Tuesday, 24 December 2019

बिल

आज मी पुण्यापासून साधारण ३००-३५०किमी लांब एक गावी कस्टमर कॉल साठी आलो होतो. एक मिटिंग झाल्यानंतर दुसऱ्या मिटिंगच्या आधी लंच करण्यासाठी ब्रेक घेतला. कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट ने मिटिंग मधील एका ज्युनियर ला मला जेवायला बाहेर घेऊन जायला सांगितलं. माझ्या बरोबर आमचाही एक तरुण इंजिनियर होता.

जेवण झालं, बिल आलं. आता तो माझ्याबरोबर आलेला मुलगा इतका तरुण होता की त्याने माझं बिल भरावं हे काही मला पटत नव्हतं, जरी कॉल वर आलेल्या सप्लायरला एक कर्टसी म्हणून लंच ऑफर केलं असलं तरीही. म्हणून मी आग्रह करून बिल भरून टाकलं. त्यात सप्लायर-कस्टमर किंवा मी लांबून आलो आहे म्हणून दिलेली कर्टसी हे काहीही मनात नव्हतं तर केवळ वडीलकीच्या भावनेतून बिल देऊन टाकलं.

हॉटेलच्या बाहेर मी कस्टमरची वाट बघत असताना जे मी पाहिलं त्याने मात्र व्यथित झालो. त्या यंग मुलाने हॉटेल मालकाकडून अजून एक बिल बनवलं, कारण तसंही त्याची कंपनी ते अप्रुव्ह करणार होती.

मध्ये इंडस्ट्री आणि कॉलेज प्रोफेसर्स यांच्यात एक मिटिंग झाली ज्याचा मी भाग होतो. नवीन इंजिनियर्सकडून इंडस्ट्री च्या काय अपेक्षा आहेत यावर बोलायचं होतं. मी तिथे हेच सांगितलं की आम्हाला टेक्निकल नॉलेज थोडं कमी असेल तरी चालेल पण व्हॅल्यू सिस्टम मात्र तगडी पाहिजे. कामाप्रति निष्ठा, प्रामाणिकता, शंभर टक्के जबाबदारी हे गुण ठासून भरले पाहिजेत.

आमच्या कंपनीत असं एकदा घडलं तेव्हा हेच सांगितलं की या इनमिन ५०० रुपयांच्या बिलानी कंपनी गरीब होत नाही हे नक्की पण क्लेम करणारे कधी थोडे पैसे कमावतील पण संपन्न कधीही होऊ शकणार नाही.

संपन्नता ही फक्त आणि फक्त कठोर परिश्रमाने आणि प्रयत्नवादी असणाऱ्या लोकांना वश होते आणि त्यांच्या हातून जे सुटतं ते बाकीच्यांचा हाताला लागतं. 

Sunday, 22 December 2019

भावेश भाटिया

निराशेच्या गर्तेत अडकलं असताना एखादया व्यक्तीला आपण ऐकतो आणि ते मळभ असं दूर होतं, तसंच काहीसं झालं, श्री भावेश भाटिया यांना ऐकल्यावर.

मेणबत्ती सारखा तसा स्वस्त आयटम. त्यात ते करतात कैक कोटींचा टर्नओव्हर. जगातल्या ६७ देशात त्यांचं प्रॉडक्ट निर्यात होतं. हजारो व्यक्तींना सोबत घेऊन जाणारी सन राईज कँडल ची वाटचाल प्रेरणादायी आहे. त्यांच्या कंपनीत शंभर पेक्षा जास्त लोक काम करतात.

कंपनी सारखी कंपनी. मग त्यात विशेष असं काय? तर यातला आश्चर्यकारक भाग हा आहे की श्री भावेश भाटिया हे पूर्णपणे अंध आहेत. आणि वर उल्लेख केलेल्या शंभर पैकी ऐंशी लोक पण अंध आहेत.

कथा फारच उद्बोधक आहे त्यांची. हातगाडीवर त्यांनी मेणबत्ती विकायचा बिझिनेस चालू केला आणि गेल्या अडीच दशकाच्या वाटचालीत त्यांनी तो वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.

आणि भावेशजींचं आयुष्य म्हणजे सुरस आणि चमत्कारिक घटनांनी भरलेलं आहे. टुरिस्ट म्हणून महाबळेश्वर ला आलेल्या गडगंज श्रीमंत असणाऱ्या निताजींशी त्यांचं झालेलं लग्न, अंधत्व आलेलं असताना नागपूर नेपाळ नागपूर असा सायकलवर केलेला प्रवास, खेळण्याची आवड जी आजारपणामुळे सुटली होती ती परत पंचविशीत जोपासली आणि गेल्या दोन दशकात गोळाफेक या क्रीडाप्रकारात पॅरा ऑलिम्पिक मध्ये तब्बल ११७ पदकं, देशभरातल्या आठ विद्यापीठाकडून डी लिट ही पदवी, आणि तीन वेळा राष्ट्रपती पुरस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची विलक्षण वक्तृत्व कला. स्वरचित अशा असंख्य शेरोशायरीतून त्यांनी जो प्रवास उलगडला त्याने हॉल मधील १५० जण अचंबित झालो.

भावेशजींच्या झळाळत्या कारकिर्दीला अजून चार चांद लागू देत आणि त्यांनी जे अंध लोकांना काम देऊन मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचं महत्वाचं काम चालू केलं आहे त्यात त्यांना यश मिळू दे याच मनःपूर्वक शुभेच्छा





Tuesday, 27 August 2019

सकारात्मक

फेसबुकवरच्या पोस्टवरून असं कुणाला वाटू शकतं की मला सकारात्मकतेचा रोग लागला आहे. हो, अति सकारात्मकता हा रोगच. प्रत्यक्ष जीवनात पॉझिटिव्हिटी ची टाळ सारखी कुटू शकत नाही आणि जर कुटत असू तर त्याचा प्रौढ गटणे झाला आहे असं खुशाल समजावं.

बऱ्याचदा पॉझिटिव्हिटी म्हणजे आयुष्यातला नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करणे असा घेतला जातो. हा खरंतर गुन्हाच. मी आतापर्यंत जे पाहिलं आहे, अनुभवलं आहे आणि वाचलं आहे त्यावरून एक निष्कर्ष काढला आहे.

Being positive does not mean overlooking negatives. It just means seeing eye to eye of negativism and telling "I know you are there and I am working on you. With my efforts, I am letting you go."

नैसर्गिकरित्या काही प्रश्न सुटतील ही आपली विशलिस्ट असते. पण प्रत्यक्षात तसं  होत नाही. जेवताना चुकून तोंडात खडा आला, तर आपण त्याला तोंडात ठेवून आता पुढचा घास चांगला येईल, अशी वाट बघत बसत नाही. तर तोंडातला खडा थुंकून टाकतो, तोंड स्वच्छ धुतो आणि मग पुढचा घास घेण्यास सज्ज होतो. नकारात्मकतेवर अगदी असंच काम करावं लागतं.

व्यावसायिक जीवनात प्रश्न उभे राहतातच.  त्यावर साधकबाधक विचार करून एक ऍक्शन प्लान बनवून त्याला उत्तर देण्यात शहाणपणा आहे.  

Sunday, 25 August 2019

IMTMA

अनेक इंडस्ट्रीयल असोसिएशन सारखी आय एम टी एम ए ही एक आहे, जिचे आम्ही मेम्बर आहोत. इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर असोसिएशन. आमच्या इंडस्ट्री ला लागणारे अनेक ट्रेनिंग कोर्सेस ते कंडक्ट करतात. फिनिशिंग स्कुल इन प्रोडक्शन इंजिनियरिंग आणि डिझाइन कोर्स ऑफ मशीन टूल हे मला आवडणारे कोर्सेस. डिग्री पूर्ण झाल्यावर जर हे कोर्स केले तर एम्प्लॉयेबिलिटी वाढते असं मला वाटतं. सेटको यथाशक्ती या ट्रेनिंग कोर्सेस मध्ये आपला सहभाग देते.

परवा मशीन टूल डिझाइन कोर्सच्या अवॉर्ड सेरेमनी साठी मी हजर होतो. त्याचे अवॉर्डस सेटकोने स्पॉन्सर केले होते. कोर्स पूर्ण करणाऱ्या मुलांबरोबर विविध कॉलेजेस चे प्रोफेसर तिथं हजर होते. त्यांना सांगितलं की समाजाची उतरंड जर थांबायची असेल तर शिक्षक हे एक नोबल प्रोफेशन परत एकदा बनवण्याची आपली जबाबदारी आहे.

त्या फोरम वर बोलताना मी सांगितलं की इंजिनीअर्स एम्प्लॉयेबल बनवण्याचं उत्तरदायित्व हे स्टुडंट्स, कॉलेजेस आणि इंडस्ट्री या सगळ्यांवर आहे. अवॉर्डस स्पॉन्सर करण्याचे आभार मानण्यात आले त्यावर मी म्हणालो की एक इंडस्ट्री प्रतिनिधी म्हणून आम्हीही काही देणं लागतो. आणि त्या कर्तव्यपूर्तीच्या भावनेने हे आम्ही केलं आहे. त्यात जनरोसिटी वगैरे अशी भावना नाही आहे.

मुलांशी संवाद साधताना त्यांना सांगितलं की टेक्निकल स्किल शिवाय स्वयंशिस्त, कामाची शंभर टक्के ओनरशिप, Be an employee...Be an employer अशी कामाची पद्धती, Having.....Doing.......Being ही थिंकिंग प्रोसेस रिव्हर्स करणे आणि संवाद कौशल्य या गोष्टी तुम्हाला बाकी गर्दीपासून वेगळं करतील जिथं फार लोक नसतात.

अन सरतेशेवटी आवाहन केलं की इंजिनियर्स चं मागणी पेक्षा पुरवठा जास्त यामुळे डिग्रेडेशन झालं आहे, पण ती जुनी ग्लोरी परत आणणं हे तुमच्या हातात आहे. चहाचं दुकान टाकण्यात काहीच वाईट नाही, पण ते करताना बाहेर इंजिनियरिंग च्या डिग्रीला हार घालणं हा नतद्रष्ट पणा आहे. मशीन टूल ही मदर इंडस्ट्री पैकी एक आहे. झोकून काम करणाऱ्या इंजिनियर्स साठी तो स्वर्ग आहे. सर्वांचं स्वागत केलं.

(IMTMA चं पुण्यात ट्रेनिंग सेंटर आहे. इंजिनिअरिंग झाल्यावर व्यावसायिक स्किल सेट वाढवण्यासाठी इथं अनेक कोर्सेस आहेत. इच्छुकांनी वेब साईट द्वारे संपर्क साधावा) 

Thursday, 22 August 2019

पॉझिटिव्हीटी

काल आनंद मोरे ने एक महत्वाचा मुद्दा मांडला की सकारात्मकता दाखवणं ठीक आहे पण भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. मिलिंद सरवटे सरांनी याबद्दल एक लेख मला मागे पाठवला होता, या विषयावर.

उद्योजकता आणि व्यावसायिकता हे दोन वेगळे पैलू आहेत असं मला नेहमी वाटत आलं आहे. त्या दोघांचे गुण अवगुण आहेत. ज्या लोकांमध्ये दोन्ही पैलूंचे गुण एकवटून येतात ते नारायण मूर्ती, रतन टाटा बनतात आणि फक्त व्यावसायिकता दाखवली तर त्यांचा सायरस मिस्त्री किंवा विशाल सिक्का बनतो.

उद्योजकांचा इमोशनल किंवा सेंटिमेंटल कोशंट हा जास्त असतो, हे मी माझ्यावरून आणि आजूबाजूला जे उद्योजक आहेत त्यावरून सांगू शकतो. व्यावसायिकांचा एनलिटिकल कोशंट जास्त असतो. इमोशनल पद्धतीने एका लेव्हल पर्यंत कंपनी चालू शकते. पण त्यानंतर फक्त सकारात्मकता किंवा नकारात्मकता घेऊन किंवा फक्त स्ट्रॉंग रिलेशन्स वर व्यवसाय केला तर त्याला लिमिटेशन्स येतात. हे वेळीच ओळखून उद्योजकाने जर त्याच्यात व्यवसायिकतेचा अभाव असेल, तर बाहेरून ते हायर करावेत आणि स्वतःच्या इमोशन्सचा लगाम, मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक, त्या व्यावसायिक माणसांच्या हातात द्यावा.

उद्योजकाच्या तथाकथित पॉझिटिव्हीटी ला, व्यावसायिक एनलिटिकल डाटा चं कोंदण लावतात आणि मग त्या व्यवसायाचं बस्तान बसतं असा माझा अनुभव सांगतो.

माझ्या भावनाप्रधान स्वभावाला लगाम लावायचं काम कंपनीत प्रोफेशनल्स करतात आणि फेसबुकवर आनंद, मिलिंद सर, मेधा नाईक सारखे मित्र मैत्रिणी करतात.

राहता राहिला प्रश्न कौस्तुभ ने मेंशन केलेलं यशस्वी उद्योजक हे बिरुद. जे मी लिहिणार आहे त्यात विनय नाही, न्यूनगंड ही नाही आणि अहंगंड तर नाहीच नाही. एक उद्योजक म्हणून मी स्वतःला दहापैकी सहा मार्क देईल पण व्यावसायिक म्हणाल तर मी स्वतःला अयशस्वी समजतो. व्यवसायिकतेचे गुण मिळतात परफॉर्मन्स मेझर वर. सतरा वर्ष व्यवसाय करूनही मी माझं एस एम इ टॅग काढू नाही शकलो आणि पुढील चार वर्षे तरी काढू शकणार नाही. यातच काय ते आलं. त्यांनतर जर सेटको मिडीयम किंवा लार्ज कंपनी म्हणून ओळखली गेली तर माझ्या उद्योजकतेपेक्षा माझ्या कंपनीतील व्यावसायिक लोकांचा त्यात जास्त वाटा असेल याबाबत शंका नाही.

अजून एक जाता जाता सांगावंसं वाटतं की कौस्तुभला जे यशस्वी म्हणून अभिप्रेत आहेत तसे सोशल मीडियावर खूप कमी लोक लिहितात. कारण ते कदाचित वर लिहिलेले परफॉर्मन्स मेझर अचिव्ह करण्यात बिझी असावेत. मी तिथं स्वतःला बिझी ठेवत नाही म्हणून इथं वेळ देऊ शकतो इतकाच काय को फरक.  

Monday, 19 August 2019

सोशल मीडिया

जे जे म्हणून पहिलं ते आयुष्यभर लक्षात राहतं. पहिल्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचा भाग झालो हे नेहमीच लक्षात राहील. कार्यक्रम संदर्भात कन्फेशन: तिथं पोहोचेपर्यंत वाटलं नव्हतं की कार्यक्रमाची मांडणी इतकी आखीव रेखीव असेल. विषय जोरकस होते. दर्जा एकंदरीत वरचा होता. त्याबद्दल समीर, मंगेश आणि टीमचे अभिनंदन. प्रसादचे आभार की त्याने माझं नाव इथं सुचवलं. एक प्रेक्षकांची संख्या सोडली, तर नाव ठेवायला अजिबात जागा नव्हती.

दोन सेशन मध्ये पॅनलिस्ट होतो. "ब्रँड, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सोशल मीडिया" आणि "मला व्यक्त होताना असणाऱ्या चिंता, त्यावरील उपाय आणि माझ्या अपेक्षा"

पहिल्या विषयावर पॅनलिस्ट म्हणून बोलण्यापेक्षा मलाच शिकायला खूप मिळालं. दोन तर महत्वाचे मुद्दे आहेत. माझे टेकअवे मी इथं लिहिणार नाही आहे. कुणाला हवे असतील त्यांनी मेसेंजर वर संपर्क करावा. पण एक मात्र बोललो की सोशल मीडिया तर्फे मार्केटिंग करण्याची अक्कल मला फार उशिरा आली आणि माझे त्या बद्दलचे खूप मिस कन्सेप्शन होते जे गेल्या वर्षभरात दूर झाले. सोशल मीडिया मार्केटिंग हा प्रकार सिरीयसली उद्योजकांनी घ्यायला हवा. २०१४ मध्ये नाही म्हणायला, थोड्या राजकीय विषयावर पोस्ट लिहायचो आणि त्यामुळे मी माझे कस्टमर्स आणि सहकारी यांना फेसबुकवर मित्र यादीत जागाच नाही दिली. ती मोठी चूक झाली. पुढे मग राजकीय पोस्ट लिहिणं हे अलमोस्ट बंद केलं. आता मात्र एक दिशा मिळाली आहे आणि ती दुसऱ्या पॅनल डिस्कशन मध्ये सांगितली.

दुसऱ्या टॉपिक मध्ये पहिले विचारलं की  पोस्ट चोरी होतात त्याबद्दल काय म्हणणं आहे. कौशल इनामदार आणि सारंग साठे हे दोघे दृकश्राव्य माध्यमातील त्यामुळे त्यांना ही चिंता असणारच. पण मी आणि गौरी या टेक्स्ट फॉर्म मध्ये लिहिणारे. मी सांगितलं "हा प्लॅटफॉर्म मी निवडला आहे. आणि त्याचा फॉरमॅट असा आहे की पोस्ट या उचलल्या जाणार आणि त्याबद्दल कन्सर्न असण्यात काही मतलब नाही. जो पर्यंत माझी पोस्ट वापरून कुणी अर्थार्जन करत नाही तो पर्यंत मी बोंब मारण्यात मतलब नाही. इंटरनेट चा खर्च याशिवाय मी त्या कन्टेन्ट वर फिजिकल खर्च करत नाही. ज्यांना स्वतःचं लिखाण चांगलं वगैरे वाटतं त्यांनी पुस्तक काढावं आणि पैसे कमवावे."

दुसरा विषय ट्रोलिंगचा. ट्रोलिंग हे मुख्यतः राजकीय आणि धार्मिक विषयावर पोस्ट अथवा कॉमेंट टाकली की होतं. व्यावसायिक लोकांनी राजकीय, धार्मिक, प्रांतिक, भाषिक या कुठल्याही मुद्दयांवर आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त करू नये, असं मला वाटतं. आपल्या राजकीय भावनेचं प्रकटीकरण हे मतपेटीद्वारे आणि धार्मिकतेचं प्रदर्शन हे घरातल्या देव्हाऱ्यात मांडावं. सोशल मीडिया त्यासाठी प्लॅटफॉर्म नाही. तो ज्यांच्यासाठी आहे ते त्याचा दणकावून वापर करत आहे. आपण त्याच्या फंदात पडू नये.

क्लोजिंग रिमार्क मध्ये हेच सांगितलं की सोशल मीडिया हे कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी चांगलं टूल आहे. आणि मुख्य म्हणजे ते आपल्यासाठी बनलं आहे आपण त्याच्या साठी नाही. तर त्या डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया याचा वापर आपल्या वृद्धीसाठी वापरावा, मग ती व्यावसायिक असो वा वैयक्तिक असो.  

(बाकी विषय आणि त्यावर बोलणारे लोक धारदार होते. सायबर हायजिन, सायबर व्हिक्टिम, व्यवसायिक यश हे सगळे मुद्दे राज्याच्या कानाकोपऱ्यात जावे असं मला मनापासून वाटतं आणि एकूणच सर्वांची इन्क्लुजिव्ह ग्रोथ व्हावी हि सदिच्छा.)

Thursday, 15 August 2019

सोशल मीडिया

सोशल मीडिया हा बऱ्याच जणांप्रमाणे माझ्याही आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. सध्या मी फेसबुक, व्हाट्स अप आणि लिंक्ड इन वर ऍक्टिव्ह आहे. इथं प्रत्येकाचा अजेंडा असतो. माझाही आहे.

मी इथं ब्रॅंडिंग करत असतो. एक तर माझं स्वतःचं किंवा माझ्या व्यवसायाचं आणि अगदी उद्दात्त वगैरे म्हंटलं तर देशाचं. स्वतःचं ब्रॅंडिंग करणे या पद्धतीला "स्वतःची लाल करणे" असं इथं बोललं जातं. ब्रॅंडिंग म्हणजे 'समोरच्याच्या मनात स्वतःची प्रतिमा तयार करणे.

या मधील हे कंपनीचं ब्रॅंडिंग इथं फेसबुकवर मी फार उशिरा चालू केलं. काही करणं होती त्यासाठी.  पण स्वत:चं ब्रँडिंग चालू करून आता तीन चार वर्षे झालीत. ब्रँड मार्केट करण्यामागची खरी गोम ही आहे की तुमचा प्रत्यक्ष डिलिव्हरन्स हा ब्रँड प्रॉमिस प्रमाणे हवा. तो देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो.

हे करताना इथं मी कुणाला मित्र वाटतो, कुणाला दादा वाटतो, कुणाला आदरयुक्त भीती वगैरे वाटते. काही जणं डायरेक्ट खिजवतात, कुणी आडून टोमणे मारतं, कुणी जेष्ठतेच्या भावनेने काळजीपूर्वक सल्ला देतं की न्यून किंवा अहंभाव येऊ देऊ नको. मला या सगळ्यांचा आदर आहे. मी हे एन्जॉय करतो.

यातील गंमत अशी आहे की माझ्या प्रत्यक्ष जीवनात व्यवसायाच्या अनुषंगाने या सर्व भावना अधिक तीव्रतेने शो केस होतात. इथं त्यामानाने या सर्व भावना मवाळ असतात. प्रत्यक्षातील माझं प्रेम किंवा दुःख, मिळणारा आदर किंवा माझा अहंकार, लोकांच्या मनातील माझ्या बद्दलची भीती किंवा माझं न्यूनत्व हे इथल्यापेक्षा धारदार असतं. त्यामुळे इथं मला क्षणिक दुःख किंवा सुखशिवाय अंगाला काही लागत नाही. आर जे संग्राम सांगतो तसं मी सोसल इतकं सोशल मीडिया वापरतो.  सोशल मीडिया वर ब्रँड बनवताना काही दोस्ती झाली आहे, ती मात्र जीवापाड जपतो. सोशल मीडिया हे बॅरिअर माझ्यासाठी तुटतं.

हे सगळं मी बोलणार आहे १८ ऑगस्टला "ब्रँड, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सोशल मीडिया" या विषयावर पॅनेलिस्ट म्हणून. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून यावं. 

Monday, 12 August 2019

हव्यास

शनिवारी सांगलीला टेम्पो पाठवायचा होता. नेमकं टेम्पो मालकाच्या आजोबांचं निधन झालं. मग जे काही पाठवायचं ते कारने पाठवलं. कार सोमवारी सकाळपर्यंत आली नव्हती. म्हणून कंपनीत कॅबने आलो.

कॅब मध्ये फोनवरून फळणीकरांशी बोलत होतो. औषधं कितीची झाली वगैरे चर्चा चालू झाली. मग पूरग्रस्त परिसरातील डॉक्टरशी बोलणं झालं. पुढच्या लॉट मध्ये काय पाठवायचं ते मागवून घेतलं. उद्या आमच्या क्रिसलीस ग्रुप मध्ये चर्चा ठरली, ते ही फोनवर बोलणं झालं. 

तर ही सगळी पार्श्वभूमी सांगण्यामागे एक कारण आहे. किंवा एक मित्रवर्य म्हणतात तसं वाचणाऱ्यावर प्रभाव पडण्याचा मला हव्यास आहे. तर जे तसं समजतात त्यांनी तसं समजावं. 

तर कारण हे आहे की कॅब मधून उतरण्याअगोदर कॅब ड्रायव्हर म्हणाला "तुम्ही सर कॅबचं भाडं देऊ नका."

मी विचारलं "का?"

तर म्हणाला "तुम्ही इतकं करताय तर माझ्याकडून फुल न फुलांची पाकळी".

मी समाधानाने हसलो. माझं कॅब अकौंट कार्डला  कनेक्ट आहे. शून्य रुपये आल्यावर म्हणाला आग्रह करू लागला, कॅश परत देतो.

मी म्हणालो "मित्रा, मदत करावी हे तुझ्या मनात आलं, हे खूप आहे. मदतीचा चान्स आज हुकला. कुठं तरी करशील नक्की"

मनोभावे आम्ही एकमेकांचा हात हातात घेतला.

दुसर्यावर प्रभाव पाडण्याचा हव्यास मला आता फेसबुकच नाही तर प्रत्यक्ष जीवनात पडला आहे. 

Saturday, 10 August 2019

सेल्स कॉल

काल नासिकला गेलो होतो. कस्टमर कॉल वर. बऱ्याच दिवसांनी मेझरिंग इन्स्ट्रुमेंट्स हातात घेतले. मशीनमध्ये घुसून काम केलं. शर्ट ला ऑइल लागलं आणि ट्राऊजर ला काळे डाग पडले. जेवण्याच्या आधी हात धुतले खरे, पण हाताला तो जुन्या काळात येणारा मंद असा ऑईलचा वास आला. माझ्या लेखी तो वास म्हणजे पारिजातक चुरगळल्यावर हाताला जो येतो तोच.

हे माझं आवडतं काम. कस्टमर ला सोल्युशन देणे. इम्पोर्ट सब्स्टीट्युट बनवणे. थोडक्यात कस्टमरची कम्फर्ट लेव्हल तयार करणे. आजकाल कस्टमर पण अवघड प्रश्न विचारत नाहीत. पूर्वी बजाज ऑटो, टाटा मोटर्स वगैरे कंपनीतील लोक असे प्रश्न विचारायचे की उत्तरं देताना त्रेधा उडायची. आता कुणी असे इंटरेस्टिंग प्रश्न विचारले की भारी वाटतं. आणि मी मग बोलूनही दाखवतो, की चर्चा करताना मजा आली.

कंपनी मोठी झाली. मॅनेजमेंटचं काम वाढलं. स्ट्रॅटेजी, बॅलन्स शीट, एचआर, फायनान्स हे असलं काहीतरी अवघड काम आजकाल करावं लागतं.

काल जाणवलं, हार्ड कोअर टेक्निकल काम केलं की दिल गार्डन होऊन जातं. पण नंतर हे पण वाटलं, की तेच काम करत राहिलो असतो तर कदाचित ग्रोथ पण झाली नसती. कुणास ठाऊक जॉईंट व्हेंचर पण झालं नसतं आणि पुण्याव्यतिरिक्त चेन्नई आणि दिल्लीत प्लांट पण चालू करू शकलो नसतो.

ते काय असेल ते असेल, पण आता ठरवलं आहे. सहा महिन्यातून का होईना एखादा असला खंग्री टेक्निकल सेल्स कॉल करायचा. वर उल्लेखलेली अवघड काम करताना डोकं खूपदा पकून जातं. त्यावर उतारा म्हणून.  मन फ्रेश होऊन जातं.



Thursday, 1 August 2019

हेडोनिक ट्रेडमिल

समजा मी एक कार विकत घेतली. त्याचा आनंद साधारण एक आठवडा टिकतो. एकदा ती कार माझ्या इको सिस्टम चा भाग झाली की माझं मन कुठलातरी दुसरा आनंद शोधण्यासाठी बाहेर पडतं. हा जो प्रकार आहे त्याला म्हणतात हेडोनिक ट्रेडमिल. (ट्रेडमिल वर आपण पळत राहतो पण असतो त्या जागेवरच, म्हणून हे नाव दिलं असावं असा माझा अंदाज) आपण काही भौतिक गोष्टींचा पाठपुरावा करतो, ज्यामुळे मला आनंद वाटेल. ती गोष्ट कवेत आल्यावर आपल्याला यशस्वी झाल्याचा अनुभव येतो. त्या अनुभवातून मिळणारा आनंद काही काळ टिकतो आणि मग आपण परत कोणत्यातरी नवीन अनुभवामागे धावत सुटतो.

पण मग यातून सुटका आहे का? तर आहे. तात्विक दृष्ट्या, अध्यात्मिक दृष्ट्या हीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगण्यात आली आहे. काही काळासाठी पटतं ही आपल्याला. पण थोड्या दिवसात आपल्याला त्याचा विसर पडतो.

१. जितके लागतात तितके पैसे मिळवण्याइतकं काम करा. (याचा अर्थ पैसे कमवू नका असा नाही.) एक लॉंग टर्म सेव्हिंग प्लॅन बनवला आणि रिटर्न्स ठरवले की मग पैसे जास्त मिळाले तरी त्याचा आनंद होत नाही. जिवंतपणी मोक्ष मिळाला असं होतं मग.

२. व्यायाम करून तब्येत खणखणीत ठेवा. आणि एनर्जी वाढवा.: या उपायाचे अनंत फायदे आहेत.  व्यायाम, झोप आणि मोजके पण व्यवस्थित खाणं याला चॉईस ठेवण्यात मतलब नाही. याला महत्व दिलं की हे शरीर जे रिटर्न्स देतं त्याला तोड नाही.

३. जे लोक आवडीचे आहेत, त्यांच्याबरोबर वेळ घालवा: समान विचारसरणीचे लोक, मित्र, फॅमिली यांच्याबरोबर जास्त वेळ घालवा. ह्या लोकांना आपण गृहीत धरतो पण अडचणीवेळी हीच लोक आपल्या मदतीला येतात.

४. ज्या गोष्टी आयुष्यात डोक्याला शॉट लावतात त्यांना आयुष्यातून कायमचं हद्दपार करा. अशा गोष्टी शोधा आणि त्यावरचे उपाय छोटे असतात. उदा: टूर ची बॅग तयार ठेवायची अन त्यात चार्जर, टॉयलेटरीज ची बॅग वेगळं ठेवणे. दिलेली वेळ पाळणे. वगैरे.

५. शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं. नवनवीन आव्हानात्मक परिस्थितीला न डगमगता सामोरे जाणे. जर असं काही नसेल तर अशी आव्हानात्मक परिस्थिती शोधणे अन त्यावर मात करणे. नवीन प्रोजेक्ट्स, काही शिकणे (भाषा, वादन, गाणे, खेळ काहीही). यातून मिळणारा आनंद हा अफलातून असतो.

(एका इंग्रजी लेखाचा स्वैरानुवाद) 

Friday, 19 July 2019

धडा

७ जुलै २०१९ हा दिवस भयानक होता. त्याच्याशी संबंधित भावनिक नातं जर सोडलं, तर खूप काही शिकवलं त्या दिवसाने. या प्रकारच्या अपघाताच्या बातम्या आपण वाचतो, पण आपल्याबरोबर असं काही होऊ शकेल अशी पुसटशी शंका आपल्या मनाला शिवत नाही. जणू काही अमरत्व घेऊन आलो आहे. काही चांगल्या गोष्टी आयुष्यात घडल्या की ज्याला मी लायक नव्हतो, तसं असं काही माझ्याबरोबर घडावं असंही पाप काही घडलं असेल असं आठवत नाही.

एक व्यावसायिक म्हणून धडे मिळाले. ते सगळ्यांसोबत शेअर करावे वाटले.

१. एकतर सगळ्यात आधी एच आर मॅन्युअल बनवून घ्या. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल पॉलिसी ठरवा आणि ती लिहून काढा.

२. कंपनीची गाडी असेल तर तिचं रजिस्टर बनवा आणि गाडी जर बाहेर जात असेल तर तिची न चुकता नोंद करा.

३. कंपनीची गाडी असेल तर तिचा पर्सनल वापर, नाही म्हणजे नाही.

४. इ एस आय सी शिवाय एक मेडिक्लेम आणि अपघात विमा पॉलिसी जरूर काढा.

५. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वर विमा असतो पण त्याला काही साधे नियम आहेत, ते समजून घ्या.

६. रात्री दहा ते सकाळी सहा प्रवास टाळा.

७. एम्प्लॉयर म्हणून सगळ्या लोकांना आदराची आणि प्रेमाची वागणूक द्या. तो तुमचा स्वभाव खूप मोठ्या मनस्तापापासून वाचवू शकतो.

८. देव न करो असं कुणाबरोबर होवो, पण झालं तर या प्रकारातील भावनिक भाग आणि व्यावहारिक भाग नीट समजून घ्या. दोघांची सरमिसळ करू नका.

९. गोष्टी धीराने घ्या. त्यावर टीमचं मोराल खूप अवलंबून असतं. Be brave......Even if you are not, pretend. No one can tell the difference.

१०. दोन महिन्यांपूर्वी चार लोक स्पर्धक कंपनीने उचलले आणि आता चार लोक देवाने. स्पर्धक कंपनीचे आभार मानतो. स्पर्धक कंपनी दयाळू आहे. ती त्या चौघांना जगवते. देवासारखी निष्ठुर नाही ती. 

Thursday, 18 July 2019

रामभाऊ

"तुला म्हणून सांगतो रामभाऊ, पण काय भारी चव होती या हॉटेलची दहा एक वर्षांपूर्वी! तब्येत खुश एकदम. पण आजकाल चव बिघडली यांची"

"शक्यता आहे. पण कुणास ठाऊक हॉटेलच्या पदार्थांची चव तशीच असेल. कदाचित अशीही एक शक्यता आहे की गेल्या दहा वर्षात वयोमानाप्रमाणे तुझ्या जिभेची चव बिघडली असेल."

"भावा, नेहमी लक्षात ठेव. तुझे पंचेंद्रिय कालमानानुसार घासत जा. चष्मा साफ कर, कान हलके होऊ देऊ नको, स्पर्श झाला तर अवघडु नको आणि प्रत्येक गोष्टीत चूक हुंगू नकोस."

रामभाऊ रॉक्स, मी शॉक्स. 

Wednesday, 12 June 2019

अझीम प्रेमजी

नुकतंच अझीम प्रेमजी विप्रो चेअरमन म्हणून निवृत्त होणार अशी बातमी वाचली. काही लोकांनी भारतीय उद्योगजगतावर आपली अमीट छाप सोडली आहे आणि त्यात अझीम प्रेमजी यांचं स्थान अगदी वरचं आहे हे निर्विवाद.

एकुणात विप्रोची कहाणी ही उद्योगजगतातील अजूबा आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. विप्रो चं मुख्य कार्यालय जरी कर्नाटकातील बंगलोर मध्ये असलं तरी विप्रोचा आणि महाराष्ट्राचा एक जवळचा संबंध आहे. विप्रो म्हणजे खरंतर वेस्टर्न इंडिया  व्हेजिटेबल प्रोडक्टस (Western  Indian vegetable Products) किंवा काही ठिकाणी त्याचा संदर्भ वेस्टर्न इंडिया पाम रिफाईंड ऑइल असा ही येतो. आणि सदर कंपनी चालू झाली होती ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या गावी. ही कंपनी चालू केली होती अझीम प्रेमजी यांच्या वडिलांनी म्हणजे मोहम्मद प्रेमजी यांनी १९४५ साली. सनफ्लॉवर ब्रँड खाली तेल बनवण्याची ही कंपनी होती. पुढे इथं मग तेलापासून बनवणारे साबणासारखे बाय प्रॉडक्टस बनू लागले. अगदी २०१२ पर्यंत सनफ्लॉवर ब्रँड हा विप्रो कडे होता. त्यामुळे कंपनीचा लोगो हा सूर्यफूल असाच होता. पण मग तो कारगिल नावाच्या एका अमेरिकन कंपनीला विकला. आज अमळनेर च्या फॅक्टरीत संतूर आणि शिकेकाई या साबणाचं उत्पादन होतं. अमळनेर गावामध्ये विप्रोचे शेअर्स घेऊन करोडपती झालेल्या अनेक कहाण्या आहेत.

अझीम प्रेमजी हे साठच्या दशकातील अमेरिकेतील स्टँनफोर्ड विद्यापीठाचे स्नातक. आज परदेशात जाऊन शिक्षण घेणं हे सोपं झालं असलं तरी त्या काळात हे दिव्य होतं. १९६६ साली जेव्हा त्यांचे वडील आजारी पडले तेव्हा मानसिक द्वंद्व झालं होतं. अमेरिकेचं सुखी आयुष्य जगायचं की भारतात परत यायचं. त्यावेळी २१ वर्षे वय असलेल्या अझीम प्रेमजी यांनी भारतात परत यायचा निर्णय घेतला. लौकिकार्थाने छोटा उद्योग चालवणं हे आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सुद्धा अवघड आहे. १९६६ साली लायसन्स राजच्या काळात तर ते दुरापास्त. पण अझीम प्रेमजी यांनी ते आव्हान स्वीकारलं. आणि नुसतं स्वीकारलं नाही तर आपल्या कल्पकतेच्या जोरावर जगातल्या नावाजलेल्या कंपनीमध्ये स्थान मिळवलं.

पुढील दहा वर्षांमध्ये मग विप्रोने अझीम प्रेमजी यांच्या नेतृत्वाखाली विविध उद्योगात पाय रोवले. विप्रो लायटिंग, विप्रो कन्झ्युमर प्रॉडक्टस, विप्रो हायड्रॉलिक्स. व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी शोधत असताना विप्रोला संधी मिळाली ती आयटी क्षेत्रात काम करण्याची. १९७५ ते १९८० च्या काळात संगणक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आयबीएम ला राजनैतिक निर्णयामुळे भारतातून गाशा गुंडाळावा लागला आणि अझीम प्रेमजी यांनी तयार झालेल्या पोकळीमध्ये विप्रोला बसवलं. १९८० ते १९९० मध्ये हा उद्योग बस्तान बसवत असतानाच, १९९१ मध्ये त्यावेळेसचे अर्थमंत्री श्री मनमोहनसिंग यांनी जागतिकीकरणाचे दरवाजे खुले केले आणि त्यानंतर मग विप्रोने मागे वळून पाहिलं नाही. तेव्हपासून ते आजपर्यंत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बिझिनेस च्या लाटेवर आरूढ होताना भारतातल्या पहिल्या तीन कंपनीमध्ये विप्रोचा समावेश होतो.

या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट लक्षणीय आहे. ती म्हणजे, तंत्रज्ञानाच्या जोरावर विप्रोने सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये मानाचं स्थान मिळवलं तरी प्रेमजी यांनी त्यांच्या पारंपरिक उद्योगाला जिवंत ठेवलं. ते उद्योग बंद वा विकले नाहीत. सनफ्लॉवर हा त्यांनी ब्रँड विकला पण अमळनेर ची फॅक्टरी आजही कार्यरत आहे. तीच कथा हायड्रॉलिक्स वा हेल्थकेअर प्रॉडक्टसची. हायड्रॉलिक्स हा बिझिनेस हा कष्टाचा आणि आयटी सापेक्ष कमी नफ्याचा. पण अझीम प्रेमजी यांनी त्या उद्योगावर आयटी इतकं लक्ष ठेवलं आणि त्यांनाही जागतिक पातळीवर मानाचं स्थान मिळवलं.

आज विप्रो ग्रुपचा वार्षिक टर्नओव्हर हा रु ५०००० कोटीच्या आसपास आहे. स्वतः अझीम प्रेमजी हे भारतातील श्रीमंतांच्या यादीत क्रमांक दोन वर आहेत आणि जगातल्या श्रीमंतांच्या यादीत हे पहिल्या पन्नासात असावेत. पण इतकं असूनही त्यांचा साधेपणा हा स्तिमित करून जातो. जगातली कोणतीही कार पदरी बाळगू शकणाऱ्या अझीम प्रेमजी सरांकडे टोयोटा करोला गाडी आहे. जवळच्या लोकांनी खूप आग्रह केला तेव्हा त्यांनी मर्क घेतली ती पण सेकंड हॅन्ड. गंमत म्हणजे मर्सिडीझ चा प्रथम मालक हा विप्रोमधेच काम करत होता. स्वतःचं विमान घेऊ शकणारा हा उद्योजक इकॉनॉमी मध्ये प्रवास करतो. इतकंच काय पण आजही अझीम सर पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा टॅक्सी ने प्रवास करतात.

आणि मला सगळ्यात जास्त त्यांचं व्यक्तिमत्व भावतं ते त्यांच्या समाजपयोगी कामासाठी पैसा उभा केल्याबद्दल. भारतामधील उद्योजकांमध्ये चॅरिटीसाठी उदासीनता दिसते. त्या पार्श्वभूमीवर अझीम प्रेमजी यांचं विप्रो फाउंडेशन /अझीम प्रेमजी फाऊंडेशन उठून दिसतं. अझीम प्रेमजी सरांनी या फाऊंडेशनला थोडेथोडके नाही, पण तब्बल रु ५०००० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. श्री वॉरन बफे आणि बिल गेट्स यांनी "The Giving Pledge" या राबवलेल्या मोहिमेला पूर्ण पाठिंबा देणारे अझीम प्रेमजी पहिले भारतीय. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात विप्रो फाऊंडेशन येणाऱ्या वर्षात भरीव कामगिरी करेल याबाबत काही शंका नाही. आपल्या संपत्तीचा वापर हा गरीब लोकांचं आयुष्य सुखकर व्हावं, यासाठी ते नेहमी आग्रही असतात.

अशा विविध आयाम असणाऱ्या व्यक्तिमत्वाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०११ साली भारत सरकारने अत्यंत प्रतिष्ठेचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवलं.

तब्बल ५१ वर्षे विप्रो ग्रुपची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या अझीम प्रेमजी यांनी निवृत्त व्हायचं ठरवलं आहे. त्याच्या द्रष्ठेपणाला, उद्योजकतेला आणि कल्पकतेला मानाचा मुजरा आणि यापुढील आयुष्य हे सुखकर असो या शुभेच्छा. 

Wednesday, 22 May 2019

लाल्या

लाल्या,

बास! आता पुरे झालं. नियतीने तुझ्या आयुष्याचा खेळ केलाय, पण त्याला तू पुरून उरलास. आता याच्या पुढचं आयुष्य तू मनमुराद जग. जगरहाटी च्या मागे फरफट पुरे झाली.

स्वतःची तब्येत सांभाळ. दणदणीत बँक बॅलन्स कर. ज्या कौटुंबिक इको सिस्टमने तुझी वाताहत केली त्या सिस्टम ला आता निरोप दे.

पारमार्थिक होण्यासाठी आधी स्वार्थी होणं गरजेचं आहे. ते तू होच. विमानात सुद्धा हवेचा दाब कमी झाला तर दुसऱ्याला मास्क लावायच्या आधी स्वतःला मास्क लावायला सांगतात. त्यामुळे दुसर्यांना मदत करण्याआधी स्वतःला आर्थिकदृष्ट्या बलशाली बनव.

तुझ्या आयुष्याच्या जात्याचा एक दगड आहे कर्मकांड आणि एक दगड आहे स्वार्थी मानसिकतेचा. खुट्टा फिरवतोय तो विधाता अन भरडला जातोय तो तू. आता बास! तो खुट्टा घे तुझ्या हातात. त्या कर्मकांड वाल्या दगडाला बनव तुझं आर्थिक स्थैर्य अन स्वार्थी सिस्टम ला बनव तुझं मानसिक स्थैर्य. अन ते जातं फिरवल्यावर एक कसदार दळण येऊ दे.

तुझ्या संसाराच्या सहाणेवर दुःख उगाळतात तुझीच लोक. आणि ज्यांनी तुला सहारा द्यावा तेच फासतात दुःखाचे लेप तुझ्या अंगभर.

त्या नियंत्याने तर अन्याय केलाच तुझ्यावर पण जित्याजागत्या जवळच्या लोकांनी पण मानसिकदृष्ट्या तुला लुटलं. उंटावरून शेळ्या हाकत मानभावीपणे सल्ले द्यायला फार अक्कल लागत नाही. समारंभपूर्वक जेवण झाल्यावर भरल्या पोटी पान खाऊन मारलेल्या पिचकारी इतकीच त्यांची किंमत.

तू ही तितक्या तटस्थपणे त्याकडे बघ.

आणि हो आता भिऊ नकोस, कारण तुझ्या पाठीशी कुणीच नाही आहे.

माझं म्हणशील तर मी तुझ्या पाठीशी नाही तर खांद्याला खांदा लावून उभा आहे.

तू फक्त आवाज दे आणि हा तुझा मित्र हजर होईल.

अरे, आयुष्यात अवघड प्रश्न समोर आले आणि हतबुद्ध वाटलं तर लाल्या, मी तुला डोळ्यासमोर आणतो. इतकं तर मला तुझ्यासाठी करावंच लागेल मित्रा.

तुझ्या गावी आलो की भेटूच.


Wednesday, 15 May 2019

याला तयारी पाहिजे

गिरीश कुलकर्णीना मी आश्वस्त केलं की मी त्याची पूर्ण काळजी घेईन. माझ्या कंपनीत आहे तो, काळजी करू नका.

तो मला म्हणाला, मला इंजिनियरिंग करायचं आहे. मी त्याची पटकन ऍडमिशन घेऊन टाकली. मग कौन्सिलर म्हणाला दोन्ही एकत्र नाही करू शकणार. एकतर कॉलेज नाहीतर काम. त्याने काम निवडलं.

पोरगं हुशार, मेहनती. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊ लागला. मलाही स्वतःबद्दल बरं वाटू लागलं.

एकदा आजारी पडला, वजन कमी होऊ लागलं. सरळ घरी घेऊन आलो. तब्येत चांगली झाली असं वाटल्यावर चार दिवसांनी रूमवर जाऊ दिलं.

मी अशात निवांत झालो. आयुष्य माझ्यासमोर घडत होतं.

काही दिवसांपूर्वी आला. म्हणाला बीई चे ऍडमिशनचे पैसे परत द्यायचे आहेत. मी म्हणालो, मी विसरलो ते. एखाद्या संस्थेला दे. ठीक आहे म्हणाला.

एक महिन्यापूर्वी त्याने राजीनामा दिला. मित्र म्हणवणाऱ्या एका स्पर्धक कंपनीने त्याला उचलला. आणखी दोघे घेतले. त्यांचं ठीक आहे, पण हा पोरगा पण.....धक्का बसला.

राम कडे गेलो. कैफियत मांडली. निर्विकार चेहऱ्याने मला राम ने एक कागद सरकवला. विंदांची गझल होती. 

अग्नीमुळे प्रगती घडे,
हे अन्नही त्याने शिजे,
चटका बसे केव्हातरी,
त्याला तयारी पाहिजे

पुष्पे, फळे अन सावली,
वृक्षातळी या गावली
काटा अभवित टोचता,
त्याला तयारी पाहिजे

आपुल्या चुकांना आपण
इतरांस त्या दिसती परि
त्याचीच चर्चा व्हायची,
त्याला तयारी पाहिजे

केले कुणास्तव ते किती,
हे कधी मोजू नये;
होणार त्याची विस्मृती;
त्याला तयारी पाहिजे.

डोक्यावरी जे घेऊनी
आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;
त्याला तयारी पाहिजे.

सत्यास साक्षी ठेवुनी
वागेल तो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही!
त्याला तयारी पाहिजे.

पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही ते असो-
आता टळेना पोहणे;
त्याला तयारी पाहिजे

ही कवितेची ताकद. चार तास भडभड बोलून जे सांगता येईल ते काही ओळीत. विंदा तुम्ही कालातीत आहात. निरोपाचे दोन शब्द ही घ्यायची तसदी पोराने घेतली नाही हे विसरलोय आणि कामाला निघालोय. 

Tuesday, 14 May 2019

अमेरिका

अमेरिकन जेफ हा जर इथल्या समाजाचा प्रतिनिधी आहे असं मानलं तर हा देश जगाच्या इतक्या पुढं का आहे याचा मी विचार केला. काही जाणवलेल्या गोष्टी.

१. इनोव्हेशन: मला असं वाटतं की इनोव्हेशन हा अमेरिकेचा, खरंतर प्रत्येक प्रगत देशाचा आत्मा आहे. याआधी प्रत्येक ट्रिप मध्ये मी हॉटेल मध्ये राहिलो. मात्र डिसेंबर १८ मध्ये मी अभिजित बिडकर, शिल्पा केळकर, कॅनडात माझी बहिण स्वाती आणि या ट्रिप मध्ये जेफच्या घरी राहिलो. नाही म्हणायला मध्ये एकदा डेट्रॉईट मध्ये पल्लवी सप्रे कडे गेलेलो, पण ते दोन एक तासासाठी. या सर्व वास्तव्यात मला सगळ्यात जास्त काही भावलं असेल तर जगणं सुसह्य करणाऱ्या अत्यंत नाविन्यपूर्ण आणि कल्पक गोष्टी. वाईन बॉटल चा कोर्क ओपनर, टिन डब्याचं झाकण उघडण्यासाठी चकतीची सूरी, वेगवेगळ्या पदार्थासाठी अलग चाकू, छोटी गारबेज कॉम्पॅक्ट करणारी मशीन, ब्लेड विरहित फॅन्स ही रोजच्या जगण्यातील. बाकी टेस्ला, ऍपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, थ्री एम या जगातल्या सर्वोत्कृष्ट इनोव्हेटिव्ह कंपन्या इथल्याच. थ्री एम ने तर अक्षरशः हजारो इनोव्हेटिव्ह प्रोडक्टस अमेरिकेला अन पर्यायाने जगाला दिले. पोस्ट इट, स्क्रोच बाईट, यु क्लिप ही पटकन पाठवलेली.

मी जेव्हा इथल्या सेटको मध्ये फिरतो तेव्हा अशीच कल्पक इक्विपमेंट बघायला मिळतात. अन त्यामुळेच या लोकांची उत्पादकता खूप जास्त आहे. उदा: इथे महिन्याला १२० स्पिंडल रिपेयर करण्यासाठी १२ जण आहेत तर भारतात तीस जण.

२. सर्वोत्कृष्ट गुणवत्ता: प्रत्येक गोष्ट सर्वोत्कृष्ट. अगदी फूड प्रोडक्ट पासून ते युटिलिटी गोष्टी ते इंडस्ट्रीयल गुडस यामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वोत्कृष्टतेचा ध्यास हा जागोजागी दिसून येतो.  मी यावेळेस जेफच्या घरात अनेक गोष्टी हाताळल्या. उदा: वॉटर बोट, फिशिंग बोट, कयाकिंग बोट, त्यासाठीचा डॉक, ग्रील, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिक कुकिंग, वॉर्ड रोब, खिडक्याचे ब्लाइंडज, दरवाजे. सगळीकडे गुणवत्ता एक नंबर. आपल्याकडे या गोष्टी उपलब्ध आहेत, फक्त त्याची प्राईस मोजायची तयारी नाही. सेकंड क्वालिटी मालाला आपण कमी किमतीत घेतो, स्वीकारतो आणि अडकतो. चलता है, हे ग्राहक म्हणून आपण स्वीकारलं आहे म्हणून उत्पादक पण तसं वागतात.

थोडक्यात सर्वोत्कृष्ट गुणवत्ता हा माईंड सेट आहे.

३. स्वयंशिस्त आणि स्वच्छता: कुठंही दिखावा नाही पण ही या लोकांची जीवनप्रणाली आहे. अगदी सांगायचं तर जेवण बनवल्यावर सर्व गोष्टी घासून पुसून जागच्या जागी ठेवणं, सर्व बाथरूम मध्ये नॅपकिन, टॉवेल, लिक्विड सोप हे जागच्या जागी असणे, कचऱ्याची तीन बिन्स मध्ये इमानेइतबारे विभागणी करणे, एक सुका कचरा, दुसरा रिसायकल कचरा आणि तिसरा कंपोस्टिंग. वेळेच्या शिस्ती बद्दल तर मला बोलायचा अधिकारच नाही. अक्षरशः दोन एक वर्षांपूर्वी पर्यंत मला लाज वाटावी इतका नालायक होतो वेळ पाळण्याबद्दल.

इतक्यांदा कार पार्क करताना मी बघितलं. पण प्रत्येकजण, प्रत्येकवेळी अँड आय मीन इट, पार्किंग रेषेला समांतर.

अख्खी बोट पुसली आम्ही रविवारी दुपारी. पंधरा वर्षे झालीत बोटीला पण आजही नवी कोरी दिसते ती. मी आणि यश राहिलो ती रूम आम्ही आवरून ठेवली पण मला खात्री आहे, उद्या अटलांटा हुन जेफ सिनसिनाटी ला जाताना वाट वाकडी करून टेनेसी ला जाणार, ती रूम आवरणार. आणि हा सेटको चा प्रेसिडेंट आहे. मुख्य म्हणजे या गोष्टींचं अवडंबर नाही.

या चार मूलभूत गोष्टी अमेरिकन समाजात ठासून भरलेल्या आहेत आणि त्यामुळे ही खऱ्या अर्थाने महासत्ता आहे.

मला न आवडणाऱ्या दोन गोष्टी:

१. ऊर्जेचा प्रचंड अपव्यय: या बाबतीत हा देश विचार का करत नाही हा मला नेहमी प्रश्न पडतो. युरोप या बाबतीत अमेरिकेच्या कैक पटीने सजग आहे. रात्रंदिवस इथले लाईट ढनढन जळत असतात. याबाबतीत हे इतके मागासले आहेत की रूम मध्ये लाईट स्विच ऑफ करणारी रूम की पण नसते. कुणीही नसताना टीव्ही, फॅन, एसी कायम चालू असतात. ऊर्जा वाचवणारी मास ट्रान्सपोर्ट सिस्टम या देशाला माहीत नाही. सगळे जण कार घेऊन फिरत असतात. अन ते ही अगडबंब कार्स. कमीतकमी २ लि ते ६ लि इंजिन पर्यंत.

२. खाण्याचे दणदणीत पोर्शन: कुठल्याही हॉटेल मध्ये गेलो की मला अक्षरशः भीती वाटते, दणकन किती खायला देतील ते. बरेच जण तितकं संपवतात अन काही जण टाकून देतात.

असो. माझ्या मध्यमवर्गीय समाजवादी मनाला आणि भांडवलवादी मेंदूला जाणवलेल्या या गोष्टी.

वयाची पन्नाशी पालटली पण एकदा आपण आयुष्यभरासाठी विद्यार्थी आहे असं ठरवलं की स्वतःमध्ये बदल घडवणाऱ्या गोष्टी शिकता येतात हेच प्रवासाचं फलित आहे असं मला नेहमीच वाटतं.

Wednesday, 8 May 2019

डोनाल्ड

सिनसिनाटी एअरपोर्ट पासून माझं हॉटेल साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. रस्त्यात एक अपघात झाला होता. त्यामुळे मला जवळपास एक तास लागला. उबर टॅक्सी केली होती. डोनाल्ड नाव होतं ड्रायव्हरचं. साधारण पंचावन्न वगैरे वय असावं.

डोनाल्ड गप्पा मारत होता. तो ज्या पद्धतीने माझ्याशी बोलत होता त्याने मी आश्चर्यचकित झालो होतो. जगातल्या घडामोडीबद्दल त्याला ज्ञान होतं. भारताबद्दल त्याला माहिती होती. मी डोनाल्डला विचारलं "उबर टॅक्सी चा बिझिनेस करण्याआधी, तू काय करत होता?".

त्याने जे उत्तर दिलं, ते ऐकून मी सर्द झालो. तो म्हणाला "आयएनजी मध्ये मी फायनान्स चा व्हाईस प्रेसिडेंट होतो. आणि त्यानंतर अकसा मध्ये." मी आपल्या मराठी मानसिकतेला जागून त्याला विचारलं "इतक्या चांगल्या पगाराची नोकरी तू का सोडली?".

डोनाल्ड म्हणाला "भविष्यात मला जितके पैसे लागतील ते माझे जमा झाले होते. मला फक्त आजचा खर्च भागवायची गरज होती. माझ्या फायनान्स जॉब मध्ये टेन्शन होतं आणि तितक्या पैशाची गरज नव्हती. उबर बिझिनेस हा परफेक्ट ऑप्शन होता. मला पैसे मिळतात, अनेक ठिकाणी फिरायला मिळतं आणि तुझ्यासारख्या लोकांना भेटता येतं. मला नातू आहेत. फॅमिली साठी मला वेळ देता येतो."

मला हेवा वाटला त्याचा. एखाद्याचं सरळ कौतुक करायचं नाही हा माझा बाणा. त्याला जागत मी म्हणालो "आजकालच्या जगात उबर, एअर बीएनबी सारख्या खूप संधी मिळतात. त्यामुळे असे निर्णय घेता येतात......."

मला मध्ये थांबवत डोनाल्ड म्हणाला "अशा संधी आज असतात असं नाही. माझे वडील एमआयटी चे सिव्हिल इंजिनियर होते. स्वतःचा बिझिनेस होता त्यांचा. पण १९८५ साली त्यांनी सिव्हिल बिझिनेस बंद केला अन कारण हेच. त्यांच्या भविष्यासाठी लागतील तितके पैसे जमा झाले होते. पुढचे पंचवीस वर्षे त्यांनी फूड ट्रक चालवला. आज ते ८७ वर्षाचे आहेत. आणि लाईफ एन्जॉय करत आहेत."

मी विचारलं "तुझ्या मुलांसाठी काही एक्स्ट्रा पैसे कमवावे असं तुला वाटत नाही का?"

तर तो पटकन म्हणाला "नाही! मला त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्यांच्या साठी पैसे कमवून मला त्यांच्या पंखातील बळ कमी करायचं नाही. I strongly believe that giving money more than children deserve  is biggest de-motivator for them."

गप्पा मारताना हॉटेल आलं.

आयुष्य शिकवणारे मास्तर कुणाच्या रूपात कुठं भेटतील हे सांगता येत नाही.  

Sunday, 28 April 2019

Goli Vada Pav

It may happen that you might feel depressed at times for different reasons and so I was. 

And then I heard him. He said 'Entrepreneurship is celebration." He also said "Don't allow energy and enthusiasm diminish in the journey from dream to destination."

He left the established business of corporate financing. For what? To venture in to a very low cost product 'Vada Pav". A journey started from the small shop at Kalyan Station is reached to 300 Vada Pav outlets in 100 cities of 20 states. And still growing. He dreams even today. 

It was tough journey. It had all odds like finance, local competition, apartheid-ism that how one south Indian can run Vada Pav business in Mumbai amidst clouts of two local political parties. From such mess, he got in supply chain which is supplying to McDonald,  low cost machinery, out of box marketing campaign etc. Darling of Mumbai street food, Vada Pav has crossed borders of not only city but state and today it is filling up hunger nationwide, fetching investment from international funding. Astonishing!

Meet Mr Venkatesh Ayyar. Founder of Goli Vada Pav. Core entrepreneur, excellent orator  and whose feet are firm on ground even though sky is only limit for him. A very modest and humble man. I heard him for the second time. No wonder, both times he received standing ovation. 

Depression in mind is shown dustbin. That was the power of his talk. 

Take a bow, Mr Venkatesh Ayyar

Tuesday, 16 April 2019

गोली वडा पाव

गेले काही दिवस लो फील होत होतं. अगदी वाद नाही पण अमेरिकन बोर्ड मेंबर्स चे काही मुद्दे पटत नव्हते. एक चांगल्या माणसाने बारा वर्षानंतर कंपनीला बाय केलं. काही कास्टमर्स कामाच्या पद्धतीवरून नाराज झाले.एकंदरीत झोल झाला होता रात्रीचा. झोपेचं पूर्ण खोबरं.

आणि मग काल त्यांना ऐकलं, याची देही याची डोळा. ते म्हणाले "Entrepreneurship is celebration" ते असंही म्हणाले "ड्रीम आणि डेस्टिनेशन च्या मध्ये ऊर्जा आणि उत्साह नाही असं कधीही होऊ देऊ नका"

कॉर्पोरेट फायनान्स ची दणदणीत पगाराची नोकरी सोडून त्यांनी चालू केलं, एक अत्यंत लो कोस्ट खाण्याचा पदार्थ, वडा पाव. कल्याण रेल्वे स्टेशनच्या समोर चालू केलेल्या एका छोट्या दुकानापासून चालू झालेला प्रवास आज वीस राज्यातील शंभर गावांच्या तीनशे स्टोअर्स पर्यंत येऊन पोहोचला आहे, पण स्थिरावला नाही आहे. स्वप्नं आजही पाहतात ते.

प्रवास खडतर होता. पैसे, लोकल स्पर्धा, एका दाक्षिणात्य माणसाने वडा पाव विकण्यासाठी वापर केलेला आरे डेअरी बूथ आणि त्यावरून दोन राजकीय पक्षात झालेल्या फुटीवरून झालेली परवड. इथपासून ते मॅक्डोनाल्ड चे सप्लायर हीच माझी सप्लाय चेन, लो कॉस्ट मशिनरी, हटके मार्केटिंग कॅम्पेन, मुंबई ची जान असणारा वडा पाव वेगळ्या रेसिपीच्या मदतीने पूर्ण भारतात क्षुधा शमवतो आणि दहा वर्षानंतर च्या अथक प्रयत्नानंतर इंटरनॅशनल इन्व्हेस्टर यांच्या धंद्याला बॅक अप देईपर्यंतचा प्रवास ऐकताना विस्मयचकित होऊन गेलो.

वेंकटेश अय्यर, गोली वडा पाव चे प्रवर्तक, एक धडाडीचे उद्योजक, उत्कृष्ट वक्ता आणि आकाशाला गवसणी घातल्यावर सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवले आहेत असा मॉडेस्ट, हंबल समाजवादी माणूस. काल त्यांना दुसऱ्यांदा ऐकलं. पाहिल्यावेळी ऐकलं तेव्हाही रोमांचित झालो होतो, कालही झालो. थरमॅक्सच्या अनु आगा एकदा म्हणाल्या होत्या की कुणाचं बोलणं ऐकल्यावर स्टँडिंग ओव्हेशन द्या हे सांगायला लागलं नाही पाहिजे. पहिल्यावेळी ऐकलं तेव्हा साडेतीनशे आणि काल दीडशे लोक कधी आपल्या पायावर उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट करत राहिले हे कळलं ही नाही.

आज सकाळी उठलोय. मनावरचं मळभ पूर्ण दूर झालं आहे. नैराश्य कालच्या टाळ्यांमध्ये विरून गेलं आहे.

एखाद्या आर्थिक वर्षाची सुरुवात इतक्या जोरकस पद्धतीने झालेली माझ्या आठवणीत नाही.

वेंकटेश सर, टेक अ बो!

Tuesday, 9 April 2019

नाझीमा

नाझीमा चा फोन आलेला जॉब साठी. तिने फोन वर सांगितलं की चार पाच वर्षांपूर्वी तिचा इंटरव्ह्यू झालेला आमच्या कंपनीत. ती चेक करत होती की परत काही संधी आहे का ते! सुदैवाने माझ्याकडे नाझीमाच्या प्रोफाईलची एक संधी तयार झाली होती. मी नाझिमा ला इंटरव्ह्यू साठी बोलावलं. छान डिस्कशन झाले.

इंटरव्ह्यू च्या शेवटी मी तिला विचारलं "आपण चार वर्षांपूर्वी बोललो होतो. काही कारणास्तव मी तुला जॉब नाही देऊ शकलो. आजही सगळ्या गोष्टी जुळून येतील की नाही शंका आहे. पण मला आश्चर्य याचं वाटतं आहे की चार वर्षे तू आमच्या कंपनीला लक्षात का म्हणून ठेवलं?"

चेहऱ्यावर स्माईल देत नाझीमाने जे सांगितलं त्याने मी चकित झालो. ती म्हणाली "मी आतापर्यंत ६-७ इंटरव्ह्यू दिले. पण तुमची अशी एकमेव कंपनी आहे जिथे मला माझं सिलेक्शन झालं नाही याची मेल आली. आणि नुसतं तेच नाही, तर माझं सिलेक्शन का नाही झालं याची व्यवस्थित कारणं दिली होती. तुमच्या एच आर डिपार्टमेंट ची ही पद्धत मला खूप भावली. तेव्हाच माझ्या मनात फिक्स झालं की जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा मला सेटकोत काम करायला आवडेल."

इथं मला लिंक्ड इन सारख्या प्रोफेशनल मीडिया चे आभार मानावेसे वाटतात. कारण याच ठिकाणी इंटरव्ह्यू प्रोसेस तर सांगितली जातेच पण इंटरव्ह्यू नंतर जॉब इच्छुकांशी कसं वागायला पाहिजे या बद्दलही मार्गदर्शन केलं जातं. मला आमचा एच आर ऑफिसर निलेश साळुंकेचं वागणं अभिनंदनीय वाटलं ज्याने ही प्रोसेस लक्षात ठेवून तिची अंमलबजावणी केली.

एखाद्याशी प्रोफेशनल रिलेशन्स प्रस्थापित करायचे असतील तर आपण व्यवस्थित वागतोच. पण जर तसं होण्याची शक्यता नसताना तुम्ही कसे वागता यावरही तुमची पत बऱ्याचदा ठरते. 

Thursday, 21 March 2019

जिम

सेल्स आणि मार्केटिंगच्या पोरांनी जिम जरूर लावावी. सेल्स कॉल साठी बाहेरगावी गेल्यावर तुम्ही अशा हॉटेलमध्ये राहण्याची शक्यता असते जिथे जिम असते. तुम्हाला जिमचा शौक जास्तच लागला तर तुम्ही हॉटेलच्या जिम मध्ये पण जाण्याची शक्यता असते.

सकाळची सहाची प्रसन्न वेळ आणि तुम्ही एकटे जिम मध्ये आहात. तिथे मग एखादी व्यक्ती येण्याची शक्यता असते. ट्रेड मिल चालू कशी करावी किंवा लेग प्रेस मारताना बॅक सपोर्ट ऍडजस्ट कसा करावा याची त्या व्यक्तीला माहिती नसण्याची शक्यता असते. मग ती व्यक्ती तुम्हाला मदत मागू शकते.

तुम्ही रेग्युलर जिम वाले असाल तर तुम्ही आत्मविश्वासाने इक्विपमेंट चालू करून देऊ शकता. ती व्यक्ती तुमच्यावर खुश होण्याची शक्यता असते. तुम्हा दोघांमधील संवाद फोन नंबर एक्स्चेंज होण्यापर्यंत जाऊ शकतो.

A lot can happen in Gym.

ती व्यक्ती त्या हॉटेल मधेच राहत असल्यामुळे कधी ब्रेकफास्ट टेबल वर तर कधी डिनर ला तुमची भेट होण्याची शक्यता असते.

तर शक्याशक्यतेचा विचार करता ती व्यक्ती म्हणजे तो एक महत्वाचा  ग्राहक,  असू शकतो. आणि त्या संवादाद्वारे एक महत्वाचा सेल्स लीड मिळू शकतो.

बाकी कुठल्याही शक्यतापेक्षा ही शक्यता जास्त आहे असं मला वाटतं.

तुम्हाला काय वाटलं?

अंधश्रद्धा

माझ्या एक ओळखीचे काका आहेत. त्यांनी नोकरी करत असताना मजबूत पैसा खाल्ला. पुढं एका पोराला इलेक्ट्रॉनिक आयटम ची शो रूम काढून दिली. ते पोरगं पण कचकावून बिझिनेस करतंय. दुसऱ्या पोराला कन्स्ट्रक्शन ची लाईन पकडून दिली. सध्या जरी शांत असेल तरी मधल्या तेजीत धुवाधार पैसे कमावले आहेत. पोरीचं लग्न झालेत आणि ती अमेरिकेत आहे.

रिटायर झाल्यावर काकांनी बीएमडब्ल्यू घेतली. य वेळा अमेरिकेला जाऊन आले. सध्या दररोज टीचर्स किंवा त्या पेक्षा भारी नाईंटी मारतात. चकना म्हणून रोस्टेड काजू अन पोंफ्रेट घेतात. एकदम तब्येतीत चालू आहे.

ते पैसे खात असताना आम्ही खूप म्हणायचो, यांना झोप कशी येत असेल. पुढं जाऊन बीपीचा त्रास होईल. ७५ वय झालंय, म्हातारा तुकतुकीत आहे. देवभोळ्या असणाऱ्या काकू पाच वर्षांपूर्वी देवाघरी गेल्या आहेत.

हे एक उदाहरण म्हणून दिलं. जगात असे करोडो लोक आहेत की ज्यांनी खून, चोऱ्या माऱ्या, लांडयालबाड्या, भ्रष्टाचार करून सुद्धा ते एक नॉर्मल आयुष्य जगत आहेत.

सांगायचा मुद्दा हा की असं वागणार्यांना आयुष्यात त्रास होईल वगैरे अंधश्रद्धा आहेत. तसं असतं तर दाऊद किंवा मेमन तिकडं कराचीत आलिशान घरात लोळत पडले नसते.

आपण जे जगतो ते बरोबर की चूक याबद्दल थिंकिंग प्रोसेस क्लिअर असेल तर डोक्याला शॉट लागत नाही.

अनपेक्षित प्रतिसाद

कालची पोस्ट टाकल्यावर तिला अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. काहींना असं वाटलं की मंडलीकची सेटको वगैरे अफवा आहे. खरंतर  धाकदपटशा करून खंडणी गोळा करण्याचा त्याचा धंदा आहे. असो.

तसल्या वागण्याचं मी समर्थन करतोय असंही काही जणांना वाटलं. हा डिस्क्लेमर टाकायला विसरलो. तो टाकावा म्हणेपर्यंत वेळ निघून गेली होती.

खरंतर सुख आणि समाधान या वेगळ्या गोष्टी आहेत. जे आपल्या कडे नाही आहे ते मिळवणं म्हणजे सुख, जे आपल्याकडे आहे त्यात आनंदी असणं म्हणजे समाधान. बऱ्याचदा लोक समाधानाला सुख समजतात आणि तिथं गल्लत होते. आणि ते समाधानी होण्यासाठी सुखाच्या मागे धावतात. ते धावणं जे आहे त्याला एक छान शब्द वाचला "हेडोनिक ट्रेडमिल". म्हणजे धावत असलो तरी आपण तिथेच असतो. त्या सुखाचं आयुष्यही अगदी कमी. या सिद्धांताला गंडवायचं असेल तर काही युक्त्या आहेत. त्यात सगळ्यात पहिली म्हणजे जितके पैसे पाहिजेत, तितकेच कमावणे. याचा अर्थ रिटायर होणे किंवा पैसे न कमावणे असा नाही तर एका विशिष्ट मर्यादेनंतर पैसे कमावले तरी त्याचा आनंद वाटला नाही पाहिजे. अवघड आहे ते, पण ते जमू शकतं हे स्वानुभवातून सांगू शकतो. अजून चार युक्त्या आहेत पण पोस्ट खूप लांबेल, त्यावर नंतर कधी तरी.

त्या पोस्टमध्ये आणि कॉमेंट मध्ये बरेच कंगोरे आहेत असं मला आज परत ते सगळं वाचताना जाणवलं. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे सापेक्षता. मला ते काका सुखी वाटले पण ते समाधानी आहेत का हे माहीत नाही कारण सुख हे जरी मूर्त असलं तरी समाधान हे अमूर्त आहे.

अजून एक. भौतिक गोष्टींवर समाधानी जितक्या लवकर होऊ तितकं चांगलं आणि अभौतिक गोष्टी, म्हणजे कामाची गुणवत्ता किंवा काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा यावर समाधानी नसणं हे पण चांगलंच.

असो. जास्त तारे तोडत नाही. दोनदा प्लास्टी झाल्यावर "मीच का" ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना माझ्या लक्षात आलं की आपणच निर्माण केलेल्या परिस्थितीला आपण कसे हाताळतो यावर सगळं अवलंबून आहे आणि म्हणून तो थॉट प्रोसेस चा मुद्दा.

बऱ्याच जणांनी लास्ट लाईन भारी अशी कॉमेंट केली. त्यावरून फक्त लास्ट लाईनच वाचली का, की वरचं सगळं बकवास मात्र शेवटचं वाक्य चांगलं असं काही होतं हे विचारण्याचा मोह टाळत नाही आणि अजून एका कन्फ्युजिंग पोस्टचा समारोप करतो. 

बोइंग

पुढील वीस वर्षांत भारताला २३०० लो कॉस्ट कॅरियर लागणार आहेत असा बोइंग चा अंदाज आहे. त्याची किंमत साधारण पणे ३२० बिलियन डॉलर्स होते.

२०१८ साली, भारतात दरमहा सरासरी एक कोटी लोकांनी विमानाने प्रवास केला.

भारतातील वाणिज्य विमानवाहतुकीने सलग ५१ महिने डबल डिजिट वृद्धी केली.

भारतीय अर्थव्यवस्था पुढील दोन दशकात ३.५ पट वाढून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे असा अंदाज आहे. याकाळात भारतातील एकूणच लोकांचा आर्थिक स्तर उंचावणार आणि त्यांना लो कॉस्ट कॅरियर तसेच लांब पल्ल्याच्या विमानाची गरज असणार असे निर्देश देण्यात आले आहेत.

जगातील एकूण विमानसंख्येच्या ५% ही भारतात असतील. आणि त्यामुळे ही इंडस्ट्री वेगाने वाढणार आहे. त्या अनुषंगाने येणारे जॉब्स, म्हणजे पायलट, एअर होस्टेस/होस्ट, मेंटेनन्स इंजिनियर, ग्राउंड स्टाफ यांची मोठ्या प्रमाणावर गरज लागणार आहे.

सदर माहिती कुठल्याही राजकीय पक्षांचा जाहीरनामा नसून बोइंग कंपनी तर्फे प्रसारित केली आहे. तेव्हा त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.

😊😊

काढता पाय

लिंक्ड इन वर एक पोस्ट होती. भारताच्या मार्केट कॅप ने जगात सातवा क्रमांक गाठला. जर्मनी ला मागे टाकले.

आता अशा बातम्या वाचून भारताबद्दल विनाकारण पोटशूळ उठणारे आंग्लेय मंडळी असतातच. तिथे एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली.

"देव असे न करो, पण भारत या भूमीवरून नाहीसा झाला तर कुठल्याही दुसऱ्या देशाचं काहीही बिघडणार नाही. जर्मनीबद्दल तसं म्हणता येणार नाही."

मी प्रतिवाद करत त्याला सांगितलं "त्या पोस्टमध्ये भारताची टिमकी वाजवायची असं काही नाही आहे. ती फक्त माहिती आहे. त्यामध्ये आम्ही भारतीय हे जर्मन पेक्षा भारी आहोत असा कुठेही अविर्भाव नाही आहे"

मग अजून एकाने भारतातल्या खराब प्रॉडक्ट क्वालिटीचा उल्लेख केला. महिंद्रा किंवा टाटा च्या गाड्या बेसिक सेफ्टी नॉर्मस् पूर्ण करू शकत नाही. (हे कुठून कळलं ते देव जाणे) बीएमडब्ल्यू किंवा मर्क बद्दल असं बोलू शकत नाही.

मी परत त्याला सांगितलं "पोस्ट आणि तुम्ही म्हणता ती कदाचित वस्तुस्थिती असेलही. आमच्या लोकसंख्येच्या हिशोबाने केवळ हे झालंही असेल. त्यामध्ये आमची प्रॉडक्ट क्वालिटी ग्रेट आहे हा दावा कुठंही नाही. इन फॅक्ट आमची सगळी इंजिनियरिंग इंडस्ट्री ही जर्मन इंडस्ट्री ला बेंचमार्क करते." वगैरे वगैरे.

असे वाद प्रतिवाद चालू असताना तिथे एक उत्तर भारतीय सद्गृहस्थ आले. आणि त्यांनी आंग्ल लोकांना उद्देशून कॉमेंट टाकली
"तुम्हाला माहिती आहे का भारताने जगाला शून्य दिलं......" आणि मग तेच पुढचं टेस्ट ट्यूब बेबी, प्लास्टिक सर्जरी वगैरे.

मी तिथून मग हळूच काढता पाय घेतला. 😊😊

फेसबुकवर ओळख

फेसबुकवर ओळख झालेल्या एक कुटुंबाकडे मला जेवायला बोलवलं होतं. माझ्याबरोबर त्यांनी अजून एका मित्राला जेवायला बोलावलं होतं जो त्या कुटुंबाला बरेच वर्षांपासून, म्हणजे वीस एक वर्षे, ओळखत होता.

नमस्कार झाले, ओळख झाली, गप्पा झाल्या, बिझिनेस काय वगैरे जाणून झालं.

जेवणाच्या टेबलवर तो कौटुंबिक मित्र म्हणाला "हे तुमचं सगळं छान आहे. फेसबुकवरील मैत्री, विचार जुळले वगैरे वगैरे. पण तरीही एक गोष्ट मला झेपत नाही ती अशी की मी या कुटुंबाबरोबर मैत्रीचं नातं फुलवण्यासाठी पंचवीस वर्षे व्यतीत केली आहेत. तुझी यांच्याशी मैत्री फारतर दोन वर्षांची. आणि तरीही आपण आज एका टेबल वर एकत्र जेवायला बसलो आहे, हे काही मला पटत नाही."

म्हणणं बिनतोड होतं.

माझा एक लहानपणीचा मित्र मला नेहमी तक्रारवजा म्हणतो "फेसबुकच्या लोकांना द्यायला तुला वेळ आहे आणि आम्हाला भेटत नाही."

हे बरोबर की नाही ते वेगळं पण प्रतिमा तशी तयार झाली आहे हे खरं. तसं बघायला गेलं तर गेल्या पाच वर्षात फार तर पन्नास एक वेळा, जास्तच वाटताहेत, फेसबुकच्या मित्रांना भेटलो असेल. पण त्या न्यूज फीड चा आवाका इतका मोठा आहे, आणि परत पोस्टवर होणारी चर्चा यामुळे पोस्टकर्ता कायम या गोतावळ्यात असतो असं वाटण्याची शक्यता आहे.

खरंतर काळाच्या कसोटीवर इथली मैत्री अजून सिद्ध व्हायची आहे. एखादी जाहिरात केल्यासारखे आपण, म्हणजे मी तरी, इथे व्यक्त होतो. त्यावरून कुणी इम्प्रेस होतं, कुणी हाडतुड करतं. प्रत्यक्षात मी किती चालू आहे, आक्रस्ताळा आहे हे इथं माहीत होण्याची सुतराम शक्यता नसेल याची मी पुरेपूर काळजी ब्रँड बनवताना घेतो. इथे आतापर्यंत मोजके लोक भेटले आहेत जे मला लॉंग टर्म मध्ये मित्र म्हणून स्वीकारतील. अन्यथा फेसबुकवरील मैत्री न्यूज फीड पुरती मर्यादित असून ती प्रत्यक्षात फुलवण्यासाठी, तो मित्र म्हणल्याप्रमाणे, खूप प्रयत्न करावे लागतील पण तितका वेळ देऊ शकणार नाही, हे माझं मत आहे.

😊😊

५७ सेकंदाचा व्हिडीओ.

मोजून ५७ सेकंदाचा व्हिडीओ.

चौथी पाचवीच्या मुलामुलींचा शाळेतला क्लास. जेवणाची सुट्टी होते. मुलं मुली वह्या पुस्तकं दप्तरात टाकतात आणि खाण्याचे डबे उघडतात.

तो ही डबा काढतो. थोडयाशा आशंकेनेच झाकण उघडतो. त्याच्या मनातील भीती जी चेहऱ्यावर दिसते तीच खरी ठरते.

डबा ठक्क रिकामा असतो.

गरिबीने दिलेला चटका त्याच्या बरोबर आपल्यालाही बसतो.

क्लास टीचर ला सांगून तो एवढासा जीव वर्गाबाहेर जातो. तोंडात आलेलं पाणी बाहेर थुंकून टाकतो. थोड्यावेळ वर्गाबाहेर टाईमपास करत, बाकीच्यांचं खाऊन झालं असेल या बेताने तो परत वर्गात येतो.

अत्यंत निराश मनाने त्याचा डब्बा परत स्कुल बॅग मध्ये टाकण्यासाठी उचलतो.

त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य. डबा थोडासा जड लागतो. विस्मयचकित भावनेने तो हळूच झाकण उघडतो तर डबा काही खाद्य पदार्थांनी पूर्ण भरला असतो.

तो आजूबाजूला पाहतो. सगळी मुलं मुली आपापल्या जगात मश्गुल असतात. काही गालात हसतात पण डबा कुणी भरला हे त्याला कळू न देण्यात ते यशस्वी होतात.

आत्यंतिक आनंदाने तो पहिला घास घेतो.

आणि आपल्या धूसर डोळ्याला स्क्रीनवर मेसेज दिसतो.

We can not help everyone, but everyone can help someone.

कुणीतरी म्हणून गेलं आहे

"भले तुम्ही मेंदूने कॅपिटलिस्ट असा, नव्हे व्हाच, पण हृदयात समाजवाद जोपासा आणि हाताला साम्यवाद शिकवा. There is possibility that this world may be livable and lovable."

(कुणीतरी म्हंटलं असं लिहिलं की लोक सिरियसली घेतात, आदरवाईज हे वाक्य माझंच आहे 😊)

ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी

एअरपोर्टवर ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी नावाचं पुस्तक वाचत बसलो होतो. बिझिनेस करताना कॉम्पिटिशन ला तोंड देताना काय करायला पाहिजे, आपल्या प्रॉडक्ट च्या प्राईस वर नव्हे तर व्हॅल्यू वर लक्ष केंद्रित करून, ती वाढवून स्वतःला वेगळं कसं प्रस्थापित करायचं याचं सुंदर स्पष्टीकरण पुस्तकात दिलं आहे. थोडक्यात स्वतःची एक मार्केट स्पेस तयार करून तिथे असलेल्या भाऊगर्दीपासून वेगळं कसं ठेवायचं याबद्दल युक्तीच्या चार गोष्टी त्यात आहेत.

बोर्डिंगची घोषणा झाली अन मी विमानाकडे नेणाऱ्या बसमध्ये शिरलो. या बसच्या मधल्या भागात मोकळी जागा असते. तिथे एकमेकांना रेटारेटी करत खूप लोक दाटीवाटीने उभे होते. माझी नजर बसच्या मागच्या बाजूला गेली तर तिथे अमाप जागा होती. सीटची मागील रांग तर पूर्ण रिकामी होती.

मी त्या गर्दीतून वाट काढत बसच्या मागच्या बाजूला गेलो. त्या मागील सीटच्या रांगेत मी एकटाच बसलो होतो. मी इकडे एकटा बसलो असताना समोर मधे उभे असलेले लोक मात्र श्वास पण धड घेऊ शकत नव्हते.

एखादं मॅनेजमेंटचं पुस्तक वाचावं आणि त्यात लिहिलेल्या गोष्टीचा अनुभव इतक्या पटकन आपल्याला यावा असं या आधी क्वचितच घडलं होतं.

ग्रोथ राम 21

"मग आता काय करायचं ठरवलं आहेस?"

रामने नोकरीचा राजीनामा दिल्यावर मी त्याला विचारलं.

"बिझिनेस" राम म्हणाला.

मी विचारलं "पण इतकी चांगली नोकरी का सोडलीस तू?" उत्तरादाखल राम फक्त हसला.

"तुझी ग्रोथ झाली नाही का?" मी विचारलं.

राम परत हसला.

"नुसतं गालातल्या गालात हसतोस, म्हणजे नक्कीच तुझी ग्रोथ झाली नसेल, म्हणून तू जॉब सोडलास" मी पिच्छा पुरवला.

माझ्याकडे राम ने खूप आश्वासक नजरेने पाहिलं अन म्हणाला

"अरे, ज्या नोकरीने मला बिझिनेस करण्याची धमक दिली तिथं माझी ग्रोथ नाही झाली असं कसं म्हणू शकतोस?"

"चल पार्टी करू" राम माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणाला.

"So what is next course of action?" I asked RaM when he resigned from his job.

RaM said 'I will get in to business."

I asked him "Why did you leave such a good company?" RaM simply laughed at my question.

"Did not you grow in your job?" I asked.

RaM smiled again.

"You are just smiling at my question. It shows that company did not offer you growth opportunities. That must be the reason, you left job. Is that right?" I perceived my mind.

RaM looked at me very promisingly and said to me "My company developed me and my mindset to venture in to business. How can you say that it did not give me opportunity to grow? I believe that was the biggest growth company offered me."

RaM had a point. I could not deny his invitation to go for party. 

इमटेक्स २०१९

इमटेक्स २०१९ या औद्योगिक प्रदर्शनात मला एका पॅनल डिस्कशन साठी बोलावलं होतं. विषय होता "Life beyond machine tool- passionate people with passionate hobbies".

माझे सगळे छंद तसे अशातले. ब्लॉग आणि व्यवसायातील अनुभव हे २०१३-१४ पासून लिहायला लागलो, कवितावाचन तर अगदी ताजा ताजा छंद, गिनीज रेकॉर्ड सारखा काही तरी अनोळखी उद्योग हे पण २०१६ मधील. त्या सगळ्यांचा मी प्रश्नाला उत्तर देताना उल्लेख केला. पॅशन वर बोलताना म्हणालो "Passion is strong desire to carry out certain activity by investing time and money, knowing that you don't get any return except intangible pleasure."

हे सांगितल्यावर मॉडरेटरने साहजिक सगळ्यांना पुढचा प्रश्न विचारला "पण हे सगळं करायला वेळ कसा काय मिळतो?" मी थोडक्यात सांगितलं की आपण कोण वेळ मॅनेज करणार? वेळ आहे तिथं आहे. आपलं आयुष्य त्याभोवती गुंफण्यापलीकडे आपण काही फार काही जास्त करत नाही.

हे असं असण्यामागे आमचे बिझिनेस कोच मनीष गुप्ता सरांचा मोठा वाटा आहे.

इमटेक्स च्या ग्राउंड वर सहा सात मोठे दणकट स्क्रीन लावलेत अन हे पॅनल डिस्कशन तिथं दाखवत होते. एका ओळखीच्या माणसाने फोटो काढून पाठवले, कारण मी पुण्याला परत आलो होतो.

मी पुण्याला परत का आलो म्हणून विचारताय? अहो, माझ्या पेक्षा तरुण आणि हुशार इंजिनियर्स आमचा बूथ बंगलोर मध्ये सांभाळत आहेत. मग माझी तिथं गरज ती काय? 😊😊

राम 20

मी असा एम डी वगैरे झालो कंपनीचा तरी तु माझ्याकडे ढुंकून पण पाहत नाहीस. साला समजतो कोण तू स्वतःला?" मी रामला चिडून विचारलं.

"भावड्या, तुझी पोझिशन काय, तू एमडी का काय असशील, तू पैसे किती कमावतो याने मला काही घंटा फरक पडत नाही. तू लोकांना कसं वागवतोस इतक्या साध्या गोष्टीवरून तुझी लायकी कळते'. राम म्हणाला.

माझी लायकी काढल्यावर मी ही सटकलो. मी म्हणालो "अच्छा, अजून काय तुझे असले फंडे आहेत, ते तर कळू देत."

"आता तू विचारण्याचा गुन्हा केला आहेस तर ऐकून घे."

- स्वतः प्रॉब्लेम्स च्या गर्तेत अडकला असताना सुद्धा तू दुसर्यांना मदत करू शकतो का?

किंवा

- ज्याला इम्प्रेस करायचं त्यालाच नव्हे तर प्रत्येकाशी आदर देत तू वागतोस का?

झालंच तर

- स्वतःच्या चुका कबूल करण्याइतकं तुझं मन मोठं आहे का आणि मुख्य म्हणजे ती चूक निस्तरण्याची धमक ठेवतोस का?

असलं काही असेल तर माझ्यासमोर उभा रहा. नाहीतर बाजू हो. जरा हवा येऊ दे."

मी

मी एक सुशिक्षित बिनडोक आहे. मुर्खच म्हणा ना! मी माझ्या देशात फारसा फिरलो नाही आहे. इथे शेकडो भाषा बोलल्या जातात याची मला काहीही कल्पना नाही आहे. मी विविध प्रदेशातील अन्नाची चव कधी घेतली नाही आहे. मी इतर राज्यातील लोक, धर्म, भाषा, प्रथा, कथा, कला, कविता याबाबत जागरूक नाही आहे. मी माझ्या विश्वात, माझ्या सुखासीनतेत रममाण आहे. माझ्या साठी प्रगती म्हणजे, मोठे रोड्स, एक चांगली नोकरी, त्यातून मिळणारा पगार ज्यातून मी छान कपडे विकत घेऊ शकतो आणि सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत दारू पिऊ शकतो. कधीही आणि कुणीही मला विरोध केला की मी त्याला माझा दुश्मन समजतो. माझ्या मागे सेल्फीत दिसला पाहिजे किंवा कधी सुट्टीत मला त्याची शांतता वाटली पाहिजे, याशिवाय निसर्गाशी मला काही घेणं देणं नाही आहे. मला संस्कृती म्हणजे काय हे माहीत नाही. सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असणं म्हणजे काय हेही मला माहित नाही. आयुष्याचा अत्यंत उथळ विचार करणारा माणूस आहे मी.

मला सार्वजनिक ठिकाणी वागावं कसं, स्वच्छता ठेवावी कशी याची अक्कल नाही आहे. मी कुठंही थुंकतो, कुठेही मुततो, बायकांची छेड काढतो, त्यांच्यावर बलात्कार करतो, त्यांना घाणेरड्या शब्दात शिव्या देतो. दुसऱ्या भाषा तर सोडाच, मी माझ्या भाषेतील कोणतेही साहित्य वाचले नाही आहे. इतिहासाकडून काय शिकावं ही बुद्धी माझ्याकडे नाहीच. ऐतिहासिक स्थळांना विद्रुप करणं, धार्मिक स्थळांची कचराकुंडी करणं हा माझा हक्क आहे. माझी विनोदबुद्धी बकवास आहे. स्वच्छता ठेवणे ही मी सोडून बाकी साऱ्यांची जबाबदारी आहे यावर मी ठाम आहे. मी विनाकारण जोरात हॉर्न वाजवतो, नो एन्ट्री मध्ये बिनदिक्कत गाडी घालतो, रांग मोडतो, काम करून घेण्यासाठी लाच देतो, निषेध व्यक्त करताना सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो. समाजात वावरताना मी खांद्याच्या वरचा भागाचा वापर करत नाही, सुसंवाद साधत नाही, दुसर्याप्रति आदर ठेवत नाही, शांतता ठेवत नाही, स्वच्छता पाळत नाही. त्यामुळेच राजकारणात मी ज्यांना फॉलो करतो ते ही असेच एकतर भ्रष्ट आहेत, नाहीतर अहंकारी आहेत, माजोरडे आहेत आणि त्यांच्या असं असण्याचा मी उदोउदो करतो.

मी असा आहे. इथल्या बहुतांश वर्गाचा प्रतिनिधी. काय म्हणता, तुम्ही असे नाही आहात? खरं सांगताय का? नाही, तुम्ही असे नसाल तर कदाचित तुम्ही या देशाचे नागरिक आहात का, या बद्दल शंका आहे. किंवा तुम्हाला शिक्षण आणि संस्कार चुकीचे मिळाले आहेत. किंवा परिस्थितीने तुम्हाला मूर्खासारखं वागण्यापासून परावृत्त केलं आहे. कुणास ठाऊक, तुम्ही चांगली पुस्तकं वाचली असावीत, कदाचित. की असं काही आहे की "विशाल मनाचा माणूस" हा रोग तुम्हाला झाला आहे?

या सर्वसाधारणपणे बिनडोक लोकांच्या महाकाय देशात तुमचं अस्तित्व नगण्य आहे. तुमच्या असण्याचा इथं काहीही फरक पडत नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही असे मूर्ख नाही आहात यासाठी मी तुम्हाला ठोकुही शकतो. 

(श्रीविद्या श्रीनिवासन यांचा मूळ इंग्रजी लेख चैताली आहेर यांच्या वॉल वर वाचल्यावर कुणीतरी कानाखाली मारली असं वाटलं मला. मी विचार केला, मी एकटाच का मार खाऊ. म्हणून मग भाषांतर केलं आणि इथं टाकला 😊😊)

इंडिया शायनिंग

बीजेपी चं हे मागच्या वेळीही झालं होतं. त्यावेळी इंडिया शायनिंग ह्या टॅग लाईन ने त्यांचा घात केला होता. आता अशी काही टॅग लाईन नाही आहे, पण एकुणात न केलेल्या कामाचा बोलबाला रेटून करायचा आणि मुख्य म्हणजे जनतेला येडं समजायचं, हा बीजेपी चा मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्या मानसिकतेतून ते बाहेर येत नाहीत.

सगळ्यात मोठी गल्लत इथे झाली की बीजेपी ला अजूनही असं वाटतं की लोकांमध्ये धार्मिक तेढ वाढवून राज्य करता येईल. विकासाचं नाव पुढं करायचं आणि अत्यंत हिणकस असे धार्मिक अजेंडे रेटायचे. हा जो विश्वासघात ते करतात त्यामुळे त्यांचे वांदे होतात. स्वच्छ भारत साठी महात्मा गांधींचा वापर करून घेणे, वल्लभभाई पटेल यांना हायजॅक करणं, त्या योगींनी सुद्धा काय बिनडोक मुहूर्त शोधला, फैजाबाद चं नाव बदलायला, गायीचं अनाठायी उदात्तीकरण हे सगळं भोवलं. जे तुमच्या मनात आहे ते स्वीकारलं जाणार नाही हे माहिती असल्यामुळे विकासाचा मुखवटा समोर केला आणि अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण करत समाजात तेढ निर्माण केली. फाजील आत्मविश्वास आणि सगळी दुनिया आपल्या मुठीत आहे या गैरसमजात राहिले आणि स्वतःचा गळा घोटून घेतला.

एक वेळेत गरिबीत राहू हे जनता मान्य करेल, धार्मिक अस्मितेच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व जोपासणं हे सामान्य जनतेला कधी जमलं नाही आणि जमणार नाही हे बीजेपी कधी ध्यानात घेत नाही.

भ्रष्टाचार हा मोठा प्रॉब्लेम आहेच आणि काँग्रेस त्यासाठी बदनाम आहे. पण तो सामान्य माणसाच्या आयुष्यात भीती निर्माण करत नाही, असुरक्षितता तयार करत नाही, मनातल्या माणुसकीला मारत नाही. भ्रष्टाचार हा गुन्हा आहे आणि त्याला योग्य ती शिक्षा दिली जाण्याची शक्यता असते. बऱ्याचदा ती दिली जात नाही हे सत्य आहे, पण तो स्वीकारार्ह नसतो. पण धर्मांधता आणि भ्रष्टाचार असा जर चॉईस दिला तर सामान्य जनता भ्रष्टाचाराचा स्वीकार करेल हे पण या निकालावरून सिद्ध होतंय.

मंदिर, पुतळे, नाव बदलणे, गोहत्याबंदी, बाष्कळ बरळणे या असल्या अन प्रॉडक्टिव्ह गोष्टीत हे सरकार वेळ, पैसा, ऊर्जा वाया घालवत गेली. शेतकऱ्यांप्रति दाखवलेली अनास्था आणि आश्वासनांची चक्क जुमला म्हणून केलेली बोळवण   

समाजसेवा

२०१३ साली मला समाजसेवा करण्याची खाज आली होती. त्यातून मग मी पाच समाजसेवी संस्थांना कॉन्टॅक्ट केलं. त्यातील आपलं घर चे फळणीकर आणि स्नेहालय च्या गिरीश कुलकर्णी यांच्या संपर्कात आलो. दोन्ही संस्थांना वेळ देता येतो का याची चाचपणी करण्यासाठी दोन्ही ठिकाणी मी जाऊ लागलो. पण लक्षात आलं, सेटको सांभाळून या संस्थांना वेळ देणं हे निव्वळ अवघड आहे. थोडक्यात खाज कमी झाली. 😊😊.

दोन्ही संस्थाचालकांच्या संपर्कात मात्र राहिलो. पुढे मग स्नेहवन च्या अशोक देशमाने आणि आरंभ च्या अंबिका टाकळकर यांच्याशी ओळख झाली.

या भेटीगाठी चालू असताना, आपलं घर आणि माझी कंपनी जवळ असल्याने तिथे मी बऱ्याचदा जाऊ लागलो. आपलं घर च्या डोणजे वसतिगृहात या ना त्या कारणाने चकरा वाढल्या.

एके दिवशी फळणीकरांनी आपलं घरच्या विश्वस्त मंडळावर यायचं निमंत्रण दिलं. काम काय करायचं हे काहीच माहीत नव्हतं. तरी एक अनुभव घ्यावा म्हणून मी मंडळावर गेलो. त्यांच्या मीटिंग अटेंड करू लागलो. त्यापेक्षा भरीव काम काही मी करू नाही शकलो. पण एकुणात समाजसेवी संस्थांचं काम कसं चालतं याची जाणीव झाली. परत फळणीकर म्हणजे परफेक्शन चे भोक्ते. शासनाची कुठलीही मदत घ्यायची नाही हा खाक्या. शिस्तीचे दुसरे नाव.

वर्षभरातील काही नोंदी आणि आवाहन.

१. ना नफा ना तोटा तत्वावर समाजसेवी संस्था चालवणं हे एखादा नफा कमावणारा बिझिनेस चालवण्यापेक्षा खूप अवघड असतं.

२. आधी नि:स्पृहपणे काम करायचं, तेच संतपणाचं काम. ते केल्यावर काही असे काही अनुभव येतात की "हे ची फळ काय मम तपाला" अशी परिस्थिती फाळणीकरांनी खूप वेळा अनुभवली. जिवंतपणी मोक्ष प्राप्ती घ्यावी वाटली.

३. या समाजसेवी संस्था चालवताना डोनेशनची गरज असतेच, पण मनुष्यबळ ही लागतं.

४. समाजसेवेसाठी दुसरी फळी तयार करणं हे फार जिकिरीचं काम.

५. कुणाला डोनेशन द्यायची किंवा संस्थेत काम करायची इच्छा असेल तर जरूर संपर्क साधावा.

Monday, 18 March 2019

पाचवी पणती

ती आली होती माझ्याकडे फेसबुकच्या माध्यमातून. कुणीतरी रेफरन्स दिला होता. जॉब साठी. त्या वेळेस माझ्याकडे तिच्या प्रोफाईलचा जॉब नव्हता. मुलगी थोडी विस्कळीत वाटली होती मला. नकारात्मकता तर अगदी ठासून भरली होती तिच्यामध्ये. मी सांगितलं तिला की सध्या तरी जॉब नाही.

साधारण पाच महिन्यात तिच्या प्रोफाईलचा जॉब माझ्याकडे तयार झाला. मी तिला कॉंन्टॅक्ट केला तर ती कुठलासा कोर्स करायला बंगलोर का कुठेशी गेली असं कळलं. मग मी ती जागा भरली. तेव्हापासून एकाच महिन्यात ती परत आली जॉब मागायला. मी तर जागा भरली होती.

मला काळजी वाटली त्या मुलीची. तिच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नव्हतं. होती मराठवाड्यातील. एकटीच पुण्याला. वय ही २८-२९. लग्नाचा पत्ता नाही. निगेटिव्हिटी सदैव टपकायची तिच्या बोलण्यातून. मी विचार केला ही पोरगी जर रस्त्यावर आली नाही तर आयुष्यातून उठेल.

मी तिला पहिले सांगितलं "तुला पहिले आर्थिक स्थैर्य आणावं लागेल आयुष्यात. मग आपण तुझे बाकीचे प्रॉब्लेम बघू. जॉब शोधतो तुझ्यासाठी."

सुदैवाने एक जॉब मिळाला, तिच्या प्रोफाईल ला सूट होणारा. मुख्य म्हणजे ऑफिस मला माहित होतं. तिथला मालक आणि इतर अनेक एम्प्लॉईजला मी ओळखत होतो. तिथं तिच्या व्यक्तिमत्वात बदल होईल असं मला वाटायचं.

ती जॉईन झाली तिथं. काम चालू झालं. पण ही  दर  महिन्याला कटकट करायची. मला जमत नाही, आवडत नाही, मला तुमच्या कंपनीत घ्या. मी जॉब सोडते. एकदा आली आणि म्हणाली "मी ब्युटी पार्लर काढते." आता मात्र तडकलो. तिला म्हणालो "डोकं जागेवर असेल तर एक वर्ष हा जॉब सोडू नको. चार पैसे कमव. एक वर्षाच्या आधी जर जॉब सोडलास तर परत मला कुठल्याही कारणांसाठी कॉन्टॅक्ट करायचा नाही. आणि जरा अवतार बदल. थोडी जिम वगैरे लाव, वॉर्डरोब चेंज कर."

पोरीने ऐकलं. खुश राहू लागली. सव्वा वर्षे काम केलं.

आणि एक दिवशी तिचा फोन आला. स्थळ आलं आहे, मुलगा जर्मनीत असतो. पोराचं प्रोफाईल झकास. आपल्या आयुष्यात काही तरी चांगलं घडतं म्हणजे काही तरी प्रॉब्लेम या धारणेने ती मुलगी परत काही त्यात खोट काढत होती. मी तिला सांगितलं "जास्त फाटे फोडू नकोस. जशा गोष्टी सामोऱ्या येतील तशा फेस कर. चांगलं होईल."

यथावकाश तिचं लग्न झालं.

दहा दिवसांपूर्वी भेटली मला. खूप खुश दिसत होती. सुखात्मकता आणि सकारात्मकता ठायी ठायी दिसत होती. जी मुलगी फक्त माझ्याशी प्रॉब्लेम्स शेअर करायची, तिने सगळं काही आलबेल आहे असं सांगितलं. काही दिवसात जाईल ती जर्मनीला. तिला हार्दिक शुभेच्छा.

मी वर पोहोचल्यावर चित्रगुप्त सांगेल मला की तुझी जागा तशी नरकातच आहे. पण अशी काही गोष्ट सांगितली की ज्यामुळे एखाद्याच्या आयुष्याचा ट्रॅक बदलण्यात तुझा थोडा हातभार आहे, तर मी तुला दोन एक दिवस स्वर्गात राहायला देईल. तर मी ही घटना सांगेन.

(स्वतःची टिमकी वाजवणाऱ्या मी पोस्ट टाकतोच. पण ही पकडून आधीच्या पाच पोस्ट या केवळ फेसबुकच्या माध्यमातून काही चांगलं घडू शकतं हे सांगण्यासाठी आहेत.)

पाचवी पणती 

R K Laxman

२००३ साली टाटा सन्स मध्ये हरखलो होतो. लंडन मध्ये ललिता जेम्स मला तिच्या ऑफिस मध्ये घेऊन गेली होती. तिने मला एक केबिन दाखवली होती, एम एस ओबेरॉय यांची. फार भारी वाटलं होतं. असाच एक अनुभव नुकताच आयुष्यात आला. तो म्हणजे आर के लक्ष्मण यांच्या घरी जाण्याचा. हो तेच “Creator of common man with uncommon sense of humor”.

फेसबुकने मला काही रत्ने दिली आहेत. त्यापैकी एक आहे  तिच्या वयाला न शोभणारी संवेदनशीलता बाळगणारी, शास्त्रज्ञ होण्याच्या दिशेने हळूहळू पण दमदार पावलं टाकणारी. तिची अन माझी ओळख झाली तेव्हा मला तिचं फेक अकौंट वाटलेलं. अनेकानेक प्रश्न विचारून भंडावून सोडणारी. (तिच्या निम्म्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसतातच). तिच्याच नव्हे तर तिच्या पूर्ण कुटुंबाबद्दल मला आत्मीयता आहे अशी रुचिरा.

तर ही सारखी मला सांगायची श्रीनि सर आणि तुम्ही भेटावेत असं खूप वाटतं. तर हे श्रीनि सर म्हणजे आर कें चे चिरंजीव. मी विचार करायचो, इतक्या मोठ्या माणसाचा वारसा. मी भेटून काय बोलणार? त्यांना आवडेल का? बरं ते स्पेस जर्नलिस्ट. माझं त्या बद्दलचं नॉलेज अगदी उथळ. मी आपलं हो म्हणायचो. १४ फेब्रुवारीला ने रुचिरा ने परत चिवचिव केल्यावर आम्ही तारीख ठरवली. ९ मार्च.

प्रिया प्रभुदेसाई बरोबर आस्वाद मध्ये नाश्ता केला. आणि मॅजेस्टिक मध्ये काही पुस्तकं घेतली एक श्रीनिसाठी आणि एक माझ्यासाठी. श्रीनि सरांना द्यायचं पुस्तक अर्थात रुचिरा ने ठरवलेलं. मग लोअर परेल च्या फिनिक्स मॉल मध्ये भेटलो श्रीनि सरांना. तुम्हाला सांगतो साधेपणाची कमाल मर्यादा म्हणजे श्रीनिवास लक्ष्मण. गर्व, अहंकार, दिखाऊपणा हे अवगुण त्यांच्या जवळपास पण नाहीत. दोन एक तास गप्पा मारल्यावर आम्ही त्यांच्या घरी गेलो. पेडर रोडला.

दरवाजावर पाटी वाचली. R K Laxman. अंतर्बाह्य थरारलो. आत गेलो आणि भारावल्यासारखं त्या हॉल मध्ये भिरभिरत होतो. आर कें नी स्वहस्ते काढलेली अनेक चित्रे मी पाहिली. यातली तीन मला चित्रं फार आवडली. पण सगळ्यात भारी १९६२ साली काढलेलं, ज्यात त्यांनी त्यांचा मुलगा चांद्रभूमीवरून पृथ्वीकडे पाहतो. १९६९ साली मानवाने चंद्रावर पाय ठेवला आणि श्रीनि पुढे स्पेस जर्नलिस्ट झाले. हा दिवस आहे की स्वप्न याची मी पुन्हा पुन्हा खातरजमा करून घेत होतो.

श्रीनिवास सरांची स्वतःची रूम म्हणजे अंतराळातल्या माहितीचा खजाना आहे. आपल्या आवडीच्या कामासोबत जगणे म्हणजे काय हे तिथं जाऊन कळतं. दुपारभर सर आणि त्यांची पत्नी उषा यांच्याशी गप्पा आणि सोबतीला रुचिरा ची टीवटीव.

निघालो. राहवलं नाही. R K Laxman या पाटीच्या शेजारी उभा राहून फोटो काढून घेतला. कुणाबद्दल असणारी आदराची भावना उचंबळून येणे याची अनुभूती झाली.

एका स्वप्नवत दिवस अंजली आळेकर यांना भेटून संपला.

सांगायचं म्हणजे, आयुष्यात पहिल्यांदा कुणाला भेटण्यासाठी कामावरून सुट्टी घेतली.

Thursday, 14 March 2019

जॉब

फोन आला. फोनकर्त्याच्या मित्राला जॉब हवा होता. जॉब सिकर चं नाव होतं सचिन. 

सचिनचा बायोडाटा आला. खणखणीत करियर होतं. मल्टिनॅशनल कंपनीत दहा बारा वर्षे काम केलं होतं. नंतर आवड म्हणून टिचिंग प्रोफेशन मध्ये शिरले. पण एकुणात शिक्षण महर्षींनी केलेला बाजार पाहून आणि एकुणात अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्वालिटी ची वाट लागलेली पाहून तीन चार वर्षात पस्तावले. 

माझ्या इंटरव्ह्यू मध्ये हे सगळं पोटतिडकीने बोलले. त्यांची या विषयाची तळमळ पाहून मी त्यांना विचारलं की फायनली काय करायचं ठरवलं आहे. तर म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये परत यायचं. मी विचारलं, पण तुमची आवड अध्यापन असेल तरीही. तर हो म्हणाले. 

मी म्हणालो "असं समजा की माझ्याकडे मॅन्युफक्चरिंग च्या हेड ची पोझिशन आहे आणि एक माझी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तिथे मला एका चांगल्या प्रोफेसरची गरज आहे. हे कॉइन आहे. टॉस करू. हेड पडलं तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि टेल पडलं तर ट्रेनिंग मध्ये. आता मी टॉस केलं तर कॉइन हवेत असताना, तुमच्या मनाला काय वाटेल? हेड पडावं की टेल?"

सचिन संभ्रमात पडला. अन हळूच म्हणाला "टेल. पण तरीही......"

मी सांगितलं "कॉइन पडल्यावर जे येईल ते स्वीकारणं ही तडजोड झाली. आणि कॉइन हवेत असताना काय पडावं असं वाटणं ते निवडणं हे आयुष्य. तुम्ही अध्यापन क्षेत्र सोडू नका. तुमच्या सारखी लोक अभियांत्रिकी क्षेत्राची गरज आहे. दुर्दैव हे की आज सगळ्यात जास्त विनोद हे इंजिनियर्स वर होत आहेत. चहाचा धंदा चांगलाच पण इंजिनियरिंग च्या डिग्रीला हार घालून त्याची खिल्ली उडवण्याचा नतद्रष्ट पणा डोक्यात जातो. लॅब मध्ये शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधाला लोकाभिमुख करण्याचं काम तंत्रज्ञांचं आणि ते ताकदीने व्हावं यासाठी तुमच्या सारख्या लोकांनी हे क्षेत्र सोडू नये". 

इतकं बोलून अशी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निवडली जी प्रोफेशनल पद्धतीने चालवली जाते. तिथे त्यांचा रेफरन्स दिला. इंटरव्ह्यू बहुतेक शेड्युल झाला आहे. सचिनला जॉब मिळाला तर तो त्याचं सोनं करेल याबाबत शंका नाही. त्याला हार्दिक शुभेच्छा. 

अ...... अभियंत्याचा हे फक्त पुस्तकाचं नाव नाही आहे, ती माझी जीवन प्रणाली आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हो, अभिमान आहे, गर्व नव्हे. 

Wednesday, 13 March 2019

फेसबुक ची पणती

एक महिना फेबुवर नसताना दोन महत्वाचे प्रसंग घडले आणि त्याला करण फेसबुकच होतं. 

२१ फेब्रुवारीला जयसिंगपूर येथील जेजे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग इथे "उद्योजकता" या विषयावर बोलायला बोलावलं होतं. खणखणीत स्वागत केलं होतं. ढोलताशा, औक्षण अन काय काय! प्रमुख पाहुण्यांमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी होती, त्यामुळे गर्दीला तोटा नव्हता. पण तिच्याशिवाय श्री सुनील जाजीत होते. एल अँड टी बंगलोर चे एच आर चे प्रमुख. काही महिन्यांपूर्वी भारताला इंजिनियर लोकांची किती कमी प्रमाणात गरज आहे हे अधोरेखित करणारा, तो लेख श्री जाजीत यांनी लिहिलेला. मी त्यावर आधारित मराठीत लेख पण लिहिला होता. चौथे गेस्ट होते ते कॉलेज चे माजी विद्यार्थी श्री बघाटे. पुढे आय आयटी करून युकेमध्ये पीएचडी केली आणि दहा वर्षे जॉब केला. फक्त बिझिनेस करण्याच्या उद्देशाने ते पुण्यात परत आले आणि तो व्यवस्थित सेट केला. या तिघांनीही अत्यंत समयोचित आणि मुद्देसूद भाषणं केली. 

उद्योजकता या विषयावर माझी मतं आता आकार घेत आहेत आणि ती माझ्या अनुभवातून आली आहेत. मुलांना ती पटतात असं मला त्यांच्या प्रतिक्रियेतून जाणवतं. 

असाच एक अनुभव आय एम डी आर, पुणे येथेही आला. स्टार्ट अप च्या कॉन्फरन्स मध्ये पुन्हा एकदा तरुणाईशी "उद्योजकता" या विषयावर बोलायला निमंत्रित होतो ते २ मार्चला. साधारण नव्वद साली आय एम डी आर ला ऍडमिशन घ्यायला गेलो होतो. काही कारणाने नव्हती घेतली. २ तारखेला वक्ता म्हणून गेलो. 

दोन्ही कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली ती फेसबुकमुळे. जयसिंगपूरच्या कॉलेजला रेफरन्स दिला कोल्हापूरचे राजन गुणे सरांनी तर आय एम डी आर ला बोलावलं श्री दिलीप रणदिवे यांनी. 

एका वर्षात पाच ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनीशी संवाद साधायचा हे ठरवलं होतं ते साध्य झालं. 


Sunday, 10 March 2019

ताडोबा 2