Monday, 29 June 2015

नागपूर पार्ट १

मला असं नेहमीच वाटत आलं आहे की जगण्याची संधी जरी पुण्याने दिली तरी संधीचा दरवाजा ठोठावण्याची अक्कल मात्र नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर शहराने दिली. नाशिक अन औरंगाबादमधे तर माझं लौकिकार्थाने शिक्षणच झालं, पण ८३ ते ८६ या उन्हाळ्यात मी नागपूरला जे जगलो, त्याने प्रचलित शिक्षणाव्यतिरिक्त जीवनाचे विविध कंगोरे दाखवले हे नि:संशय. माणूसकी, प्रेम, संयमित व्यावहारिकता याचा थोडा जरी अंश माझ्यात उरला असेल तर तो नागपूरमुळे आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही. 

काही नाती अशी असतात की त्याला नाव नसतं. माझं आणि साधनाताईचं असंच एक नातं. साधनाताई खरं तर माझी आत्या. आत्या का तर ती बाबांना दादा म्हणायची म्हणून. बाकी काही नाही. पण तिचे भाऊ जे माझ्या वयाचे होते, तिला साधनाताई म्हणायचे मग मी पण तेच बोलवायला लागलो. आता तिची मुलं मला मामा म्हणतात. 

उत्साह या शब्दाचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला साधनाताईला भेटायला हवं. क़ायम उत्फुल. नाशिकला आम्ही रहायचो. घिसाडांचं घर टिळकवाडीत आणि आम्ही दिंडोरी रोडला. हो, घिसाड आडनाव. तिच्या सुस्वरूपतेला आणि स्वभावाला न शोभणारं. आपल्या वागण्यानं क़ायम समोरच्यावर क़ायम आनंदाचा शिडकावा शिंपडणार्या साधनाताईचं आडनाव लग्नानंतर उन्हाळे असं व्हावं ही  अजून एक गंमत. सहा सात वर्षाच्या कौटुंबिक जिव्हाळ्याची मैत्री घट्ट नात्यात कधी परिवर्तित झाली हे दोन्ही घरातल्या लोकांना कळलंच नाही. 

मला नक्की वर्ष आठवत नाही पण ८२-८३ असावं. साधनाताईचं लग्न झालं आणि ती नागपूरला आली, तिथल्या उन्हाळ्यात नांदायला. हो, तिचं आडनाव आता उन्हाळे झालं. गिरीश उन्हाळे, तिचा आत्येभाऊ. त्यांनीच मागणी घातली तिला. गिरीश, खरं नाव विसरलो पण काहीतरी देवाचं नाव आहे, त्यांना बाळ म्हणायचे. लग्न करायला नाशिकला आले तेव्हा काहीजण त्यांना बाळ, काही बाळदादा तर काही बाळ्या म्हंटलेलं आठवतंय. या सगळ्यांचं रूपांतर लग्नानंतर बाळासाहेब अशा भारदस्त नावात झालं. वरपक्षाच्या रूममधे गेल्यावर बाळासाहेबांच्या व्यवस्थित ठेवलेल्या बँगेत विल्सचं पाकीट माझ्या नजरेने हेरलं होतं. "तुझा नवरा सिगरेट पितो" हे मला साधनाताईच्या कानात जाऊन सांगायचं होतं. पण ती उबळ दाबून धरली. 

बाळासाहेब, नावाबरोबर सध्या त्यांची नंतर तब्येतपण भारदस्त झाली, पण आपण त्यांना गिरीशच म्हणू. अतिशय सॉफ्टस्पोकन, मृदू बोलणारे. नागपूरच्या कानाला गुदगुल्या करणार्या शिव्यांमधल्या "आयला, मायला, साल्या, भोसडीच्या" इतक्याच काय त्यांच्या तोंडून पडायच्या. कदाचित बालमनावर विपरीत परिणाम नको म्हणून माझ्यासमोर ते ठेवणीतले मंत्रोच्चार करत नसावेत. बोलणंही एकदम हळू. फोनवर बोलत असतील तर शेजारच्या माणसाने कितीही कान टवकारले तरी एखादा शब्द ऐकू आला तर शप्पथ. राहणं एकदम टापटीपीचं. कडक इस्त्रीचे कपडे, कायम शर्ट आत खोचलेला, चापूनचोपून पाडलेला भांग, एकदम भारी पर्फ़्यूम अन डोळ्यावर गॉगल असा एकदम टकटकीत मामला होता. पण या सगळ्या प्रकारात भपका कुठेही नव्हता. तर ते सगळं त्यांना शोभून दिसायचं. 

आजही मी बाळासाहेबांना फोन केला की ते "हा, बोल राजेश, कसा आहेस" अशी शांत आवाजात एकदम साधी, अळणी म्हणा हवं तर, सुरूवात करतात अन साधारण आमचं संभाषण दीड मिनीटात संपतं. याउलट साधनाताई ला फोन केला की "अय्या राजेश, किती दिवसांनी फोन केलास रे" अशी दणदणीत सुरूवात होऊन मग अधूनमधून "अजून काय म्हणतोस" असं म्हणत संपलेलं संभाषण पुन्हा पुढे नेत अाणि मग माझ्यानंतर वैभवीशी, मग वहिनीशी म्हणजे माझ्या आईशी बोलून साधारण अर्ध्या पाऊण तासाने ती फोन खाली ठेवते. सौंदर्याचा निकष लावला तर साधनाताई रूपवान अन गिरीश स्मार्ट पण ताईइतके नाही. पण कपड्यांची टापटीप बाळासाहेबांची साधनाताई पेक्षा उजवी. असं परस्परविरोधी असणारी ही जोडी माझ्या लेखी लक्ष्मी नारायणापेक्षा काही कमी नव्हती. 

आयुष्य कसं जगावं याचे आपले काही ठोकताळे असतात. त्याला आदर्श असंही म्हणतात. 

गिरीश आणि साधनाताईचा संसार बघून मी माझ्याही आयुष्याचे ठोकताळे मांडू लागलो.  

क्रमश: 

रस्ते आणि मँनेजमेंट

मला असं नेहमीच वाटत आलं आहे की आपल्या इथले रस्ते आणि ट्राफीक हे मँनेजमेंटचे गुरू आहेत. कसे ते सांगतो:

रस्त्यावर इतके खड्डेखुड्डे असतात आणि मग त्यांना चुकवत गाडी चालवण्याची सवय. कुठल्याही प्रोजेक्ट मधे आलेले अडथळे पार करत तो पूर्ण करण्याची सवय लागते. 

रस्त्यावर कुणी कुठुनही आपल्याला आडवा येऊ शकतो. गाडी चालवताना नेहमीच सावध रहावं लागतं. Be alert हे आम्हाला वेगळं शिकवावं लागत नाही. 

बाकीचे लोकं सिग्नलला थांबून नियम वैगेरे पाळतात. आम्ही मात्र चान्स मिळेल तसं सुळकन गाडी काढतो. प्रॉब्लेम्स नियमाप्रमाणेच सोडवायला पाहिजे, असं नसतं हे आम्हाला शिकवलं जातं. 

शांतपणे रस्त्याच्या मधोमध चालवण्याच्या सवयीप्रमाणे एक विलक्षण स्थितप्रज्ञता येते. 

हॉर्न ऐकणे अन वाजवणे यामुळे माणसाची सहनशक्ती वाढते. कस्टमर हॉर्नप्रमाणे कितीही बोंबटला तरी आमच्यावर काहीच फरक पडत नाही. 

ट्राफीक जाम मधे अडकल्यावर, या प्रॉब्लेम मधून आपण सहीसलामत सुटू याची खात्री असते. हीच श्रद्धा मग प्रोजेक्टमधे चहूबाजूने येणार्या प्रॉब्लेम मधे अडकल्यावर, त्यातून सुटू ही खात्री देते. 

गाडी चालवताना ओव्हरटेक करताना समोरून एखादी गाडी येते, तेव्हा आम्ही त्याला अंदाज घेऊन आधीच रस्त्याच्या कोपर्यात दाबतो. कस्टमर किंवा कुणीही काही प्रॉब्लेम घेऊन आला की आम्ही आधीच कॉर्नर करतो. 

नियम तोडल्यावर हवालदाराला आपण जी कारणं देतो आणि काही नाहीच जमलं तर शेवटची तोडपाणी जी करतो तिचं महत्व मँनेजमेंट मधे वेगळं सांगायची गरज नाही. 

रस्त्यावर अँक्सीडेंट पाहिल्यावर गाडी चालवतानाची निर्वीकारता अन्नपदार्थात शिश्यासारखं विष मिसळण्याची अक्कल देते. 

तेव्हा राज्यकर्त्यांनो, आपल्या देशाचे रस्ते आणि ट्राफिक तुम्ही अशीच ठेवा, खड्डे ठेवा, खाचखळगे ठेवा. अशी चालतीबोलती मँनेजमेंटची विद्यापीठं हे आपल्या देशाचं भूषण आहे. आणि त्यामुळेच आपण जगाला मँनेजमेंटचे एक्सपर्टस देऊ शकतो. 

Sunday, 28 June 2015

धंदीफंदी

गेले ६ महिन्यापासून शेड मालकाच्या मागे लागलो होतो, समोरचा रस्ता बनवून द्या. हो नाही करता करता पावसाळा आला. त्याच्या आधी म्हणालो "तुम्हाला पैसे खर्च करणं अवघड जात असेल तर आम्ही contribute करतो." तर म्हणाले "अहो, तो काय विषय आहे. ग्रामपंचायतीने नाय केलं काम तर आपण टाकून देऊ ५०-६० गाड्या मुरूम. हाय काय अन नाय काय" आम्ही आपलं वाट बघत थांबलो. कचकावून पाऊस चालू झाला. समोरच्या भुसभशीत मातीचा पार चिखल झाला. गाड्या अडकू लागल्या, लोकं घसरू लागले. मालक काय घास टाकेना. एका सकाळी ८:३० लाच धडकलो मालकाच्या घरी.

५ ते ६००० स्क्वेयर फूटाचं घर. १००० एक स्क्वेयर फूटाचा तर हॉलच होता फुल्ली एयरकंडिशन्ड. मऊ गाद्यांचे सोफे. वरती एक रापचिक झुंबर. ७-८ लाखाचं असेल. मार्बल फ्लोरिंग. हॉलमधेच स्टेन ग्लास होती, फुल साईज, १० एक फुट उंचीची. त्यावर विठ्ठलाचं पेंटिंग अन ओव्हरऑल थीम वारीची. गरीबांच्या सोहळ्याला त्या पाच कोटीच्या घरात स्थान होतं. यांच्या चिरंजिवांचं मागच्या महिन्यात लग्न होतं. २, ३० फूट बुमचे डायनामिक कॅमेरे, एक द्रोन कॅमेरा. कमीतकमी ७-८ लाखाचं फुलांचं डेकोरेशन. जेवायला चाट, साऊथ इंडियन, चायनीज, पंजाबी आणि महाराष्ट्रीयन डिशेसची रेलचेल. सात स्वीटस. पानमलाई नावाची एक मिठाई प्रत्येकी १०० रू ला असेल. २५००-३००० पब्लिक. म्हणजे ३० लाखाचा चुराडा.

नाही, करा हो चुराडा. आम्हाला काय त्याचं. वडिलोपार्जित जमीनी तुमच्या. शेतकर्यांचा कळवळा असणार्या जाणत्या राजांचे समर्थक तुम्ही. घर सजवताना आणि लग्नात तुम्ही शानशौकत मिरवली तर आमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. पण तुमच्याकडून आम्ही भाड्याने धंद्यासाठी जागा घेतली. तुमच्या घरी लक्ष्मी घागरी भरते त्यातली एखादी घागर आमच्याकडूनही मिळते तुम्हाला. तरी इतकी बेपर्वाई. ज्या ठिकाणाहून तुम्हाला काहीही मिळकत नाही त्या घरावर तुम्ही करोडो रूपये खर्च करता अन ती बरकत ज्या वास्तुमुळे तुम्हाला आली तिला मात्र कंगाल ठेवता.

टाटा, भारतीय उद्योगक्षेत्रातलं अत्यंत विश्वासार्ह नाव. त्यांनी व्हीएसएनएल उचलली आणि सगळीकडे जाळं पसरवलं. महिन्याला न चुकता ३३१४ रू च वट्ट बिल येतं. एखाद दुसरा दिवस पैसे भरायला उशीर झाला तर सकाळ दुपार संध्याकाळ फोन करून भंडावून सोडता. आणि दिवसातले ३-४ तास कनेक्शन डाऊन अबसतं तेव्हा काहीतरी मुर्खासारखी कारणं देऊन कस्टमरच्या तोंडाला पानं पुसता तुम्ही.

आमच्या इंडस्ट्रीमधे एक सी फॉर्म नावाचा प्रकार असतो. म्हणजे आंतरराज्य काही सेल्स केला तर त्याचं इनव्हॉईस बनवताना आम्हाला VAT न लावता CST भरावा लागतो. २% आहे तो. हे पैसे सेंट्रल ला जात असावेत. ह्या प्रोसेसमधे कस्टमरने सी फॉर्म नावाचं एक डॉक्युमेंट इश्यु करायचा असतो. डिक्लरेशन की सप्लायरने २% चार्ज केलेत. सी फॉर्म शासनाला द्यायचा असतो. आता गंमत बघा, समजा तुम्ही तामिळनाडूतल्या कुठल्या खेड्यातले कस्टमर अन मी तुम्हाला मटेरियल सप्लाय केलं सी फॉर्म च्या अगेन्स्ट २% लावून. तो फॉर्म तुम्ही दिला नाही तर पेनल्टी भरायची कुणी? तर मी. कळलं का? परत वाचा.

तुम्ही केलेल्या चुकीची शिक्षा मात्र मी भोगायची.

हे असं आहे. माझ्यासारखे असंख्य लघुउद्योजक देशाच्या कानाकोपर्यात काम करत आहेत. पाच पन्नास कुटुंबाचा भार वाहताहेत. देशाच्या जीडीपी मधे खारीच्या वाटेचं का होईना योगदान देत आहेत. पण आजूबाजूचं वातावरण पोषक नाही. Infrastructure नाही, किचकट कायदे याने कधीकधी त्रस्त होतो आम्ही.

नवीन शासनाने गेल्या वर्षभरात घोषणा खुप केल्यात आता उरलेल्या काळात जर त्याची अंमलबजावणी केली तर बहुचर्चित अच्छे दिन नक्कीच दिसतील याची आशा वाटते.

तसंही आशा ठेवण्याशिवाय आपल्या हातात काय आहे? 

Friday, 26 June 2015

असंपन्न आणि अपरिपूर्ण.

दोन गोष्टीबद्दल आज काल मी फारच संभ्रमात असतो. अगदी खरं सांगायचं तर बऱ्याच बाबतीत संभ्रमात असतो, पण दोन गोष्टी वैगेरे शब्द लिहिले लोकांना वाटतं, याला बाकी गोष्टी कळतात. असो.

ह तर सांगत होतो दोन गोष्टी. संपन्नता आणि परिपूर्णता. म्हणजे याला काही लिमिट असावी का?

पहिले आपण संपन्नता घेऊ. हो म्हणजे ती अशी लेखात बिखातच  घेऊ शकतो. प्रत्यक्षात आनंद आहे. तर संपन्तेच्या कल्पनेला कुठं मुरड घालावी? किती असलं म्हणजे ते पुरेसं असतं? याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतीलही. संपन्नता आणि याबरोबर येणारी असुरक्षिततेची भावना. पुढच्या पिढीला पण आपणच वारसाहक्काने घर किंवा इतर स्थावर संपत्ती ठेवण्याचा अट्टाहास हा माणसाला ग्रीडी बनवतो असं नाही वाटत का? मुलांना एक शिक्षण दिलं हे इतकं पुरेसं नाही का?

मी आजकाल वयाच्या ५० ते ५५ मध्ये निवृत्त होण्याचा विचार करतो आहे. तो कुणाजवळ बोलून दाखवला तर पहिली प्रतिक्रिया असते "अरे म्हणजे यश ला तुझ्या कंपनीत लावशील ना तो पर्यंत" म्हणजे काय? मी का म्हणून पोराच्या भवितव्याचा इतका विचार करू. तो समर्थ नाही का? तो समर्थ नाही तर मी फक्त त्याला भौतिक सुखच द्यावं का? आणि ह्या स्वत:चे सामर्थ्य, त्रुटी, मग त्यांचा नीट वापर या अभौतिक गोष्टी त्याने कुठून शिकाव्यात. म्हणजे थोडक्यात संपन्नतेच्या ध्यासापायी आपण येणाऱ्या पिढीचे पंख आधीच कापून टाकतोय. मग मला पुरेल इतकाच पैसा हवा असेल तर का मरमर करावी. ७० व्या वर्षी जर मला नैसर्गिकरीत्या मृत्यू गृहीत धरला तर स्मशानाचे भाडे असेल त्यावेळेला ७५०० रु वैगेरे. त्यापेक्षा जास्त कशाला हवेत पैसे.

अन दुसरी परिपूर्णता. खूप जास्त perfectionist असणं, हे मला तापदायक वाटतं. आणि ही परिपूर्णता एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा तशाच पद्धतीने केली असता येते म्हणे. आता मला एखादी गोष्ट करण्यामध्ये तोच तोच पणा आला तर मुलखाचा कंटाळा येतो. अहो इतकंच काय, फातिमानगर हून कंपनीत जायला तीन वेगवेगळे रस्ते आहेत. बिबेवाडी-कात्रज वरून, डायस प्लॉट वरून लक्ष्मीनारायण मार्गे, अन स्वारगेट मार्गे. चार दिवस एका रस्त्यावरून गेलं की दुसरा मार्ग लागतो. तीच ब्याग, तोच डब्बा, तेच चष्म्याच कव्हर, त्यांची तीच जागा, तसंच उघडायचं, तसंच ठेवायचं. हे काही आपल्याला  नाही जमणार.

आयुष्यातील गोष्टी त्याच त्याच पद्धतीने केल्या तर आयुष्य नीरस बनतं असं माझं वैयक्तिक मत आहे. मग माझ्यात लौकिकार्थाने जिला परिपूर्णता म्हणतात ती कशी येणार. यांत्रिकी अभियंता असलो तरी रोजच्या जीवनाचं यांत्रिकीकरण झालेलं मला आवडत नाही. मॉर्निंग वॉक एका रस्त्यावरून दररोज घेतलेला चालत नाही. पळवाट समजा.

एखादी गोष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीचा अवलंब केल्यास नुकसान होतं कधी तरी पण नाविन्याचा हव्यासच इतका की ते नुकसान खाऊन टाकतो. देवाने हा विचित्र हव्यास पाळण्याची सांपत्तिक स्थिती दिली हे नशीबच म्हणायचं. पण तुम्हाला सांगतो एखादी गोष्ट नवीन पद्धतीने करण्याचा सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे अपयशाची  भिती. Fear of  failure. आणि मग मनात तयार होतं त्या प्रचलित पद्धतीबद्दल गाढव प्रेम. दुसर्या नवीन पद्धतीबद्दल इतका तिटकारा निर्माण होतो की बास!

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिपूर्णतेची भावना मनात आली की माणसाची उतरण चालू होते. आपण जे करतो तेच उत्तम, तेच भारी असं म्हंटल की संपलंच म्हणून समजा. मग डोळ्यावर झापडं लागतात, मेंदू ला गंज चढतो.

असो. ह्या सगळ्या माझ्या थेअर्या आहेत. कुणाला पटेल न पटेल. पण मला असंच आवडेल, असंपन्न आणि अपरिपूर्ण.

जे आहे ते आहे

वांदे.

फेसबुकमुळे मी बराच नादिष्ट किंवा छंदिष्ट झालो होतो. आजही सोशल मिडीयात मला फेसबुकच जास्त आवडतं. घरच्यांना पण सॉलिड डौट च आला होता की या माणसाला फेसबुकचा नाद लागला आहे म्हणून.

माझ्यासारखाच नीलला क्लॅश ऑफ क्लॅनचा नाद लागला होता. आ़यपॅड दिसला की झडप मारलीच म्हणून समजा. आई बापाची बोलणी पण खायचा.

मी फेबु डिअॅक्टिवेट केलं अन त्याचं अॅप फोन आणि आयपॅडवरून उडवून टाकलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं तसं नीललाही वाटलं
.
एके दिवशी कंपनीतून घरी आल्यावर आयपॅडवर नील नेहमीप्रमाणे तुटून पडला आणि दोनच मिनीटात माझ्याकडे विजयी मुद्रेने पाहत म्हणाला "पप्पा क्लॅश ऑफ क्लॅन उडवलं" मी विचारलं "का" तर म्हणाला "तुम्ही नाही का तुमचं फेसबुक अकाऊंट उडवलंत, मग मी पण......."

असला येडा आहे तो.

नीलला तसं म्हणायला सवय नाही पण पेप्सी बिप्सी ओढतो अधूनमधून. मी रागावतोही त्याला. आपण कुठलाही नाद सोडला की नीलही सोडतो असं नुकतंच कळलं होतं. मी मनात प्रश्न तयारही केला "मी काय प्यायचं सोडलं म्हणजे तु पेप्सी प्यायचं सोडशील?" मला त्याचं उत्तरही माहित आहे. "वाईन" नीलसाठी कुठलीही दारू म्हणजे वाईन. त्याला बियर, व्हिस्की हे उपप्रकार माहित नाहीत.

प्रश्न मी अजून विचारला नाही आहे. मी घुटमळतो आहे मनात. अगदी कॉम्प्युटरवर फेसबुकमधे कर्सर डिअॅक्टिव्हेट वर नेऊन घुटमळत होतो तसाच.

माझ्या मनात जे उत्तर आहे तेच त्यानं दिलं तर परत वांदे.

तो देऊ शकतो. येडा आहे तो.

Monday, 22 June 2015

अजय

अजय लहानपणापासून अभ्यासात हुशारच होता. आणि स्वभावानेही मनमिळाऊ. आपले आईवडील अन दोन भाऊ, असा पाच जणांचा संसार चालू होता. आईवडील, यशवंतराव आणि लता, एकदम देवभोळे. सारख्या पुजा अन व्रतवैकल्य यात गढलेले. अजय चे दोन भाऊ, सुजय आणि हे संजय ही हुशारच. सांपत्तिक स्थिती ठीकठाकच, पण सुखी अन समाधानी.

अजय बारावीला उत्तम मार्कस मिळवून इंजिनियर झाला. करियर घडवण्याच्या प्रयत्नात असतानाच पाठचा भाऊ सुजय ही इंजिनियर होऊन नोकरीला लागला. अजय इकडेतिकडे हातपाय मारत होता, पण म्हणावी तशी घडी बसत नव्हती. एव्हाना सुजयने कंपनीतील, त्याच्या वयापेक्षा मोठी पोरगी पटवली, अन स्वत:चा स्वतंत्र घरोबा बसवला. अन ह्या घटनेचा अजयवर विपरीत परिणाम झाला. आधीच आयुष्यात चाचपडत असलेला अजय अन त्यात लहान भावाने केलेला उदयोग. अजयला वेडाचे झटके येऊ लागले.

पुण्याला त्याला मी कामाला लावलं, पण तो कामावरच जायचा नाही. घरी आल्यावर नुसता बडबड करायचा. एकदा मी त्याला जंगली महाराज च्या मंदिरात घेऊन गेलो. खूप समजावलं. पण काही फरक नाही. एक दिवशी मी खूप धुतला त्याला. शेवटी तो गावी परत गेला.

इकडे तिकडे जॉब करायचा ही तो. अशात त्याचं लग्न ठरलं. नशीब त्याचं दुर्दैव हातात घेऊन फिरत होतं. बायकोने इतका मानसिक त्रास दिला की ज्याचं नाव ते. यशवंतराव आणि लता या देवभोळ्या ज्येष्ठ दाम्पंत्यावर ४९८ अ कलम लावून तुरुंग दाखवला. शेवटी जे व्हायचं तेच झालं. अजयचा घटस्फोट झाला.

घटस्फोटाची प्रोसेस पूर्ण होता होता एक वर्ष गेलं. ते झाल्याबरोबर यशवंतराव अजय च्या मागे लागले, परत लग्न कर म्हणून. अजयला वाटतच होतं, आपलं पण घर वसावं म्हणून. त्याच्या वेडसरपणाची झाक पण औषधामुळे कमी झाली होती. शेवटी मग प्रणिताचा स्थळ आलं. तिलाही मेंटल डिप्रेशन ची गोळी चालू होती. पण तिचा पायगुण चांगला होता. अजय ला चांगली नोकरी मिळाली.

संसारात स्थिरस्थावर होत असतानाच अजय ची मानसिक स्थिती खूप सुधारली, पण याउलट प्रणिताची मात्र अजून बिघडली. त्या दोघांच्या संसारावर फुल उमलले. अनिश नावाचा मुलगा. त्याचा परिणाम अजयवर चांगला तर प्रणिता वर उलटा झाला. सारखं ती मृत्यू बद्दल बोलू लागली. अगोदरच्या बायकोने दिलेला ४९८ चा झटका अजयच्या चांगला लक्षात होता. आता परत या बायकोने काही विचित्र केलं तर त्याला आणि कुटुंबाला कुणीही माफ करणार नव्हतं. प्रचंड टेन्शन मध्ये असायचा, पण सुदैवाने त्याचा मेंदू जागेवर होता.

कंपनीत स्थिरस्थावर झालेल्या अजयने पोस्ट ग्रज्युएशन करायचं ठरवलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा ओढत असलेल्या अजयचं मला कौतुक वाटत होतं. वेडसर बायको, तिच्या टांगती धमक्यांची तलवार, लहान मुल आणि २-३ महिने पगार न देणारी कंपनी. तरीही अजय नैय्या हाकत होता.

आणि अशात ती घटना घडली. प्रणिता, अनिश, प्रणिताची आई अन भाऊ हे एका दुर्दैवी घटनेत पाण्यात वाहून गेले. अजयवर आकाश कोसळलं. पण त्यातूनही अजय सावरला. बायको मुलाच्या मृत्युनंतर १२ व्या दिवशी अजयने ME ची परीक्षा दिली आणि पुढे चांगल्या गुणांनी पास ही झाला.

एक वर्ष होतं ना होतं तोच यशवंतराव अजयच्या मागे लागले, परत लग्न कर म्हणून. एव्हाना अजय या सगळ्या प्रकराला उबगला होता. पण यशवंतराव काही ऐकत नव्हते. सारखा लकडा, आमच्यासमोर तुझं घर बसू दे, काय हरकत आहे मुलीला मुल असेल तर, पण लग्न कर.

अजयने मला सांगितलं की दादांना तू समजावून सांग. मी तर सांगून आलो आहे "नियतीने अजयला खूप चटके दिले आहेत. अशा परिस्थितीत त्याला लग्नाला भरीस पाडून तुम्ही मोठी चूक करत आहात. त्याचं आयुष्य आहे, त्याला त्याच्या कलाने जगू दया. त्याचे काही ठोकताळे आहेत, ते मांडू दया" अशाच पद्धतीचं दोन एक तास बकबकत होतो. बघू काय फरक पडतो ते.

अजय, सगळ्यात पहिले, तुला मी मारल्याबद्दल मन:पूर्वक माफी मागतो. कारण मुळात तुझं बिघडलेलं मानसिक संतुलन हा तुझा आजार आहे हेच मला कळलं नव्हतं. आणि दुसरं आता विधात्याला तु टक्कर देत या सगळ्यातून बाहेर पडला आहेस. मला तुझं कौतुक तर आहेस, पण जेव्हाही तु मदतीची हाक देशील, मी एका पायावर येईल, तुझ्या पाठीशी उभं राहण्यासाठी.

(सुजय ने घराशी संबध तोडले आहेत अन तो सिंगापूरला स्थायिक झाला आहे. अन संजय घरच्या लोकांशी संबंध ठेऊन आहे, पण गावापासून दूर ४०० किमी वर एका शहरात चांगल्या नोकरीत आहे.)

Thursday, 18 June 2015

18 June

१९८८-८९ ची गोष्ट असेल. माझं आणि वैभवीचं प्रेमप्रकरण, ज्याला संस्कृत भाषेत लफडं म्हणता येईल, फारच जोरात चालू होतं. एके दिवशी बाबांनी, भास्कर मंडलिकांनी, मला विचारलं "का रे, काल कर्वे रोड ला तुझ्यामागे स्कूटर वर कोण मुलगी बसली होती?" मी बोललो "अहो तो मी नव्हतो. मित्राला दिली होती गाडी. त्याच्या आत्ते बहिणीला सोडायला चालला होता तो" फुल लोणकढी थाप  होती ती. बाबानाही लक्षात आलंच असेल ते. मिश्किल पणे हसले अन सोडून दिलं मला. पण शेवटी बापच ते माझे. मी समजून घेतलं.
******************************************************************************
१७ जून २००९. बाबा पलंगावर निपचित पडून होते. मला मुंबई ला जायचं होतं. मी विचार केला जाऊन येऊ. काम आटोपलं. परत आलो.सगळं व्यवस्थित होतं.

१८ जून २००९. गुरुवार. सकाळी कुठलंसं स्तोत्र बाबांच्या शेजारी बसून म्हंटल. मग नेहमीप्रमाणे तयार झालो. ऑफिस ला जायला. युनिफॉर्म चढवला. आणि बटणं लावत बाबांच्या रूम मध्ये गेलो. श्वास चालू होता. काय मनात आलं माझ्या काय माहित. आईला बोललो "मी आज जात नाही ऑफिस ला" ती म्हणाली "का रे" मी म्हणालो मूड नाही आज" कपडे बदलून पायजमा वैगरे घालून बसलो.

उन्मेष चा फोन आला. येतो म्हणाला घरी, थोड्यावेळासाठी. मग बाहेर जातो कामाला, अन संध्याकाळी परत येतो. मी बोललो "उन्मेष, तू एक काम कर. आजची दिवसाची कामं आटप अन दुपारी साधारण दोन वाजता घरी ये."

माझ्या सासूबाई, बरेच दिवसात घरी आल्या नव्हत्या. बाबांना बघायला. मी त्यांना फोन केला "या आज बाबांना भेटायला" तर त्या म्हणाल्या "येते संध्याकाळी" तर मी बोललो "दुपारीच या बरं राहील"

ठाण्याहून मामाचा फोन आला. तो म्हणाला "काय रे राजा, आज घरी कसा?" मी म्हणालो "नाही जावसं वाटलं कंपनीत" तर तो म्हणाला "चल, मी पोहोचतोच २-३ वाजेपर्यंत"

संध्याकाळी ५ च्या सुमारास मी सीडी आणायला गेलो भजनाची. विचार केला लावून ठेवावी. परत आलो. आणि ती सीडी लावत असतानाच बाबांच्या श्वास घेण्याच्या आवाजात बदल झाला. घरघर वाढली. मी आईला हाक मारली, बाकीही लोक आले.

माझ्या लक्षात आलं काय घडतंय ते. मी पाय आपटून, "नाही नाही" म्हणत ओरडू लागलो. अगदी लहानपणी कुणी आलेला माझ्याच वयाचा पाहुणा माझं खेळणं माझ्याकडून हिसकावून घेताना जसा रडायचो तसाच. पाय आपटत.

तेव्हा कुणीतरी त्या पाहुण्या मुलाला सांगायचं "बाळा, दे ते त्याचं खेळणं. त्याला परत देवून टाक."

इथे पाहुणा साक्षात यम होता. त्याला सांगण्याची कुणाची बिशाद. तो कुणाचीही पत्रास न ठेवता बाबांना आमच्या सगळ्यांकडून हिसकावून घेऊन गेला. 

१८ जून २००९. राजेश भास्कर मंडलिक मधील भास्कर मंडलिक, हे राजेश नावाच्या पाठी मागे लिहिण्यापुरते राहिले. बाकी काही आयुष्यात प्रश्न उभे राहिलेच तर आता माझ्या पाठीशी ते नसणार होते.
********************************************************************************

मागच्या आठवड्यातील गोष्ट. मी कुठल्यातरी सेमिनार ला गेलो होतो. आणि जरा ड्रिंक्स घेतले होते. मी रात्री उशिरा आलो. अन सुमडीत खोलीत जाऊन झोपलो. सकाळी उठल्यावर बाबा म्हणाले "काय कुठली घेतली होतीस काल?" मी बोललो "कुठे काय? सेमिनार अटेंड केला अन घरी आलो. बाकी काहीच नाही".
फुल लोणकढी थाप  होती ती. बाबानाही लक्षात आलंच असेल ते. मिश्किल पणे हसले अन सोडून दिलं मला. पण शेवटी बापच ते माझे. मी समजून घेतलं.

आज १८ जून २०१५. आणि गुरुवारच. बाबा गेल्यापासून परत कधी भेटले नव्हते. आज आले. तारीख आणि वार दोन्हीही जुळलेत आज. त्यांनीही विचार केला आज दयावच दर्शन. सकाळी च भेटले. मी झोपेतून उठल्यावर परत निघून गेले.

अनंताकडे.

Tuesday, 16 June 2015

एकला चलो रे

शाळेत असताना मी बॅडमिंटन खेळायचो. अगदी चँपियन वैगेरे नव्हतो, पण ठीकठाक. नाशिकला मेरीचा हॉल होता. आम्ही तिथे पार घाम निथळेपर्यंत रॅकेटबाजी करायचो. तिथं एक सलाते नावाचे प्लेयर यायचे. तुफान प्लेयर होते ते. त्यांच्यासमोर एक कुलकर्णी काका लढायचे. त्यांच्या सिंगल्स मॅच म्हणजे ट्रीट असायची.

एकदा डबल्सची मॅच होती. कुलकर्णी अन त्यांचे पार्टनर आणि समोर सलाते अन आमचा मित्र महेश्या. महेश खेळायचा चांगला पण बाकी प्लेयर्स समोर बारक्याच. मॅच चालू झाली. सलाते कडकडू लागले पण आमचा महेश्या मधेच लूडबूड करायचा अन पॉईंट जायचा. दोन चारदा असं झाल्यावर सलाते महेशला बोलले " तु सर्विस केल्यावर किंवा घेतल्यावर साईडला फक्त उभं रहायचं. काहीच करायचं नाही. मी सांभाळतो"

अन मग सलाते पेटले. मुरारबाजीसारखी त्यांची रॅकेट तळपू लागली. महेश सर्विस करायचा अन बाजूला उभा. सलातेंना बॅडमिंटनचं कोर्ट म्हणजे टेबल टेनिसचा टेबल वाटू लागला. सलातेंनी गेम मारली शेवटी. टाळ्यांचा कडकडाट झाला.

आयुष्यातही होतं ना असं बर्याचदा. आपल्या पार्टनरने फक्त उभं रहावं. काही करूच नये.कारण त्यांनी घेतलेली कुठलीही अॅक्शन ही त्या कामात खो टाकत असते. अन मग हे लाईफ पार्टनर बरोबर होऊ शकतं, बिझीनेस पार्टनर बरोबर होऊ शकतं, प्रवासात को पॅसेंजर बरोबर होऊ शकतं.

आपण प्रॉब्लेममधे असतो अन हे आपले साथीदार भलताच काहीतरी विचार करत असतात. कधी कधी तर त्यांच्या तोंडून पडलेलं वाक्यही इतकं टँजन्ट असतं की आपलं टाळकं सटकतं. तेव्हा असंच बोलावं वाटतं सलातेंसारखं "भाऊ, तु फक्त अस. बाकी काहीच करू नकोस, एक वाक्य बोलू नकोस. मी बघतो सगळं"

सलाते जिंकले, प्रत्येक जण जिंकेल असं नाही. 

Monday, 15 June 2015

कपडे

तसं मी मॅनेजमेंटचे बरेच सेमिनार्स अटेंड करतो, पुस्तकंही वाचतो. पण त्यातल्या एका गोष्टीची माझी नाळ काही जुळत नाही ते म्हणजे, कपडे. कपडे तुमचे भारी असले पाहिजेत हे प्रत्येकजण ठासून सांगत असतो. त्याचा माझ्यावर तास एक भर परिणाम राहतो,

माझं अन चांगल्या कपड्यांचं अगदी लहानपणापासून वाकडं आहे. त्यातल्या त्यात फॅशनेबल कपड्यांशी तर अगदी ३६ चा आकडा. ८-९ वीत असताना क्वाड्राजीन्स नावाची टूम निघाली होती. पितृसुलभ भावनेने बाबा मला ती घेण्यासाठी दुकानात घेऊन गेले. नासिकला, विजयानंद थेटरच्या जवळ. ट्रायलरूम मधे ती ब्राऊन कलरची क्वाड्रा मांडीत अशी अडकली की ती काढताना पार मी घामाघूम होऊन गेलो होतो. पार आता कापून काढावी लागते की काय असं झालं होतं. बरं ती मोठी कात्री डोळ्यासमोर. अन जीन्स अशा ठिकाणी अडकली की कात्रीनं कापताना पँटबरोबर अजून काही अवयव कापला जाईल की काय ह्या भितीने दरदरून घाम फुटला. म्हणजे त्या जीन्सच्या नादात माझे जीन्स पुढच्या पिढीला जाणार नाहीत की काय अशी महाभयानक शंका मनात तयार झाली. दुकानदाराच्या मदतीने ती जीन्स महत्प्रयासाने काढल्यावर मी त्याचं जे नाव टाकलं की आजतागायत जीन्स पँट घेतली नाही.

पुढं डिप्लोमाला तर आनंदीआनंदच होता. अंग झाकण्यासाठी काही अंगावर असावं म्हणून शर्ट पँट. हॉस्टेलवर तर अंडरपँटच्यावर एखादा कपडा असेल तर बाकी पोरं फिदीफिदी हसायची. जनरल नॉलेज कॉंपिटिशन मधे प्राईज मिळालं होतं. इंजिनियरिंग कॉलेजला समारंभ होता. मी क्रिकेट खेळत होतो, ग्राऊंडवर. मला कुणी सांगितलं "अबे मंडल्या गांडू, तुझं नाव आहे ना. जा पळ." मी चार तास खेळून मळकटलेला, तसाच बक्षीस घ्यायला. समोरचा अनोळखी मुलगा म्हणाला "मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्राईज घेतोस, कपडे तर धड घालून यायचे"

पुढे २३ व्या वर्षी बालविवाह झाला माझा. सगळेच जण लग्नात सुट घेतात. त्या न्यायाने मी ही घेतला. हो, म्हणजे फारशी अक्कल आली नव्हती. खरंतर अक्कल ची मी आजही वाट पाहतोय. पण २३ काय लग्नाचं वय नव्हतं. आयुष्यातला पहिला कोट अन टाय घेतला. एस केएफ ला राहिलो असतो तर तो कदाचित शेवटचा राहिला असता. पुढे मार्केटिंगला करीयरने वळण घेतलं. ९७ साली आकार उकार बदलल्यामुळे नवा कोट घ्यावा लागला. Exhibitionमधे स्टॉलवर उभं रहायचं होतं. बैलाला सजवतात तसं कंपनीने टाय कोट ने सजवून आम्हाला उभं केलं. ती कंठलंगोट बांधतानाची झटापट आठवली की अजूनही हसू येतं. शेवटी माझा बॉस बोनी मदतीला धावून आला. त्याने घसा आवळणारी गाठ मारली अन मी मार्केटिंगच्या आखाड्यात कुस्ती लढायला सज्ज झालो. १८ वर्षं झाली, मी दुसरा कोट किंवा टाय घेतला नाही. तोच निळा कोट अन चट्यापट्याचा टाय. आणि हो, पुरूषांचा टाय पण चट्यापट्याचा असतो.

नाही म्हणायला कधीकधी अँरो किंवा कलरप्लस च्या दुकानात जातोही मी. अगदी रूंद छाती वैगेरे करून. पण ते प्राईसटँग वरचे आकडे बघून वीस डिग्री सेंटीग्रेड च्या वातावरणात मला दरदरून घाम फुटतो. ट्रायल रूम मधे जाऊन औटघटकेचा साहेब बनतोही मी. पण बाहेर येताना दडपलेल्या छातीने रिकाम्या हाताने परत येतो. खुप पैसे वाचवल्याचं सुखद फिलींग त्यावेळी येतं.

आता तर कंपनीचा युनिफॉर्म आहे. तोही फार छानछोकीचा नाही. साधाच आहे. सुदैवाने अमेरिकन कंपनी सेटको, ही पण कोट टाय घालण्यासाठी फार आग्रही नाही आहे.

स्वच्छ कपडे असावेत, जरा इस्त्रीबिस्त्री ठीकठाक असावी एवढाच काय वयोपरत्वे झालेला बदल. बाकी कपडे खुप सुंदर किंवा चकचकीत, एकही डाग वैगेरे नसण्याऐवजी जरा मन तसं ठेवलं तर चेहरा तजेलदार दिसतो, असं मला नेहमीच वाटत आलं आहे.

Sunday, 14 June 2015

Burnout

आजकाल लोकांकडे तक्रारींचा पाढा  तयार असतो. खर्याची दुनिया नाही राहिली, सगळीकडे दहशतवाद बोकाळलाय, भ्रष्टाचाराने देश पोखरून गेला आहे, शैक्षणिक संस्थेत अनागोंदी माजली आहे वैगेरे वैगेरे. अशा गोष्टी बाष्कळ पद्धतीने चघळून त्याचा कीस पडायचा हा आपला राष्ट्रीय टाईमपास आहे. या प्रकारावर प्रतीआघात एक तर आपण करत नाही किंवा केलाच तर तो तडीला नेत नाही.

लोकं खरं तर सुशिक्षित झाले आहेत, हुशार झाले आहेत, (काही अतिहुशार ही आहेत), आजूबाजूला काय चालू आहे त्याची त्यांना माहिती आहे, कधी चुकीची पण असते ती गोष्ट वेगळी. तरीही आपण अशी गोष्ट आपल्यासमोर घडली की आपण हात खाजवत उभे राहत फक्त बघत बसतो. कुणी दुसरा अवयव खाजावतं. पण कृती शुन्य. आणि हे दुबळ्या मनाचं लक्षण आहे, किंवा आपल्याला काही करायचंच नाही, किंवा क्षमता नाही वैगेरे अशातला भाग नाही आहे. हे त्याच्या पेक्षा विचित्र आहे.  किंबहुना आपल्या हातून पाप घडतं आहे आणि या पापाचं नाव आहे Burnout. (मी याला मराठीत काय म्हणावे यावर पुष्कळ खल केला, पण नाही सापडला शब्द. Burnout is a psychological term that refers to long-term exhaustion and diminished interest in work. निरिच्छता जुळतं थोडं)

कधीकाळी ही साथ काही लोकांपर्यंत पोहोचली होती, त्यांना आपण मानसिक रुग्ण किंवा दुबळे म्हणायचो. पण आता मात्र परिस्थिती उलटी आहे. आपल्यातले बरेच जण या विचित्र रोगाचे शिकार झालो आहोत. समाजातला अगदी छोटा वर्ग याच्या तडाख्यातून सुटला आहे.

आणि हे अगदी सगळ्यांना लागू. एखादा माणूस असो वा संस्था, शासन असो की नागरिक, नोकरदार असो की त्याचा मालक, पालक असू द्या की बालक, शिक्षक की त्याचा विद्यार्थी. थोड्याफार फार फरकाने BurnOut या रोगाचा प्रत्येकजण शिकार झाला आहे.

काय आहे हा प्रकार burnout, निरिच्छता.

अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अगतिकता, आजूबाजूच्या परिस्थितीत आपल्या वागण्याने काहीही बदल होणार नाही याची खात्री झाल्यामुळे मेंदूला आलेलं जडत्व. त्यामुळे वागण्यात आलेली निष्क्रियता. जे आहे, जे मिळतं, ते स्वीकारा अन गप्प बसा. आपल्याला त्या परिस्थितीला जुळवून घ्या. ती बदलण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. निरिच्छता, जडत्व.

तुम्हाला ती उंदराची गोष्ट आठवत असेलच ना. शास्त्रज्ञ मंडळीनी प्रयोग केला आहे.

दोन पिंजर्यात उंदीर ठेवले जातात. त्या पिंजर्याच्या तळभागात इलेक्ट्रिक करंट सोडला आहे. एका पिंजर्यात वर एक लाल दांडी दिली आहे. काही कारणाने तिला स्पर्श झाला तर करंट वाहणं बंद होतं (अ पिंजरा) आणि दुसऱ्या पिंजऱ्यात असं काही नाही आहे.(ब पिंजरा). दोन्ही पिंजऱ्यात उंदरं ठेवली गेली. करंट पास केल्यामुळे उंदरं उड्या मारू लागली आणि अ पिंजर्यातल्या उंदरांना कळलं, लाल दांडीला स्पर्श केलं असता करंट थांबतो हे लक्षात आलं त्यांच्या. त्यामुळे मृत्युच्या भितीवर विजय कसा मिळवायचा हे कळलं.

याउलट ब पिंजर्यातील उंदरं उड्या मारून थकली अन मग शेवटी मरायची वाट पाहत पडून राहिली.

आता पिंजरे बदलले. अ तील उंदरे ब त. आणि ब ची अ त. तोच प्रयोग. गंमत म्हणजे मृत्यूवर विजय मिळवता येतो हे लक्षात आलेल्या उंदरांनी लाल दांडी नसताना तळभागात असलेली अलुमिनम ची वायर तोडली आणि करंट पास करण्याच्या वायरला कापून तो बंद केला. याउलट दुसर्या पिंजर्यातल्या उंदरांना अन्यायाविरुद्ध निपचित पडून राहायची सवय लागलेली. लाल दांडी पिंजऱ्यात असताना, ती पडून राहिली. परत निपचित. निरिच्छता. जडत्व.

म्हणून मग हत्तीच्या पिल्लाला साखळदंडाने बांधलं की मग त्याला सवय लागते अन तेच पिल्लू मोठं झाल्यावर खुंटीसकट साखळी ओढून नेण्याची ताकद असणारा गजराज निवांत उभा राहतो, माहुताचा भाला टोचवून घेत.

आणि मग अत्यंत धूर्त धार्मिक नेते, मग ते कुठल्याही धर्माचे असोत, आजकाल लहान किंवा तरुण असतानाच अशी शिकवण देतात की प्रश्न न विचारता त्या फतव्याला बळी पडतात. स्वत:ची बुद्धी गहाण ठेवून.

आयुष्यात शाश्वत काय असेल तर तो बदल. आणि जे कोण या बदलाला सामोरं जाऊन मिठीत घेत नाही ते मग या बदलत्या जगात बोझ बनून राहतात. म्हणून मग आयुष्यात निवृत्तीची वेळ येते. कारण अनुभव असला तरी घडणारे बदल आपण स्वीकारत नाही.

त्यामुळे इतिहास साक्षी आहे. जगातल्या क्रांती या फक्त युवकांकडून घडल्या आहेत. कारण त्यांची हृद्य जळत असते, पिचलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी. ह्या मंडळीना नकारात्मक गोष्टीचा गंध ही नसतो अन मग त्यातून काहीतरी अविश्वसनीय त्यांच्या हातून घडतं.

अन असं म्हंटल जातंच की "जगाला वेठीस धरण्यासाठी मुठभर नालायक लोकांची क्रूर वृत्ती कारणीभूत नसते तर खंडीभर चांगल्या लोकांच्या मेंदूला आलेलं जडत्व कारणीभूत असतं"

आणि मग आपल्या लक्षात येतं की या देशाचा नागरिक म्हणून आपण प्रदूषण, भ्रष्टाचार, दहशतवाद, निष्क्रिय शासक या सगळ्या संवेदनशील मुद्द्यावर आपण झापडं बसवून मुग गिळून बसलो आहोत. ही अशी निष्क्रियता आली की आपण जगण्याचा फक्त मुखवटा चढवलेला असतो. आतून खरं तर आपण मृत असतो. अन आपल्या अशा मृतप्राय वागण्यामुळे नराधम, क्रूर, हलकट लोकं समाजात उजळ माथ्याने नुसते वावरत नाहीत तर त्यांचा उदोउदो ही होत असतो. यासारखी दुसरी शोकांतिका नाही.

मला अशी अशा वाटते की तुम्ही या निष्क्रियता, निरिच्छता या रोगाला बळी पडले नाही आहात. आणि जर दुर्दैवाने असं झालं असेल तर देव तुम्हाला यावर विजय मिळवण्यासाठी धैर्य अन बुद्धी देवो.

निरिच्छता  आणि पराभूत मानसिकता ही माणसाला नेहमीच पायदळी तुडवत असते. पण तरीही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा झेप घेऊ इच्छिणाऱ्या माणसाच्या प्रबळ इच्छाशक्ती बद्दल मी नेहमीच आशावादी आहे.  इच्छाशक्ती पुन्हा जागृत होण्याची असंख्य उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात.


मूळ लेखक: श्री गुरविंदर सिंग

(मराठीत केलेला स्वैर अनुवाद)

Saturday, 13 June 2015

टेलिमार्केटींग

तुम्ही कधी काॅल सेंटर किंवा टेलिमार्केटींग करणार्या पोरा पोरींच्या मानसिकतेचा विचार केला आहे. कसला horrible प्रकार आहे तो! दिवसभर हेटाळणी, कुत्सित, निर्भत्सना करणारे शब्द ऐकायचे. किंवा सारखे नकार ऐकायचे. कसलं विदीर्ण होत असेल मन त्यांचं.  मला या पोरा पोरींचा अजिबात राग येत नाही उलट कीव वाटते. मला राग आहे त्यांच्या मालकांचा ज्यांनी हा धंदा म्हणून adapt केला आहे.

कारण तुम्ही जर बघितलं तर ही पोरं विशीतली वैगेरे असतील. रॉ एकदम. यांना या इन्शुरन्स कंपन्यांचे मालक पढावतात. हे असं बोला. दुनियादारी न बघितलेली पोरं ती, तुम्हाला पाहिजे तशी मोल्ड करता येतात. तुम्ही सांगितलं, गळ्यात पडलं तर गिऱ्हाईक मिळतं तर ती पडणारच. मी तर ३-४ जणांशी असा पोटतिडकीने बोललो की खात्री आहे की त्यांनी त्या टेली मार्केटिंग च्या जॉब वर पाणी सोडलं असेल.

मध्ये दोन वर्ष मी एका कंपनीचं सेल्स चं काम केलं. त्या कंपनीचे दीड एक लाख रुपये कस्टमर कडे पेंडिंग होते. कंपनीच्या मालकाने इंजिनियर ला, म्हणजे तो माझा assistant, काय वाटेल ते झालं तरी पैसे आणले पाहिजेस. रड, पड, उपाशी रहा, पण पैसे आण. मालकाला मी सांगितलं, तो इंजिनियर आहे. पैसे मागताना त्याला इतकंही लाचार नको बनवूस की त्याला तो भिकारी वाटेल म्हणून.  

मला आठवतं मी जेव्हा सेल्स कॉल करायचो, तेव्हा फोनवरून रीतसर अपॉइंटमेंट घ्यायचो. दोन चार वेळा फोन केला अन मला थोडी भनक जरी आली की समोरच्याला irritation चं फिलींग येतंय, मी फोन करायचं टाळायचो. त्याने बोलावल्यावरच जायचो. अन ही सवय माझ्या मॅनेजरने, बोनीने लावली. मी त्याबद्दल त्याचा नेहमीच ऋणी राहीन. 

अगदी आताशातली चेन्नैची गोष्ट. फोर्ड कंपनीचा मेंटेनन्स मॅनेजर, प्रकाश. मी आमच्या माणसाला, प्रदीपला सांगितलं आपल्याला इथं एंट्री पाहिजे. ते पोरगं च्यायला, दर दिवसाआड फोन करायचं. अन तो प्रकाश दरवेळेस काहीतरी फेकून टाळायचा. एके दिवशी मी प्रदीपला बोललो "भाऊ, तु थांबव फोन करणं. फोर्ड महत्वाचा कस्टमर आहे, पण सोनं नाही लागलं त्याला. इतकंही लाचार नाहीत आपण" हो मग, त्या तरूण पोराच्या सेल्फ एस्टीमला धक्काच की तो!. बोनीची शिकवण कामी आली. 

परवा फोर्डची मेल आली, भेटायला या. काही काम तुमच्याकडून करून घ्यायचं. प्रदीपला बोललो, जा आता रूबाबात. 

ज्यानी कोणी tele marketing ची ही पद्धत शोधून काढली अन जो अशा पद्धतीने सेल्स कॉल करायला लावतो त्याला माझे लाख तळतळाट..............फोनवरून नाही अगदी डायरेक्ट दिल से. 

मी पण आधी खूप तड्कायचो त्यांच्यावर. पण एकदा खूप शिवीगाळ झाल्यावर विचार केला, गड्या हे काही खरं नाही. असं कितीदा ओरडणार आपण? मग जरा माझ्यातच बदल केला. मध्ये जसं हॉर्न ची पोस्ट लिहिताना तोंडपाटीलकी केली होती, हो हाच शब्द लिहिला होता एका लहानपणीच्या मित्राने, तशीच परत एकदा करतो. पटली तर घ्या, नाहीतर सोडून दया. असल्या फोनवरून डोकं खराब करून घ्यायचं नसेल तर खालील उपाय बघा करून.

१. +९१ १४० वरून चालू होणारे नंबर हे फक्त टेली मार्केटिंग चे असतात. ते फोन कट करा.
२. Truecaller नावाचं App आहे. डाऊनलोड करून घ्या. spam फोन आहे का ते लागलीच कळतं. फोन टाळता येतो.
३. Do you need personal loan? या प्रश्नाचं उत्तर नाही म्हणून एकदा सांगितलं तर निम्म्यापेक्षा जास्त लोकं फोन ठेवून देतात.
४. आता बिझी आहे. नंतर फोन कर हे सांगितलं तर बरेचदा फोन येत नाही.
५. कामात असाल अन असा फोन आला तर फोन बाजूला ठेवून दया अन दोन मिनिटाने फोन कानाला लावला तेव्हा तो विचारत असतो "Shall I send my executive?". शांतपणे नाही म्हणा. समोरचा गप्प.
६ लहान गावात माहित नाही, पण पुण्यात मी इतक्यांदा भेटायला ये म्हंटल तरीही ते येऊ शकत नाही आणि आलेच तर appointment ची वेळ कधीही पाळत नाही.

आणि हे सगळे उपाय केल्यावरही जर कुणी शहाणपणा केलाच, शक्यतो हे हिंदीभाषिक च असतात,  तर भ आणि झ ची आपली बाराखडी पाठ आहेच. मग नाद करायचा नाय .  

Friday, 12 June 2015

श्रीमंती अशीही अन तशीही

साल कधीचं ते आठवत नाही पण २००७-०८ असावं बहुधा. मी डेक्कन ने मुंबई ला निघालो होतो. शेजारी कुटुंब बसलं होतं. नवरा, बायको अन पोरगा. पोरगा १०-१२ वर्षाचा. माणूस, जाड, टकला अन गोरा. श्रीमंतीचा वास सगळीकडे झळकत होता. म्हणजे त्याच्या कपड्यातून, त्याच्या पोटावरून, मनगटावरच्या घड्याळातून, मोबाईल मधून, चष्म्याच्या फ्रेम मधून. अन त्याची बायको. साधारण पणे अशा माणसाची जशी असायला पाहिजे तशीच. सुंदर, सडपातळ, गोरी आणि हो गृहकृत्यदक्षही असावी. म्हणजे ज्या इमानेतबारे ती त्या हट्टी पोराचे लाड पुरवत होती अन नवऱ्याच्या आज्ञा ऐकत होती त्यावरून. डोक्यावर गॉगल वैगेरे सिग्नेचर गोष्टी होत्याच.

आनंद, नाव ठेऊ आपण त्या श्रीमंतीचं. तर आनंदचं बोलणं मी नेहमीच्या सवयीने भोचकपणे ऐकत होतो. तर सीन असा होता की त्या दहा वर्षाच्या पोराला ट्रेन प्रवास करायला मिळावा म्हणून ते अडीच लोकांचं कुटुंब डेक्कन मध्ये होतं. अन त्यांची मर्सिडीज पुण्याहून एकटाच ड्रायव्हर घेऊन येत होता. अन तो त्यांना दादर स्टेशन वरून पिक अप करणार होता.

बाप्पा! काय श्रीमंती. ऐकूनच हाताची दहाही बोटं तोंडात घालायची इच्छा झाली.

*********************************************************************************

खोदादाद सर्कल दादर ला पूर्वी एक ताज ची बेकरी असायची. म्हणजे मी सांगतोय ९७ ते २००० साल ची गोष्ट. त्या बेकरीच्या मागे एक साधारण ७० एक स्क्वेयर फुटाच्या रूम मध्ये एक ऑफिस थाटलं होतं. सेल्वम travel. राजू सेठ. तामिळी अण्णा होता. taxi पुरवायचा तो मला. मी त्याचा तसं बघायला गेलं तर एकदम लिंबू टिंबू गिऱ्हाईक होतो. त्याच्याकडे ताज अन ITC चं अकौंट होतं. मी डेक्कन ने दादर ला उतरलो की त्याच्याकडे जायचो चालत. एक कटिंग चहा प्यायचो. taxi घ्यायची अन निघायचं, कामाला. काम संपलं की त्याचा ड्रायव्हर  मला दादर नाहीतर व्हीटी (छत्रपती शिवाजी टर्मिनस) ला सोडायचा. डेक्कन नाही तर प्रगती ने ढाबळीत परत. ऑफिस लहान असलं तरी त्याची कीर्ती महान होती. ४० एक कार असाव्यात त्याच्याकडे. अगदी मर्सिडीज, BMW पासून ते एस्टीम वगेरे पर्यंत. नुसता फोन टाकायचा अवकाश, बास! कार तयार.

२००० साली मी कार घेतली. (कारच घेतली ना, मग साल्या विमान घेतल्यासारखं काय लिहितोस) अन माझा आणि सेल्वम चा संपर्क कमी झाला. अधून मधून कधी गरज लागली तरच. २००२ ला मी जॉब सोडला अन मग मात्र सेल्वम चा नंबर माझ्या खोपडीतून डिलीट झाला. नाही म्हणायला एकदा कधीतरी घेतली taxi. तेव्हा त्यांचं ऑफिस वरळी ला शिफ्ट झालं होतं.

२००८ साली पार्टनर वाघेला च्या मुलीचं लग्न ठरलं. मुलगा ब्रिटीश पासपोर्ट होल्डर, पण गुज्जूच. एकदम जातवाला. वरातीला लेक्सस किंवा BMW वैगेरे घेऊ म्हणाला. मिळेल का? मी बोललो "राजूभाई ला करतो फोन. अन ठरवून टाकू" नेहमीप्रमाणे वाघेलाने  तीन चार वेळा आठवण केली, मी फोन करतो म्हणून ठोकायचो. अन ये रे माझ्या मागल्या.

अशाच  एका सकाळी मुंबईला जाण्यासाठी शिवनेरीत चढलो. (आधी शिवनेरीवर, आजकाल शिवनेरीत) बँग वरती ठेवताना मागच्या सीटवर माणसाचा ओळखीचा चेहरा. थोडं निरखून बघितलं तर, राजूसेठ. मी बोललो "राजूसेठ, पहचाने क्या?" दोनच मिनीट माझ्याकडे पाहत राजूसेठ, तामिळी हेल काढत म्हणाला "राजेश मंडलिक साब" पुन:भेटीचे सोपस्कार घडले. मी विचारलं "राजूसेठ, सात आठ वर्षांनी भेटतोय आपण. तुम्हाला माझं नाव अन चेहरा लक्षात कसा राहिला?" ते जे म्हणाले ते अचंबित करणारं होतं. 

"तु डेक्कनने यायचास. सरळ ऑफीसमधे. मी, अन ऑफीस स्टाफ़ त्यावेळेस चहा प्यायचो. तोच तुला द्यायचो. तु निवांतपणे चहा घ्यायचास अन कामाला निघायचास. समोर ताजची बेकरी होती. मी तुला म्हणायचो, कुछ पेस्ट्री मंगाऊ. तु नाही म्हणायचा. माझ्याकडे त्यावेळी बरेच साहेब यायचे, पण कुणीही ताजची फुकटची पेस्ट्री नाकारलेली आठवत नाही. काही जण तर हक्काने मागवून घ्यायचे. एक दोन महाभागांनी तर घरी पाठव म्हणून ही सांगितलं. या पार्श्वभूमीवर तुझं एकदाही पेस्ट्री किंवा केक न खाणं नेहमीच लक्षात राहिलं" 

मी सर्द झालो. त्यावेळी ताज हे नाव मी तोंडातल्या तोंडात चघळायचो. तिथलं काहीही आपल्यासाठी नाही हे फिट्ट होतं डोक्यात. या अडाणीपणामुळे राजूसेठ च्या लक्षात राहिलो होतो. गंमतच! 

खरी गंमत पुढे आहे. गप्पा छाटू लागलो. वरातीच्या कारबद्दल सांगितलं. राजूसेठ नेहमीप्रमाणे म्हणाले, हो जायेगा. बोलता बोलता एका ठिकाणी राजूसेठ म्हणाले "कष्टाशिवाय पैसे नाहीत रे. घाम गाळावाच लागतो. पर्याय नाही. पुर्वी कुदळ फावडं मारावी लागायची. आता सकाळी जिम मधे घाम गाळतो." 

दादरला उतरायच्या आधी मी राजूसेठ ला विचारलं "तुमच्याकडे इतक्या गाड्या आहेत. तरी तुम्ही बसने?" 

तर म्हणाले "धंद्याची एक गाडी कमी होते. परत मी एकटाच. गाडीचं पेट्रोल. अन तो टोल. अरे दोन्ही साईडच्या टोलमधे माझं एका बाजूचं तिकीट निघतं" 

चार तासाच्या प्रवासात मॅनेजमेंटचे बरेच फंडे मिळाले. 

शिवनेरीच्या तिकीटात इतकं शिक्षण! सौदा वाईट नव्हता. 

इंडिगो

तसं बघायला गेलं तर इंडिगो ही नो फ्रिल एयरलाईन्स. जेट अन एयर इंडियाच्या समोर एकदम छोटी. सिंपली फ्लाय या पुस्तकात एयर डेक्कन चे सर्वेसर्वा कॅप्टन गोपीनाथ सरांनी लिहीलं की इंडिगोच्या प्रवर्तक हे एयर डेक्कनचे टिकेटिंग सॉफ्टवेयर बनवणारे. एयर डेक्कनचा डाटा वापरून त्यांनी इंडिगो चालू केली असा त्यांचा आरोप आहे. असेलही कदाचित.

पण आजच्या तारखेला इंडिगो देशातली अग्रगण्य विमानकंपनी झाली आहे. आणि माझं असं निरीक्षण आहे की त्यांनी दोनच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं. एक वेळेवर निघणं अन दुसरं स्वच्छता. कस्टमरची दुखरी नस कुठली ते बरोबर ओळखलं आणि तीच योग्य पद्धतीने दाबली.

विमान वेळेवर निघण्यासाठी इंडिगोचा स्टाफ जी धावपळ करतो तो कौतुकास्पद आहे. त्यामुळे कोणत्याही विमानतळावर बाकी सर्वांच्या डिलेच्या घोषणा होत असताना इंडिगोची बहुतांश उड्डाणे वेळेवर होत असतात. त्यासाठी त्यांच्या स्टाफला कसं ट्रेन केलं आहे याचा अनुभव विमानतळावरच घ्यावा. कियोस्क चेकिंग, हँड लगेजचं प्री चेकिंग, विमानात वेस्ट गोळा करताना सर्व गोष्टी घ्यायचा अट्टाहास, प्रवासी सीट नंबर नुसारच पाठवण्याबद्दल आग्रह. अशा अनेक.

बाकी स्वच्छ विमान म्हणजे काय याचा अनुभव आत गेल्यावरच कळेल.

Pursue an excellence, and success will follow you किंवा Define USP and diligently work on it. Gain no 1 spot, अशी मॅनेजमेंटची वाक्यं आपण नेहमीच ऐकत असतो. (ही वाक्यं तुम्ही आधी वाचली नसल्याची दाट शक्यता आहे, कारण ती दरिद्री वाक्यं माझी आहेत). त्याचं जिवंत अनुभव घ्यायचा असेल तर इंडिगोने प्रवास करावा.

आज नो फ्रिल एयरलाईन मधली पायोनियर कंपनी एयर डेक्कनचं नामोनिशाण गायब झालं आहे. (पण वेळ काढून कॅप्टन गोपीनाथांचं Simply Fly नावाचं चित्तथरारक आत्मचरित्र वाचाच.) तिला जिने गिळंकृत केलं त्या किंगफिशरचे वाभाडे जगभर निघून त्यांची विमानं जमीनीवर उभी आहेत. (स्वत: विजय मल्ल्या मात्र अजूनही हवेत आहेत) एयर इंडिया वर मी पामर काय बोलणार? जेट अजूनही आपल्याच गुर्मीत आहे. आर्थिक तोट्यात असूनही त्यांची पोकळ मस्ती दिसतेच. बाकी विमानकंपन्या धडपडताहेत. या मांदियाळीत इंडिगो मात्र नंबर १ ला आहे, प्रॉफीटमधे आहे. (एयरलाईन प्रॉफीटमधे चालवणं हा चमत्कार समजला जातो). त्यांच्या स्टाफच्या देहबोलीत प्रचंड आत्मविश्वास दिसतो. साहजिकच आहे म्हणा.

कामानिमित्त सध्या माझे महिन्याला ५-६ विमानप्रवास होतात. त्यातले बहुतांश इंडिगोने असतात. एयरपास ची त्यांची योजना आहे. बहुतेक घेईन मी.

मधे एका सेमिनारमधे बोलताना ऐकलं "We are starting event exactly on time. Same like indigo!" यापेक्षा इंडिगोला वेगळी पावती काय असेल.

कस्टमरला काय हवं, यावर मनापासून काम केलं तर तुम्ही व्यवसायात अग्रणी बनता याचं इंडिगो उत्तम उदाहरण आहे.

(त्यांच्या इंटरनॅशनल फ्लाईटचा माझा एकमेव अनुभव आहे, अन तो बोरिंग आहे.)

Tuesday, 9 June 2015

राक्षस

आज फोन आला समृद्धि का वृद्धी असं काहीसं नाव होतं. म्हणाला ११.५% रेट ऑफ़ इंटरेस्ट देतो बोलला इन्व्हेस्टमेंटवर. 

मी बोललो "भनकला का बे तु. काय घोड्याच्या रेसवर पैसे लावणार की खत्रीचा मटका खेळणार इतका इंटरेस्ट द्यायला" तर बोलला "सर, आम्ही अँनिमल हजबंडरी अन विविध अँग्री प्रॉडक्टस मधे पैसे लावून चांगला प्रॉफिट कमावणार" 

हे असं चालतं आपल्या इथे. तो चैनरूप भन्साळी तिकडं जीवाचं बँकॉक करतोय. ते नाशिकचे, नाव विसरलो, तिकडे सिंगापूरला कौटुंबिक पार्श्वभाग उबवत आहेत, अन त्यांच्या बोकांडी पैसे लावलेले आपण मध्यमवर्गीय पाणावलेले डोळे लावून बसलो आहोत हात पसरून, कधी पैसे परत मिळतील याची वाट बघत. कुणाचे पीएफ चे, कुणाची ग्रँच्युइटी, कुणा शेतकर्याने मागच्या मोसमात जमवलेले. ज्यांचं पोट हातावर आहे अशांचे पैसे घेऊन हे नराधम ग़ायब होतात अन आपण हताशपणे बघत राहतो. 

असं होऊनही, इतकी बोंबाबोंब होऊनही अशा कंपन्या कुत्र्याच्या छत्रीसारख्या उगवतात अन कुत्र्यासारखंच मुतुन ग़ायब होतात. बँक ६-७% रेट देते, तेव्हा बिझीनेसवाले ८-८.५% रेट देऊ शकते. ते पण टाटा, लार्सन सारखी professional management अन established product line असेल तर. अँग्री प्रॉडक्टस अन दुग्धव्यवसाय करून हे दीडशहाणे ११.५% इंटरेस्ट देणार. येडे समजतात आम्हाला. 

काही वर्षापूर्वी अशाच कंपन्या आल्या होत्या, परशुरामपुरिया अन स्टर्लिंग. काय तर म्हणे तामिळनाडुत सागाची लागवड करणार. कुठल्या जंगलाचे फोटो लावून फ़ुल च्युत्या बनवलं होतं पब्लिकला. गायब झाल्या. लोकं बसले नंतर टाळ कुटत. 

तुम्हाला सांगतो कुठल्याही unknown कंपनीच्या हातात तुमचे पैसे जाऊ देऊ नका. अगदी स्पिंडल वैगेरे रिपेयर करणारी असेल तरीही. अन त्यातल्या त्यात इंटरेस्ट यंव देतो अन त्यंव देतो सांगितलं तर त्याला म्हणा "भाऊ, सुरक्षित अंतर ठेव. २० मीटर त्रिज्येत फिरू पण नको" ११.५% इंटरेस्ट द्यायला प्रॉफिट किती कमवावा लागेल अन त्याला काय पापड़ बेलावे लागतात, हे कळतं म्हणा. 

अँग्री प्रॉडक्टस अन गायी म्हशी पाळण्याचा बिझीनेस. म्हणजे ही कंपनी छोटी शहरं, तालुके अन खेड्यात पोहोचणार. ऑफीसं थाटून घराघरात डाका घालणार. म्हणून आधीच सावध करतोय. विनंती समजा, खरंतर आज्ञा करायची आहे, पण higher rate of interest च्या कुठल्याही स्कीमच्या नादी लागू नका. तो रस्ता समृद्धि अन वृद्धीकडे नेत नाही तर भिकेचे डोहाळे लावतो. 

मी कधी शेयर करा वैगेरे सांगत नाही, पण हा मेसेज शेयर करा. गावागावात पोहोचवा. सांगा नवीन राक्षस येत आहे, पुंजी जपा.

 शेयर करा- हुकुमावरून

Monday, 8 June 2015

कॉपी

प्रविण, तुझ्या गोष्टीवरून मपली पण आठवली रे दहावीची गोष्ट.

मी म्हणजे शाळेत अगदी ओढून ताणून हुशार वैगेरे गणला गेलेलो. म्हणजे खरंतर गंडला गेलेलो. म्हणजे मी हुशार नव्हतो पण मास्तर लोकं, मित्र आणि इतकंच काय माझे आई वडील ही मला हुशार वैगेरे समजू लागले होते. शाळेत लागलेली ही हुशारीचा अभिनय करण्याची सवय पुढे मला आयुष्यभर उपयोगी पडली. आज मी जो काही आहे त्यामागे ह्या अभिनयकलेचा सिंहाचा वाटा आहे यात तिळमात्र शंका माझ्या मनात नाही. (आमच्याही नाही, असं कुणीतरी पुटपुटल्याचं ऐकू येतंय मला)

दहावीची परीक्षा. पहिलाच पेपर मराठीचा. मी गेलो पार तेजतर्रार होऊन.  हातावर दही वैगेरे टाकलं माऊलीने. शर्ट इन बिन करून पोहोचलो केंद्रावर.

सगळ्यांच्याकडे तेव्हा ते ब्राऊन कलरचं पॅड असायचं, चिमटेवालं. माझ्या काकांनी फोल्ड होणारं पॅड दिलं होतं. म्हणजे वरती चिमटा अन आत पेन वैगेरे तसंच पेपर ठेवायला कप्पे. तशीही शायनिंग टाकण्याचा एकही चान्स सोडत नव्हतो मी. अजूनही सोडत नाही.

तर ते पॅड घेऊन रूबाबात बसलो जाऊन टेबलवर. धडधड वाढली होती. पेपर आला मराठीचा. तसा ठीकंच होता. खरडायला चालू केलं.

अन आला तो स्क्वाड. प्रत्येकाची चेकिंग चालू केली. माझ्यापर्यंत पोहोचले. ते पॅड हातात घेतलं त्यांनी. उलटंपालटं करत ते कुतुहलाने पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य ते वेगळंच पॅड पाहून अन माझ्या डोळ्यात अभिमान, म्हणजे तीच शायनिंग.

चेक करणार्याने पॅड च्या मधे हात घातला. तिथे एक कप्पा होता. अन त्यातून त्याने एक काहीतरी लिहीलेला कागद बाहेर काढला. अन कागद वाचत माझ्याकडं बघू लागला. इतका वेळ विजयी विश्व वैगेरे भाव असलेला माझा चेहरा खर्रकन उतरला. रडकुंडीने मी त्या माणसाकडे बघू लागलो. त्याने परत पॅड चेक केलं. अजून काही ऐवज सापडला नाही. एव्हाना वर्गात इज्जतीचा फालूदा व्हायला चालू झाला होता. पोरं पोरी डोळे विस्फारून बघत होते.

त्या चेकरने खिसे वैगेरे तपासले. सुदैवाने काही सापडलं नाही. मला म्हणाला "पेपर लिहीणं चालू ठेव, घाबरू नकोस. मी येतो ५ मिनीटात" अन गेला. ती ५ मिनीटं मला युगासारखी वाटली. गर्भगळित होणं वैगेरे काय असतं ते पहिल्यांदा अनुभवलं.

तो आला अन म्हणाला "लिही पेपर, काही प्रॉब्लेम नाही" डोळे पूसत पेपर कसाबसा लिहीला. तीन तास पुरे झाल्यावर ऑफीसमधे कुणी सर घेऊन गेले अन दाखवला तो सापडलेला कागद. बाबा पण उभे होते. इंग्रजी विषयाच्या नोटस होत्या त्या. म्हणून वाचलो. अभ्यास करताना तो कागद चूकुन पॅड मधे राहिला होता.

अगदीच काही नाहीतर मराठीला मार्क कमी का पडले याचं उत्तर द्यायला मी या घटनेचा पुरेपूर वापर करून घेतला.

तो जर मराठीचा कागद निघाला असता तर.........अजूनही ते आठवलं की मी थरकापतो.

त्या दिवसापासून मी फोल्ड होणारं पॅड वापरून सोडून दिलं, आता पोरांनाही नाही वापरू देत. इतकंच काय, पण राजेश मंडलिक, व्यवस्थापकीय संचालक,  कुठलेही फोल्ड होणारे पॅड, डायरी बियरी वापरत नाहीत.

Saturday, 6 June 2015

पहिलं मराठी स्फुट

 फेसबुक वर नवीन होतो. मराठी कसं लिहावं हे नुकतंच कळलं होतं. ते कळल्यावर लिहिलेलं पहिलं मराठी स्फुट. दिनांक १६/१२/२०१२

धर्म, जातपात, प्रादेशिकता यांनी भारतीय राजकारण गेल्या काही वर्षापासून व्यापलेले आहे. प्रगती, विकास या शब्दांचे आपल्या राजकारणाला आणि समाजकारणाला जणू वावडेच आहे. रिटेल एफ डी आय ला विरोध आणू उर्जेला विरोध, पाणी पुरवठा सुरळीत करणाऱ्या धरणांना विरोध, असे एकूण विविध विरोधाचे पेवच फुटले आहे. खरं तर हीच धोरणे राबवून प्रगत राष्ट्रांची झलेली भरभराट बघून, आपण तेथील परदेशवारी झाली कि त्यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती करतो आणि भारतात परत आलो कि बाह्या सरसावून या धोरणांना विरोध करतो. कुठल्याही पक्षाचे असलेले " निर्नायकी " पण आणि त्यातून उभा राहिलेलं प्रादेशिकतावाद आणि प्रादेशिक पक्षांना निर्माण झालेले महत्व हे प्रगतीसाठी मारकच ठरत आहे. अर्थात यामध्ये राष्ट्रीय पक्षांची धोरणे हीच कारणीभूत आहेत. कॉंग्रेसने नक्कीच विकासाभूत धोरणे राबवली पण त्यावर आपल्या प्रचारात भर देण्यापेक्षा स्वतःच्या निधार्मिवादाची टिमकी वाजवली आणी एक निर्णय न घेणाऱ्या पक्षाची प्रतिमा गेल्या काही वर्षात तयार केली. भा ज प बद्दल तर बोलायलाच नको. वैचारिक व्यासपीठावर विरोध करण्या ऐवजी धार्मिक मुद्द्याला कुरवाळत बसण्यात त्यांनी धन्यता मानली आणि एका मोठ्या मध्यमवर्गाला वेगळ्याच रस्त्यावर नेउन ठेवले. यामध्ये तथाकथित नवश्रीमंत, आपल्याला कुठल्या धोरणामुळे आर्थिक सुबत्ता आली आहे हे विसरून राष्ट्राला विकासापासून दूर नेणाऱ्या या पंथावर आपली बुद्धी सांडत राहिले. या दोन्ही पक्षांच्या विचित्र धोरणांमुळे अनेक प्रादेशिक पक्ष आणी हि नवीन आम आदमी पार्टी सारख्या पक्षांचा उदय नंतर भरभराट झाली. आणी भारतीय संविधानाच्या रचनेमुळे या सर्वांची मोट बांधून राज्यकर्त्यांना यु पी ए आणि एन डी ए सारख्या मोळी बांधाव्या लागल्या. पण या रचनेमुळे भारत हे राष्ट्र प्रचंड बौद्धिक क्षमता असूनसुद्धा प्रगती आणी विकासापासून वंचित राहिले. खरं तर जगामध्ये युरोप हे दखल घेण्याजोगे उत्तम उदाहरण आहे. वेगवेगळ्या संस्कृती असलेले २६-२७ देश एकत्र एका चालानाखाली येतात काय, आणि एकमेकांचा डोलारा सांभाळतात काय, सगळेच अनाकलनीय. विचार करा ग्रीस वा स्पेन सारखा देश या आर्थिक पडझडीत, जर्मनी आणि फ्रांस सारखे प्रगत राष्ट्रे नसती, तर पालापाचोळ्यासारखी उडली असती. आपल्या एक एक शहरांएवढी लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार असलेले हे देश, त्यांनी विचार केला कि एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आणि आपल्या इथे संस्कृती एक आहे, एकत्रित बांधणारे संविधान आहे, चलन एक आहे. या ताकदीचा उपयोग करण्या ऐवजी प्रादेशिकता, भाषावाद, धार्मिक वाद यावर आपला वेळ आणी बुद्धी खर्च करून आपली वैचारिक दिवाळखोरी जगापुढे प्रकट करतो. अहो कुठल्या इस्ट इंडिया कंपनीच्या गुलामगिरीचा विचार करताय. बदल लेल्या जागतिक परिस्थितीमध्ये कुठलाही देश दुसर्या देशावर अधिसत्ता गाजवू शकत नाही. तसे असते तर आज अफगाणिस्तान, पाकिस्तान आणी इराक वर अमेरिकेची सत्ता नसती? अशा परिस्थितीमध्ये अंतर्देशीय गुंतवणूक होऊन आपल्यादेशाचे जर भले होत असेल, तर आपण गुलामगिरीकडे चाललो आहोत असा कंठशोष आपण का करत आहोत. तरी बरे इस्ट इंडिया कंपनी आता एका भारतीयाकडेच आहे आणि टाटांनी जगात सर्वत्र आपले पाय पसरले आहेत. ज्या चीनची प्रगती आपण सगळेजण अचंबित नजरेने बघत आहोत, त्यामध्ये परकीय गुंतवणुकीचा सिंहाचा वाट हे सगळे जण जाणतात. आपण सगळ्यांनीच धर्माधिष्ठित समाजकारणा पेक्षा विकासाधीष्ठीत समाजकारण केले पाहिजे आणि आपल्या सर्वांचे एकत्रित प्रयत्नच राजकारणाला सुद्धा वेगळे वळण देईल. यातूनच एक दिवस असा येईल कि कॉंग्रेस व भा ज पा सारखे राष्ट्रीय पक्ष आपल्या निधार्मावादाची वा धार्मिक विचारांची कास सोडून प्रगीतिक सामाजिक विचारप्रणालीचे दोर पकडतील आणि आपल्या देशाला विकासाच्या रस्त्यावर आणून ठेवतील अशी अशा वाटते.

ऑफीशियल भाट

चेन्नैत एक गेस्ट हाऊस रेंट आऊट केलं आहे. खरंतर भाड्याने घेतलं आहे असं म्हंटलं असतं तरी काही चुक नाही. पण भाड्या हा आत्मनिंदेंचा इतका कडक अविष्कार लिहायला कसं तरीच वाटलं. (अन गेस्ट हाऊस, हा हा. च्यामायला २५० स्क्वेअर फूटची खोली आहे. दोन पेक्षा जास्त लोकं राहिले तर एकमेकांना अंग घासेल इतकी लहान. लाल करा हो, पण किती?) असो.

पण आहे मात्र अगदी भारी वस्तीत. हो म्हणजे उच्चभ्रू की काय म्हणतात ना तशी. स्वच्छ बिल्डींग. भला मोठा टेरेस आहे बाजूलाच. एका किमीवर मरीना बीच आहे. ज्या गल्लीत आहे तिथे येतानाच मी एक भलं मोठं घर बघितलं, त्याला पुरूषभर उंचीची कंपाऊंड वॉल, बाहेर पोलीसच्या गाड्या. अन अशी समोरासमोर दोन घरं. अन तिथून चार पाच प्लॉट सोडले की आमची बिल्डींग. त्याच संध्याकाळी टेरेसवर भरार वारा खाता खाता मी प्रदीपला विचारलं "Who lives in those big houses?" तर तो म्हणाला "Subramaniam Swamy?" मी चपापलो.

(आता पुढचं संभाषण मराठीत) मी विचारलं "हा वारा आपल्या बिल्डींगकडून स्वामी साहेबांच्या घराकडे जातो की त्यांच्या घराकडून आपल्या घराकडे" तर तो म्हणाला "I don't know. But why are you asking this" मी काही बोललो नाही. आणि काय सांगायचं. हेच ना "आधीच आम्ही येडपट, त्यात शेजारी स्वामी साहेब रहायला" मग वार्याची दिशा नको बघायला?

(हे "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" ह्या जुन्या प्रचलित किंवा "आधीच तर्कट, त्यात पद्य प्याला" या गजू तायडेंच्या नव प्रसारित म्हणीच्या चालीवर वाचावे)

 "आधीच आम्ही येडपट, त्यात शेजारी स्वामी साहेब रहायला" सॉलीड pun. म्हणजे ज्यांना मी येडपट वाटतो तेही खुश अन ज्यांना स्वामी साहेब हुशार वाटत नाहीत तेही खुश. (इतकी आत्मवंचना बरी वाटते.) असो.

अजून एक सांगायचं म्हणजे, तथाकथित उच्चभ्रू वस्तीतल्या कुंड्याही कचर्याने दिवसरात्र ओसंडून वाहत असतात. अगदी स्वच्छ इंडिया कल्पनेच्या उद्गात्यांचे ऑफीशियल भाट त्या गल्लीत राहत असतील तरीही.

million dollar question.

"Is man a blunder created by God or is God a blunder created by man?” - Friedrich Nietzsche.

आता हा फ्रेड्रिक कोण, मला माहित नाही. याचं मी बाकी साहित्य वाचलं का, तर नाही. हा WA चा फॉरवर्ड आहे का, तर नाही. एका मेल वर खाली लिहून आलं होतं. But isn't it million dollar question? असाच एक प्रश्न. Million dollar question. लिहायला पण मजा येते ना, मिलीयन डॉलर.!!

तसा माझा मित्रपरिवार मोठा. म्हणजे नाशिकचे ५-६ जण अन त्यांच्या फँमिली, औरंगाबादचे ८-९ मित्र, SKF चे २-३, वैभवीचे ६-७ मित्र अन त्यांच्या फँमिली, प्रोफेशनल मैत्रीतून झालेले ३-४ जण, शेजारपाजारातले २ जण. बाकी नातेवाईक पण बर्यापैक, १०० एक तरी. म्हणजे ज्याला घट्ट वैगेरे म्हणतो तसे. बाबांच्या तुलनेत हा गोतावळा छोटा पण आजच्या मापनात चांगलाच. असं असताना मी अशात आभासी जगातल्या खूप जणांना भेटलो. खर्डेघाशी गेट टुगेदर, गणेशच्या घरी प्रविण आणि सिंधूला, पंडित पॉटरला, कोल्हापूरात विनयला, पुण्यात मधुराला, बडोद्यात मुकुंदला, परवा पुण्यात संतोष, अतुल अन शिल्पाला.

माझे हे सगळे भेटीचे वृत्तांत ऐकून माझा मोठा मुलगा मला म्हणाला "What is that feeling which drives you to meet your friends of virtual world when you have many friends in real world?" Now that is million dollar question.

का भेटत असू आपण सगळे? आणि इतकं आवर्जून. म्हणजे माझे कित्येक जवळचे नातेवाईक आहेत ज्यांना मी बरेच दिवसात फोनही केला नाही. काही पुण्यात राहतात, त्यांना भेटलो नाही आहे. सासरची मंडळी ऑलरेडी ओरडतात आहे माझ्या नावाने, की हा फक्त लिहीतो, भेटलं तर याच्या तोंडातून शब्द फुटत नाही. मग काय आहे हे? हातचं सोडून पळत्याच्या मागे चाललो आहोत का? की पिकतं तिथे विकत नाही तसं जे आहेत त्यांची किंमत न ठेवता मृगजळाला पाण्याचं तळं समजतो आहे? जसं आपण वागतो तसं बाहेरच्या देशातही लोकं भेटत असतील का? हे आटणार आहे की, असंच चालू राहणार आहे. असच चाललं तर त्याचा अंत कुठे?

Rajesh Mandlik Signing off in 12025 Shatabdi Express.

एकटाच बसलोय. पण हा blunder शब्द बेकार आहे. Million dollar वर उतारा.

असाही प्रवास

४५० किमी चं अंतर. सकाळी ५:३० ला निघालो, पहाटसमयी. सगळेच आंघोळी बिंघोळी करून. पाठीमागे बसले तीनही पोट्टे. यश, नील आणि अभिषेक. शेजारी अर्धं अंग वैभवी. सगळेच एकदम फ्रेश. ड्रायव्हिंग सीटवर अस्मादिक.

 मागे नीलची किलबिल, यशचा अधुनमधुन पडणारा एखादा डायलॉग अन अभीची युरोप टूरची कॉमेंट्री. मग गाणी. पोरं जमतील तशी. तेव्हा वैभवी पोरांच्यात पोर/ त्यांच्याहून जास्त दंगा. मी इतका लहान नाही होऊ शकत. ब्रेकफास्ट नंतर पोरं निद्रेच्या आधीन.

मग सुसाटलेला रस्ता. मी आणि २४ वर्षाची संगत जागी. वैभवी अगदी पट्टीची गायिका वैगेरे नाही आहे. पण गजल तिच्या आवडीची. तिच्या आवाजातून काही अनमोल गाणी. मी सुद्धा माझा भसाडा आवाज तिच्या आवाजात मिसळत. "ये दौलत भी ले लो" "तुम मुझे भुल भी जाओ"" आज जाने की जिद ना करो" "जलते है जिसके लिये" "अभी ना जाओ छोडकर" गाणी पण अशी आहेत की रस्ता कटत जातो, पण गाणी संपत नाहीत.

पोरं उठली. त्यांच्या भन्नाट आईने शिव्यांच्या भेंड्या लावल्या. मी खुदखुदत ऐकत बसलो. त्यातल्या त्यात नीलची प्रगती ऐकून कान धन्य झाले.

आठ तासाने जेवायच्या ठिकाणी थांबलो. नील बोलला "मी नुसता बसून पकलोय, तुम्ही तर कार चालवता इतका वेळ. तुम्हाला किती कंटाळा आला असेल?" मी बोललो "असं जर विश्वच माझ्याबरोबर असेल तर जगातला कुठलाही रस्ता मग तो कितीही लांबीचा असू दे, खड्याखुड्यांचा असू दे, तो तर मला राजमार्गच वाटणार की रे!"

 त्याला काही कळलं नाही बहुधा.

कुटुंबैव वसुधम

पाणी

यावेळेला ठरवलंच. समुद्रकिनार्यावर उभा होतो. समोर अथांग पाणी. करोडो, अब्जो गॅलन. योजना आकार घेऊ लागली. ८ तासाला १०० कोटी लिटर इतकं पाण्याचं desalination करणारा प्लांट टाकायचा. साधारण तीन लाख स्क्वेयर फूट जागा लागेल.

तो लागला की मग त्याच्या आउटपुटला साधारण २५० एच पी चे सहा पंप लावेल. अन मग त्या समुद्र किनार्यावरील प्लांटपासून साधारण ५ फूट अंतर्गत व्यासाचे पाईप पंपाच्या आऊटपूटपासून टाकायला चालू करेल. साधारण ४५० किमी लांबीची पाईपलाईन होईल. या सहा पाईपचं आउटलेट प्रत्येकी दोन असं, जायकवाडी, येलदरी अन मांजरा धरणात सोडेल. साधारण पंधरा दिवस सहाही पंप फुल कॅपॅसिटीने चालवले तर २५ टीएमसी पाणी प्रत्येक धरणात जमा होईन. आणि मग मराठवाड्यातली पोरं एका पाईपने एकमेकांवर रबरी पाईपने पाणी उडवत खेळतील, शेतकरी जमीन नांगरून आल्यावर पारावर बसून गप्पा मारतील (आत्महत्येचं नामोनिशान राहणार नाही).

अऩ मग एके दिवशी तो प्लांट अन पाईपलाईन राष्ट्राला अर्पण केलं जाईन. ----------------------------------------------

ही कल्पना आहे आणि कल्पनाच राहू देऊ. पण नियतीच्या क्रूरतेपुढे हतबल झालं की असले काही तरी तिरसट विचार सुचतात. कुणी म्हणतं जितका पाऊस पडतो त्याच्या पंचवीस टक्के पाऊस पडला अन तो व्यवस्थित जिरवला तरी पुरेसं पाणी आहे. मग अडतं कुठे? का नाही सरकारी मंडळींना कळत? इथं जग वाळवंटात नद्या फिरवताहेत अन आमच्या इथे पाण्यासाठी वणवण करावी लागते.

एका ठिकाणी असं लिहील्यानंतर एक मित्र म्हणाले "किती वांझोटी कल्पना आहे ही" खरंच वांझोटीच. जे प्रत्यक्षात येऊ नाही शकत ती मांडून काय उपयोग. पण येतात विचार असे. आठ दिवसाने पाणी येतं, म्हणून कुणी गंमतीत लिहीतं, पाहुण्याला हात धुवायला झाडाच्या ठिकाणी जायला सांगतं. का तर झाडाला वेगळं पाणी टाकायला नको. सहजतेनं अभिजीत लिगाडे लिहून जातात पण किती भीषणता आहे त्यात!

 जात, धर्म या विषयावर एकमेकांवर चिखल उडवण्यात धन्यता मानतो आपण. रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट यावर चर्चा करणारे ग्रूप दिसत नाहीत सोशल मिडीयावर. असेच चालू राहिले तर एकमेकांवर चिखल उडवण्यासाठी तो तयार व्हायला पाणी मिळणार नाही हे ध्यानात ठेवू यात.

राजेंद्रसिंहांचे पाय धरू यात.

शेवटी जीवनाचा प्रश्न आहे.

Thursday, 4 June 2015

परभणी २

घराच्या दक्षिणेकडे तीन घरं. सोबणे, डांगे अन देशपांडे. फाटकाच्या कोपर्यावर सरू आजी. माजघरात एक मोरी होती. तिचा वापर आम्ही पोरं आंब्याच्या कोयी साठवण्यासाठी करत असू. हो, आंब्याच्या कोयींचा खेळ असायचा. आठ कोयींची एक रांग, परत पुढे आठ कोयींची रांग आणि सगळ्यात पुढे गट्टू. ५ ते ६ फुटावर उभं राहून आम्ही आमच्या कोयीने ढाय उडवायचो. जितक्या उडतील, त्या आमच्या. गट्टू उडवला तर सगळ्या कोयी आपल्या. डांग्यांचा शाम champion होता खेळात. लेफ्टी अन चकण्या, दणादण गट्टू उडवून अख्खी ढाय मारायचा. मी हरलो की त्या ,मोरीत जाऊन कोय कपाळावर आपटून रडायचो. तरी बरं उन्हाळ्यात दररोज आंब्याचा रस घरात होत असल्यामुळे ५०-१०० कोयी जमा व्हायच्या. पण माझा जीव त्या खेळातल्या कोयींमध्ये अडकला असायचा. खेळत शाम्या माझा दुश्मन असला तरी बाकी वेळेत  जानी दोस्त होता.

स्वयंपाकघरात आजी कायम काम करत असायची. जेवणाचं बनलं की एखादी चटणी कुट नाहीतर मुसळीवर मसाला कर, नाहीतर रवी वापरून ताक बनव. आणि ती ४ एक फुटी रवी होती अन तिला फिरवायला जाडजूड दोरी होती. सगळ्यांचं करून सवरून बाकी बायका आडव्या पडून गप्पा मारू लागल्या की आजी एकटीच साधारण २-३ वाजता जेवायची. कायम २५-३० पान वाढणाऱ्या आजीला आयुष्याच्या शेवटी एकटीला करून ११ वाजता एकटीनेच जेवावं लागलं हे तिचं दुर्दैव.

देवघरात पंगत बसायची. वदनी कवळ घेता चा उद्घोष झाला की सगळे गप्पा टप्पा मारत जेवत. पण भंकस नसायची. कुणाची टाप. समोर आजोबा, केशवराव डंक, दस्तुरखुद्द बसले असायचे.

आजोबा, एक दणदणीत व्यक्तिमत्व. कधी कुणावर भडकलेले मी बघितलं नाही. पण जरब च अशी होती की कोण टूरटूर करेल. काळा कोट, आत पांढरा शर्ट, खाली धोतर अन डोक्यावर टोपी. कपाळावर आडवं गंध. हातात छत्री नाहीतर काठी. चालू लागले की त्यांच्या रस्त्यावर चिडीचूप. एकटेच बसले असायचे. कचेरीत. दुपारी त्यांना जेवायला बोलवावं लागायचं. कुणाची टाप नसायची त्यांना बोलवायची. आम्ही नातवंडा पैकी एक कुणीतरी जायचं. मी दारातूनच बोलवायचो, अन तिथंच दाराशी उभा राहयचो. ते उठले की मग हलायचो. पूजा खणखणीत चालयची. पूजेच्या खोलीत मी त्यांना शीर्षासन करताना बघितल्याचे स्मरते. मी कधी अनुभवलं नाही पण आई सांगते, ६-७ भाषा यायच्या त्यांना. शाळा, गोरक्षण संस्था यांच्या विश्वस्त मंडळावर होते ते.

मुक्ताजीन हे अनेकांचे ऋणानुबंध असलेले ठिकाण होते. किती लग्नं, मुंजी त्या आवारात झाल्या याला गणती नाही. आजोबा सगळ्यांना मदत करावयास तत्पर असावेत.

हैदराबाद च्या नाईकांची होती ती मुक्ताजीन. काळाच्या ओघात नाईकांनी त्यांच्या मराठवाड्यातल्या सगळ्या स्थावर मालमत्ता विकायला काढल्या. त्यात मुक्ताजीनही विकली गेली. साधारण ८२-८३ ची गोष्ट असावी. समद नावाच्या गृहस्थाने विकत घेतली. मालक बदलल्यावर काही वर्षात जीनला अवकळा आली. समदचा मुलगा फ़ज्जु, पंचविशीतला असेल, आजोबांशी हसत बोलायचा, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटायचे. त्या सगळ्या प्रकारात आजोबांना खूप मनस्ताप झाला असावा असे मला आता वाटते. कदाचित तो मानसिक त्रास त्यांना सहन झाला नसावा. १९८८ साली त्यांचे निधन झाले.

पुढे काळ मोठा निष्ठुर होत गेला. १९९१ साली मामाचे अपघाती निधन झाले. पुढे पुढे मुक्ताजीन ला अवकळा आली. सगळे आपापल्या संसारात रमले. आजी एकटीच त्या घरात राहू लागली. नाही म्हणायला मधु मामा काळजी घ्यायचा. तो मुलखाचा दारुडा. पण आजीवर लक्ष ठेवून होता हेच नशीब. २००० च्या सुमारास डंक कुटुंबाने मुक्ताजीन वर पाणी सोडलं.

फेसबुक च्या परभणीकर ग्रुपच्या ओढीने मी परभणीला गेलो मागच्या वर्षी. आजोळ बघावं म्हणून गेलो तर अक्षरश: खंडहर उभी होती. माझं आजोळ, तो राजमहाल  काळाच्या उदरात गडप झालं होतं. भिरभिरत्या नजरेने मी त्याच्या जवळ एका घराजवळ थांबलो आणि विचारलं की इथे केशवराव डंक यांचं घर होतं, कुठे आहे ते सांगू शकाल का? तर म्हणाले, कोण डंक तो दारुड्या. मला एक जोरात हुंदका आला. डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. मी स्कूटर ओढली. तो माणूस, काय झालं, थांबा वैगेरे म्हणू लागला. मी त्याला हातानेच खुण केली, की  बास आता. नजरेला नरक दिसला, अन कानात शिसे ओतले.

मी परत परभणीला गेलो तर, तिकडे नजर ही टाकणार नाही अशी शप्पथ खाल्ली.

क्रमश:

परभणी २

   

Tuesday, 2 June 2015

भेटूच परत

खरं तर अकौंट deactivate करणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे. २००९ ला मी अकौंट ओपन केलं. तेव्हापासून कधी बंद नव्हतं केलं, आता पहिल्यांदाच करतो आहे,  म्हणून थोडं कौतुक. आता कुणी असंही म्हणू शकतं की इथे येताना विचारून आला होतास का, नाही ना, मग deactivate करताना कशाला ढोल वाजवतोस. पण काय झालं की काही मैत्री अशा घट्ट झाल्या की काहीच न सांगता गुल होणं पण काही झेपलं नाही. अर्थात त्यांच्याशी फोनवर आता संपर्क आहेच. त्यामुळे चिंता नाही.

मजा आली पण. त्यातल्या त्यात सप्टेंबर २०१३ नंतर. rmandlik.blogspot.in यावर लिहितो काय अन ते फेसबुकवर टाकतो काय अन त्यातून यार दोस्त मिळतात काय. साला अजीबोगरीब. एकाशीही वाद नाही. मेसेंजर वर भंकसगिरी नाही. एकदम सरधोपट. नाही म्हणायला दोघींनी उडवलं मला मित्र यादीतून. For no reason. पण ठीक आहे. गिलाशिकवा नाही. मी पण विनाकारण कुणालाही उडवलं नाही. हो, नेत्यांवर हिणकस जोक मारलेल्यांना मात्र उडवलं. बाकी कॉमेंट वर वाद झाला म्हणून तर नाहीच नाही. चुकून एका मैत्रिणीला अन्फ्रेंड केलं. पण ती स्टोरी आहे, कुणालाही न पटेल अशी. त्यामुळे सोडा.

बाकी काही लोकांचच नाव लिहून, त्यांचे आभार मानून वाद निर्माण करायचा नाही. पण संवाद साधता येईल असे किमान दीडएकशे तरी मित्र झालेत. जास्तच, पण कमी नाही.

माझं हरवलेलं अख्खं गाव मिळालं. परभणी.

असो. कोणताही निरोप घेताना मी कातर होतो. आतापर्यंत चार वेळा वाहन विकलं. अन प्रत्येक वेळी चार थेंब डोळ्यातून बाहेर पडलेच. इथे तर मित्रच सगळे. आभासी असले तरी दुसऱ्या बाजूला कुणी संवाद साधतं म्हणून तर मैत्री. त्यामुळे आज ही थोडा का होईना मनातून हललो तर आहेच. बरं यासाठी वाटतंय की reactivate करणं माझ्याच हातात आहे.

अनेक तुटके फुटके अनुभव तुमच्या बरोबर शेयर केले. तुम्हाला आवडले. नियतीने ढकललं म्हणून यात पडलो. आता परत काठावरून चालत राहील. कुणी सांगावं, पुन्हा  पडेलही यात, परत तुम्हाला भेटण्यासाठी……फिरता फिरता

भेटूच परत