013

सिंहगड

तसा मी हाडाचा trekker नाही. (तसं बघायला गेलं तर मी हाडाचा खेळाडू नाही, हाडाचा engineer नाही किंवा हाडाचा वाचक नाही. माझे आणि हाडाचे नाते हे फक्त चघळण्या पुरतेच आहे.) म्हणजे मला trekking ची आवड नाही असेही नाही, फक्त कुणीतरी पुकारा केला पाहिजे. कॉलेज मध्ये एक तर गोडबोल्यांचा राजेश फरफाटावायचा किंवा BJ Medical चा एक वल्ली ग्रुप होता ते तरी ओढून न्यायचे. (ह्या ग्रुप मधील वल्ली  आता पुण्यातील प्रथितयश डॉक्टर्स आहेत) नाही म्हणायला एक-दोन ट्रेक मी arrange केले आहेत पण ते तुरळक. बाकी आपली मजल पर्वती, चतुश्रुंगी किंवा फारतर घरामागची रामटेकडी. हो, म्हणजे डी म्हणेपर्यंत जी टेकडी संपते ती.

या पार्श्वभूमीवर मी रविवारी सिंहगडावर जायचे ठरवले तेव्हा माझे मलाच आश्चर्य वाटले. बाकी घरच्यांनी "याला वेड लागले आहे" असे म्हणून सोडून दिले. (या कारणास्तव मला दररोज कुठल्यातरी कामावर अर्पण केले जाते).

सकाळी ६:३० वाजता पायथ्याला पोहोचलो. एका छोटया शेतजमिनीचे pay and park मध्ये रुपांतर केले होते. शेतीच्या उत्पन्नापेक्षा पार्किंग मधून जास्त पैसे कमावता येतात हे बघून आश्चर्य वाटले. (संजय सोनवणी सरांच्या लेखाची आठवण झाली).

कारमधून उतरून खाली घसरलेली ३/४ जरा वरती ओढली. (ही आपली style आहे. कुठल्याही घाम गाळण्याच्या क्रिया करताना मी जरा अघळ पघळ कपडे घालतो. वजन आणि घेर कमी झाला आहे हे जाणवण्यासाठी ही फारच नामी क्लुप्ती आहे. मला माहिती आहे, तुमचे विचार चक्र कंसातील पहिल्या वाक्यावरच थबकले आहे. आणि नाही ते विचार तुमच्या मनात येत आहेत . पण ते थांबवा आणि पुढे वाचा.) आणि सिंहगडावर आक्रमण केले.

थंडी असेल म्हणून टी शर्ट वर पुल ओवर घातला होता. थोडया वेळातच उकडायला लागले, म्हणून तो काढून हातात घेतला. थोडया वेळातच त्या पुल ओवर चे वजन मला डाचायला लागले. म्हंटल किती बावळट आहोत आपण. (हे स्वगत दर दिवशी ४-५ वेळा कुठल्यातरी कारणास्तव होतेच) कार मधेच ठेवायला हवे होते.

एक गम्मत आहे, कुठल्याही गडावर जाताना वा येताना कुणीतरी असे भेटतेच किंवा काहीतरी असे होते कि ते विसरता येत नाही, मग ते रायरेश्वर वरून येताना "ओ ग माझा पांडुरंग, महराजाना भेटून आला व्हय चालत जाऊन" म्हणणारी आणि नील चा गालगुच्चा घेणारी म्हातारी आजी असो, किंवा राजगडावर भूक लागल्यावर स्वत:च्या वाटेची भाकरी आणि वाशाट देणारी मावशी असो. त्या पुल ओवर च्या वजनाचा विचार करत असतानाच मला समोर "ती" दिसली. साधारण ५५ वय, हिरवे नऊवारी पातळ, रापलेला रंग आणि डोक्यावर ३०-३५ लिटर चा पाण्याचा छोटा ड्रम आणि हातात एक कळशी. हळूहळू गड चढत होती. मला माझीच लाज वाटली. मी त्या माउली च्या मागेच होतो आणि तिची झोपडी आली. छोटे हॉटेल होते तिचे. मला आश्चर्य वाटले, तिथे एक तरणा बांड मुलगा काकडी चिरत उभा होता. मला ते काही झेपलं नाही. म्हणजे ती त्याची आई असो वा नसो, ते चित्र विचित्रच होतं, हे खरं. ते पाणी तिने  लिंबू सरबतासाठी आणले असावे.

चढण अर्ध्यावर आली होती. एक छोटा ग्रुप होता, साधारण तिशीतील असावे सर्व. २-३ लेडीज आणि २-३ जंटलमन. त्यातल्या एकीने एकाला विचारले "ही पाण्याची बाटली इथे फेकू का" तो म्हणाला "फेक" मला राहवले नाही. मी म्हणालो "प्रत्येक हॉटेल मध्ये आता कचरा गोळा करतात. तिथे टाका". तर ती तिशीतील तरुणी म्हणाली "बरं काका" काका, सूचना दिल्याचा सूड ती असा उगवेल असं वाटले नव्हते. माझ्या छातीत एक सूक्ष्म कळ उठली. ती गड भरभर चढल्यामुळे आली अशी मी मनाची समजूत घालून निघालो.

चढाई जारी होती. ५५-५६ वयाच्या ५-६  जणांचा ग्रुप आला. सगळे बापे. त्यातला एक जण त्यांच्या वयाला न शोभेल अशा घाण भाषेत बोलत होता. आणि मोठयानी. उगाचच हसायचे. बाकी लोकसुद्धा मनात इच्छा नसून साथ देत होते. मला त्यातील कृत्रिमपणा जाणवत होता. मला हसू आले. मनात आले यांनी माझे कॉलेज मधले सुसंवाद ऐकले असते तर सोवळे घालून "घालीन लोटांगण" म्हणले असते. असो.

सकळाचे ७:३० वाजले होते. तेवढ्यात एक जुना मित्र आला. त्याचे नाव "क्ष" ठेवू. ह्या क्ष ला जवानीत प्रत्येक पार्टी मध्ये out झाल्यावर रूमवर सोडायची जबाबदारी माझ्यावर असायची. तर क्ष म्हणाला "तब्येत कशी आहे" मी म्हणालो "उत्तम", पुढचा प्रश्न "मग काय ड्रिंक्स सोडले कि नाही" आयला वेळ सकाळची साडेसातची, गड चढतो आहे, बरं  हा एकेकाळचा पेत्ताड आणि मला विचारतो आहे दारू सोडलीस का? मी नवसागर पिल्यासारखा चेहरा केला आणि त्याला बाय म्हणालो.

दीड तासाची रपेट करून मी वरती पोहोचलो. गडाच्या मागे जाऊन भरार वारा खाल्ला, गड एकदम स्वच्छ दिसत होता. शासनांनी आणि काही NGO नि चांगले काम केल्याचे जाणवत होते. पोहे खाल्ले, २ ग्लास ताक पिलो. पोहे आणि ताकाचे ९० रु झाले. आणि माझा मध्यमवर्गीय मराठी बाणा जागा झाला. तेवढ्यात एक्स्प्रेस हाय वे वर चहासाठी २० रु मुकाट देण्याचा नतद्रष्ट पणा आठवला आणि पाणी आणणारी ती स्त्री हि आठवली. गपगुमान पैसे दिले आणि खाली उतरायला निघालो.

मजल दर मजल करत कार पाशी येउन पोहोचलो आणि गडाकडे पहिले. बऱ्याच दिवसानंतर आलो होतो. अडीच वर्षांपूर्वी angioplasty झाल्यापासून हे उदयोग कमीच झाले होते. त्यामुळे मस्त वाटले, आणि उगाचच घोषणा द्यावी वाटली "डॉ सुहास हरदास की जय" "angioplasty शोधणाऱ्या Allopathy चा विजय असो" रुबी hall ची ही आठवण आली. त्याचे बिलपण आठवले. रुबी hall चे बिल……… आई ग…………छातीत पुन्हा कळ  आल्यासारखे का वाटतंय.

Saturday, 28 December 2013

पराक्रम



Lead, Educate, Apply, Prosper (LEAP) असेच नाव होते conference चे. मे २०१३, हॉटेल grand hyatt गोवा. By the way, मी अशा भरपूर conferences attend करतो. पंचतारांकित हॉटेल मध्ये सकाळी दाबून ब्रेकफास्ट करतो, दुपारी दाबून जेवतो, दुपारचा High Tea हाणतो, आणि रात्री परत दाबून जेवतो. (मला माहित आहे "दाबून" या शब्दावर तुम्हाला कोटया सुचत आहेत, पण तूर्तास त्या तुमच्या जवळच दाबून ठेवा). तिथे shining पण भरपूर टाकतो. लोकांशी ग्लोबल गाव गप्पा मारतो, तिथे प्रश्न विचारतो, प्रश्नांना उत्तर देतो. एकदम फर्मास. लोकांना वाटते काय भारी माणूस आहे हा! मग परत येतो, रहाटगाडग्यात अडकतो, दाबून खाल्लेलं एव्हाना जिरून गेलं असतं आणि मी माझा नेहमीचा "सर्व जगाचा भार या खांद्यावर आहे" अशी देहबोली करून कामाला लागेलेला असतो.

पण या LEAP मध्ये एका माणसाला ऐकले, आणि "खूप काम आहे विसर ते व्यक्तिमत्व" असं बजावून हि  मनात ते भाषण रुंजी घालत राहतं.तसे तिथे तिघे बोलले श्री शिरगुरकर, श्री केळकर आणि पराक्रम सिंह जडेजा. विषय होता "when  I Was small" पहिल्या दोघांचंही भाषण मनाला उभारी देणारं. अस्खलित इंग्रजीत. दोघंही उच्च विद्याविभूषित आणि अगदी copy book पद्धतीने business वाढवला. म्हणजे प्रॉब्लेम आले पण ठीक होते. मी सांगणार आहे तिसऱ्या वल्ली बद्दल. 

पराक्रम सिंह  त्याचे नाव. सध्याचे वय साधारण ४७-४८. राहणे: राजकोट. त्यांनी भाषण चालू केले, पहिल्यांदाच सांगून टाकले "माझं इंग्रजी कच्चं आहे, त्यामुळे मी हिंदीत बोलेल, जमेल तसं एखादं वाक्य इंग्रजीत बोलेल."  मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. भाऊ बहिणी अभ्यासात हुशार. पण पराक्रम मात्र खेळातच रमलेला. बुद्धीबळ आणि क्रिकेट ची विशेष आवड. यथातथा अभ्यास करत, बुद्धीबळ च्या स्पर्धेत चमकत होता. क्रिकेट जीव कि प्राण. national ला निवड झाली. गाव आठवत नाही पण स्पर्धेला जायचा खर्च होता रु २५०००. पराक्रमच्या वडिलांना ते जमवायला फारच कष्ट झाले. याला माग, त्याला माग, PF काढ. पराक्रम ते बघत होता. स्पर्धा हरला. मनात एकच, पैसे कमावणे इतकं अवघड आहे का? आणि मग सुरु झाली लढाई.

१२ वि नंतर शिक्षण सोडून मामांच्या धंद्यात join होणे, धंदा होता लेथ चे spares बनवणे. हळूहळू स्वतः चे शॉप टाकले, ज्योती enterprises , धंदा तोच, लेथ चे पार्टस बनवणे. साधारण १९९०. ३०० sqft, भांडवल रु ५००००/- (राजकोट लेथ प्रसिद्ध आहेत). ९५-९६ पर्यंत परिस्थिती अशी झाली की सर्वच पार्ट ज्योतीत बनायचे. ज्योती ने मग स्वतःची लेथच काढली. कंपनी वाढली. १२ वी शिक्षण झालेल्या माणसाच्या दृष्टीने ही मजल खूपच होती. पण पराक्रम पुढचा विचार करत होता, आणि त्यांनी CNC Turning Center launch केली. राजकोट मध्ये बातमी झाली "पराक्रम डूबनेवाला है". डीलर ने केलेल्या अपमानामुळे मार्केटिंग स्वतःच. झंझावाती कामाची मेढ रचली होती. कंपनीला भरपूर order मिळू लागल्या आणि भरभराट होऊ लागली.

पराक्रम सिंहची ज्योती आता चांगलीच स्थिर झाली होती. पण आव्हाने स्वीकारण्याची नशा असलेल्या पराक्रम सिंहना आता खुणावू लागले होते आता मशिनिंग सेंटर चे मार्केट. (लेथ चे CNC version म्हणजे Turning Center तर मिलिंग चे CNC Version मशिनिंग सेंटर). २००३ साली २ कोटी उलाढाल असलेल्या ज्योतीचे Imtex Exhibition चे बजेट होते तब्बल २ कोटी, आणि तिथेच launch झाली अत्याधुनिक मशिनिंग सेंटर. आणि त्यानंतर ज्योतीची घौडदौड चौफेर चालू झाली. नवीन प्रोडक्ट रेंज, मोठी जागा आणि अंगात असलेली जिद्द यांवर कंपनी exponential rate ने वाढत होती.  या दरम्यान ज्योतीला ह्युरोन मशीन टूल या फ्रांसच्या कंपनीतून पार्ट बनवण्याची order मिळाली. पराक्रमजी (आता जी म्हणणे गरजेचे होते) नेहमीच फ्रांस ला जायचे.

२००८. ह्युरोन च्या मालकांनी ठरवले कि कंपनी विकायची, आणि ज्योतीचे धाबे दणाणले. मोठा धंदा जाणार होता. पराक्रमजी फ्रांस मध्ये हॉटेलवर विचार करत बसले होते. एका निर्धारानीच झोपी गेले आणि दुसर्या दिवशी सकाळी ह्युरोन च्या मालकाला न भूतो अशी ऑफर दिली "मला तुमची कंपनी विकत घ्यायची आहे." फिरंग्याला वाटले याला वेड लागले. पण पराक्रम जी दृढ होते. negotiations झाले आणि भारतीय मशीन टूल इंडस्ट्रीच्या इतिहासात एक अतर्क्य गोष्ट घडली. राजकोट सारख्या गावातील (भारताचे मशीन टूल manufacturing हे बंगलोर, हैदराबाद, बेळगाव आणि पुण्यात एकवटले आहे) १०० कोटी उलाढाल असलेल्या कंपनीने फ्रांस मधील एक अग्रगण्य कंपनी २५० कोटीला विकत घेतली. पराक्रम सिंह जडेजा ह्युरोनचा चार्ज घ्यायला फ्रांस ला गेले आणि त्यांच्या समोर भारताचा तिरंगा त्या इमारतीवर फडकताना अंगावर रोमांच उभे राहिले होते.

आता ज्योतीचे नाव भारतात अक्षरश: दुमदुमू लागले. आज ती मशीन टूल इंडस्ट्री मध्ये एक नावारूपाला आलेली अग्रगण्य कंपनी आहे.

LEAP मध्ये हे भाषण झाल्यावर २ मिनिटे pindrop silence होता. भारावलेल्या अवस्थेत सर्वजण आपसूक उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मला राहवले नाही, मी बोललो "Parakramji you were humble enough to say that you can't speak English well, and you would speak in Hindi. But your address was so straight from heart that even if you would have talked in your mother tongue Gujarati, we all would have understood it equally well."

मी ३-४ वर्षांपासून जडेजा साहेबाना भेटायचा प्रयत्न करत होतो. यावर्षी जमले. तीन तास दिले आणि अख्खी कंपनी दाखवली. ७५ एकरचा परिसर, अत्याधुनिक infrastructure, Leonardo Da Vinchi R&D  सेंटर, आणि कंपनीच्या आवारात मोठा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सर्वांसाठी खुला. आणि पराक्रम सिंह (ज्यांनी त्यांचे हे नाव ठेवले त्या आई वडिलांना प्रणाम) मात्र पूर्ण जमिनीवर. मागच्या वर्षीची  ज्योतीची उलाढाल रु ७०० कोटींची झाली आहे. आणि पराक्रम सिंह मात्र next generation मशीन च्या development च्या विचारात गुंतले आहेत.


(हा लेख त्यांचे भाषण आणि माझी भेट यावर आधारित आहे. दिलेल्या statistics मध्ये काही बदल असण्याची शक्यता आहे. पण दिलेल्या आकडेमोडी पेक्षा त्यांच्या जिद्दीचा आपण विचार करायला हवा, नाही का!)

Friday, 27 December 2013

योगायोग

कधी कधी ध्यानी मनी नसताना एखादी गोष्ट घडते आणि आपण हतबुद्ध होऊन जातो. त्या प्रसंगातून आपण सही सलामत बाहेर पडतो तेव्हा आश्चर्यच वाटते कि आपण कसे  बाहेर पडलो ते.

माझा लहान मुलगा नील तेव्हा साधारण दीड ते दोन वर्षाचा असेल. माझ्याकडे तेव्हा santro होती. मी आणि नील MG रोड ला गेलो होतो, फोटो फास्ट च्या दुकानात. अरोरा towers  च्या समोर. काही फोटो च्या प्रिंट काढायला दिले होते. त्याची डिलिवरी होती. संध्याकाळची ६ ची वेळ. तेव्हा मग रोड ला वेस्ट एंड च्या बाजूने प्रवेश होता. (म्हणजे आता जो वन वे आहे त्याच्या opposite). मी दुकानासमोर आलो तर गाडयांची मरणाची गर्दी. कार कुठेतरी लांब लाऊन यावं लागणार होतं. माझ्याबरोबर नील. विचार केला दुकानासमोर गाडी ठेऊनच काम झाले तर किती बरं होईल. दुकानाच्या समोर फोटो फास्ट चा एक मुलगा उभा दिसला.

फोटोची चिट्ठी खिशातच होती. hand brake लावला. गाडी चालूच ठेवली. उतरलो. नील गाडीतच. धावतच दुकानासमोर गेलो. त्या मुलाला सांगितले हि फोटोंची डिलिवरी घे आणि मला कार मध्ये आणून दे. आणि धावतच परत आलो. कार चा दरवाजा उघडायला गेलो आणि लक्षात आले कि दरवाजा उघडतच नाही आहे. आणि बघतो तर काय उतरताना मी मुर्खासारखा सेन्ट्रल lock करून खाली उतरलो होतो . दोन मिनिटे कळलेच नाही कि काय झाले ते. आता बोंबला!

म्हणजे situation बघा कशी आहे ती. कार चालू, माझा पोरगा कारमध्ये, मी बाहेर आणि गाडी locked. आतमध्ये टेप वर गाणी चालू होती, AC चालू होता, पोरगं गाण्यावर नाचत होतं………अहो पण मंडळी गाडी पण चालू होती. नशीब handbrake लावला होता. आता करू काय, काहीच सुचेनासे झाले होते. एव्हाना तो दुकानाचा मुलगा फोटो घेऊन आला. माझा पडलेला चेहरा बघून (हे एक माझं फार मोठे नाटक आहे, मनातल्या भावना चेहऱ्यावर लागलीच दिसतात) त्याने विचारले काय झाले? मी सांगितल्यावर तो पण हबकला. बंद काचेतून मी नील शी संवाद साधण्याचा विनोदी प्रयत्न करत होतो. मी बाहेरून काहीही म्हंटले कि ते वेडं पोर नुसते टाळ्या पिटत हसायचं. एव्हाना त्याने  driver च्या सीट चा ताबा घेतला होता. त्याला मी खाणाखुणा करून सेन्ट्रल lock चा नॉब उचलायला सांगत होतो. तो बिचारा त्याच नॉब शी खेळल्यासारखे करायचा आणि नंतर भलतीकडेच बघायचा.

संध्याकाळची वेळ. येणारे जाणारे भरपूर. त्या दुकानातल्या मुलाला, सतीशला, metalic पट्टी आणून मारुती ८०० चा दरवाजा उघडायचा अनुभव असावा. त्याने तो पण प्रयत्न केला. पण फसला. एव्हाना बघ्यांची पण गर्दी वाढली होती. "कसलं येडं आहे" असं माझ्याकडे बघत comment पास करत जात होते. नील चं हसणे जरा कमी होऊन त्याचा चेहरा रडवेला झाला होता. मला दडपण आलं आता या पोरानी भोकाड पसरले तर काय करायचे. मी माझा जास्तीत जास्त चेहरा नॉर्मल ठेवून लोकांना कटवत होतो.  duplicate किल्ली आणण्याशिवाय पर्याय नव्हता.

वैभवीची lab तेव्हा हडपसर ला होती आणि ती अर्ध्या रस्त्यात पोहोचली होती. duplicate किल्ली मी गाडी पुसणाऱ्या कडेच ठेवायचो, घरात नाही. (हा अजून एक मूर्खपणा). वैभवी म्हणाली मी करते manage आणि येतेच अर्ध्या तासात. या नाटयमय प्रसंगाला सुरु होऊन २० मिनिटे झाली होती आणि मला अजून ३० मिनिटे खिंड लढवायची होती.

माझ्या मूर्खपणाला कोसत मी कारला प्रदिक्षणा घालत होतो. तेव्हढ्यात मला मागच्या खिडकीच्या काचेत वरती थोडी gap दिसली. का कोण जाणे, मी त्या काचेवर हात ठेवला आणि खाली ओढल्यासारखे केले आणि काय आश्चर्य! ती काच आली कि खाली. मला आनंदाचे भरतेच आले. फोटो फास्ट चा सतीश पण उड्या मारू लागला. (सतीश माझ्या प्रॉब्लेम मध्ये पूर्ण गुंतला होता). वैभवी रिक्षात बसली होती, तिला सांगितले येऊ नको फत्ते झाली आहे.

मला आठवले, मागच्या काचेची वायर महिन्या पूर्वी तुटली होती आणि handle नुसतेच फिरत होते. आज दुरुस्त करू, उद्या करू अशी चालढकल करत ते राहूनच गेले होते. ते असे माझ्या पथ्यावर पडले होते.

दरवाजा उघडून पहिले सीट वर बसलो, शांतपणे. दोन घोट पाणी पिलो. नील साठी कॅडबरी घेतली होती ती सतीशला दिली, त्याने माझा हात प्रेमाने दाबला आणि म्हणाला "आता जावा घरी, आरामात". मी नील कडे पहिले, तो लहानगा जीव आता अर्धा तास एकटाच खेळून पेंगुळला होता. डोळ्यात तळं साठवून मी त्याच्या डोक्यातून हात फिरवला, आणि गाडी चालू केली, घरी जाण्यासाठी……………… आरामात.


(आता सगळ्याच गाड्यांचे पुढचे दार सेन्ट्रल lock करून लावले तरी lock उघडते, त्यामुळे या प्रॉब्लेम ची gravity कमी झाली आहे, हे आपले नशीब. Thanks to innovative ideas in automobile engineering.)

Friday, 20 December 2013

प्रसंग

प्रसंग

वर्ष २०१०. अमेरिकेतील रॅले गावाचे एयरपोर्ट. माझी शिकागोची फ्लाईट. सकाळी ८ ची वेळ. मी चेक इन काऊंटरच्या लाईनमधे. माझा नंबर आला. माझ्या मागे बरीच लोकं लाईनमंधे. मी तिकीट घेऊन गेलो. तिथे स्वयंचलित मशीन होतं बोर्डींग पास देण्यासाठी. तिकीटावर बारकोड होता. पण तो बारकोड कुठे दाखवायचा हे काही माहित नव्हतं. मी तिकीट मशीनवर वेगवेगळ्या पद्धतीने फिरवत होतो, पण मशीन काही फळत नव्हते. मी समोर बघितले, एक बाई उभी होती. रंगाने डार्क सावळी होती. (अमेरिकेत फळ्याला  black board म्हणता येत नाही). तुच्छतेने माझ्याकडे बघत होती. मी अजीजीने तिच्याकडे बघत होतो, पण बाई काही ढिम्म हलत नव्हती. मि विनंती केली, " could you help me to get the boarding pass please". मदत तर दूरची गोष्ट, बाई सरळ तोंड वाकडं करून निघून गेली.

एव्हाना मी हवालदिल झालो होतो. मागची लोकं शांत होती. पण ती शांतताच मला डाचत होती.

तेव्हढ्यात एक गौरांगना जी माझ्याच मागे लाईनमधे ऊभी होती, पुढे आली आणि माझ्या कानात किणकिणली "may I help you?" आणि मी हो म्हणायच्या आत माझं तिकीट घेतलं, मशीनवर योग्य ठिकाणी बारकोड दाखवला. पटकन माझा बोर्डींग पास प्रिंट होऊन बाहेर आला. हायसं वाटलं. मी सुंदरीला मनापासून thank you म्हणालो. ती परत किंणकिणली "you are welcome" आणि माझ्या पाठीवर थोपटलं. मी मोहरलो. (बोर्डींग पास मिळाला म्हणून, नाही तर तुम्हाला वाटेल थोपटलं म्हणून)

निघालो, पण त्या पहिल्या बाईचा तुच्छतेचा कटाक्ष बरेच दिवस सतवत होता. खोटं कशाला सांगू, आठवलं की अजूनही सतावतो.

आताच्या अमेरिकेच्या घटनेशी संबंध जोडणे, म्हणजे बादरायण प्रकार.

मॅडमची पत मोठी, हुद्दा मोठा आणि अपमानही मोठाच. आपली लायकी ती काय, त्यामुळे आलेला राग एकट्यानेच गिळला. आज गदारोळात आठवण झाली एवढेच. आपला पण हिशोब चुकता झाल्याचे समाधान.


Sunday, 15 December 2013

स्नेहालय-एक अनुभव

आणि यादवबाबा मंदिरात माझी गिरीश सर सगळ्यांशी ओळख करून देत होते "हे राजेश मंडलिक, माझे मित्र". मित्राची ओळख किती जुनी तर दहाएक मेल ची देवाणघेवाण. बस. त्या पहिल्या भेटीनेच गिरीश सरांनी मला खिशात टाकले होते. राळेगण सिद्धी गावाला चक्कर मारून माझ्या गाडीने नगर कडे निघालो. आणि त्या प्रवासात उलगडला गिरीश सरांचा आणि पर्यायाने "स्नेहालय" चा प्रवास. हो तेच गिरीश कुलकर्णी, "स्नेहालय" वाले.

लहानग्या गिरीश ला लहानपणी रेड लाईट भागातून क्लास चा जावं लागायचं. वेळ वाचवा म्हणून short cut. पण ह्याच मार्गाने त्यांचा आयुष्याचा मार्ग बदलला . १३-१४ वर्षे ते ७० च्या वेश्या आणि त्यांचे जीवन बघून गिरीश विचार करायला लागला कि कसे असेल यांचे आयुष्य. त्यांची लहान पोरं तिथेच खेळत असायची. आणि मग वयाच्या २० व्या वर्षी गिरीश कुलकर्णी या युवकाने ठरवून टाकले कि या लोकांना मेन स्ट्रीम मध्ये आणायचे. आणि साकारली एक अद्भुत चित्तरकथा.

६ ची  ६० मुलं झाली आणि राहते घर अपुरे पडायला लागले. "मुलांना आज आपण laptop घेऊन देतो, माझ्या वडिलांनी मला घरात वडिलांनी वेश्या ठेवण्याची परवनगी दिली, पुनर्वसनासाठी" गिरीश सहज पणे सांगून जातात. MIDC च्या माळरानावर एक जमिनीचा तुकडा दिला मुथा परिवाराने. आणि सुरु झाले "स्नेहालय". गिरीश सरांची एकनिष्ठता बघून जास्त जमीन मिळत गेली आणि १० एकराच्या परिसरात आज स्नेहालय उभे राहिले आहे. जवळपास ४०० मुलं मुली (बहुतांशी वेश्यांची) तिथे सांभाळली जात आहेत. यातील निम्य्याहून अधिक HIV positive  आहेत. त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे. सिप्ला foundation तर्फे शाळेची नितांत सुंदर इमारत उभी आहे. सुसज्ज असे कॅन्टीन आहे. जवळपास २० बेडचे हॉस्पिटल आहे. आणि इथे ३rd  स्टेज च्या hiv पेशंटची ट्रीटमेंट दिली जाते अगदी मोफत. अंबादास चव्हाण सारखे कार्यकर्ते गिरीश सरांची वर्षानुवर्षे साथ देत आहेत. आणि त्यांच्या मुलांच्या एकएक कहाण्या ऐकल्या तर माणूस थरारल्या शिवाय राहत नाही. मग ते बलात्काराच्या केस मध्ये मास जन्मठेप घडवून आणणारा साक्षीदार असो, कि सिंगापूर मध्ये एक लाख पगाराची मिळवणारा विद्यार्थी असो, कि श्रीगोन्द्याला फासेपार्धींची मुले सांभाळणारा असो. संस्थेतून कित्येक मुलींचे संसार उभे झाले आहेत. (हो तुम्ही समजताय तसंच, वेश्यांच्या hiv positive मुलींचेच संसार).

"women empowerment" हा शब्द पुष्कळदा ऐकला होता. त्याचा अर्थ गिरीश सरांचा २५ एकरातील  "हिम्मतग्राम' प्रकल्प सांगून जातो. वेश्यांचे पूर्ण पुनर्वसन. पहिले व्यसनमुक्त करायचे, त्यांना व्यवसाय द्यायचा पर्यायी आणि वेश्या व्यवसायापासून परावृत्त करायचे. २५ वर्षापासून चाललेल्या या प्रयत्नांचे दूरगामी परिणाम दिसायला लागले आहेत. नगर जिल्ह्यात आता १८ वर्षाखालील वेश्या नाहीत. पूर्वी नगर जिल्हा, सांगलीच्या मागोमाग वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आणि आता नगर पार तळाला. पूर्वी ९०० वेश्या धंद्याला उभ्या आता उण्यापुर्या २००. वेश्यांच्या मुली हा व्यवसाय सोडून साधे जिणे जगत आहेत आणि मुलं दलालीचा घाणेरडा प्रकार सोडून कंपनी त काम करून अभिमानाचे जिणे जगत आहेत.

कौटुंबिक हिंसाचार आणि कुमारी माता यांना मदत म्हणून "भारत माता" प्रकल्प. स्त्रियांवर होणारे अत्याचार ऐकले तर अक्षरश: थरकाप उडतो. पण गिरीश सर आणि त्यांची टीम लिगल matters पासून ते प्रकरण तडीला नेईपर्यंत सगळी मदत करतात.

आणि या सगळ्यांवर कळस म्हणजे "स्नेहांकुर" प्रकल्प. २-३ दिवसांपासून ते ३ वर्षापर्यंत लहान मुलं मुली बघताना जीव गलबलून जातो. पण तिथे सुद्धा अतिशय सुंदर काळजी. विविध कारणांनी आई बापानी सोडलेल्या लहानग्यांचे इथले असंख्य स्वयंसेवक पालक झाले आहेत. मुलीदेखत वडिलांनी आईचा केलेला खून, बलात्कारातून mentally challenged बाईला झालेला मुलगा, किती आणि कशा केसेस. पण या सगळ्यांची पालनपोषणाची जबाबदारी उत्कटतेने पार पाडली जाते.

मागेच ९०. ४ FM स्वतःचे radio station. समाजप्रबोधन पार संदेश दिला जातो. कमीतकमी २% मतदार मतदानासाठी प्रवृत्त करायचे ही धारणा.

आणि हे सगळे सांगताना कुठलाही अभिनिवेश नाही, आपण काही समाजासाठी करतो आहे अशी भावना नाही. सगळे कसे अगदी सरधोपट पद्धतीने. मग ते आमिरखान च्या सत्यमेव जयते मधून मिळालेली देणगी असो, सिप्ला foundation ने केलेली भरघोस मदत असो, कि Thermax च्या अनु आगा madam ची मदत असो. एवढ्या मोठमोठ्या व्यक्तिशी ओळख असलेले गिरीश सर माझ्याशी तेवढेच समरसतेने सांगत होते. बरं एवढं करून ह्या गृहस्थाची ओळख आता स्नेहालायाचे founder member म्हणूनच आहे. legally ते न तिथले अध्यक्ष आहेत ना सेक्रेटरी आहेत. निरपेक्ष स्वयंसेवक. स्वत: उभ्या केलेल्या संस्थेपासून एवढं detach होऊन पण attach असणे अवघडच. पण गिरीश सर सहजतेने करतात. आपण निकराने आवंढे गिळत असताना गिरीश सर एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे विविध विचार सहजपणे सांगत जातात.सच्च्या विचारांना लोकांची जोड मिळत जाते तशी सरांच्या कार्याला असंख्य लोकांचे हातभार लागले आहेत. 

गिरीश सर, तुमच्यासारखे लोकं जगात आहेत म्हणूनच हे चाक फिरते आहे, अव्याहत.

स्नेहालय-एक अनुभव

Thursday, 12 December 2013

प्रकरण आणि confession

मला सौ तेजपाल, सौ आहुजा, सौ हिलरी क्लिंटन या गृहिणीचं फारच कौतुक वाटतं  बुवा! कसल्या पाठीशी सॉलिड उभ्या राहतात त्या नवऱ्याच्या. एकदम खंबीर! मानलं. नाहीतर आमच्या मंडळी. असं काही सत्कृत्य माझ्याकडून झालं तर पोलिसाला मंडळ च सांगेल "घ्या हो याला जरा खोपच्यात" "ते टायर ची treatment काय असते हो, बराच ऐकले होते, तीच द्या याला म्हणजे चांगलं जागेवर येईल" "नाहीतर याच्या …………… " (पुढचं वाक्य तुम्ही तुमची प्रतिभाशक्ती वापरून पूर्ण करू शकता)

साधारण २००३-४ ची गोष्ट असेल. मी रोबोटिक्स आणि आटोमेशन वर एक आर्टिकल लिहिले होते. त्या magazine मध्ये एक सेल्स executive होती . मुंबईला असायची. लेखापुरते आपण तिचे नाव सोनिया ठेवू यात. (खरं तर सकाळपासून हे नाव ठरवण्यात खूपच वेळ गेला. म्हणजे फेसबुक वर कोणी या नावाचे friend नाही आहे ना, पंचक्रोशीत या नावाची कुणी स्त्री नाही आहे ना, जुन्या मैत्रीणीपैकी हे नाव कुणाचे नाही आहे ना , याची शहनिशा करूनच हा नामकरण विधी पार पडला.) तर हि सोनिया माझ्या खूपच मागे लागली होती, (पुढे वाचा) म्हणजे लेख लिहिण्यासाठी. मी खूप बिझी आहे वैगेरे सांगून टाळत होतो. खरंतर इंग्रजी मध्ये लिहायचे म्हणून मी उडवत होतो. पण ती फारच चिकाटीची होती. सारखा follow up करून पार भंडावून सोडलं होतं. शेवटी मी एक यथाबुद्धी लेख लिहून पाठवला. आर्टिकल पब्लीश झाल्यावर मला १५ दिवसानंतर फोन आला आणि सोनिया म्हणाली "आर्टिकल फारच छान लिहिले आहे" मी आभार मानून फोन कट केला.

त्यानंतर १५ दिवसानंतर परत फोन "पुढच्या issue साठी आर्टिकल लिहा ना" आयला म्हंटलं आली का आफत. मी तेव्हा आतासारखा रिकामटेकडा नव्हतो, खरंच खूप बिझी होतो. परत technical गोष्टीवर लिहा, म्हणजे डोकं वापरा, चार इंजीनियर ते वाचणार, त्यावर प्रश्न विचारणार. खुराकच की हो तो!  हे आता लिहीतो तसं नाही, वाचलं तर वाचलं कुणी, नाहीतर राहील गुगलच्या सर्व्हर वर सडत. मी म्हंटलं "बघतो" आणि तिथं फसलो. (सरळ नाही म्हणताच येत नाही. आयुष्यातल्या बर्याच प्राॅब्लेम चं ते प्रमुख कारण आहे).

"लिहा ना प्लीज़, माझी पर्सनल रिक्वेस्ट समजा" "सर पाठवताय ना आर्टिकल" "लिहायला घेतलय की उगीच थापा मारताय" अशा संवादांनंतर संभाषणाची गाड़ी दुसर्या विषयांकडे कधी वळली ते कळलंच नाही. "बरंच फिरता हो तुम्ही" "मजा आहे, वेगवेगळी गावं बघता" "काय जेवलात आज" "माझ्यासाठी पण आणा की काहीतरी दिल्लीहून" आरं तिच्या मारी, प्रकरण पुढं चाललं होतं. बरं मी तिला सांगितले की मी married आहे, मला एक पोरगा आहे. नंतर सोनियाचे फोन महत्वाच्या मिटींगमधे असताना यायला लागले. फोन उचलला नाही तर तासा दोन तासानी यायचाच, हडकून टाकत पण नव्हतो. बरं तेव्हा हे फ़ेसबुक पण नव्हतं. प्रवासात फोन आला की वेळ कटून जायचा. आर्टिकल वैगेरे बाजूला राहिलं. Virtual flirting चं म्हणा की. पण एक मात्र खरं की मी तिला स्वत:हून फोन कधीच करायचो नाही. पण आला आणि वेळ असेल तर गप्पा पण ठोकायचो.

एकदा मी कार चालवत होतो, वैभवी बाजूला आणि मागे कुणी पाहुणे होते. मोबाईल समोरच होता. तेव्हढ्यात मेसेज आला.  सहसा बायको माझा फोन घेत नाही आणि मेसेज तर त्याहून नाही. पण तो घेतला आणि तो सोनियाचा होता "तुम्हारी याद में " अशा धर्तीचा शेर होता. वैभवी वाचून दाखवत होती, लक्षात आलं ल्याेचा झालाय. झटकन फोन हिसकावला आणि मेसेज डिलीट करून टाकला. पण झालं, मेसेजनी आपलं काम बरोबर केलं होतं. बायकोला संशयच नाही तर खात्री झाली काहीतरी गडबड आहे. घरी गेल्यावर मला विचारलं काय प्रकार आहे. मी आपला साळसूदपणाचा आव आणत "नाही तसं काही नाही, उगाच आपलं" म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण वैभवी काही बधली नाही, तिने शांतपणे पण फर्मली विचारलं "जे काय आहे ते, खरं सांग" मी पण मग देवाशपथ खरं सांगेल, या धर्तीवर जे आहे ते सांगून टाकलं.

वैभवी म्हणाली "तिचा फोन नंबर दे" माझ्याकडे तो नव्हता, मेसेज डिलीट केला होता. पण ती हट्टालाच पेटली, म्हणाली
आताच संपवायचा हा विषय. माझी एकदम ट्यूब पेटली, received काॅलमधे असेलच. सापडला. वैभवीनी तिला
समजावून सांगितले की हे जे काही चालू आहे ते चुकीचं आहे. मला पण सांगितले की "ती नादान असेल, पण तुला तर
अक्कल पाहिजे की नाही" मी चूक क़बूल केली. खरं म्हणजे मी जे सोनियाला सांगायला पाहिजे होतं, ते वैभवीने सांगितलं

त्या दिवसापासून कानाला खड़ा लावला. प्रवासात सुद्धा कुणी स्त्री वर्ग शेजारी आला की……… . खरं सांगू, कुणी येतंच नाही हो. जवळपास दहा वर्ष झाली या गोष्टीला, पण आजही मेसेज आला की वैभवी तो कटाक्षाने वाचते. काय करणार "बूँद से गयी ………….

पण तुम्हीच सांगा या पार्श्वभूमीवर त्या तीन सौ बद्दल कौतुकमिश्रीत आदर वाटणे सहाजिकच नाही का?

Sent from my iPad

Sunday, 8 December 2013

आयुष्य

आज सकाळी ६:३० वाजता कार घेउन बाहेर पडलो. समोरच्या काचेवर धुकं साचले होते. काचेतुन फारच अंधुक दिसत होते. वायपर चालवले. काही क्षणापुरते दिसले, पण परत काचेवर फाॅग जमा झाला. एसी चं तापमान कमी जास्त करून बघितलं, पण काहीच फरक पडला नाही. फारच विचित्र वाटत होतं. तेव्हढ्यात समोर एक खड्डा आला. समोरच्या काचेतुन ठीक दिसत नसल्यामुळे, खड्ड्यात आदळली. पण फार काही नुकसान न होता पुढे जात राहिलो.  खिडकीची काच ख़ाली केली, वर केली, पण समोरच्या काचेवरचा फाॅग काही कमी होइना. समोरून दूसरी कार आली. आदळलोच असतो. थोडक्यात वाचलो. आता मी अगतिकतेने काचेला आतल्या बाजूने हाताने साफ करून ते धुकं घालवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो.  मी हतबल झालो होतो.

अचानक बाहेरचं तापमान आणि कारमधील आतलं तापमान याची काहीतरी सांगड घडली आणि आश्चर्य म्हणजे समोरच्या काचेवरचं धुकं नाहीसं झालं. समोरचा रस्ता लख्ख दिसायला लागला. मला कळलंच नाही, माझ्या प्रयत्नानी हे घडलं की आपोआपच. मला एकदम हायसं वाटायला लागलं आणि कार चालवायला मजा यायला लागली.

आयुष्य हे साधारण आपण असंच जगतो, नाही का?

Friday, 29 November 2013

दंगल

  २७ फेब्रूवारी २००२. कच्छ एक्सप्रेस चं बुकिंग, गांधीधाम साठी. मी, मोहन चोलकर आणि कराडकर. ट्रेन साधारण संध्याकाळची. तोपर्यंत आम्हाला बातमी येउन पोहोचली, गोध्राला साबरमती एक्सप्रेस चा डबा जाळला आणि वातावरण तणावयुक्त. मी मोहनला विचारलं, cancel करू यात का?. मोहन म्हणाला "काम पण महत्वाचं आहे, जाऊ यात". मी पण विचार केला, काय होणार होऊन, उद्यापर्यंत शांत होईल. मी मान होकारार्थी डोलावली. प्रवास चालू झाला. वेगवेगळ्या बातम्या कानावर येत होत्या. पण फार काही सिरीयस वाटत नव्हतं. व्यवसायाच्या गप्पा चालू होत्या. एक एक गाव मागे चाललं होतं. अहमदाबाद आलं असावं कधीतरी रात्री. ट्रेन पण बर्याच वेळ थांबली होती, नेहमीप्रमाणे. आणि चालू पडली.

 सकाळी गांधीधाम आलं. व्यवहार सुरळीत चालू होते. कंपनीची गाडी आली होती स्टेशनवर. गेस्ट हाऊसला घेउन गेली. फ़्रेश झालो. पहिली मिटींग झाली. आणि ११ वाजता चुलत भावाचा ठाणयाहून फोन आला (त्याला माहित होतं मी गुजरात गेलो आहे ते.) म्हणाला "अरे अहमदाबाद पेटलं आहे, तु बरा आहेस का?" मी म्हणालो "इथे सगळं व्यवस्थित आहे" म्हणाला काळजी घे. दुसरं काम हातात घेतलं. एक तास गेला आणि त्यानंतर मात्र फोनची लाईनच लागली. "कुठे आहेस, कसा आहेस, कशासाठी कडमडलास तिथे, कसला राडा चालू आहे तिथे" मी प्रत्येकालाच उत्तरं देउन थकलो, "अरे इथं काहीच प्राॅब्लेम नाही आहे, काळजी घेईन" अशा वेळेस सर्वांना फारच काळजी वाटते, सहाजिकच आहे म्हणा ते. बंगलोरहून माझ्या बाॅसचा फोन आला "पहिली फ़्लाइट घे आणि मुंबईला ये" माझ्याबरोबर मोहन आणि कराडकर. आमचं संध्याकाळच्या ट्रेन चं परतीचं तिकीट होतं.

एव्हाना दडपण वाढत चाललं होतं. मोहन निवांत होता. म्हणाला "काही नाही, ट्रेननी जाऊ" त्याला आणि कराडकरांना बडोद्याला उतरायचं होतं. PSL कंपनीत सर्व कामे सुरळीत चालू होती, काहीच टेन्शन नव्हतं. सटारली होती ती या फोनमुळे. बोनीचा बंगलोरहून निर्वाणीचा फोन आला "निघालास की नाही" मी म्हणालो "ट्रेननीच येतो़" त्याची सटकली, म्हणाला "are you crazy". त्याला कसंबसं समजावलं. "Take care" म्हणताना त्याच्या शब्दातून काळजी टपकत होती हे मला फोनमधूनही जाणवलं.

घरच्यांचा फोन आला. वैभवी बोलली, "काय ठीक आहे ना" म्हणालो "हो" "ठीक आहे, ये व्यवस्थित" कूल, एकदम शांत,  आक्रस्ताळेपणा नाही, अती काळजी नाही, तिचा तो शांतपणा त्या अवस्थेत मानसिक उभारी देउन गेला. हे नेहमीच होत आलं आहे, त्यावेळेसही झालं, आणि अंतापर्यंत होत राहील. मी काहीतरी राईचा पर्वत ऊभा करायचा आणि वैभवीने त्याच्यावर शांत प्रतिक्रिया देउन, त्याला वितळवून टाकायचं.

काम आटोपलं, आणि आमची त्रयी स्टेशन वर पोहोचली. बघतो तर काय खचाखच भरली जाणारी ट्रेन रिकामी. मोजकीच माणसं. आमचं २ एसी चं तिकीट होतं, तिथे आनंदच होता. आनंद कुठला, पूर्ण डब्यावर एका अनामिक दडपण होतं. अख्ख्या डब्यात आम्ही तिघंच.  पहिल्यांदाच मी मनातून टरकलो. मोहन आणि कराडकर पण टरकले असावेत. आम्ही तिघंही धैर्य चेहर्यावर अक्षरश: गोळा करत होतो. Be brave, pretend even if you are not. Nobody can tell the difference. हे वाक्य आम्ही जगत होतो.

गाडी हलली, coach attendant आला, त्यानी गुड न्यूज़ दिली, TC नी पण दांडी मारली होती. म्हणजे पूर्ण ट्रेन मधे एकही TC नव्हता. आम्हाला सांगितले "गाडीच्या बाहेर निघून नका, दरवाजे बंद ठेवा" त्यानी पण उसनं अवसान आणलं होतं. जसाजसा अंधार पडत गेला, आमचं बोलणं मंदावत गेलं. (रात्रीच्या जेवणाचं काय केलं आठवत नाही). गाड़ी वेगवेगळ्या स्टेशनवर थांबत होती, पण प्रवाशांची देवाणघेवाण तुरळक. झोपण्याचा प्रयत्न केला. कराडकर आणि मोहन गाढ़ झोपले होते, मला त्यांचा हेवा वाटला.

झोपण्याच्या धडपडीत २;३० वाजले, आणि गाड़ी एका मोठ्या स्टेशनवर थांबली. बराच प्रयत्न करून नाव वाचलं "अहमदाबाद". प्लॅटफाॅर्मवर एक भयाण शांतता होती. अक्षरश: कुत्रसुद्धा नव्हतं. त्या नेहमी गजबजलेल्या स्टेशनवर काळ जणू थबकला होता. भारतातलं हे बिझी स्टेशन मलूल होऊन पडलं होतं. (अहमदाबादला माझी तेव्हा महिन्यात एक चक्कर व्हायची). गाडी तिथून हलली, तेव्हा विषण्णता आणि भितीचं गार्रूड माझ्या मनावर सवार झालं होतं.

सकाळी ५ वाजता बड़ोदरा आलं, मोहनचा भाऊ पोलीसच्या गाडीमधून त्यांना घ्यायला आला होता. माझी खूप इच्छा होती, त्यांनी माझ्याबरोबर मुंबईला यावं, पण तो वडोदर्याला उतरण्यावर ठाम होता. तिथे डब्यात दूसरे २-४ प्रवासी आले पण ते माझ्या बर्थपासून बरेच लांब होते. आता मी एकटाच होतो.

सकाळ झाली, तेव्हा अंकलेश्वर आलं. दोघंजण डब्यात आले. त्यांच्या डोळ्यात भिती दाटून आली होती. पाय छातीशी आवळून दोघं एकमेकासमोर बसले. माझ्याकडे बघून कसंनूसंच हसले. माझी नज़र टाळत होते. दिवस चढ़त होता आणि गाडी सुरत पार करत महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करती झाली. त्याबरोबर त्यतल्या एकाने मोबाईल काढून घरी फोन केला आणि रडतरडत सांगितले की ते सुखरूप आहेत. फोन बंद केल्यावर त्याने हमसाहमशी रडून घेतले. सावरल्यावर मी त्याला विचारले "काय झाले"?

ते दोघं मुस्लिम होते, मुंबईचे. अंकलेश्वरला त्यांचं गोडाऊन होतं.(कसलं ते विसरलो). दंगलखोरांनी भस्मसात केलं होतं, आगीमधे. आणि त्यांच्या मागावर होते, जिवे मारण्यासाठी. दिवसरात्रआसरा शोधत होते, पण कुणीच थारा दिला नाही. लपूनछपून ही गाडी पकडली आणि त्यांचा जीव वाचला होता.

मुंबईला पोहोचलो, माझा हात प्रेमाने दाबून ते निरोप घेऊन गेले. मी दादरला एशियाड स्टॅंडला पेपर घेतला, आणि मला जाणवलं की मी कुठल्या भयाण दिव्यातून सहीसलामत आलो आहे.

त्या विचारातच माझा बसमधे निवांत डोळा लागला माझ्या घरी पोहोचण्यासाठी.














Wednesday, 27 November 2013

आमची मुंबई

आज फार दिवसांनी मुंबई चे जीवन परत अनुभवले. १९९४-२००२   मुंबईला आठवड्यात २-३ वेळा यायचो. त्यात २००० पर्यंत माझा पुणे मुंबई पास होता आणी मुंबई मधे फिरण्याची मदार लोकल, रिक्षा, बस, टॅक्सी आणि पायी चालणे याच्यावर असायची. दादर, ठाणे, कांदिवली, LBS रोड, साकीनाका, मरोळ असा बेफाम संचार असायचा . त्या काळात स्टेशनच्या विविध बल्लवानी या पोटाची भूक भागवली आहे. दादर वेस्टला पंपाचा वापर करून ताक घुसळले जायचं आणि पाइपमधून वेगानी सोडले असायचं. फारच भारी दिसायचं ते दृश्य. मी आपसूकपणे खेचला जायचो त्या स्टॅालवर, आणि २-३ ग्लास रिचवूनच बाहेर पडायचो. दिवसभर काम करून थकलेला मी डेक्कनच्या पासहोल्डरच्या डब्यात लागलीच झोपून जायचो. डब्याला दोन अक्षरी नाव (बहुधा चीना) असलेला वेटर होता. तो माझ्यावर फारच लळा लावून होता. कर्जत आलं की मला उठवायचा, माझं आवडतं आॅम्लेट आणायचा आणि मग चहा. काही वर्षांपूर्वी तो रिटायर झाल्याची बातमी वाचली. उगाचच सैरभैर झालो होतो. २००० ला मी सॅंट्रो घेतली, आणि एक्सप्रेस हायवे पण चालू झाला, आणि माझं रूटीन सुटलं.

आणि आज पुन्हा तेच अनुभव जवळपास १३ वर्षानी. चांदिवलीला रिक्शा पकडली अंधेरी स्टेशनसाठी. हो! त्याच भैयाची, राज ठाकरे ज्यांची धुलाई करतात तोच भैया. मुंबईकरांचं माहिती नाही, पण मला तर ही जमात ईमानदारच भेटली आहे. आणि आमच्या पुण्याच्या मराठी रिक्शावाल्यांच्या पार्श्वभूमीवर तर फारच भारी. तोच परिचयाचा साकी विहार रोड, सीप्झ, मरोळ, आणि अंधेरी स्टेशन. आणि तीच लोकलची तिकीटाबारी. तशीच लगबग, तशीच घालमेल. फर्स्ट क्लासला लाईन नव्हती, मोह झाला होता तिकीट काढायचा. पण आवरलं, म्हंटलं आजचा दिवस तोच १३ वर्षापूर्वीचा. बॅग सांभाळत आलो प्लॅटफाॅर्मवर. मग आली मुंबईची शान, डार्लिंग, जीवनरेखा, चर्चगेट फास्ट. धक्काबुक्की, पाकिट जाण्याची चिंता, गर्दीतून लोकांची मदत घेत बॅग रॅकवर.

तोच घामाचा वास, तीन जणांच्या सीटवर बूड वाकडं करून चौथ्याचं बसणं. त्या गर्दीमधे "ते प्रेमी यूगुल'. आजूबाजूंच्या लोकांची पर्वा न करता त्यांचं एकमेकांच्या डोळ्यात बघून बोलणं. बाहूचा तट करून तिला अनाहूताचा स्पर्श होऊ नये म्हणून त्याची धडपड. दादरला लोकांच्या लोंढ्यानीच बाहेर फेकली गेलेली लोकं. आणि त्यानंतर लोकलच्या छोट्या विश्वात आलेलं रितेपण. खिडकीची जागा, आणि वेगामुळे घामेजलेल्या अंगावर आलेली वार्याची झूळूक. गॅझेटच्या जमान्यातसुद्धा महाराष्ट्र टाईम्सला चतुर्थांश  फोल्ड करून वाचणारी माणसं.

सेंट्रलला उतरलो, आणि मेनला आलो. मुंबई पोलिसबरोबर सलामी, आणि समोर माझं दुसरं प्रेम, राजधानी (पहिलं डेक्कन) . थकलेल्या शरीराला  डब्यातल्या थंड वातावरणांनं जरा हायसं वाटलं.

बरोबर ४:४० ला राजधानी हलली, आणि मी नोस्टाल्जिक होत मावळत्या सूर्याच्या साक्षीने भारताच्या आर्थिक राजधानीला निरोप देता झालो, ते राजनैतिक राजधानीला भेट देण्यासाठी.


Monday, 18 November 2013

प्रिय अमोल,

प्रिय अमोल,

सस्नेह नमस्कार!

कालच तुला भेटून आलो. तेव्हापासून तुला पत्र लिहायचे ठरवत होतो. शुक्रवारी रात्री "ती घटना" डोक्यातून जात नव्हती आणि रविवारी रात्री तू डोक्यातून जात नव्हता.

ज्या धीरोदात्तपणे तू या प्रसंगाला सामोरे गेलास त्याला शप्पथ सांगतो तोड नाही. एक वेगळ्याच प्रकारचे असीम धैर्य तू दाखवलेस याचा मला अभिमान वाटतो. गेल्या काही वर्षातील तुझे transformation  हे अक्षरश: स्तिमित करणारे आहे. एवढे आभाळ कोसळले तरी तू अचल होतास आणि मला जाणवले कि माझ्यासारखे सामान्य जीव कसे आपल्या दु:खाला कवटाळून बसतात आणि त्याचेच कौतुक करत बसतात. तुझ्या ह्या खंबीरपणापुढे मी नतमस्तक झालो आहे.

गेल्या ४-५ भेटीत मला असं जाणवतं आहे की अमोलच्या हातून काहीतरी अजोड असं घडणार आहे आणि या जाणिवेची चुणूक मला रविवारी दिसली. तुझी M.E. ची परीक्षा आहे असं आईकडून कळले, त्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. अध्यापन क्षेत्र अतिशय पवित्र आहे आणि तू तुझ्या आयुष्यात त्याला पुरेपूर न्याय देशील याबाबत मी नि:संदेह आहे.

आपल्या पंखाना शक्ती देण्याची तू गेली अनेक वर्षे प्रामाणिक प्रयत्न करतो आहेस आणि प्रयत्नांना यश येताना दिसत होते  आणि त्यातच हे अघटीत घडले. "ती घटना" हि दुर्दैवीच, पण त्या सगळ्यातून गरुड  पक्ष्याप्रमाणे तू तुझ्या जीवनरूपी अंबरात मुक्त विहार करणार आहेस याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही.

विधात्याने तुझी हरघडी परीक्षा घेतली आहे, पण आता माझी खात्री झाली आहे कि त्यावर तू आता विजय मिळवला आहेस. अतिशय तावून सुलाखून तू आता बाहेर आला आहेस. तू आता जगाला दाखवून दे कि भट्टीत आगीचे चटके बसल्यावर सोने कसे झळाळून उठते ते!

कुसुमाग्रजांची एक कविता आहे "कोलंबसचे गर्वगीत" त्यात कोलंबस त्या खवळलेल्या समुद्राला आव्हान देतो तद्वतच तु देखील त्या जगन्नियंत्याला आव्हानच दे. त्या कवितेचं शेवटचं कडवं

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला

या संसाररूपी सागरात तुझी नौका आता पूर्ण ताकदीने सोड, फडफडणार्या शिडांना योग्य दिशा देत.

तू आता स्वयंपूर्ण आहेसच , तरी माझी कुठलीही मदत लागली तर नि:संकोच पणे बोलणे. तुझा हक्कच आहे तो!

अशीच तुझी विचारधारा सकारात्मक  भावनेनी भरलेली असू दे.

जास्त काय लिहू. शब्दच गोठले होते तिथे तुझ्याच धैर्यशील पणामुळे इतके लिहिण्याची ताकद आली.

पुन्हा एकदा तुझ्या अतुलनीय धैर्याला सलाम

राजेश

तळटीप: तुला हे बोल ऐकवून शहाणपणा दाखवणारा नतद्रष्ट मी, "ती" ला न भेटण्याची खंत आयुष्यभर बाळगून राहील


Sunday, 3 November 2013

परदेशवारीच्या worries भाग ३ (शेवट)

२ ० १० चा अमेरिकेचा हा माझा पहिलाच दौरा. युनिडो IMTMA च्या delegation बरोबर गेलो होतो. एकूण २५ जण होतो. १० दिवस खूप धमाल केली. राष्ट्रीय समेलनच होते म्हणा ना. कारण delegation मध्ये पूर्ण भारतातून लोकं समाविष्ट केले होते. IMTS हे exhibition आणि काही industrial visits असा भरगच्च कार्यक्रम होता. त्या दिवसानंतर पुढचा १ आठवडा मी एकटाच अमेरिकेत फिरणार होतो. Detroit ला आमचा ग्रुप आपापल्या वाटेने जाणार होता.

मला Detroit मध्येच सेटको कंपनीच्या प्रेसिडेंट ला भेटायचे होते. (पुढे २०१२ साली या Setco शी आमचे joint venture झाले. JV कुठले majority stake विकतच घेतले आमच्या कंपनीत आणि मी धंदेवाईक नोकरदार चा परत नोकरदार झालो. बघू कसं होतंय पुढे ते!). रविवारी रात्री संजय अभ्यंकर ने मला Novi भागात crown plaza नावाच्या हॉटेल मध्ये सोडलं. सोमवारी सकाळी प्रेसिडेंट जेफ क्लार्क मला कंपनीत घेऊन गेले.  मीटिंग मस्तच झाली. मी खरं तर त्यांच्याकडे टेस्टिंग मशीन विकत घ्यायला गेलो होतो तर त्यांनी मिटींगच्या शेवटी मला म्हणाले "ते मशीन आपण नंतर बघू, let us  talk of working together in India". त्यामुळे मी थोडा हवेतच होतो. मिटिंग संपवून साधारण दुपारी ४ वाजता हॉटेल ला परत आलो . मला सोडून जेफ लगोलग Cincinnati ला गेला. दुसर्या दिवशीपासून Detroit, Charlotte, Raleigh, बोस्टन आणि शिकागो असा एक आठवडयाचा कार्यक्रम होता. सगळ्यांचे फोन नंबर मी blackberry मध्ये store करून ठेवले होते. त्यामुळे निर्धास्त होतो. 

JV ची ऑफर भारी वाटल्यामुळे मला लागलीच पुण्याला माझ्या business partners हे कळवणे क्रमप्राप्त होते. आणि हॉटेलच्या नेट रूम मध्ये मेल लिहायला बसलो. का कोण जाणे मला खूपच झोप येत होती. कशीबशी मेल लिहून संपवली आणि रूम मध्ये आलो. शर्ट काढला आणि hanger ला लटकवण्याची पण तसदी घेतली नाही. (या माझ्या सद्गुणापयी मी बायकोच्या खूप शिव्या खातो). तिथेच टेबलवर उलटा टांगला आणि झोपी गेलो. विचार केला एक ते दीड तासात उठावे आणि नंतरचा वेळ घालवावा.

जाग आली आणि जरा तिरमिरीतच उठलो. किती वाजले हे बघण्यासाठी blackberry फोन शोधत होतो. शर्ट च्या वरच्या खिशात सहसा मी ठेवतो. नाही सापडला. trouser च्या खिशात पण नव्हता. रूमचे लाईट लावले आणि रूम धुंडाळली. (साले या स्टार हॉटेलचे लाईट एवढे डीम का असतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे) रूम च्या घड्याळात बघितले, रात्रीचे ८ वाजले होते. आयला फोन गेला कुठे. एव्हाना मी झोपेतून शुद्धीवर येत होतो आणि तशी मला वास्तवाची जाणीव व्हायला लागली. माझे अमेरिकेतले सगळे contacts, आणि भारतातले जवळपास ७५० नंबर फोन मध्ये stored होते. झालं, आली का पंचाईत. नेट रूम मध्ये फोन असेल असं वाटलं, नव्हे खात्रीच होती. मी तिथून उठून ४ तास होऊन गेले होते. तरी पण बघावं सापडतो का ते नाहीतर ज्याला सापडला त्याने reception ला दिलाच असेल.

नेट रूम ला बघितलं, फोन नव्हता. reception ला विचारलं, त्यांनी हि इमानेतबारे त्यांचं डेस्क धुंडाळलं आणि नकारार्थी उत्तर मिळालं. माझी सटपटली. सगळे contacts फोन मध्ये. अक्खा १ आठवडा काढायचा या अजस्त्र देशात. बरं त्या फोन मध्ये मित्राचं सीम, जे मी पुण्यात borrow केलं होतं. मला काही सुधरेनां. त्या receptionist नी हॉटेलचा maintenance बघणाऱ्या एका पंचविशीतल्या पोराला बोलावले. पीटर  त्याचे नाव. (हो इथे सिमरन ही नव्हती आणि air होस्टेस पण. सगळ्या बाब्यांचा मामला होता अगदी हॉटेल स्टाफ सकट).

तो पण म्हणाला " I checked the net room some time back and I found nothing. Normally people are honest here but you never know if some one has picked up and put it in his pocket". म्हटलं बोंबला. पीटर तसा technosavy होता. त्याने पहिले मला विचारले तुझा नंबर मीहिती आहे का? मी रूम मध्ये गेलो आणि मित्रांनी दिलेलं सीम चे पाकीट घेऊन आलो. हो त्यात नंबर होता. पीटर नी फोन लावला आणि मला ऐकवले "the number you have called is out of service". सगळा खेळ संपला होता.

पीटर ला म्हणालो "it is a costly phone, but that is not a worry, the data is dam important. and moreover my US contacts are stored there" (खरं तर तो कॉस्टली फोन आहे ही माझी मोठी worry होती. पण प्रोब्लेम मध्ये ही आपण फेकण्याचा बाणा काही सोडत नाही). तो म्हणाला "do not get panic, we will try something". त्याच्यामध्ये मला आता देवदूत दिसू लागला होता. त्यांनी त्याच्या palmtop वर चेक केलं t mobile चं जवळ outlet आहे का आणि मला सांगितले की रस्ता क्रॉस केला की twelve oaks नावाचा mall आहे तिथे t mobile चे outlet आहे ते तुला मदत करू शकतील.

मी तडक निघालो, तर पीटर नी मला विचारले "कसा जातो आहेस" मी म्हणालो "हे काय जातो कि चालत" पीटर म्हणाला "this is US, and this is motorway, you will not be able to even cross the road. I will take you there in my car" अमेरिकेचे हे एक अजब तर्कट आहे. सगळीकडे गाडीने. चालायला मागतच नाही कुणी. शहराच्या बाहेर तर हे फार प्रकर्षाने जाणवते. pedestrian साठी सोयीच कमी. अर्थात हे माझं observation.इथे मला arden गावाचा किस्सा सांगण्याची इच्छा होत आहे पण ते नंतर कधीतरी. (युरोप मध्ये याच्या अगदी उलट. पहिले पायी जाणार्यांसाठी सोयी मग ते कुठेही असो) .

पीटर मला mall ला घेऊन गेला आणि म्हणाला "रश, दुकान ९ वाजता बंद होणार आहे". त्या अवाढव्य mall मध्ये मी प्रवेश करता झालो. आणि ते tmobile चे outlet ५ मिनिटात सापडले. मी त्यांना सांगितले की काय झाले. सेल्समन माझ्याशी अगम्य अशा इंग्लिश मध्ये काही तरी विचारू लागला. (युरोप मध्ये इंग्लिश बोलतच नाहीत आणि इथे बोलतात तर आपल्याला कळत नाही. त्यातल्या त्यात ह्या मिशिगन स्टेट मधील लोकांचे इंग्लिश तर भयानक फास्ट. north कॅरोलिना मध्ये आपल्याला कळेल असा स्पीड). मी त्याला म्हणालो "जर दमाने घे, आधीच माझी तंतरली आहे तू अजून घाबरवू नको." पण मला असं जाणवलं कि तो मला मनापासून मदत करतो आहे.

T Mobile वाल्यांनी तो माझा नंबर चेक केला आणि पाचच मिनिटात एक दुसरे सीम कार्ड दिले आणि म्हणाला "ya this is your new sim". मी अविश्वासाने त्याला म्हणालो "of the same number" तो वदला "of course". मला काही document नाही मागितले, identity proof, नाही कि पासपोर्ट नाही. मी विचारले कि "पैसे किती झाले" तर तो शांतपणे म्हणाला "काही नाही फुकट". आता कुठलीही गोष्ट फुकट मिळाली कि आपला आनंद कसा अवर्णनीय असतो. मी आभार मानतच निघायच्या तयारीत होतो.

मंद बुद्धीचा मी, आता ते सीम कार्ड कुठे घालणार  होतो (नका निरनिराळे तर्क लढवू. साधं सरळ वाक्य आहे हे). मी परत सेल्समन कडे माझा गरीब चेहरा केला, त्यानी ताडलं, म्हणाला "instrument" त्यानी माझी एकूणच वागणूक बघता एक ५० dollars चा नोकिया दाखवला. माझ्या चेहऱ्यावर प्रश्न दिसतच होता "हा पण फुकट का" तो बघूनच सेल्समन आधीच शहाणा झाला आणि म्हणाला "५० dollars". मी म्हणालो "दे बाबा" तेव्हढ्यात त्याला बहुधा माझी कीव आली असावी. "take this phone. it costs $ 20 in the scheme. Take out existing sim and throw it off and insert your sim" त्यांनीच माझं सीम घेतलं, फोन मध्ये टाकलं आणि म्हणाला " ya now this ready to use" मी धन्य झालो. एखादा प्रोब्लेम एवढ्या चुटकी सरशी सुटू शकतो ह्याची मला जाणीवच नव्हती. त्याचे  मी मनापासून आभार मानले आणि खुशीतच निघालो. (२० डॉलर्स दिले बरं का!)

बाहेर पीटर वाट बघत होता. मी १५ मिनिटात परत आलो होतो. त्याच्यामुळे माझा फोन अर्ध्या तासात परत चालू झाला होता. मला घेऊन त्याने परत हॉटेल ला सोडले. पीटर ची बहुधा duty संपली होती आणि त्याने फक्त माझ्यासाठी वेळ काढला होता. मी त्याचेही मनापासून आभार मानले.

रात्रीचे थोडे खाल्ले आणि रूम मध्ये येउन विचार करू लागलो कि laptop मधून मेल बॉक्स मधून US चे contacts काढावेत आणि बाकी मग भारतात गेल्यावर बघू. माझी anxiety बरीच कमी झाली होती. विचारांची जुळवाजुळव करतच मी झोपी गेलो.


अचानक मला रात्री कधीतरी जाग आली. मी उठून बसलो. रात्रीचे ३ वाजले होते. सहसा मी हॉटेल मध्ये झोपताना बाथरूमचा लाईट चालू ठेवतो. बाथरूम चा दरवाजा थोडासा उघडा होता आणि त्यातून प्रकाशाची एक तिरीप मी ज्या टेबलवर दुपारी शर्ट टांगला होता त्याच्या खाली जमिनीवरच्या कोपऱ्यात येत होती. थोडेसे आळोखेपिळोखे देताना अचानक माझी नजर त्या टेबलाच्या खालच्या कोपऱ्यावर गेली. आणि काय सांगू तुम्हाला… माझा blackberry फोन तिथे शांतपणे विसावला होता.

पूर्ण अविश्वासाने मी तो फोन हातात घेतला आणि मी स्वप्न तर बघत नाही आहे हे चाचपून बघितले. आणि सगळा sequence माझ्या लक्षात आला. मी नेट  रूम मधून आलो. झोपेतच शर्ट टेबलवरच्या bag वर उलटा टांगला. हे करतानाच फोन जमिनीवर शर्टच्या खिशातून पडला. खाली कार्पेट असल्यामुळे (आणि मी झोपेत) मला आवाज आला नाही. पडण्याच्या धक्क्यामुळे सीम कार्डने मान टाकली होती. (insert sim card मेसेज अजूनही झळकत होता). एखादी गोष्ट सापडली नाही की धांदल करण्याच्या सवयी मुळे पुढचा उपद्व्याप झाला होता. रात्री त्या अवस्थेत (म्हणजे मनाच्या अवस्थेत), मला नाच करावासा वाटत होता. पण आवरले आणि शांत मनाने झोपी गेलो.

पुढील दौरा व्यवस्थित पार पडला हे सांगणे न लागे.

त्या दिवसापासून मी हॉटेल मध्ये फोन सुरक्षित असा ठेवतो……… आणि शर्ट मात्र तसाच टेबलवर किंवा खुर्चीवर उलटा टांगलेला असतो.

(समाप्त)

Thursday, 31 October 2013

परदेशवारीच्या worries २

२००९ चा दौरा इटलीचा. मिलान मध्ये रहात होतो. एका exhibition साठी गेलो होतो. ३ दिवस exhibition बघून चौथ्या दिवशी Frankfurt ला सकाळी जाऊन रात्री मिलानला परत येण्याचा प्लान होता .

३ दिवस exhibition मध्ये तंगडतोड करून पायाचे तुकडे झाले होते. त्या दिवशी मला पुण्याचेच एक गडगंज श्रीमंत असे industrialist भेटले होते. त्याचं नाव आपण देसाई ठेऊ. आमची कंपनी त्यांचा एक महत्वाचा कस्टमर आहे. मला म्हणाले संध्याकाळी फिरू, कॅथेड्रल पाहू, एकत्रच डिनर करू आणि मग आपापल्या हॉटेल ला जाऊ. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी आम्ही भेटलो. भव्य असे कॅथेड्रल बघितले. थोडी स्ट्रीट शॉपिंग केली. दिवसभराचे फिरणे आणि हा संध्याकाळचा व्यायाम, पाय अगदी दुखून आले होते. भूक पण जबरी लागली होती. देसाई साहेबांचे निमंत्रण होते जेवणाचे. विचार केला नेतील साहेब एखाद्या हॉटेलमध्ये पिझ्झा खायला.

मिलान मध्ये हॉटेलच्या बाहेरच मेनू कार्ड लिहिलेले होते. आम्ही त्याच्या समोर उभे राहायचो आणि साहेब वाचायचे. पिझ्झाचा रेट बघायचे आणि म्हणायचे जरा बघू अजून एका ठिकाणी. पुढच्या हॉटेल मध्ये परत तीच कथा. बरं रेट मध्ये काही असा जमीन अस्मानाचा फरक नव्हता. पिझ्झा साधारण ६.५० युरो ते १० युरो ला मिळत होता. तरी पण साहेबांचे काही "अजून एक हॉटेल बघू" काही संपेचना. माझा  एका महिन्याचा पगार त्यांची एका दिवसाची कमाई होती. मला काही सुधरेना. पाय ओरडायला लागले होते आणि पोट तर कळवळून रडत होतं पण देसाई ना काही माझी दया येत नव्हती. शेवटी मीच म्हणालो " सर आता इथे खाऊ, मला सकाळी लवकर जायचे आहे विमानतळावर" असे म्हणता म्हणता मी खुर्चीत बसकण च मारली आणि मेनू कार्ड चाळू लागलो. आता देसाई ना काही इलाजच नव्हता. पटापट order दिली. ज्या देशातला पदार्थ हा त्या देशातच खाणे एक वेगळाच आनंद असतो. Italian पिझ्झा एक भारीच प्रकार आहे आणि तो इटली त खाणे हा एक भारीच अनुभव आहे. असो, बिल आले. सुरुवातीचा अनुभव घेता मीच पाकिटात हात घातला (म्हणजे तसे दाखवले) देसाई म्हणाले "राहू द्या, राहू द्या मी तुम्हाला निमंत्रण दिले" हे म्हणताना त्यांचा चेहरा कसनुसाच झाला होता. मी मात्र शपथ खाल्ली देसाई च निमंत्रण परत घ्यायचं नाही.

दुसर्या दिवशी सकाळी Frankfurt चं विमान सकाळी ७ ला होतं म्हणजे मला ६ ला पोहोचणे आवश्यक होते. मिलान च्या लीनेट विमानतळावर जायला १ तास लागत होता. सकाळीच माझा हॉटेल च्या manager शी प्रेमळ संवाद झाला होता. तो असा कि "तुला taxi ने जायचं असेल तर ६० युरो पडतील" असं म्हणाल्याबरोबर माझ्यातला अंकगणित तज्ञ जागृत झाला. म्हणजे रु ३३०० फक्त. "आणि बसनी जायचे असेल तर १ युरो. बस stop पर्यंत taxi चे ५ युरो" म्हणजे रु ३३० फक्त. (रु  ३३०० ला फक्त एक पद्धत म्हणून लिहिले). मला नाही वाटत मी कुठला option घेतला हे वेगळं सांगावं.

सकाळी ४:३० ला taxi येणार होती. ४:४५ ला बस stop. ५:०५ ची पहिली बस, ५:५० ला airport असा भरगच्च कार्यक्रम होता. देसाई कृपेमुळे हॉटेलवर पोहोचायला रात्रीचे ९:३० वाजले होते आणि पाय पण वाजले होते. सकाळचा ३:३० चा अलार्म लावला . झोपलो पण सकाळच्या टेन्शन मुळे झोप अशी अधांतरीच होती. २:३० वाजता जाग आली. तेव्हा फेसबुक प्रकरण नव्हते म्हणून बुक वाचत बसलो.

४:२५ ला बरोबर टॅक्सी आली आणि सुमसाम रस्त्यावरून १५ मिनीटात बस स्टाॅपला आणून सोडलं . विचार करा नवीन रस्ता, नवीन गाव, नवीन देश आणि सकाळची पावणेपाच ची वेळ आणि मी एकटा. सगळा अंधार , फक्त रस्त्यावरचे लाईट चालू. शप्पथ सांगतो, सटारली होती. बरं बस स्टॅाप पण बरोबर आहे कि नाही माहिती नाही. हॉटेल manager नि टॅक्सी ड्रायव्हर ला परस्पर सांगितले होते. आणी अशा विचारात असतानाच इमारतीच्या एका पिलर मागून दोघं विचित्र माणसे बाहेर आली. पूर्ण drug addict. पिंजारलेले केस, स्लीव लेस शर्ट, अंगावर भरपूर tatoo. आणी ते माझ्याच दिशेने येऊ लागले. थोडं अंतर ठेवून माझ्याकडे बघत हातवारे करत काही तरी italian भाषेत बोलत होते. मी पासपोर्ट, पैसे चाचपून बघितले आणि त्यांच्याकडे लक्ष न देता स्तब्ध उभा होतो. (एकदा नगर ला सीन बघितला होता रात्री १२ वाजता एक गावाकडचा माणूस मध्ये उभा होता आणि दोन कुत्रे त्याच्यावर बेफाम भुंकत होते. मला तेच
आठवत होतं )

अशा गर्भगळीत अवस्थेत असतानाच ती आली आदि शक्तीचे रूप. (आता मी ते राहुल-सिमरन विचार करण्याच्या मन:स्थितीतच नव्हतो). इथे आली ती air होस्टेस च्या रुपात. बहुधा सर्व परिस्थिती तिने ताडली. सर्वप्रथम ती माझ्याकडे बघून हसली. सुटाबुटात असलेला मी आतून कसा हललो होतो, नाही कळायचं. ते हास्य मला दहा हत्तीचे बळ  देऊन गेलं . नंतर तिने  गर्दुल्ल्याकडे नजर फेकली. आणि अहो आश्चर्यम! ते दोघेही रस्ता क्राॅस करून समोरच्या फूटपाथवर जाऊन बसले. माझ्या नजरेतून आभार टपकत होते. सगळा १० मिनीटाचा खेळ, पण किती वेगवेगळे विचार तेव्हढ्यात येउन गेले याची गणतीच नाही.

मी त्या महालक्ष्मीला विचारलं " will this bus take us to Milan Linate airport" ती म्हणाली "yes "माझ्या जीवात जीव आला. बरोबर ५:०५ मिनिटांनी बस आली. १ युरो चं तिकीट काढताना मनात आलं, आपण काही मुर्ख पणा तर नव्हता पैसे वाचवण्याच्या नादात.

पुढे सगळं व्यवस्थित झाले. ७ ला विमान हाललं आणि मी झोपेचा बॅकलाॅग भरण्याच्या कामाला लागलो.




















Saturday, 26 October 2013

परदेशवारीच्या worries

साधारणत: कधीही माझा परदेश दौरा ठरला की माझ्या काही मित्रांची आणि नातेवाईकांची पहिली प्रतिक्रिया असते "मजा आहे बुवा तुमची." जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे याप्रमाणे त्यांना कळत नसते का मी कुठल्या दिव्यातून जातो आहे ते. माझ्यासारख्या छोटी कंपनी चालवणार्यासाठी परदेश दौरा हे एक मोठं काम असतं. विमानाची तिकीटे, लोकल ट्रान्सपोर्ट, हाॅटेल बुकिंग हे सगळंच जिकीरीचं काम असतं. यात सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो गुणाकाराचा. वीक करन्सीमुळे प्रत्येक वेळेस युरो, डाॅलर, पौंडप्रमाणे गुणीले ७०/६०/९० हे फारच त्रासाचं असतं. हे टाळायचं असेल तर एकतर मुकेश अंबानी असावं, नाहीतर कुठल्या तरी मोठ्या कंपनीचा executive. या सगळ्यातून जेव्हा दौरा without problem पार पडतो, तेव्हा गड जिंकल्याचं समाधान असतं. त्या परिस्थितीतून जाताना मनाची अवस्था कशी असते हे स्वत: अनुभवल्याशिवाय नाही कळणार.

२००६ चा Switzerland/UK चा दौरा. Switzerland ला मला पहिले Renaud नावाच्या कंपनीत जायचं होतं. Bevaix नावाचं गाव, गाव कसले खेडंच ते इनमिन २००-३०० घरांचं (हे तिथे गेल्यावरच कळलं). नेटवरून bed & breakfast शोधलं. ( यूरोप मधे हा एक साॅलीड प्रकार आहे bed & breakfast. Small scale industrialist साठी perfect fit. आता हे B&B मला २५ स्विस फ्रॅंक ला मिळालं म्हणजे ₹ ९०० फक्त, विश्वास बसतो का) मेलवरून विचारलं bevaix स्टेशन वरून यायचं कसं? होस्ट म्हणाला "पायी, जवळच आहे"

रविवार होता, सकाळी ७ वाजता झुरिक ला पोहोचलो. तिथे खालीच रेल्वे स्टेशन आहे. तिकीट बारी वर गेलो आणि मागितलं " बीव्हेक्स" ती माझ्या तोंडाकडे बघत राहिली. मी परत म्हणालो " बीव्हेक्स". तिथे इंग्रजी  चा आनंद आहे. कुणीच बोलत नाही . तिने नकारार्थी मन हलवली. माझं धाबं दणाणलं. म्हंटलं ही काय पंचाईत. शेवटी तिला स्पेलिंग लिहून दाखवलं "bevaix" ती म्हणाली " बिव्हे". मी सुस्कारा सोडला. म्हंटलं  दे बाई एक तिकीट. तिने तिकीट देताना जे काही सांगितले त्याच्यावरून हे कळले कि न्युशॅटल नावाच्या गावाला ट्रेन चेंज करायची आहे. 

Switzerland चा नयनरम्य परिसर, स्वर्गच जणू, पृथ्वीवरचा. आणि मी विचार करतोय रेल्वे प्रवासात, पुढची ट्रेन व्यवस्थित मिळेल ना याचा. neuchatel ला उतरलो. मनमाडला जसं पूर्वी ब्रॉडगेज वरून मिटरगेज व्हायचं तसंच काहीसं . पुढच्या प्रवासाची ट्रेन आली ५ डब्ब्यांची. डब्बे पण एकदम छोटे. toytrain च म्हणा ना! थोडंफार इंग्रजी येणाऱ्या स्टेशन वर उभ्या माणसांनी सांगितलं कि सहावं स्टेशन आहे बेव्हे. त्यांना बाय करून बसलो ट्रेन मध्ये. सुटली झुकझुकगाडी. सहज म्हणून ट्रेन मध्ये चक्कर मारली . ५ डब्बे फिरायला असा किती वेळ लागतो आणि अक्षरश: फाटली. तुमचा विश्वास बसणार नाही, त्या आख्या  ट्रेन मध्ये मी एकटा. CHARTERED ट्रेन. बसायला आडमाप जागा असून मी आपला उभा. सहावं स्टेशन म्हणून सांगितले तरी प्रत्येक स्टेशनवर बघायचं हे बिव्हे तर नाही ना ! खरं तर बघायचो कुणी अजून चढताय का ट्रेन मध्ये! पण माणूस नावाचा प्राणी दिसला तर शपथ. तिथल्या स्टेशनच्या पाट्या पण बारक्या. शेवटी एकदाचं आलं बा ते बिव्हे. पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा विचार करत उतरलो. सकाळचे ११ वाजले होते.

नितांतसुंदर बिव्हे स्टेशन, पण तिथे मी एकटा, आता करू काय, विचारू कुणाला. स्टेशनवर फोन नाही. चिटपाखरू दिसेना. आणि दिसलं, पाखरू दिसलं. एक अप्रतिम सौंदर्य माझ्याच दिशेने चालत येत होतं. ती पंचविशीची आणि मी........जाऊ दे मी कितीचा ते महत्वाचं नाही. (तसं मी "बाराचा" आहे हे कित्तेक वर्षापासून म्हणतात).  विचार करा situation चा, आधीच मी स्वर्गात आणि समोरून येतय ते लावण्य, एकटं. मी राहुल ती सिमरन, संवाद............फोन नंबरची देवाणघेवाण.............उद्या भेटण्याच्या आणाभाका................ एका प्रेमकहाणीची सुरूवात. परत ये मित्रा, असं फक्त हिंदी चित्रपटात होतं. मी तिच्याकडे गेलो, म्हणालो "ताई", तिला कळत नव्हतं, तरी मी जास्तीत जास्त सभ्य असण्याचा प्रयत्न करत होतो. "could you please guide me, how to reach this address" तिकीटबारी वरच्या बाईने केला तसाच चेहरा या ताईने पण केला आणि म्हणाली "no english". मी dumbcharads खेळत तिला विचारलं "फोन कुठे आहे कळेल का?" तिने एका दिशेने बोट दाखवले आणि विरूद्ध दिशेने चालू पडली, निर्विकार चेहर्याने. (खरं सांगा तुम्हाला वाटलं ती हसून थोडी लाजून गेली म्हणून. पण त्या ताईशपथ सांगतो, तशी नाही गेली).


तिने सांगितलेल्या दिशेने मी चालत गेलो आणि एका हमरस्त्यावर आलो. डावीकडे एक restaurant दिसलं, जीवात जीव आला. तिथे पोहोचलो तर ४-५ pensioner सिगार आणि काॅफी पित बसले होते. मी जाऊन हाॅटेल मालकिणीला विचारलं की हे B&B कुठं आहे? (असं वाटलं ना की मी मालकिणीबद्दल भारी सांगणार. तर नाही, ती आपल्या ललिता पवार यांच्यासारखी होती) इथे एक बरं होतं "no English" म्हंटलं की संपलं. मी आशेनं त्या म्हतार्यांकडे बघितलं, त्यांनी मला बघून पेपरमधे तोंड खुपसलं. शेवटी ललिताबाईंना दया आली आणि त्यांनी मला फोन कुठे आहे ते दाखवलं. 

मी माझ्या होस्टला फोन केला. आता जर त्यांनी फोन उचलला नसता तर, असा विचार आला असतानाच तिकडून आवाज़ आला "हॅलो" (सुदैवाने हाेस्ट English speaking होता). मी म्हणालो भेट बाबा एकदाचा. तर म्हणाला डावीकडे चालत ये, मी इकडनं निघालोच, रस्त्यावर भेट होइलंच. मी म्हणालो " अरे पण मी तुला ओळखणार कसं" तर म्हणाला " बाळा हे Switzerland आहे, रस्त्यावर आपण दोघंच असू". 

मी निघालो आणि थोडं अंतर चालल्यानंतर समोरून तो आला. काॅलेजमधे असताना वैभवी दिसली की जशी धडधड व्हायची, अगदी तसंच वाटायला लागलं. (किती निर्लज्जपणा, जे वाटलं ते लिहीतोय). आता तोच आहे का अजून कुणी. तेव्हढ्यात तोच माझ्याकडे हसून मला म्हणाला "राजेश" आणि माझा एवढा वेळ धरून ठेवलेला जीव भांड्यात पडला.

B&B जवळंच होतं. मला छान अशा रूम मधे त्याने सोडलं. भूक मरणाची लागली होती. दाढ़ी आंघोळ करून बरोबर आणलेलं खावं असा विचार करत होतो. सकाळपासूनचा घटनाक्रम आठवत दाढीचं क्रीम गालावर लावलं आणि ब्रशनी पसरवत असताना जाणवलं की काहीतरी चिकट लागतय. मी हात फिरवला आणि बर्याच वेळानी खदखदून हसलो ................................. विचारांच्या नादात (आता ती माझ्यासाठी परत सिमरन झाली होती) मी old spice च्या ऐवजी Colgate लावलं होतं

क्रमश:

Thursday, 24 October 2013

झोप



"अजूनही तसाच झोपतो का ग तो?" मंगेशची आई माझ्याबद्दल वैभवीशी बोलताना

"मंडल्या, जागा आहेस का झोपला?" नितीनची आई, मी हॅालमधे आणि काकू किचनमधून आवाज देतात

माझ्या झोपेची महतीच तशी आहे. बर्याच जणांनी त्याचा अनुभव घेतला आहे. वेळ, काळ, स्थळ, जागा याचा आणि झोपेचा काही संबंध असतो याची मला जाणीवच नसायची. कुठेही, कधीही, कसाही मी झोपायचो.

१९९६ ची गोष्ट असेल. एकदा बेळगावला काही कामानिमीत्त गेलो होतो. येताना प्रायव्हेट बसचं तिकीट होतं, शर्मा ट्रॅव्हल. बस मुंबईला जाणारी आणि मला पुण्याला उतरायचं होतं. तेव्हा चांगली बस असणं हे भाग्याचं लक्षण असायचं. बस एकदम टकाटक होती. दिवसभर काम करून रात्री १० वाजता बसमधे बसलो. जेवण झाले होते. थोडे थंडीचे दिवस होते, जवळ एक सोलापूरी चादर होती. ड्रायव्हर च्या मागची पहिली सीट होती, भरपूर लेगस्पेसवाली. बसल्याक्षणी मला झोप लागली. डोक्यावरून चादर घेउन मी मस्त झोपी गेलो. सकाळी बहुतेक ६ वाजले असावेत. चादर ओढून डोकं बाहेर काढलं तर मला लोणावळ्याचं हाॅटेल फरियाज दिसलं. हाईट म्हणजे मला वाटलं की मी स्वप्न बघतेाय, म्हणून परत झोपलो. परत जाग आली तेव्हा खंडाळ्याच्या घाटात काच पुसण्यासाठी बस थांबली होती. मग लक्षात आपला लोच्या झाला ते. क्लीनर म्हंटलं "उठवलं का नाही रे पुण्याला" तर म्हणाला " पुना करके कितना बोंब मारा, तुम पहिला सीट पे बैठकें उठा नहीं तो मैं क्या करूँ?" गपगुमान खोपोलीला उतरून परत पुण्याला आलो.

SKF मधे थर्ड शिफ्ट करायचो. ज्यानी ही शिफ्ट शोधली त्याला माझे फ़ार तळतळाट लागले आहेत. ती संपवून मी बसमधे असा बेदम झोपायचो की ज्याचं नाव ते. लोकं माझी मजा करायचे, माझ्या स्टाॅपला मला ऊठवायचेच नाही. गाडी कोथरूडला जाऊन परत येताना ड्रायव्हर ला माझी कीव यायची, मग तो मला अंबर हाॅलच्या इथे सोडायचा. 


एकदा मी वड़ोदरा एक्सप्रेस नी मुंबईला येत होतो. साधारण रात्री ११:३० ला सुटते आणि सकाळी सेंट्रलला सोडते. मी जे बेदम झोपलो. सकाळी उठलो तेव्हा सीन असा होता की गाडीतले सर्व प्रवासी उतरून गेले, एक मी आणि खालच्या बर्थचा एक असे दोघंच होतो आणि तो शहाणा माझे बुट घालून निघण्याच्या तयारीत होता. मी म्हंटलं "ए भाऊ, काय करतोस" तर आम्ही झोपेत असताना त्याच्या चपलांचा कुणीतरी पोबारा केला होता. मला जाग आली म्हणून नशीब, नाहीतर सकाळी ६:३० वाजता "कुणी चप्पल देतं का चप्पल" म्हणत फिरावं लागलं असतं. 

माझा पहिला परदेश दौरा सिंगापूरचा १९९८ साली झाला. असंच रात्री ११ वा ११:३० चं फ़्लाइट असेल. विमान प्रवास त्याआधी जास्त नव्हता झाला. पहिला परदेश दौरा म्हंटल्यावर लोकं कशी excited असतात़. मी आपला पडी टाकायला मोकळा. सकाळी MD संजीव आणि Manager बोनी पाॅल माझ्याकडे बघून हसत होते. तर झालं असं होतं की रात्री air pockets आणि rough weather मुळे विमान बरंच डचमळलं होतं, लोकांमधे बराच तणाव निर्माण झाला होता. मी त्यावेळेला थोडा हललो, पण एसी चा व्हेंट adjust करून परत निद्रादेवीच्या कुशीत. 

हे माझे वाहनांमध्ये झोपणे मजेशीर आहे. म्हणजे स्वत:च्या बेडपेक्षा बस, विमान किंवा सगळ्यात भारी म्हणजे रेल्वेत मस्त झोप येते. एकवेळ घरात अंथरूण पांघरूण च्या नावाने शिमगा असेल, पण रेल्वेत एकदम टापटीप. वैभवी तर गमतीत म्हणते की कुठलाही ड्रायव्हर दिसला की राजेशच्या डोळ्यावर झोप तरंगायला लागते आणि स्टार्टर मारला की झोपेची आराधना चालू होते.

या झोपेने पहिला झटका दिला १९८९ साली, जेव्हा मी वैभवीला propose केलं होतं. "हो की नाही" या उत्तरेच्या अपेक्षेत रात्र जागून काढली होती. त्यानंतर काही प्रसंग यायचे (म्हणजे proposal चे नाही बरं का!), की झोप उडायची. पण प्रासंगिक, २-४ दिवसात झटका ओसरायचा आणि निद्रेशी दोस्तीचा कारनामा चालू रहायचा. 

पण आजकाल या सखीने चांगलाच काडीमोड घेतला आहे, अगदी वितुष्टंच म्हणा की! व्यवसाय, त्याच्या अनुषंगाने येणारे ताणतणाव, आपणच सेट केलेले सदैव uncomfort zone ठेवणारे goals आणि standards याच्यामुळे ही निद्रादेवी रूसली आहे. गाढ म्हणावी अशी झोप अशी लागंतच नाही. पण काय करणार, अंगावर घेतलय तर निभवावं तर लागणारच. सगळं कळतय आणि जेव्हा ते वळेल तेव्हा या दुरावलेल्या सखीशी परत मैत्री होईल............तो खरा सुदिन, चुकलेच, ती खरी सुरात्र!

नमन २

म्युनिक मध्ये सिटी टूर घेतली होती. अन्द्रेआस नावाचा गाईड होता एक साधारण १०० किलो वजनाचा. थोडा वजनामुळे चालायचा पण त्रास व्हायचा. दिवसभर बडबड करत होता, हा राजवाडा, museum, B M W ची factory, stadium आणि सगळ्यात शेवटी octoberfest. Octoberfest तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच कि तो beer फेस्टिवल आहे. म्युनिकला beer खूप brew होते. (प्रत्येक म्युनिकर वर्षाला १०३ लि beer पितो. जगात एक नंबर झेक १०७ लि: इति अन्द्रेआस). नावाप्रमाणेच इथे आबालवृद्ध beer पिण्यासाठी येतात. १२ ऑक्टोबर चा राजाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हि प्रथा चालू झाली. एक रस्ता आहे साधारण ७५० मीटर लांबीचा (चूकभूल देणे घेणे), त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठे असे मंडप असतात, म्हणजे एका मंडपात ५-६००० लोकं मावतील असे . आणि तिथे एक कलमी कार्यक्रम चालू असतो तो म्हणजे beer ढोसण्याचा. त्या मंडपात जाण्यासाठी प्रचंड रांगा असतात (रांगा चं नका सांगू हो कौतुक आम्हाला).

तर octoberfest ला आम्ही संध्याकाळी ४ वाजता पोहोचलो. बस पार्किंगचे वांदे च होते. खूप लांब बस पार्क करून शेवटी त्या फेस्ट ला पोहोचलो. सूचनेप्रमाणे ६ वाजता परत यायचे होते. ग्रुप disburse झाला. मरणाची गर्दी. मी आणि अजून ५ जण अन्द्रेआस बरोबर लटकलो होतो. रस्त्याच्या शेवटी एका टेन्ट मध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे त्या जाड्यामुळे. नाहीतर फक्त बीअर चा वासच घेऊन परत यावं लागलं असतं. अमृततुल्य मध्ये असतात तशी निव्वळ बाकडी असतात लांबच्या लांब, मध्ये एक टेबल. त्यावर बसायचं आणि मग त्या ललना घेऊन येतात ते १ लि चे टम्पास. आणि मग हाणायच अमृत जमेल तेवढं

आमच्यात एक जोगळेकर म्हणून होते. त्यांनी एक भारी jacket (अगदी किमतीत सांगायचं असेल तर ५-६ हजाराचं) घातलं होतं. गर्दीमध्ये उकडायला लागलं म्हणून बाजूला काढून ठेवलं. बीअर प्राशन झाले २ मग प्रत्येकी. घाई होती, ६ च्या आत बसमध्ये जाऊन बसायचे होते. आणि टायमिंग एकदम कडक, त्यामुळे तडक निघालो परत अन्द्रेआस आणि आम्ही ५ जण. फेस्ट मधून बाहेर पडलो, बसच्या दिशेनं जायला लागलो. अन्द्रेआस ला बिचार्याला चालायचा त्रास होत होता. अर्थात तो आम्हाला एका स्पॉट  पर्यंत सोडून अलविदा म्हणणार होता. तो स्पॉट साधारण २०० मी असेल आणि जोगळेकर थबकले आणि फक्त म्हणाले "jacket राहिलं" आता बोंबला. तेव्हा सांगताहेत बायको नि वाढदिवसाला घेतलं होतं २ महिन्यापूर्वी. म्हणजे सत्यानाश. अन्द्रेआस नि ताडलं काय झालं म्हणून. थोडा खल झाला, एवढी गर्दी तिथे, कोण ठेवणार ते आणि परत पोहोचण्याची वेळ, कडक जर्मन बस चालक यावरून सर्वानुमते असे ठरले कि त्या jacket वर पाणी सोडायचे. (कि बीअर सोडायची). जोगळेकरांनी  सुद्धा खुल्या मनाने बायकोच्या शिव्या खायची तयारी करून घेतली.

अन्द्रेअस ला अलविदा म्हणण्याची जागा आली. बिचार्याने आमच्यासाठी खूपच त्रास घेतला होता. वजनामुळे चालायचा त्रास असून सुद्धा आमच्याबरोबर न कंटाळता भटकला. फेस्टमध्ये  त्याच्या बीअर चे पैसे आम्ही दिले तीच काय टीप (१५ युरो मोजले हो वट्ट).

त्याला अलविदा करून आम्ही बस मध्ये अगदी वेळेवर पोहोचलो. जोगळेकरांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती, पण काही इलाज नव्हता. आमचा पुढचा कार्यक्रम डिनर चा होता एका Indian Restaurant मध्ये.

आम्ही पोहोचलो तर buffet मांडूनच ठेवला होता. सूप घेतले आणि ग्रुप मध्ये गप्पा चालू झाल्या. गप्पा अर्थात जोगळेकरांच्या jacket बद्दलच होत्या. तिथली गर्दी, आणि त्यामुळे कसं बाजूला काढून ठेवलं आणि विसरलो वैगेरे…………. आम्हाला पोहोचून २०-२५ मिनिटे झाली होती. आणि माझं लक्ष हॉटेलच्या मेन गेट कडे गेलं. अचानक मला चेहरा घामाने डबडबलेला एक जाडा माणूस दिसला आणि हो अन्द्रेआस च होता तो आणि त्याच्या उजव्या हातात होतं ते…………………………… जोगळेकरांचे jacket. 


आम्ही अवाक झालो होतो. आम्हाला बाय केल्यानंतर अन्द्रेआस ला काही करमेना. तो परत त्या शेवटच्या टेंट मध्ये चालत गेला. त्या ५-६००० लोकांच्या टेंट मध्ये ते jacket होतं त्याच बाकड्यावर. अन्द्रेआस नि त्यावर झडप च घातली आणि झपझप आमच्याकडे येऊ लागला.आमच्या गप्पामधून त्याला कळले होते कि आम्ही कुठल्या तरी  Indian Restaurant मध्ये जाणार होतो. ते तसं फेस्ट पासून लांब होतं. पण पठ्ठ्या आला शोधत. त्याचे बीअरचे पैसे देताना गुणिले ५५ चा हिशोब करणारा मी, मानभावीपणे त्याला जेवायचा आग्रह करत होतो. पण अन्द्रेआस काही बधला नाही. काही महत्वाचे काम आहे म्हणून सटकलाच. जोगळेकरांच्या चेहऱ्यावर ख़ुशी ओसंडून वाहत होती. माझे लक्ष बाय बाय करणाऱ्या अन्द्रेआस च्या घामेजलेल्या चेहऱ्याकडे गेले……………. त्यावर एक वेगळेच आत्मिक समाधान विलसत होते.

Wednesday, 23 October 2013

बनी तो जर्मनी

व्यवसायाच्या निमित्ताने माझे अनेक देशांमध्ये फिरणे झाले, त्यापैकी मला सगळ्यात जास्त आवडलेला देश म्हणजे जर्मनी. जर्मनीत मी तीनदा  गेलो एकदा एका दिवसाकरता (म्हणजे सकाळी मिलान वरून frankfurt आणि संध्याकाळी परत मिलान), दुसर्यांदा एका आठवड्यासाठी आणि तिसर्यांदा मी उणीपुरी १२ दिवसांची ट्रीप केली. (या माझ्या पहिल्या २ ओळीतच मित्रांना चलाखी कळली असेलच.
मी काही देशांना visit केली आहे पण "अनेक" लिहिले कि कसं वाक्याला एक वजन येतं. आता हाच शब्द पहा ना "उणीपुरी". शक्यतो ४-५ वर्षे एखाद्या देशात राहिले कि लिहितात "उणीपुरी ४-५ वर्षे काढली".  पण हे आपलं असंच आहे. म्हणजे कणभर करायचं आणि मणभर दाखवायचं. एवढं लिहिल्यानंतर माझ्या हुशार मित्रांना कळलंच असेल की मी कंपनीत मार्केटिंग बघतो. असो)

तर मी सांगत होतो जर्मनी बद्दल. भारत सोडून जर मला कुठल्या देशात राहायला सांगितलं तर मी जर्मनीचं नाव घेईल. (लिहायला काय हरकत आहे, विसा ऑफिसर चं बघू नंतर). नवीन तंत्रज्ञान, नैसर्गिक साधनसंपत्ती, शिस्त, माणुसकी या सगळ्यांचा अनोखा संगम मला जर्मनीत पाहायला मिळाला. (खरं तर सार्या युरोप ला हे लागू होतं असं म्हणतात). एका आठवड्याच्या ट्रीप मध्ये मी उत्तर जर्मनीत फिरणे झाले तर त्या १२ दिवसांच्या ट्रीप मध्ये मी बसनी खूप फिरलो. मुख्यत: दक्षिण जर्मनीत. अनेक कंपनीत visit केल्या, ज्या अक्षरश: खेडेगावात उभ्या केल्या आहेत. तिथे digital divide नावाचा काही प्रकारच नाही आहे. म्हणजे कुठेही गेलं तरी, सर्व जीवनावश्यक गोष्टी तसेच इंटरनेट, बँकिंग, courier अशा auxiliary services या सगळीकडेच उपलब्ध असतात.

नैसर्गिक साधनसंपत्ती चा समर्पक उपयोग हे जर्मनीचे वैशिष्ट्य. कुठल्याही हॉटेल मध्ये corridor मध्ये पाय ठेवल्यानंतर डोक्यावर लाईट पेटणार. वर्षातून २-३ महिने सूर्यप्रकाश असावा पण प्रत्येक घरावर सोलार panel आहेच. एकरांमध्ये सोलार फार्म उभे केले आहेत. फिरत असताना विंड मील चा जथा दिसलाच पाहिजे.

लोकं अतिशय कष्टाळू. FMB (Family Managed Business) हे जर्मनी चं अजून अप्रूप. मला वाटलं आपण एवढं ऐकतो, स्वतंत्र कुटुंब पद्धती बद्दल. त्या पार्श्वभूमीवर मला हे business model जरा विशेष वाटलं.

त्या १२ दिवसाच्या ट्रीप मध्ये बसमधून खूप फिरलो. बसचे पण रूल भारी. ४ तासापेक्षा driver ने सलग बस चालवायची नाही. ४ तास गाडी चालवल्यावर ४५ मिनिटे सक्तीचा stop. आराम करायचा, मगच पुढच्या प्रवासाला. एका दिवसात १२ तासापेक्षा duty करायची नाही. म्हणजे सकाळी ८ वाजता starter मारला कि रात्री ८ वाजता compulsory गाडी बंद. काहीही झालं तरी. highway ला फ्रेश होण्याची ठिकाणे पण मस्त. urinal चा वापर करायचा असेल तर युरो १ charge पडतो. (बर्याचदा मी पायावर पाय ठेवून बसायचो पण २-४ दा "पाण्यात" घालवले रु ५५ फक्त). दांडका च असतो. १ युरो चं कॉईन टाकल्याशिवाय आताच जाता येत नाही.

अजून एक मस्त पद्धत बघितली. mall मध्ये trolley एका ठिकाणी stored असतात. trolley पाहिजे असेल तर ५ युरो चं कॉईन टाकायचं कि एक तिचे lock उघडते. खरेदी झाली, कार मध्ये समान ठेवलं कि trolley परत store करायची. त्यावेळेस ती योग्य पद्धतीने lock केली कि ५ युरो परत. म्हणजे trolley कुठंही रस्त्यावर भरकटत राहत नाही तर जागेवर येउन बसते.

जुन्या वस्तू सांभाळण्याची यांना फार हौस. wuppertal ला अमोल कडे गेलो होतो. तिथे ११० वर्ष जुनी inverted मोनोरेल बघितली. शप्पथ सांगतो आयटम आहे ती ट्रेन.


बाकी technical गोष्टीबद्दल लिहायला बसलो तर पानं भरतील पण तुम्ही बोर व्हाल. त्यामुळे सांगता एका भारी किस्स्याने.

क्रमश: कालपासून पुढे

म्युनिक मध्ये सिटी टूर घेतली होती. अन्द्रेआस नावाचा गाईड होता एक साधारण १०० किलो वजनाचा. थोडा वजनामुळे चालायचा पण त्रास व्हायचा. दिवसभर बडबड करत होता, हा राजवाडा, museum, B M W ची factory, stadium आणि सगळ्यात शेवटी octoberfest. Octoberfest तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच कि तो beer फेस्टिवल आहे. म्युनिकला beer खूप brew होते. (प्रत्येक म्युनिकर वर्षाला १०३ लि beer पितो. जगात एक नंबर झेक १०७ लि: इति अन्द्रेआस). नावाप्रमाणेच इथे आबालवृद्ध beer पिण्यासाठी येतात. १२ ऑक्टोबर चा राजाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हि प्रथा चालू झाली. एक रस्ता आहे साधारण ७५० मीटर लांबीचा (चूकभूल देणे घेणे), त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठे असे मंडप असतात, म्हणजे एका मंडपात ५-६००० लोकं मावतील असे . आणि तिथे एक कलमी कार्यक्रम चालू असतो तो म्हणजे beer ढोसण्याचा. त्या मंडपात जाण्यासाठी प्रचंड रांगा असतात (रांगा चं नका सांगू हो कौतुक आम्हाला).

तर octoberfest ला आम्ही संध्याकाळी ४ वाजता पोहोचलो. बस पार्किंगचे वांदे च होते. खूप लांब बस पार्क करून शेवटी त्या फेस्ट ला पोहोचलो. सूचनेप्रमाणे ६ वाजता परत यायचे होते. ग्रुप disburse झाला. मरणाची गर्दी. मी आणि अजून ५ जण अन्द्रेआस बरोबर लटकलो होतो. रस्त्याच्या शेवटी एका टेन्ट मध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे त्या जाड्यामुळे. नाहीतर फक्त बीअर चा वासच घेऊन परत यावं लागलं असतं. अमृततुल्य मध्ये असतात तशी निव्वळ बाकडी असतात लांबच्या लांब, मध्ये एक टेबल. त्यावर बसायचं आणि मग त्या ललना घेऊन येतात ते १ लि चे टम्पास. आणि मग हाणायच अमृत जमेल तेवढं

आमच्यात एक जोगळेकर म्हणून होते. त्यांनी एक भारी jacket (अगदी किमतीत सांगायचं असेल तर ५-६ हजाराचं) घातलं होतं. गर्दीमध्ये उकडायला लागलं म्हणून बाजूला काढून ठेवलं. बीअर प्राशन झाले २ मग प्रत्येकी. घाई होती, ६ च्या आत बसमध्ये जाऊन बसायचे होते. आणि टायमिंग एकदम कडक, त्यामुळे तडक निघालो परत अन्द्रेआस आणि आम्ही ५ जण. फेस्ट मधून बाहेर पडलो, बसच्या दिशेनं जायला लागलो. अन्द्रेआस ला बिचार्याला चालायचा त्रास होत होता. अर्थात तो आम्हाला एका स्पॉट  पर्यंत सोडून अलविदा म्हणणार होता. तो स्पॉट साधारण २०० मी असेल आणि जोगळेकर थबकले आणि फक्त म्हणाले "jacket राहिलं" आता बोंबला. तेव्हा सांगताहेत बायको नि वाढदिवसाला घेतलं होतं २ महिन्यापूर्वी. म्हणजे सत्यानाश. अन्द्रेआस नि ताडलं काय झालं म्हणून. थोडा खल झाला, एवढी गर्दी तिथे, कोण ठेवणार ते आणि परत पोहोचण्याची वेळ, कडक जर्मन बस चालक यावरून सर्वानुमते असे ठरले कि त्या jacket वर पाणी सोडायचे. (कि बीअर सोडायची). जोगळेकरांनी  सुद्धा खुल्या मनाने बायकोच्या शिव्या खायची तयारी करून घेतली.

अन्द्रेअस ला अलविदा म्हणण्याची जागा आली. बिचार्याने आमच्यासाठी खूपच त्रास घेतला होता. वजनामुळे चालायचा त्रास असून सुद्धा आमच्याबरोबर न कंटाळता भटकला. फेस्टमध्ये  त्याच्या बीअर चे पैसे आम्ही दिले तीच काय टीप (१५ युरो मोजले हो वट्ट).

त्याला अलविदा करून आम्ही बस मध्ये अगदी वेळेवर पोहोचलो. जोगळेकरांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती, पण काही इलाज नव्हता. आमचा पुढचा कार्यक्रम डिनर चा होता एका Indian Restaurant मध्ये.

आम्ही पोहोचलो तर buffet मांडूनच ठेवला होता. सूप घेतले आणि ग्रुप मध्ये गप्पा चालू झाल्या. गप्पा अर्थात जोगळेकरांच्या jacket बद्दलच होत्या. तिथली गर्दी, आणि त्यामुळे कसं बाजूला काढून ठेवलं आणि विसरलो वैगेरे…………. आम्हाला पोहोचून २०-२५ मिनिटे झाली होती. आणि माझं लक्ष हॉटेलच्या मेन गेट कडे गेलं. अचानक मला चेहरा घामाने डबडबलेला एक जाडा माणूस दिसला आणि हो अन्द्रेआस च होता तो आणि त्याच्या उजव्या हातात होतं ते…………………………… जोगळेकरांचे jacket. 

आम्ही अवाक झालो होतो. आम्हाला बाय केल्यानंतर अन्द्रेआस ला काही करमेना. तो परत त्या शेवटच्या टेंट मध्ये चालत गेला. त्या ५-६००० लोकांच्या टेंट मध्ये ते jacket होतं त्याच बाकड्यावर. अन्द्रेआस नि त्यावर झडप च घातली आणि झपझप आमच्याकडे येऊ लागला.आमच्या गप्पामधून त्याला कळले होते कि आम्ही कुठल्या तरी  Indian Restaurant मध्ये जाणार होतो. ते तसं फेस्ट पासून लांब होतं. पण पठ्ठ्या आला शोधत. त्याचे बीअरचे पैसे देताना गुणिले ५५ चा हिशोब करणारा मी, मानभावीपणे त्याला जेवायचा आग्रह करत होतो. पण अन्द्रेआस काही बधला नाही. काही महत्वाचे काम आहे म्हणून सटकलाच. जोगळेकरांच्या चेहऱ्यावर ख़ुशी ओसंडून वाहत होती. माझे लक्ष बाय बाय करणाऱ्या अन्द्रेआस च्या घामेजलेल्या चेहऱ्याकडे गेले……………. त्यावर एक वेगळेच आत्मिक समाधान विलसत होते.

Tuesday, 15 October 2013

नमन

विजय बरोबर आर श्रीनिवासन साहेबांकडे जायचे ठरले होते . विजय माझा जवळचा मित्र. एका स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा मालक . आर श्रीनिवासन (लोकं त्यांना श्रीनि सर या नावानी ओळखतात) १ २ ० ० कोटी रुपयाच्या श्रीनिवासन ग्रुप चे अध्यक्ष. विजयची आणि त्यांची ओळख गेल्या ३ वर्षांची. विजयचा हरहुन्नरी पणा श्रीनि सरांनी बरोबर जोखला होता. एका नवीन प्रोजेक्ट मध्ये श्रीनि सरांनी  त्याला भागीदार करून घेतले होते.

जेव्हा जेव्हा विजय मला अशात भेटायचा, श्रीनि सरांबद्दल भरभरून बोलायचा. श्रीनि सर असे साधे आहेत, मुलगा BMW मध्ये फिरतो पण श्रीनि सर कसे Indica मधेच फिरतात, त्यांचे decision making किती फास्ट आणि कसे योग्य.  . श्रीनि सर कसे दक्षिण भारतातून जॉब साठी पुण्यात आले. शिक्षण नाही, खिशात दमडी नाही, पडेल ते काम केलं. शून्यातून विश्व निर्माण केलं. आज १ २ ० ० कोटीचा कसा मालक  आहे. मला म्हणायचा तू एकदा त्यांना भेटायला पाहिजे मी म्हणायचो "अरे एवढा मोठा माणूस तो. मला भेटण्यात त्यांना काय इंटरेस्ट" मला म्हणाला "तुला त्यांना भेटण्यात इंटरेस्ट आहे ना, चल मग".

मंगळवारची संध्याकाळी ५ वाजताची वेळ ठरली. मनावर थोडे दडपण होते. विजय आणि मी श्रीनि group च्या त्या अलिशान office मध्ये शिरलो . आत जाताना विजय नि मला सांगितलं की गेल्या गेल्या त्यांच्या पाया पडायचं. ते साधारण सत्तरीचे आहेत हे माहिती होतं, पण तरीही हे पाया का पडायचं ते काही मला उमगलं नव्हतं. मी विचारलं "का", तर म्हणाला "अशी पद्धत आहे आणि ती का आहे हे विचारण्याच्या फंदात मी काही पडलो नाही, तुला awkward वाटत असेल तर तू पाया पडू नकोस." मी हो हि म्हणालो नाही आणि नाही पण. थोडं विचित्र वाटलं हे खरं.

ऑफिस सुंदरच होतं, म्हणजे कुठेही झकपक पणा नव्हता पण एक grace होती प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि गोष्टी म्हणाल तर जिथल्या तिथे. रंगसंगती अतिशय सुरेख. एक सुरेल instrumental CD चालू होती background ला. एकंदरीत वातावरण मस्तच होते. कामं पण व्यवस्थित चालू होती, कुठे गडबड नाही, गोंधळ नाही. सगळे जण शांतपणे आपापलं काम करत होते , जे फोन वर बोलत होते त्यांच्या आवाजाची पट्टी खालची होती. एकंदरीत काहीतरी वेगळं होतं या ऑफिस मध्ये एवढं नक्की जाणवलं.

विजयचा तिथे रोजचाच राबता होता. मला म्हणाला "सरांचा निरोप आहे, ५ मिनिटे थांबावे लागेल." तो कुणालातरी भेटायला एका केबिन मध्ये गेला. मऊशार सोफ्यावर बसून
मी इकडचे तिकडचे observation करत होतो. ५ मिनिटात विजय आलाच आणि म्हणाला "चल, आपल्याला बोलावलंय".

श्रीनि सर केबिन च्या बाहेर आले. विजय शिरस्त्याप्रमाणे त्यांच्या पाया पडला. मी पाया पडावं कि नाही या संभ्रमात असताना वाकल्यासारखे केले आणि आम्ही त्यांच्या केबिन मध्ये गेलो . मी श्रीनि सरांचे निरीक्षण करू लागलो. साधारण सवापाच फुट उंची, सावळा रंग, डोक्यावर अर्ध्यापेक्षा जास्त टक्कल, परीटघडीचा पांढरा शर्ट असं एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व. कुठल्याही बाजूने हा गृहस्थ १ २ ० ० कोटीची उलाढाल असलेल्या कंपनीचा मालक वाटत नव्हता. "कसा आहेस" मला विचारले . साधारण दक्षिणात्य माणसाचे जसे मराठी असते तसेच त्यांचेही होते. संभाषण चालू होता होताच त्यांचा ऑफिस बॉय टक टक करून आत आला आणि म्हणाला "निघतो". सर म्हणाले "अरे रवि, थांब रे ५ मिनिटे बाहेर"

तो बाहेर गेल्यानंतर मला म्हणाले "हा मुलगा माझ्याकडे आहे १ २ वर्षांपासून. बायको गेली आहे बाळंतपणाला गावी. हा चालला आहे भेटायला. याच्या घरी म्हातारे आई वडील आहेत. खुळा आहे, घरी जाताना काही नेणार नाही. म्हणून मीच पाठवले आहे चितळे कडे एकाला, बाकरवडी, फरसाण आणि काजू कतली आणायला. येईलच एवढ्यात." मी अवाक होऊन ऐकत होतो, एवढा मोठा माणूस आपल्या ऑफिस बॉय बद्दल इतका विचार करत होता.

इतक्यात ते सगळे जिन्नस घेऊन तो बाहेर गेलेला माणूस आला. श्रीनि सरांनी हाक मारली "रवि ये रे, हे घेऊन जा सगळे गावी. दे सगळ्यांना. माझा नमस्कार सांग तुझ्या आई वडिलांना. बायकोला धीर दे सगळं व्यवस्थित होईल म्हणून. आणि हे घे पैसे" असं म्हणून ३ - ४ हजार रुपये देऊ लागले. रवि म्हणाला "अहो सर, राहू द्या आधीच advance आहे." सर म्हणाले "अरे तो ऑफिस चा, हे माझ्याकडून. आणि हे बघ" मिश्किलपणे म्हणाले "एक box इथे वाट काजू कतलीचा" रवि त्यांच्या पाया पडला आणि डोळे पुसत म्हणाला "येतो सर".

आणि मग माझी विचारपूस चालू केली. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होतो पण माझ्या मनात तो रवि, त्याच्याबद्दल असणारी श्रीनि सरांची तळमळ, त्याच्या आई वडिलांना सांगितलेला नमस्कार हेच चालू होतं. माणसाचे मोठे पण म्हणजे काय याचा मी अनुभव घेतला होता. तो काही माझ्या डोक्यातून जाता जात नव्हता.

"ठीक आहे मग, येत जा अधून मधून. गप्पा मारू यात. आणि काही चांगला product असेल तर सांग, प्रोजेक्ट करू." श्रीनि सर म्हणाले. मी म्हणालो "येतो सर." आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला, मनोभावे…………या वेळेस विजयला ते मला सांगण्याची आवश्यकता नव्हती.

(या गोष्टीतील नावं आणि व्यवसाय काल्पनिक आहेत. पण घटना एकदम अस्सल आहे, अगदी स्वतः अनुभवलेली. त्यातूनही कुणी  अशीच माणसे आणि असाच प्रसंग अनुभवला असेल तर तो योगायोग समजू नये. कारण जीवनाला अर्थ देणारी अशी लोकं असतात यावर माझा दृढ विश्वास आहे)

Friday, 11 October 2013

लढा

काही लोकं अशी असतात़ की त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी किंवा ते व्यक्तिमत्वच आपल्या मनात घर करून राहिलेलं असतं. माझ्या पण आयुष्यात काही अशी लोकं आहेत. विशेष असं त्यांच्या हातून काही घडलं असेल असंही नाही, पण मला जे त्यांचे अनुभव आले ते जतन करून ठेवण्यासारखे आणि मी ते वेळोवेळी सांगतो देखील. आणि दरवेळी मी तेव्हढाच हर्षोत्फुल असतो.

SKF ची साधारण २०-२२वर्षापूर्वीची सेकंड शिफ्ट. बुधवार होता. मी आणि अजय नाईक ड्यूटीवर होतो. ७:४५ वाजता जेवण्याची वेळ झाली. नेहमी उत्साहानी बडबड करणारा अजय जरा मलूल वाटत होता. मी विचारलं " काय रे काय झालंय?" अजय म्हणाला "काही नाही रे जरा थकल्यासारखं वाटतंय" त्याला जेवण्याची प्लेट सुद्धा उचलायला अवघड जात होतं. मी त्याला म्हणालो "तु बस, मी घेउन येतो़ तुझी प्लेट" जेवताना म्हणाला " सकाळी swimming जरा जास्त झालं, ते त्रास देत असेल" अर्ध्या तासात जेवून आम्ही ड्यूटीवर हज़र झालो. शिफ्ट संपली तेव्हा कळलं अजय बरं वाटत नाही म्हणून लवकर घरी गेला. मला त्यात काही वावगं वाटलं नाही.

दुसर्या दिवशी गुरूवार म्हणजे सुट्टीचा वार. मी आपल्याच मस्तीत घालवला असेल.

शुक्रवारी सकाळी first shift ला आलो तेव्हा कळलं अजयला जहांगीर मध्ये अॅडमिट केलं आहे आणि त्याला काहीतरी गंभीर आजार झाला आहे. मी पण चक्रावलो, बुधवारी लक्षात आलं होतं की त्याची तब्येत बरी नाही आहे, पण अॅडमिट करण्याएवढी वाईट परिस्थितीही नव्हती. ३:३० वाजेपर्यंत अजयच्या आजाराबद्दल काही मोघम असं कानावर येत होतं. मी तसाही संध्याकाळी जहांगीर ला त्याला भेटायला जाणारच होतो, म्हंटलं तेव्हाच बघू काय प्रकार आहे तो.

रूम मध्ये गेलो तेव्हा अजयची पत्नी चिंताग्रस्त चेहरा करून बसली होती, पण अजयचा चेहरा मात्र हसरा होता. म्हंटला "ये रे राजा" (राजेशला राजा अशी राजेशाही हाक मारणारे काही मोजके लोक आहेत त्यापैकी अजय एक). त्याचं स्वागत बघूनच मी थोडा निर्धास्त झालो. पण पुढे तो जे हसर्या चेहर्याने सांगत गेला, त्यानी माझा चेहरा मात्र काळवंडत गेला. "त्याचं काय आहे, माझ्या हाता पायातली शक्ती पूर्ण गेली आहे, फक्त मी व्यवस्थित बोलू शकतो" "ठीक आहे, प्राॅब्लेम आहे, पण बोलू शकतो हे काय कमी आहे का?" अजयचा positive attitude बघून मी चाट पडत होतो. अजयला बोलायला खूपच आवडतं, अगदी बडबड्याच म्हणा ना. त्याचा sense of humor ही ज़बरदस्त. कंपनीच्या पार्टीमध्ये हा पठ्ठ्या center of attraction असायचा. आजार गंभीर आहे, पण मेंदू तर शाबूत आहे, बोलू शकतो आहे, पूढचं पूढं बघू असा साधा सरळ हिशोब होता. काहीतरी न्यूरोच्या related issue होता हे कळले होते. त्यानंतर त्याने सांगितलेला क़िस्सा मला थक्क करून गेला.

गुरूवारी अॅडमिट केल्या नंतर त्याला ३५००० रूपयाला एक अशी चार इंजेक्शनं त्याच्या शरीरात उतरवली होती. रात्री (की शुक्रवारी सकाळी) त्याला उपचार म्हणून electric shocks देण्यात येणार होते. याची बहुधा बडबड चालूच होती. Stretcher वरून घेउन जाण्यासाठी नर्स आली. त्या परिस्थितीतल्याही त्याच्या विनोदी झाक असलेलं बोलणं बघून ती म्हणाली "का हो तुम्हाला electric shocks देणार आहेत, tension नाही वाटत" त्यावर अजय म्हणाला " त्याचं काय आहे सिस्टर, ३५००० रूपयाचं एक अशी चार इंजेक्शनं ठोकून तुम्ही मला एवढा मोठा shock दिला आहे, त्याच्यासमोर हे shocks म्हणजे किस झाड़ की पत्ती" आता बोला !

पुढे त्या आजाराबद्दल कळलं लाखात एखाद्यालाच होतो. त्याचं नाव आहे Guillain Barre Syndrome. अर्थात त्या आजाराबद्दल कळायलाच तीन आठवडे गेले . वाचण्याची शक्यता खूपच कमी. Neurologist दिवटे मॅडम आणि जहांगीर हाॅस्पिटल यांनी खूपच व्यवस्थित उपचार केले. डाॅक्टर दिवटे म्हणाल्या की औषधापेक्षा तुम्ही त्या आजाराला कसं सामोरं जाता यावर recovery अवलंबून आहे. अजय वाखाणण्याजोग्या धैर्यानी त्या दुर्धर आजाराला सामोरा गेला, आणि त्यावर विजय मिळवून दिमाखात कंपनीत परत रूजू झाला.

आज अजय SKF अहमदाबाद चा plant head आहे. कालानूरूप आमचं बोलणं आता कमी होतं, पण त्याचा आजार आणि तो लढा क़ायम माझ्या लक्षात राहील.




Monday, 7 October 2013

मला लाभलेले पायगूण

कालच्या लेखावर वैभवी ची परमप्रिय मैत्रीण सिंगापूर निवासी  अनु सिंग (पूर्वाश्रमीची सोनल वाळिंबे) हिच्याकडून मैत्रीण प्रेमापोटी एक  comment आली, वैभवी चा पायगुण होता म्हणून झाले. मग मी विचार करायला लागलो (हे काय भलतंच, अशा नजरेने वाचू नका, मी पण करतो कधी कधी विचार) आणि लक्षात आले कि माझ्या आयुष्याचा डोलाराच कुणाच्या तरी  पायगुणावर उभा आहे. आणि अचानक मला पाय या अवयवा विषयी आणि लाथ बसणे या प्रक्रियेविषयी विशेष ममत्व वाटू लागले . 

भारती विद्यापीठातून १ २ जण  बजाज ऑटो मध्ये select झालो होतो त्यात अस्मादिकांचा नंबर लागला होता. १ २ ही जण कंपनीत रुजू व्हायला औरंगाबाद ला गेलो. मित्रांची हसीमजाक चालू होती, उदयाला नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती, ३ ० दिवसानंतर पहिला पगार होणार होता. सुख स्वप्नांची कमी नव्हती. मेडिकल झाली . डॉक्टर बर्वे आणी डॉक्टर जहागीरदार होते. संध्याकाळी ५ वाजता सगळ्यांना बोलावले. आणि प्रत्येकाला सांगायला सुरुवात केली तू या department ला जा, तू तिकडे जा . मी आपला हातावर हात चोळत, पाय हलवत चुळबूळ करत बसलो होतो पण मला काही सांगतच नव्हते. सगळ्यात शेवटी माझ्याकडे आले, आणि मला सांगण्यात आले कि बाळा तू मेडिकल मध्ये reject झाला आहेस . धरणीकंप झाला, हात पाय थरथरू लागले . कॅम्पस मध्ये एक जॉब offer घेतली कि दुसरीकडे appear होता येत नव्हतं. बजाज ला जॉईन होण्याचा मटका लागला होता, ती पण लाईन  बंद झाली होती खूप प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. आयुष्यात मिळालेली पहिली लाथ, म्हणजे पायगुण डॉक्टर बर्वेंचा .   डाॅक्टर बर्व्ंेंच्या पायगुणामुळे दुसरा जाॅब शोधला आणि SKF मध्ये जाॅईन झालो. 

SKF च्या मुलाखतीनंतर मला सांगितले की TRB grinding ला जा. मी दरवाजापर्यंत पोहोचलो नाही तोच personal manager ने परत बोलावले आणि आज्ञा दिली "असं कर, DGBB grinding ला जा" आज्ञा शिरसावंद्य मानून मी DGBB grinding कडे कूच करता झालो. खरंतर ती लाथच, पण मी "आज्ञा" "शिरसावंद्य" असे शब्द याच्यासाठी वापरले कारण ते माझ्या पथ्यावर पडलं होतं. का ते मला नंतर कळलं. TRB म्हणजे taper roller bearing चं grinding department म्हणजे trainee साठी काळ्या पाण्याची शिक्षा होती. तिथे कुणीही ३ महिन्यापेक्षा जास्त trainee टिकत नव्हता. DGBB म्हणजे deep groove ball bearing ला पाठवणारे तामोळी साहेब माझ्यासाठी पायगूणाचे ठरले.

एक वर्ष govt training केल्यावर मी कंपनी ट्रेनी झालो आणि एव्हाना माझ्या affair ची कुणकुण दोन्ही घरच्यांना लागली होती. मी नोकरीबरोबरच ICWA करण्याचा प्रयत्न करत होतो. पण लग्नाची भानगड निघल्यामुळे मी ICWA चा नाद सोडून दिला, आतली गोष्ट सांगतो, मला ते ICWA झेपतच नव्हतं. ते मी उगाचच वैभवीवर शायनिंग मारण्यासाठी नाटक करत होतो. थोडक्यात माझं लग्न ठरणे म्हणजे नियतीचाच आग्रह आणि पायगुण. (आता नियती म्हणजे कोण ते विचारू नका .)


आता लग्न तर ठरले, पगार रु २ ४ ० ० दरमहा फक्त. कंपनी ट्रेनी. म्हणजे थोडक्यात कमवायची अक्कल यायच्या आत गमवायचे मार्ग खुले होत होते . १ ८ ऑगस्ट ९ १ ला साखरपुडा झाला आणि २ डिसेंबर ची तारीखही ठरली. कुठल्याही angle ने मी लग्नाचा लायक उमेदवार नव्हतो. permanent जॉब नाही, पगार तुटपुंजा आणि वय २ ३ . २ १ ऑगस्ट ला एक अशक्य गोष्ट घडली. आमचे divisional manager पाटील साहेबांनी मला केबिन मध्ये बोलावले. सहसा ते कुणाशी बोलत नसत आणि ट्रेनी शी तर त्याहून नाही. वाटलं काय नारळ मिळतो काय आता? बोहल्यावर चढताना श्रीफळाची सोय झाली असे वाटायला लागले. धडधडत्या अंत:कारणाने पाटील साहेबांचे बोलणे ऐकू लागलो "त्याचे काय आहे मंडलिक, तुला आणि ३ कंपनी ट्रेनी ला ट्रेनिंग period कमी करून confirm करायचे ठरवले आहे. तुमच्या appointment ची तारीख १ ऑगस्ट आहे" आता फक्त वय वर्ष २ ३ ह्यामुळे लग्नासाठी मी लायक ठरत नव्हतो. (मराठी भाषेची कशी हीच गम्मत आहे "लग्नासाठी मी नालायक ठरत होतो" कसं वाटतं?) पण ते काही मी बदलू शकत नव्हतो.पाटील साहेबांनी लाथ दिली, sorry साथ दिली आणि मी होत्याचा नव्हता होता होता वाचलो. 

SKF नंतर rollon hydraulics मध्ये ८ वर्षं काम केले . २ ० ० २ मध्ये विकास दांगट या नावाप्रमाणेच दणकट व्यक्तिमत्वाच्या माझ्या मित्राने म्हंटले "आता किती दिवस दुसर्याची धुणी धुणार. बस झालं नौकरी करणं". माझ्या अंगात मुरलेला  साधं वरण भात सळसळला आणि मी कारणे द्यायला लागलो "जागा नाही, पैसे नाहीत, कसं काय जमेल" विकास उवाच "हि जागा, हे भांडवल, काही जमणार कसं नाही तेच बघतो." खेडेगावात एखादा मामा आपल्या भाच्याला बखोटीला धरून किंवा पार्श्वभागावर लाथ मारून पोहण्यासाठी कसं विहिरीमध्ये पोहायला ढकलायचा, तसंच मला विकासनी धंद्यात ढकललं. थोडक्यात त्या पायगुणा नि मी नोकरदारचा धंदेवाईक नोकरदार झालो. 


अशा पद्धतीने मी आज जो माझ्या पायावर उभा आहे, त्यात माझ्यातील अंगभूत गुणापेक्षा हे वेगवेगळे लत्ताप्रहार तथा पायगुण  जास्त कारणीभूत  आहेत  या बाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही