Friday, 28 October 2016

राजेश

इथे मी पोस्टवर जे तारे तोडतो, त्यावरून काही, म्हणजे काहीच, जणांचा असा समज, त्याला मी गैर म्हणणार नाही, झाला आहे की मी बिझिनेस मध्ये घेतलेल्या निर्णयाचं मला अनुमोदन हवं आहे किंवा त्याचा उदो उदो इथे व्हावा. काही गोष्टी मी क्लीअर करतो.

- सगळ्यात पहिले म्हणजे, निर्णय हा घेतल्यावर त्याची प्रोसेस इथे लिहितो. फेबु वरच्या कॉमेंट्स वरून त्या निर्णयाचं गैर किंवा योग्य हे मी ठरवत नाही. इथे जयजयकार झाला काय किंवा हिणवलं काय माझे बिझिनेस चे निर्णय पूर्ण विचारांती घेतले असतात. इथे मी शेअर करतो तो एक अनुभव म्हणून. आणि मी ज्या परिस्थितीत बिझिनेस करतो, ती बऱ्याच जणांच्या आयुष्यात येऊ शकते आणि लोक त्याला कनेक्ट होऊ शकतात.




- दुसरं म्हणजे अगदीच नम्रपणे नमूद करतो की फेसबुक वर ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर माझ्या कंपनीचं नाव भारत भर पोहोचलेलं होतं आणि पर्यायाने माझं. इतकंच नव्हे तर जगात सुद्धा आमच्या कंपनीचं नाव आमच्या फिल्ड मध्ये बऱ्याच लोकांना माहित आहे. आणि सुदैवाने ते ही चांगल्या गोष्टींसाठी. त्यामुळे फेसबुकवर कॉमेंट्स आणि लाईक मला क्षणभर आनंद देत असतील, पण मला खरा आनंद तेव्हाच होतो जेव्हा एखादा कस्टमर आमच्या सर्व्हिस वर खुश होतो. किंवा माझी कंपनी आदल्या वर्षीपेक्षा ग्रोथ पोस्ट करते. आज मी अभिमानाने सांगू शकतो की तुम्ही कुठल्याही, अँड आय मिन इट, कुठल्याही VMC/HMC असलेल्या मशीन शॉप मध्ये जा. याचा स्पिन्डल कुठे रिपेयर करतात असं विचारा. बहुतेक वेळा आमच्या कंपनीचं नाव तो सांगेल. गॅरंटी आहे.

- काही लोकं मला लेखक वगैरे समजतात. तुम्हाला सांगतो, मला स्वतः ला एक अभियंता म्हणून ओळख अतीव प्रिय आहे. लक्षात येतंय का अ भि यं ता. माझ्या आयुष्यातले काही ध्येय हे फक्त आणि फक्त माझे अभियांत्रिकी ज्ञान, मग ते तुटके फुटके का असेना, पूर्ण करेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. By virtue of FB, लिहायची गोडी लागली आहे म्हणून मी लिहितो. कुणीतरी माझं नाव न लिहिता वलय वगैरे लिहिलं होतं. इथल्या वलयापेक्षा मला परवा महिंद्र नासिक मधला मेंटेनन्स हेड "अरे, यार तुला व्हिजिटिंग कार्ड ची काय गरज आहे. स्पिन्डल म्हंटलं की तुझं नाव डोळ्यासमोर येतं" हे जो ते म्हणाला, ते मूठ भर मांस वाढवतं.

- काही पोस्ट या हाझनेस चे अनुभव हे शतप्रतिशत खरे असतात. तिथे मला खोटेपणाची झुल पांघरावी लागत नाही. एकदम अस्सल आहेत ते.

- मागे एकदा लिहिल्याप्रमाणे माझी ही लोकांनी ठासून मारली आहे. आज ही मारत आहेत. मलाही अपयश आले आहेत. पण त्याचा बाजार मांडत नाही. त्याची गरज मला वाटत नाही. लिहिलं तर त्याची कारण मीमांसा लिहितो. कुणास ठाव माझ्यासारख्या साध्या दुसऱ्या उद्योजकावर तशीच वेळ आली असेल तर काही तरी मिणमिणतं दिसेल.

आणि सगळ्यात शेवटी पर्सनल

मी सेंट परसेन्ट मध्यमवर्गीय संसारी माणूस आहे. माझी बायको वैभवी, पोरं यश आणि नील, आई, माझे नातेवाईक, आणि माझे मित्र यांच्यात मी खुश आहे. थोडं लोकांशी बोलायला आवडतं. आणि जगायचा Core purpose "To exchange knowledge and information to enhance eachother's quality of life" हा ठेवल्यामुळे extrovert आहे. म्हणून फेबु वरच्या लोकांशी भेटायला पण आवडतं. काही लोक सल्ले मागतात, काही देतात, काही गप्पा मारण्यासाठी भेटतात. मी तिथे शक्य तितकं योगदान देतो. आणि हो exchange म्हणजे देवाणघेवाण. पण याचा अर्थ असा नाही की कुणीही काहीही भंकस करावी. काही स्पेसिफिक सांगायचं, विचारायचं असेल तर नक्कीच वेलकम. अदरवाईज तुमचं सौन्दर्य, तुमचं स्टेटस तुम्हाला लखलाभ. मी माझ्या आयुष्याचा राजा आहे. उगाच नाही माझ्या आत्याने माझं नाव राजेश ठेवलं. 

व्हिटेरी

आता अमेरिकेत व्हीटेरी नावाचा गृहस्थ भेटला होता. त्याचे प्रोडक्टस त्याला भारतात विकायचे होते. मला म्हणाला, तू विकशील का? मी म्हणालो, मला माझा उद्योग भरपूर आहे. अजून प्रॉडक्ट नाही विकू शकत.

पण त्याला सांगितलं "तीन मेजर इंडस्ट्रीयल सिटी त माझे रिप्रेझेंटेटीव्ह आहेत. मी तुझे प्रॉडक्टस त्यांना विकायला सांगू शकतो. ते माझ्या पे रोल वर नाही आहेत. तुझे प्रॉडक्टस त्यांच्या बास्केट मध्ये आले तर त्यांना फायदा होईल"

व्हीटेरी खुश झाला. म्हणाला "हे डील जमलं तर तुझी कन्सल्टन्सी फी काय आहे ते सांग. मी देईन"

मी म्हणालो "फी वगैरे ची काही गरज नाही. यात सगळेच विन विन सिच्युएशन मध्ये आहेत. तुला सेल्स ची माणसं भेटतील, माझ्या मित्रांना प्रॉडक्टस मिळतील धंदा वाढवायला"

तर तो म्हणाला "आणि तुला?"

मी बोललो "मानसिक समाधान. आणि मला माहित आहे, मला याचा फायदा भविष्यात नक्की होईल"

तो म्हणाला "काहीतरीच काय! असं नाही होत कधी"

मी त्याला किस्सा सांगितला

"साल १९९९९. मी तेव्हा बुसाक+शाम्बान ची सिल्स विकायचो. मला सुपर स्टील ने त्यांच्या मिल मध्ये हायड्रोलिक्स मध्ये आमचे सिल्स कसे बसवता येतील ते बघायला बोलावलं. त्यांचे ड्रॉइंग्स बघितल्यावर मला कळलं की त्यांचे हायड्रोलिक्स सिलिंडर आणि पॉवर पॅक चे सप्लायर्स त्यांना फुल लुटत आहेत. मी तिथल्या कदम साहेबाना सांगितलं कि तुमच्या सप्लायर्स ला काही कळत नाही आणि ते तुम्हाला फालतू माल सप्लाय करून लुटत आहेत. कदम म्हणाले, मग आता तूच सप्लायर्स दे. मी त्यांना लिहून दिलं. पॉवर पॅक साठी पुण्याची हैड्रोथर्म आणि सिलिंडर साठी मुंबई ची इंडियन हायड्रोलिक्स आणि फास्ट सिलिंडर्स.

कदम साहेबांनी मला खुश होऊन याबद्दल कन्सल्टन्सी फी ऑफर केली. मी बोललो, सर, मला फी काही नको. तुम्ही जो पर्यंत इथे आहात तो पर्यन्त आर एफ क्यू मध्ये बुसाक शाम्बान चे सील लिहायचे.

फास्ट आणि हायड्रोथर्म दोघांनी मला ऑर्डर मध्ये कमिशन ऑफर केलं. मी म्हणालो, मला कमिशन नको. एक खात्री द्या, की तुम्ही आमचे सिल्स निदान मी असे पर्यंत तुमच्या कंपनीत स्टॅंडर्ड कराल.

१९९९ ते २०१० पर्यंत सुपर स्टील ने या तीन सप्लायर बरोबर कमीत कमी १०० कोटी रुपयांचा बिझिनेस केला.

मला काय मिळालं.? मी २००२ मध्ये सिल्स विकणारी कंपनी सोडली. पण आज ही, म्हणजे १४ वर्षांनंतर तिन्ही कंपन्या आमचे सिल्स वापरत आहे.

सुपर स्टील्स च्या आर एफ क्यू मध्ये आज पण आमचे सिल्स स्पेसिफाय केले जातात.

पुण्याच्या हायड्रोथर्म चा ओनर देशपांडे माझा बिझिनेस मधील mentor आहे.

ठाण्यातील फास्ट सिलिंडर्स चे ओनर मला लहान भाऊ समजायचे.

आणि कदाचित इंडियन हायड्रोलिक्स च्या शुभेच्छा असतील कि माझा बिझिनेस जरा बरा चालू आहे.

या प्रकाराला मी traingular working म्हणतो. आणि सेल्स चं हे खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. आणि तसंही जगण्याचा core purpose "To exchange knowledge and information to enhance brand "India"" हा आहे."

"आलं का तुझ्या लक्षात मला कन्सल्टिंग फी का नको ते"

हात मिळवून गेला तो. पण नजरेत त्याच्या विचित्र भाव होते. "This man looks to be crazy" असे काहीसे.

मी मनात म्हणालो "आम्ही इंडियन आहोतच असे.......क्रेझी"

रिअल पार्टनर

युके चा व्हिसा काढायला मी १९९९ ला मुंबई ला गेलो. मी आणि प्रदीप, माझा बिझिनेस पार्टनर, दोघे स्वित्झर्लंड हुन ऑफिशियल काम आटोपून प्रदीपच्या बहिणीला भेटायला युके ला जाणार होतो. इंटरव्ह्यू मध्ये व्हिसा ऑफिसरने विचारलं "are you traveling with someone?" मी म्हणालो "Yes, my partner" तर तो म्हणाला "what partner" मी म्हणालो "What do you mean" तर तो म्हणाला "I mean, do you share same bed". मी ताडकन उडालो. आणि म्हंटलं "No no, he is my business partner".

जोक्स अपार्ट, पण जितका वेळ आपण घरी जागे असतो, त्याच्यापेक्षा जास्त कंपनीत असतो. त्यामुळे बिझिनेस पार्टनर हा चांगला मिळणं हे भाग्याचं लक्षण. मी त्याबद्दल भाग्यवंत आहे. बरेच जण विचारतात, तुमची पार्टनरशिप कशी काय टिकली?

बाकी कुठल्याही मुद्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघातल्या विसंगती:

- आमच्या दोघातला वयाचा फरक. इतर नेहमीच्या पार्टनरशिप मध्ये बहुतेकदा समवयीन मित्रात एकत्र बिझिनेस करण्याची हुक्की येते. माझ्यात आणि प्रदीपच्या वयामध्ये तब्बल ११ वर्षाचं अंतर आहे. मग वयोपरत्वे असणाऱ्या महत्वाकांक्षेत फरक आहे.

- मी डोक्यापासून पायापर्यंत मराठी. तर प्रदीप मूळ गुजराती पण जन्मला आणि मोठा झाला पुण्यात.

- प्रदीप अत्यंत शिस्तशीर आणि वक्तशीर आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत बहुतेक दिवशी त्याच्या रुटीन मध्ये एका सेकंदाचा फरक नसतो. त्याने येण्याची वेळ द्यावी आणि आपण घड्याळ त्या प्रमाणे लावावं. गॉगल केस मध्ये ठेवणे, बॅगेत ठेवणे, त्याची झिप लावणे, ११:३० वाजता न चुकता काही तरी खाणे, दररोज तितकीच सिगरेट पिणे, तितकेच जेवणे आणि बरंच काही. मी याच्या बरोबर उलट. मी एकाच रस्त्याने चार दिवस घरून कंपनीला जाऊ नाही शकत.

- एखादी गोष्ट त्याच पद्धतीने करण्याच्या सवयीमुळे प्रदीप चं स्पिन्डल रिपेयर चं स्किल वादातीत आहे. आणि त्याचा आमच्या बिझिनेस ला खूप फायदा होतो. मी मात्र सगळ्याच गोष्टीचं थोडं थोडं ज्ञान बाळगून आहे. हो हो तेच jack of all........ त्यामुळे आमच्या कोअर स्किल मध्ये मी लक्ष घालत नाही आणि बाकी सपोर्ट सिस्टम मध्ये त्याला लक्ष घालायची गरज पडत नाही.

- बिझिनेस चालू केल्यापासून ते आतापर्यंत प्रदीप ने मला एक पैशाचा, and I mean it, एक पैशाचा हिशोब मागितला नाही आहे.

- कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना त्यातील संभाव्य धोके त्याला बरोबर लक्षात येतात. पण त्या धोक्यावर मात कशी करायची हे सांगितलं तर त्याच्या मतावर आडून राहण्याचा तो आडमुठे पणा करत नाही. मी सुद्धा काय करायचं यावर ठाम असतो पण कसं करायचं यावर वेगवेगळे मार्ग प्रयत्न  करायला फ्री ठेवतो.

- तो हात, पाय अन डोके शाबूत असेपर्यंत कंपनीत काम करणार आहे. माझी इंजिनियरिंग करिअर पुढील २-४ वर्षात थांबणार आहे. नाही, मी रिटायर नाही होणार, पण काही दुसरे प्लान्स आहेत. (नाही नाही, लेखक पण नाही होणार)

असे खरं तर अनेक मुद्दे आहेत. काही साम्य स्थळे पण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकांचे गुणदोष स्वीकारले आहेत. आमची भांडणं पण प्रचंड झाली आहेत. पण त्या सगळ्यांना ही पार्टनरशीप पुरून उरली आहे. नॉर्मल माणसात असतो तितका अहंकार दोघातही आहे, पण आमच्या पेक्षा कंपनी मोठी आहे हे दोघांच्या ही पक्के लक्षात आहे. नातेवाईक कंपनीत कामाला ठेवायचे नाहीत यावर दोघांचे एकमत आहे.

आज हे सगळं लिहायला हरकत नाही आहे. कारण पुढचं वर्ष हे आमच्या पार्टनर शिप चं रौप्य महोत्सवी वर्ष असणार आणि आता जे काय उरलेले काही वर्षे आहेत त्यात ती तुटणं आता तरी असंभव वाटतं.

आणि हो, तुम्हाला जो पार्टनर माहित आहे तो प्रदीप नाही आहे. तो तिसराच आहे अजून. त्याला भेटायचं असेल तर तुम्हाला कंपनीत यावं लागेल.



पाकिस्तानशी धंदा

मध्ये एका पोस्टवर एकाने प्रश्न विचारला की तुम्ही पाकिस्तान च्या कस्टमर शी बिझिनेस कराल का? प्राप्त परिस्थितीत अर्थातच "नाही".

पण मेख अशी आहे की पाकिस्तान ने जर आमच्या सारख्या लहान कंपनी बरोबर तिथल्या कंपनीने बिझिनेस रिलेशन्स डेव्हलप करण्याइतका व्यापार उदीम वाढवला असता तर तो देश आज च्या परिस्थितीत आहे, तसा असला असता का?

त्याचं ही उत्तर अर्थात नाहीच.

कर्म कसे करावे हे शिकण्यासाठी धर्म वापरला तर समाजाची, देशाची उन्नती होते. पण धर्माने लोकांना वापरायला सुरुवात केली की त्याचा पाकिस्तान होतो, सीरिया होतो.

धर्माच्या अति आहारी जाणं हे समाजासाठी मारक आहे हे धार्मिक तत्ववाद्यांनी लक्षात ठेवावेच. पण त्या पेक्षा जास्त त्यांच्या अनुयायांनी ध्यानात राहू द्यावे. 

अलगोरिदम

हे फेसबुकचं अल्गोरिदम भारी आहे. समाजात चालणाऱ्या विविध भांडणाच्या पोस्ट फार काही पोहचत नाही माझ्यापर्यंत. किंवा गांधी आणि नेहरूंच्या बदनामीच्या पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल आहेत असं वाचायला मिळतं. माझ्यापर्यंत पोहचत नाहीत.

मला असं वाटतं की जितका एखादया गोष्टीचा उन्माद करणे धोकादायक आहे तितकं साप समजून दोरीला धोपटणे पण चुकीचे आहे.

मला आठवतं फेबु वा WA नव्हतं त्या दिवसात एकदा उद्धव ठाकरे म्हणाले "आम्हाला कागदी वाघ म्हणालात, तर याद राखा" मी बातम्या आठवल्या, पेपर आठवून पाहिले, पण असं कुणी म्हंटल्याचं लक्षात नाही आलं. म्हणजे उगाच आवई सोडून द्यायची. विरोधकांना पण आयतं कोलीत मिळतं आणि जर नंतर कुणी खरंच कागदी वाघ म्हंटलं की समर्थकांना चेव चढतो.

एका गृहस्थाची पोस्ट वाचली, त्यात लिहिलं आपण पाकिस्तानशी स्पर्धा करतो. पाकिस्तानशी स्पर्धा? आत्मनिंदेचा इतका विलोभनीय आविष्कार या आधी वाचनात नव्हता आला. नाही म्हणजे स्वतः चे पाय जमिनीवर राहण्यासाठी फटकारा हो. पण इतकं. मुळात पठाणकोट आणि उरी च्या पाठोपाठच्या दहशतवादी हल्यानंतर दहशतवाद्यांचे तळ आपण नेस्तनाबूत केले आहेत. हे अभिनंदनीय आहेच. पण याला एखादं युद्ध जिंकल्याच्या अविर्भावात उन्माद करणं जितकं हास्यास्पद आहे तितकं च जे झालं ते चुकीचं झालं असा गळा काढणं हे पण करंटेपणाचं लक्षण आहे. मुळात हा काही निर्णय नाही झाला की टेस्ट मॅच संपली, फटाके फोडा. समजा परत एखादा दहशतवादी हल्ला झाला, की परत हिनवण चालू. टोकाचीच भूमिका.

अहिंसा वादी आहोतच आपण. याचा अर्थ असा आपण दुसऱ्या ची आगळीक काढत नाही. पण इतके दहशतवादी हल्ले होऊन हातावर हात ठेवून गप्प बसायचं? There are risks and costs to action. But they are far less than the long range risks of comfortable inaction. कालानुरूप संदर्भ बदलतात, आंतरराष्ट्रीय राजकारण बदलतात, सामाजिक समीकरणं बदलतात आणि आपण मात्र आपल्या विचारांना केवळ विरोधासाठी विरोध म्हणून आवळून बसायचं?

दुसऱ्यांवर अन्याय करणं हे पाप आहे, पण तो अन्याय सहन करणे हे पण पापच आहे.

हा आपला देश अजून प्रगत नसेल पण अमेरिकेइतका उधळ माधळ करणारा नाही, फ्रांस इतका रंगेल नाही, जर्मनी इतका कंजूष नाही, चीन इतका आढ्यातखोर नाही, जपान इतका रिजिड नाही, आणि पाकिस्तान शी तुलना करण्याइतका हलका नाही.

असो. गांधी जयंती आणि शास्त्री जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.




नैतिकता

मी आणि पार्टनर सिंहगड रोड ला पार्किंग शोधत होतो. सगळीकडे फुटपाथवर भाजी आणि फळ विक्रेते बसले होते अन त्यांच्यासमोर काही मला गाडी लावता येत नव्हती. थोड्या वेळात माझा संयम सुटला, आणि त्या गरीब म्हाताऱ्या भाजी विक्रेत्याकडे बघत म्हणालो "च्यायला, या लोकांकडे काही नैतिकताच नाही. फुकटच्या जागेवर धंदा करायचा आणि त्यावर नंतर मालकी हक्क सांगायचा."

पार्टनरने त्याचं ते सिग्नेचर छद्मी हास्य केलं आणि म्हणाला

"एक लक्षात ठेव, गरीब लोकांना नैतिकता परवडत नाही. They simply can not afford to have morals. दोन वेळच्या पोटाची भ्रांत ज्यांना मिटवायची आहे त्यांना तू नैतिकतेच्या गोष्टी शिकावतोस.  आणि म्हणून त्यांना धर्म बांधून ठेवतो. धर्मात शिकवलेल्या गोष्टी पाळल्या की त्यांना वाटतं नैतिकता पाळली. प्रॉब्लेम तुझ्यासारख्या दांभिक लोकांकडून समाजाला आहे. नैतिकता हा धर्म असं पाळणं तुला खरं तर शक्य आहे.  तसं असूनही तुम्ही त्याला घोडे लावता आणि मग बालाजीच्या दानपेटीत पैसे ओतता नाही तर साईबाबा ला मुकुट चढवता. And that's how you pretend to have morals"

"ती बघ, तिथे पार्किंगला जागा झाली आहे. जा, गाडी लावून ये"

(मूळ कल्पना: खुशवंतसिंग)

इंटरव्ह्यू बुम रँग

आम्ही तिघे इंटरव्ह्यू घेत होतो. एक यंग डायनॅमिक पोरगं समोर होतं. विचारलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरं देत होतं. मी त्याला प्रश्न विचारला "How do you look at yourself five years from now?" प्रश्नाचं उत्तर तर त्यानं चांगलं चालू केलं अन अचानक त्याच्या आवाजातील धार कमी झाली. आणि त्यानंतरच्या डिस्कशन मध्ये ती पूर्वार्धातील तडफ नव्हती. तरी मी त्याला सेकंड इंटरव्ह्यू साठी बोलावलं. तो गेला अन एच आर चा माणूस आत आला अन म्हणाला "सर तो मुलगा सेकंड इंटरव्ह्यू ला येणार नाही असं म्हणतोय. तुम्ही बाहेर येऊन बोला त्याच्याशी"

मी बाहेर गेलो आणि का येणार नाही असं विचारलं. तर म्हणाला "सिलेक्शन झाल्यावर तुमच्या शेजारी बसलेले माझे बॉस असतील असं तुम्ही म्हणाला होतात" मी म्हणालो "हो बरोबर"

तर म्हणाला "पाच वर्षानंतर मी स्वतःला कसं बघतो या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देताना ते कानात काडी घालून कान साफ करत होते. हे करताना त्यांचे डोळे बंद होते. माझं स्वप्न जिथे मांडत होतो तिथे ते इंटरव्ह्यू घेणारे अत्यंत अजागळ काम करत होते. तुम्ही लोकं माझं करिअर काय बनवणार?"

मी काही बोलायच्या आत तो निघून गेला पण. मी अवाक झालो.

संध्याकाळी सगळे इंटरव्ह्यू प्रोसेस झाल्यावर एच आर चा माणूस आला आणि त्या पोराचीच मेल दाखवली.

त्यात लिहिलं होतं "तुमचा कॉल आल्यावर मी तुमच्या डायरेक्टरचं linked in आणि फेबु प्रोफाइल चेक केलं. इंटरव्ह्यू देताना कॅण्डीटेट ने कसं वागावं याचे खूप तारे तोडले आहेत तुमच्या साहेबाने. जरा इंटरव्ह्यू घेताना काय एकटिकेट्स आणि मॅनर्स पाळायचे याबद्दल ही तुमच्या साहेबांना विचार करून लिहायला सांगा"

खरंच तारे तोडणं सोपं असतं, नाही? 

बाळबोध प्रश्न

म्हणजे एक बाळबोध प्रश्न आहे बघा.

आता समजा पानशेत मध्ये X कोटी लिटर पाणी जमा होतं अन वरसगाव मध्ये Y कोटी लिटर. दोन्ही धरणाची एकत्रित क्षमता X+Y कोटी लिटर्स.

आता याच्या समजा काही टक्के पाणी शेतीला लागणार. समजा a टक्के.

म्हणजे (X+Y)-a(X+Y)/100 इतकं लिटर्स पाणी लोकांना वर्षभरासाठी वापरायला उपलब्ध आहे.

आता वर्ल्ड स्टॅंडर्ड प्रमाणे माणशी १२५ लिटर दिवसाला लागतं. आपण पुण्यासाठी ते १५० लिटर पकडू.

म्हणजे पुण्याची लोकसंख्या

 (X+Y)-a(X+Y)/100
__________________

365X150

इतकीच असणं अपेक्षित आहे.

आता पुण्याची लोकसंख्या आपण P समजू. एका घरात चार माणसे

म्हणजे एकूण घरांची H संख्या P/4 इतकी पुरे आहे.

एका घरात आता कमीत कमी एक चारचाकी (F) आणि एक दुचाकी आहे. (D).

एका वेळेस समजा २०% चारचाकी आणि ३०% दुचाकी रस्त्यावर असतात. म्हणजे 0.2×H आणि 0.3x H.

मग इतकी वाहने रस्त्यावर एका वेळेस आली तर किती स्क्वे किमी चे रस्ते लागतील.

म्हणजे असे काही calculations होतात की आपलं वाटेल तशी शहराची वाढ होत जाते? हा माझा बाळबोध प्रश्न आहे.

आणि हो, शाळेत जे गणित शिकवतात त्याचा आयुष्यात काहीच उपयोग होत नाही असं काही नसतं.

काय म्हणता? 😊😊

(गणिताच्या शिक्षक मंडळींनी समीकरणं बरोबर आहेत का हे चेक करू नये. भावना महत्वाची. आणि तरुण मित्रांनी ही भावना कोण असा प्रश्न विचारू नये)

Thursday, 27 October 2016

पहिला इंटरव्ह्यू

साल १९८६. राम डिप्लोमा करून औरंगाबादहून पुण्याला आला. रिझल्ट लागायचा होता. रामचे वडील म्हणाले, नुसता काय टाईमपास करतोस. रिझल्ट लागेपर्यंत काही काम कर.

राम अशोकनगर ला राहायचा युनिव्हर्सिटी रोड ला. त्याच रोडला एक कंपनी होती. सुपर इंडस्ट्रीज नाव ठेवू यात तिचं. रामचे वडिलांनी कुणा ओळखीच्या माणसाला सांगितलं, सुपर मध्ये रामला काही दिवसासाठी जॉब मिळतो का ते बघ. त्या काकांनी चावी फिरवली अन रामला इंटरव्ह्यू चा कॉल आला.

राम इंटरव्ह्यू साठी कंपनीत गेला. तो त्याचा पहिलाच इंटरव्ह्यू. तळघरात कॉन्फरन्स रूम होती. दोन खुर्च्या मांडल्या होत्या. मध्ये टेबल. अन बाजूला टी पॉय. राम खुर्चीत जाऊन बसला.

इंटरव्ह्यू घेणारे संजय सर आले. ते त्यांच्या खुर्चीत बसले. बसल्यावर काही कळायच्या आत त्यांनी त्यांचे पाय बाजूच्या टी पॉय वर ठेवले. अन राम ला आय सी इंजिन बद्दल विचारलं. अन अजून काही प्रश्न विचारले. समोर ठेवलेले पायातले बूट बघत पहिलाच इंटरव्ह्यू देणाऱ्या आणि  गांगरलेल्या राम ने यथाबुद्धी उत्तरं दिली. प्रश्न संपल्यावर बायो डाटा समोरच्या टेबल वर फेकत संजय सर म्हणाले " तसं काही फार येत नाही तुला. पण त्या एम एस इ बी तल्या साहेबांनी शब्द टाकला म्हणून घेतो तुला. महिन्याचे ५०० रुपये देईल ट्रेनी म्हणून. परवा पासून ये कामाला"

टी पॉय वरचे पाय तसेच ठेवत त्यांनी रामला निरोप दिला.

घरी येऊन रामने वडिलांना सांगितलं की माझं सिलेक्शन झालं नाही. दोन दिवसांनी ते काका तणतणत घरी आले अन रामच्या वडिलांना म्हणाले "अहो काय तुमचा राम. सिलेक्शन होऊन ही जॉईन झालाच नाही" भास्कर रावांनी रामला बोलावलं आणि जरबेत विचारलं "काय रे काय म्हणतात काका. जॉईन का नाही झालास" राम म्हणाला "मला नाही आवडली ती कंपनी" तर काका म्हणाले "काम चालू न करताच तुला कसं कळलं कंपनी खराब आहे ते. तुझ्या वडिलांनी सांगितलं म्हणून मी शब्द........."

राम त्यांना अर्धवट थांबत म्हणाला "त्या सरांना इंटरव्ह्यू मध्ये लोकांशी कसं बोलायचं ते कळत नाही. जॉब करताना ते माझ्याशी काही नीट वागणार नाहीत" रामच्या नजरेतुन चीड ओसंडत होती. आणि राम तिथून निघून गेला.

नंतर भास्कर राव, रामचे वडील, रामच्या आईला सांगत होते "पोराला शिंगं फुटली आहेत. समजावा त्याला"

पुढे रामने भास्कररावांच्या सांगण्यावरून धनकवडी ला ३०० रुपये महिन्याला अशी नोकरी केली.

आज ३० वर्षे झालीत याला. उत्तर ऐकताना कुणी कानात काडी घातली म्हणून राम ने दिलेला जॉब पोराने नाकारला यात रामला काही वावगं वाटलं नाही. त्या पोराने मारलेले डायलॉग काल्पनिक असतीलही पण त्या पोराच्या नजरेत चीड रामला दिसली जी त्याच्या स्वतः च्या नजरेत ३० वर्षांपूर्वी वाहिली होती.

नजरेची भाषा फक्त प्रेमात बोलायची असं थोडीच आहे. व्ययवसायिक जीवनात पण वापरू शकता. 

मंजुळे

काही पिक्चर असे असतात की आपण जितक्यांदा पाहतो त्याच्या अजून प्रेमात पडत जातो. उदा: शोले.

काही पिक्चर असे असतात की आपण एकदाच पाहतो अन त्याचा इफेक्ट असा असतो की परत बघावा वाटत नाही. असं वाटतं, कुणास ठाव त्याची परिणामकता कमी होईल काय! मनावरचा त्याचा प्रभाव ओसरेल का! उदा: सैराट.

चला विषय निघाला तर सांगून टाकतो. माझी आई २३ सप्टेंबर ला जर्मनीला गेली. अडीच एक महिन्यासाठी. तिचे को पॅसेंजर होते, नागराज मंजुळे. आई ने काही ओळखलं नाही. मग बहुतेक दुसऱ्या कुणी सांगितलं असेल. फ्रँकफूर्ट एअरपोर्ट ला उतरताना त्या भल्या गृहस्थाने आईला बाहेर पडायला पूर्ण मदत केली, पार केबिन लगेज वरून काढेपर्यन्त. माझा मेव्हणा अमोल घ्यायला येणार होता, तर तो येईपर्यंत थांबू का असं ही विचारलं. सगळ्यात हाईट म्हणजे दुसऱ्या दिवशी मराठी लोकांनी आयोजित केलेल्या डिनर साठी आईला फोन करून निमंत्रण दिलं. विचारपूस केली, व्यवस्थित पोहोचलात का म्हणून. काही कारणाने आई जाऊ नाही शकली ती गोष्ट वेगळी.

मंजुळे साहेब, मानलं तुम्हाला. तुमच्याशी कधी भेट होईल असं काही संभवत नाही. या पोस्ट द्वारेच आभार अन सलाम तुम्हाला. 

पार्टनर १२

पार्टनर सिगरेट पित भिंतीत खिळे ठोकत होता.

"तुला माहित आहे पार्टनर, मी आतापर्यंत फेबु वर कुणाला मित्र विनंती नाही पाठवली"

"फेकू नकोस" सिगरेट ची राख फेकत राम निर्विकार पणे म्हणाला.

आयला, याला कसं कळलं म्हणून मी चपापलो.

"कशावरून म्हणतोस की मी फेकतोय" उसनं अवसान आणून मी विचारलं.

"हे बघ, खरं काय ते मला माहित नाही. पण मी तुला विचारलं की जे तू म्हणतोस ते सिद्ध करून दाखव, तर शक्य आहे का तुला? ज्या गोष्टी तू सिद्ध करू नाही शकत त्यावर शायनिंग का टाकतोस."

पुढं म्हणाला "तसं ही चमकोगिरी अशा गोष्टींची करत जा, जिथे quantifiable measures असतील"

दोन मिनिटानंतर मी त्याला म्हणालो

"तुला माहित आहे, एक दीड महिन्यांपूर्वी फेबुवर माझी ५००० मित्र संख्या पूर्ण झाली"

सिगरेट चं थोटुक पायाखाली चिरडत पार्टनर ने एक बेकार कटाक्ष टाकला अन म्हणाला "मग. पुढं काय?"

मी म्हणालो "अरे तूच म्हणालास ना quantifiable measures सांग म्हणून?"

तर राम म्हणाला "अरे, त्याने काही फरक पडतो का?"

"म्हणजे?"

"तुला सगळं कसं उलगडून सांगावं लागतं रे. म्हणजे रेल्वे चं जवळपास सव्वा लाख किमी चं नेटवर्क आहे त्यातून वर्षाला ८०० कोटी लोकं प्रवास करतात. किंवा वॉटर टेबल २०० फुटावर गेलं होतं ते जलसंवर्धनमुळे ३० फुटावर आलं. अशा गोष्टींचं कौतुक. अगदी थोडक्यात सांगायचं तर तुझ्या बिझिनेस मध्ये ४५ लोकं काम करतात अन तीन वेंडर्स चा बिझिनेस चालवण्यास तू कारणीभूत आहेस याचा अभिमान ठेव. आणि अभिमान ठेव, गर्व नाही. ५००० झाले म्हणतोय"

अन म्हणाला "चल निघतो मी. तसंही पोस्टची लांबी वाढेल तुझी. आणि हो, तुझ्या मित्रांना सांग, व पु च्या पार्टनर शी माझी तुलना नको. दोघांची जातकुळी वेगळी आहे"

पार्टनर निघून गेला.

मी जातकुळी या शब्दावरून काही राडा होईल का, याचा विचार करत बसलो. 😊😊

फर्स्ट ए सी

पुण्याहून अहमदाबाद ला निघालो आहे, ट्रेन ने. अहिंसा एक्स्प्रेस. (ट्रेन मध्ये आराम करायला मिळतो वगैरे कारणं झूठ आहेत. धंदा मंदीत असल्यामुळे विमानप्रवास परवडत नाही आहे). सेकंड ए सी अपग्रेड होऊन फर्स्ट ए सी मिळाला. मी पहिल्यांदाच फर्स्ट ए सी ने प्रवास केला.

फक्त दोन बर्थ असणारी केबिन मिळाली. अपर आणि लोअर बर्थ असणारी. इथे बर्थ ची रुंदी पण मोठी असते. केबिनला दरवाजा आहे. ज्याला आतून कडी लावता येते. आत कोण आहे हे बघण्यासाठी दरवाजाला काच आहे. पण तसं दिसू नये यासाठी आतून पडदा दिला आहे. ए सी चं तापमान अत्यंत आल्हाददायक ठेवलं आहे. मंद सुवास दरवळणारा रूम फ्रेशनर उडवला आहे. उबदार अशी दुलई दिली आहे. का कोण जाणे बर्थ सारखीच दुलई ची रुंदी पण मला सेकंड ए सी तल्या पेक्षा जास्त वाटते आहे.

रात्री पुणे स्टेशनवर टीसी म्हणाले, "सध्या एकटेच आहात. दरवाजाची कडी आतून लावू नका. रात्री कुणी प्रवासी आला तर तुमची झोपमोड होणार नाही"

रात्र झाली. गाडी पुढच्या स्टेशनवर थांबली. हा सिलसिला सकाळपर्यंत चालू राहिला. पण माझ्या केबिनमध्ये कुणीही आलं नाही.

तळटीप:

- फर्स्ट आणि सेकंड ए सी च्या बर्थच्या संरचनेत बदल असला तरी टॉयलेट च्या स्वच्छतेची लेव्हल सारखीच असते. (वेगळी का असावी, फर्स्ट ए सी तुन प्रवास केल्यावर तू गुलाबपाणी सोडतोस का? पार्टनर अशी कॉमेंट करेल)

- टीसी ने उल्लेख "प्रवासी" शब्द उच्चारला तेव्हा त्याच्या मनात तो शब्द पुरुषवाचक होता की स्त्रीवाचक याचा मी रात्रभर विचार करत होतो.

ऑम्लेटी

सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. माझे एक नातेवाईक त्यांच्या मुलाने कुठल्या बिझिनेस मध्ये जावं याची माझ्याबरोबर चर्चा करत होते. त्या मुलाला काहीतरी हॉटेलिंग मध्ये करायची इच्छा होती.

मी त्यांना फक्त अंड्यापासून बनवता येऊ शकेल अशा eating joint ची कल्पना सांगितली होती. Eggatarian हॉटेल. माझा तर प्रोजेक्ट रिपोर्ट पण डोक्यात होता. हॉटेल चं नाव ऑम्लेटी. अगदी इंटेरिअर सकट. म्हणजे फॉल्स सिलिंग ऑम्लेट सारखं दिसावं वगैरे. ऑम्लेट चे विविध प्रकार (अगदी fluffy ऑम्लेट) म्हणजे मसाला, एग व्हाइट, चीज, बटर, हाफ फ्राय आणि मग भुर्जी, scrambled eggs, एग करी, एग मसाला, एग राईस, एग सँडविच त्याच्या बरोबर उच्च क्वालिटीचा ब्रेड किंवा बन. बाजूला रोस्टेड कॉफी चं मशीन अन एक सॉलिड ambience.

माझ्या नातेवाईकांनी पण सेक्सी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला होता. गाडी कुठे बारगळली ते कळलं नाही. Project never took off. पण दोन एक वर्षात एक्स्प्रेस वे वर मॉल मध्ये एग संडे नावाचं तसं दुकान दिसलं अन आता तर निलायम च्या जवळ अथर्व नावाचं असं दुकान निघालं आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. सिंहगड रोड happening road झाला आहे. नांदेड सिटी जवळ कुणाला असा जॉईंट टाकता आला तर धूम पळेल. सिंहगड ला जाणारे हवशे गवशे ब्रेकफास्ट ला थांबतील. शनिवार रविवार उभं राहायला जागा मिळणार नाही.

आणि ले फार्म मध्ये कोंबड्या जी अंडी देतात त्यात चिकन तयार होत नाही म्हणजे ती अंडी बाय प्रॉडक्ट आहे कोंबडीचं. म्हणजे गाय म्हशीच्या दुधासारखं. व्हेज एकदम.

त्यामुळे कोंबडी आधी की अंडं या विचारात पडू नका. आपल्यासाठी अंडं च आधी.

प्रोजेक्ट सुचवला आहे आणि टाकलाच तर मी ऑर्डर देईल बरं "एक डबल एग व्हाइट मसाला ऑम्लेट विथ  ब्राऊन ब्रेड टोस्ट" कन्सल्टिंग फीस म्हणून फक्त पहिल्या ऑर्डर चे पैसे माफ कराल.

मग कधी चालू करताय "ऑम्लेटी"

धंदा १

तर अमोल चौधरी ने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मी दोन धंदे लिहिले होते. दुसऱ्या धंद्याबद्दल सांगायच्या आधी एक वस्तुस्थिती सांगतो.

रिक्षा........बारकाईने बघितलं तर आजच्या ऑटोमोबाईल मधलं सगळ्यात बंडल डिझाइन. ऊन, थंडी अन पाऊस यातून कुठलंही संरक्षण न करणारं, अपघात झालाच तर बॉडीची पूर्ण वाट लावणारं (म्हणजे, वाहनाच्या आणि माणसाच्या), वर्षानुवर्षे न बदललेलं, सगळ्यात मोठा चेंज काय तर फ्रंट इंजिन, रिअर केलं आणि आता सी एन जी आलं. पण अदरवाईज काहीच फरक नाही. बजाज आणि टी व्ही एस ची तरी चांगली आहे रिक्षा पण दोन ते तीन वर्षात पूर्ण खुळखुळा होणारा त्या पियाजो च्या मूळ डिझायनर ला साष्टांग प्रणिपात.

आणि या सगळ्यांवर कडी म्हणजे रिक्षाचा धंदा करणाऱ्या लोकांची वृत्ती. वर्षानुवर्षे एकाच गाडीवर त्याच पद्धतीने, की ज्यात बहुतेक व्हॅल्यू सिस्टम मध्ये लोकांना लुबाडणे, अरेरावी करणे, कस्टमर ला गरज असेल तेव्हा अडवणूक करणे असे गुण उधळले जातात. (अपवादानी स्वतः ला सन्माननीय समजणे). किंबहुना इतके सारे दुर्गुण असताना हा धंदा इतके वर्ष तगला हे आपल्या समाजाच्या पराभूत मानसिकतेचं एक लक्षण आहे.

पण आता वरील कारणामुळे या धंद्याला घरघर लागली आहे.  ओला अन उबर या लोकांनी धूम मचवली आहे. पण अजूनही धंद्यात स्कोप आहे असं मला वाटतं. पुण्यात एकूण ऐंशी एक हजार रिक्षा असाव्यात. पुढच्या दहा एक वर्षात रिक्षा पुणे आणि बऱ्याच शहरांच्या रस्त्यावर नसतील असा माझा अंदाज आहे. अन पब्लिक ट्रान्सपोर्ट वर्ल्ड क्लास बनायला किती दशकं जातील हे देव जाणे. विचार करा आज रस्त्यावर असणाऱ्या ६०००० रिक्षा नसतील तर टॅक्सी किती लागतील.

सरासरी पाच रु किमी इंधनाचा खर्च, पन्नास पैसे किमी मेंटेनन्स, २ रु किमी ड्रायव्हर आणि दोन रुपये किमी लोन इंटरेस्ट.  साडेनऊ रु प्रति किमी हा सेदान गाडीचा खर्च आहे. सध्या तिचा रेट १२ ते १४ प्रति किमी मिळतो. ड्रायव्हर ठेवून ही सरासरी २ रु प्रति किमी फायदा आहे. खर्च जाऊन रु २०००० प्रति महिना. त्यात स्वतः गाडी चालवली अन लोन नसेल तर सरळ रु ५०००० प्रति महिना कमाई.

उगाच नाही अमिताभ बच्चन अन रतन टाटा ओला मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत.

कष्ट आहेतच पण एका टॅक्सी मध्ये एका कुटुंबाला जगवायची ताकद आहे.  दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना आज कुणी साथ दिली असेल तर टॅक्सी धंद्याने.

बघा, विचार करा अन............स्टार्टर मारा. 😊😊

पार्टनर ११

सचिनने राजीनामा दिला आणि माझ्या तोंडून शब्द पडले "खऱ्याची दुनिया नाही राहिली. यांच्याशी कितीही चांगलं वागा, वेळेवर टांग देतातच".

पार्टनर ने विचारलं "कुठे चाललाय सचिन"

मी म्हणालो "असेल इथं कोणत्यातरी आपल्या सारख्या कंपनीत"

तर पार्टनर म्हणाला "अरे सेगमेन्ट सोडून जात नाही आहे ना. नशीब समज. आपल्या इंडस्ट्रीत राहतोय ना, ठीक आहे मग"

"अरे, पण यांना ट्रेनिंग द्यायचं, जीव तोडून. स्किल सेट शिकवले की जास्तीच्या चार पैशांसाठी हे दुसरीकडे जाणार"

पार्टनर: असलेल्या मॅन पॉवर च्या १०% गव्हर्नमेंट ट्रेनी इंजिनियर म्हणून अप्रेंटीस म्हणून घ्यायचे नियम आहे. त्याला तू हरताळ फासतोस. ट्रेनिंग दिलं तर एक उत्तरदायित्व पूर्ण केलं असं समज की. आणि लक्षात ठेव तुझ्या लोकांना असं ट्रेनिंग दे की बाहेर लोकांनी विचारलं पाहिजे, आधी सर्व्हिस ला कुठं होतास ते. नाव काढलं पाहिजे सेटको चं त्यांनी.

मी: आयला हे बरं आहे. म्हणजे आम्ही पोरांना शिकवायचं आणि त्यांनी मात्र..........

पार्टनर: पूर्ण ऐक तर. त्यांना ट्रेनिंग दे आणि त्यांना असं ट्रीट कर की त्यांनी तुझी कंपनी सोडताना चारदा विचार केला पाहिजे.

मी: म्हणजे

पार्टनर: म्हणजे

"Train your employees so well that they can leave your organisation

And treat them so good that they do not think of leaving your company."

"तुझ्या उर्वरित प्रोफेशनल लाईफ चं हे एक तत्व ठेव."


पार्टनर चा युक्तिवाद बिनतोड असतो. मी होकारार्थी मान डोलावतो. पर्याय तरी काय आहे दुसरा. 

तो

पहाटेची वेळ. साडे चार वाजले असतील. मी आळोखे पिळोखे देत हॉल मध्ये आलो. तो ही आला अन म्हणाला "चल, आटप लवकर. मॉर्निंग वॉक ला जायचं आहे." मी म्हणालो "हे दररोज चं काय आहे रे. तसंही दिवसभर ऑफिसमध्ये धावपळ होतेच की. चालणं म्हणशील तर सहा सात किमी चालतो मी दिवसभरात. तो व्यायाम नाही का मग". तर तो म्हणाला "अरे तो थोडी एक्सरसाईज. ते करताना तू टेन्शन मध्ये असतोस. एक्सरसाईज आणि टेन्शन हे बेकार कॉम्बिनेशन आहे. त्यालाच तर एक्सरशन म्हणतात"

मी पोहोचलो रामटेकडी वर. सव्वापाच साडेपाच ची वेळ. किर्र अंधार होता अन दाट झाडी. त्यातून जाणारी एकच पायवाट. चंद्राच्या प्रकाशात दोन एक फुटपर्यन्त अंधुक दिसत होतं. धीर केला अन चालू लागलो. तो होताच बरोबर.  मी म्हणालो "आपण  चालतोय अन समजा एखादा साप किंवा एखादं पिसाळलेलं कुत्रं अंगावर धावत आलं तर काय करणार. फाटेल माझी. त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं या विचारानेच माझा थरकाप उडतोय"

तो म्हणाला "हे तुझं असं आहे. म्हणजे तुला आव्हान घ्यायला आवडतं. पण त्या आव्हानाने प्रति आव्हान उभं केलं तर तुला प्रेशर्स असह्य होतात. आणि तुझी एखाद्या गोष्टीला hypothetical पद्धतीने हाताळण्याची विचारधारा. मग तुझ्या हृदयाच्या वाहिन्या तुंबतात. नशिबाने आता पर्यंतच्या आव्हानांना उत्तर देताना तुझी पावलं बरोबर पडली ते ठीक आहे. आता कसं मिणमिणत्या प्रकाशात का होईना काळजीपूर्वक पाऊल टाकतोस तसं तुला आयुष्यात ही प्रश्नांना उत्तर शोधताना छोटे छोटे थ्रेड मिळतात. अशा छोट्या धाग्यांनी मिळून एक मजबूत दोरी तयार होते अन मग तो विधाता त्या प्रश्नाच्या गर्तेतून तुला वर ओढतो.  Otherwise I can say that you like to take challenges but not pressures arising out of them"

मी म्हणालो "पण हे असं कुठपर्यंत चालू राहणार?"

तर तो म्हणाला "जब तक है जान. जोवर तुझा जीव कंपनीत आहे अन तुझ्या अंगात जीव आहे, तोवर हे चक्र चालू राहणार. दोनपैकी एक गोष्ट नसेल तेव्हा तुझी सुटका होणार"

"अरे, पण एखाद्याची कपॅसिटी......"

"तो विचार नको करुस. आपल्या हातून भव्य दिव्य"च" घडायला पाहिजे असं काही नाही आहे. हा जो "च" आहे ना, तो खूप प्रॉब्लेम्स घेऊन येतो आयुष्यात. Do not burn the bridges. तू जगात यायच्या आधी ही हे जग चाललं होतं अन नंतर ही चालणार आहे. स्वतः ला खूप जास्त सिरियसली घेतलं की दररोजच्या आयुष्यातल्या आनंदाला तिलांजली द्यावी लागते."

त्याच्याशी बोलता बोलता रामटेकडी पूर्ण पार झाली. त्या भरार पहाटवाऱ्याचा आस्वाद घ्यायला तिथे दुसरं कुणीच नव्हतं.

एव्हाना झुंजूमुंजू झालं होतं, तांबडं फुटलं होतं. अन त्या प्रकाशात मला समोरचा रस्ता आता स्पष्ट दिसत होता.

"तो" कोण तुम्हाला माहित आहे. तुमची ओळख झाली आहे त्याच्याशी. 

मिस्त्री

आपली काही इतकी मोठी पोहोच नाही बुवा की टाटा ग्रुप ने मिस्त्री साहेबाना का उडवलं याच्यावर भाष्य करू शकेल. हो म्हणजे गेल्या १४ वर्षात पहिल्यांदा एका मॅनेजर ला मी ऑगस्ट मध्ये उडवला. पण तसं करताना माझीच जास्त फाटली होती. ते करण्याआधी त्याच्या परफॉर्मन्स चं मॉनिटरिंग आणि हे कळणं की हा आपला मिस हायर आहे हे जास्त तापदायक होतं.

पण जे झालं ते दुर्दैवी. अन ते ही टाटा सारख्या ग्रुप मध्ये. परत चार वर्षांनी. आणि सायरस मिस्त्री पण कुणी लुंगे सुंगे नव्हते. शापुरजी पालनजी घरातले, जे टाटा सन्स चे सगळ्यात मोठे शेअर होल्डर. कसलं वादळ झालं असेल याची कल्पना आपण सामान्य लोकं नाही करू शकत. इन्फोसिस मध्ये नारायण मूर्तींना असंच परत यावं लागलं होतं. अर्थात टाटा ग्रुप काहीतरी भारी डिसीजन घेतलीच आणि ह्या सगळ्या प्रकारातून बाहेर पडतील याबद्दल शंका नाही.

काही दिवसांपूर्वी टॉप ग्रेडिंग नावाचं पुस्तक वाचलं. त्यात मिस हायर च्या पोटी चुकवलेली किंमत ही त्यांच्यावर डायरेक्ट केलेल्या खर्चाच्या १५ ते २० पट असते असं प्रुव्ह करून दाखवलं होतं. म्हणजे मिस्त्री साहेबांचं वार्षिक रेम्युनरेशन १८ कोटी वगैरे असावं. चार वर्षात ७२ कोटी आणि त्याच्या १५ पट. म्हणजे हजार एक कोटी स्टेक ला लागले. अर्थात साडेचार लाख कोटी रेव्हेन्यू असलेल्या टाटा ग्रुप ला हा धक्का फार मोठा नाही.

मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. आपण आपलं त्यांना क्रयासिस मधून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा देण्याशिवाय फार काही वेगळं म्हणू नाही शकत. 

Sunday, 16 October 2016

Training

"Professionalizing business for sustainable growth" हो असाच विषय होता पॅनल डिस्कशन चा. या विषयावर बोलण्यासाठी मी विचार करत होतो. तेव्हा काही गोष्टी लक्षात आल्या. त्या साधारणपणे मांडल्या आहेत.

माझी कंपनी सध्या छोटी आहे. वर्षे सरतील अन कुणास ठाव ती मोठी होईल ही. पण ती फक्त मोठी होऊन कामाचं नाही तर तसं होताना काही मूळ सिद्धांतावर ती उभी राहिली पाहिजे असं माझं मत आहे. आता हे मूळ सिद्धांत कोणते अन त्यावर कंपनीचा डोलारा कसा उभा राहील हे समजून घेणं म्हणजे कंपनीला खऱ्या अर्थाने व्यावसायिक बनवणं. आणि तसं करणं हे कंपनीला लंबी रेस का घोडा बनवतं.

काही कंपनी आपल्याला माहित आहेच. टाटा, आज जवळपास १५० वर्षे झालीत, अत्यंत दमदार वाटचाल करत आहे. अमेरिकेत तर अशा कित्येक कंपन्या आहेत की ज्यांचं वय हे दोनशे वर्ष आहे. कशा चालत असतील या कंपन्या. 

हे सगळं आपल्याला कळणार कसं? एक केस स्टडी म्हणून मला स्वतः ला घेतलं, तर करिअर ची पहिली पाच वर्षे मी एस के एफ मध्ये काढली. म्हणजे तेव्हा मी अगदीच बाळ होतो. त्यानंतरची आठ वर्षे मी बंगलोर च्या रॊलॉन हायड्रॉलिक्स नावाच्या कंपनीत होतो. कंपनी बंगलोर ला अन मी पुण्याला. अन मी हार्ड कोअर सेल्स चा माणूस. सेल्स शिकलो पण व्यावसायिकता नाही. आणि त्यानंतर बिझिनेस. बरं घरात बिझिनेस चं वातावरण नाही. लहान भावाने व्यवसाय चालू केला पण ते ही माझ्यासारखं. आपल्यांनंतर कंपनीची लीगसी वर्षानुवर्षे असली पाहिजे असं वाटत होतं. पण ते कसं करायचं ते कळत नव्हतं. 

पण हि जी भावना आहे की "आपल्यानंतर कंपनीची लीगसी वर्षानुवर्षे असली पाहिजे" ही कंपनीला व्यावसायिक पद्धतीने चालवायच्या इच्छेची पहिली खूण  आहे. आणि या जोडीला "माझ्या नंतर माझ्या कंपनीची सूत्रे माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या (जावयाच्या) हातात असली पाहिजे" अशी इच्छा "नसणं" ही त्या व्यवसायिकतेची दुसरी खूण आहे. त्याच पद्धतीने मी कंपनी चालवली अन त्याचमुळे २०१२ साली जेव्हा मी कंपनी सेटको ला विकली तेव्हा माझ्या पोटातलं पाणी थोडं पण हललं नाही. बाकी सगळे आर्थिक व्यवहार सोडले तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे माझ्या कंपनीचं वय अचानक शंभर वर्ष झालं. कारण सेटको ची स्थापना अमेरिकेत १९१२ साली झाली आहे. 

पण तरीही एक मोठा पेन एरिया होता अन तो म्हणजे human asset management. म्हणजे कंपनी वाढत चालली आहे. लोकं वाढत चालली आहेत. आता ह्या सगळ्यांची ग्रोथ मोजायची कशी? हा एक मोठा प्रश्न होता.

म्हणजे पहिले दोन प्रश्न आणि हा तिसरा पेन एरिया. या प्रश्नांवरती उत्तर काय याच्या शोधात असताना मला एका ट्रेनर बद्दल माहिती झाली. आज नाव नाही लिहीत, पण ह्या ट्रेनर ची पद्धत वेगळी होती हे नक्की. त्याच्या आधी मला अनेक जण भेटून गेले. "One minute success" किंवा "एका दिवसात उद्योजक बना" अशा पद्धतीचे. मुळात उद्योजक असणं हे संपत नाही, तर तो एक प्रवास असतो. आपण आपल्या  एम्प्लॉईज ला ट्रेनिंग देतो, जेव्हा कारसाठी ड्रायव्हर बघतो तेव्हा त्याला कार व्यवस्थित चालवता येते का, ते बघतो. पण मग त्याच पद्धतीने स्वतः उद्योजक व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षित आहे का, हा प्रश्न तितक्याच तीव्रतेने विचारतो का? 

मला असं वाटतं की तो प्रश्न विचारायला हवा. आणि नुसता उद्योग चालवणं म्हणजे पैसे कमवायचे हाच जर उद्देश असेल तर अशा प्रशिक्षणाची गरज नाही. पण वर लिहिलेले तीन मुद्दे जर तुम्हाला व्यवसायात जोपासायचे असतील तर असं प्रशिक्षित होणं अत्यंत गरजेचं आहे. 

असा प्रशिक्षक निवडताना काळजी घ्यायला हवी हे नक्की. सगळ्यात आधी म्हणजे, त्या प्रशिक्षकाने हे सगळं सोसलं असलं पाहिजे. म्हणजे उद्योजकता प्रसवताना जो त्रास होतो तो एखाद्या बाळंतिणी पेक्षा कमी नसतो. आणि त्या ट्रेनर ने जर ते अनुभवलं असेल तर तो  तुम्हाला तो त्रास कसा सहन करायचा ते शिकवतो. हो, आणि एक.  जर कुणी तुम्हाला म्हंटल की  तुम्हाला त्रास होणारच नाही असं शिकवतो, तर तो फेकतो आहे हे खुशाल समजावं. त्रास होणारच, तो त्रास कसा सहन करायचा ह्याचं प्रशिक्षण घेणं म्हणजे उद्योगात व्यावसायिकता आणणे. 

मी जो कोर्स केला त्यात मूळ सिद्धांताविषयी (Core values) आणि मूळ उद्देश (Core purpose) बद्दल शिकवलं गेलं. हे किती महत्वाचं आहे, नाही? म्हणजे आपण आलो का या पृथ्वीवर? त्या कोर्स ची फी तगडी आहे. पण हे मूळ सिद्धांत आणि मूळ उद्देश हे माहिती होणं बेशकिमती आहे. अजोड आहे. याची किंमत होऊ नाही शकत. 

सगळ्यात मुख्य म्हणजे मला माझा विकनेस कळाला. आणि अर्थात स्ट्रॉंग पॉईंट पण. आता त्या माझ्या वीक पॉइंटवर मी जीव तोडून काम करतो आहे. 

आणि दुसरा एक मुद्दा आहे. मी हा कोर्स करतो आहे. आणि आपली मैत्री आहे. तर मी तुम्हाला हे सगळं शिकवू शकतो का? तर उत्तर आहे ........ "नाही". या ट्रेनर लोकांनी त्याचा एक स्ट्रक्चर्ड फॉरमॅट बनवला असतो. त्या लॉजिकल सिक्वेन्स ने ते शिकवत गेलं तर ते तुमच्या गळ्यात उतरतं. कदाचित उद्या मी "ट्रेनिंग"   हाच व्यवसाय केला तर शिकवू शकेल ही, पण आज नाही.

अन सगळ्यात शेवटी महत्वाचं: 

- अशी व्यावसायिकता आणली म्हणजे तुमची कंपनी अनेक दशकं चालेलच का?

- आणि व्यावसायिकता म्हणजे तुमच्या मुलाला किंवा मुलीला उद्योगाची सूत्रे द्यायचीच नाहीत का?

दोन्ही प्रश्नांची उत्तरं "नाही". असं ट्रेनिंग गॅरंटी कशाचीही देत नाही, पण शक्यता मात्र तयार होते. 

तसंही, जन्म मरणाच्या फेऱ्यात गॅरंटी फक्त जन्म आणि मरण याचीच असते. बाकी तर फक्त शक्यता असतात.   

Friday, 7 October 2016

चीन १

तर मुद्दलात राडा कसा आहे ते सांगतो.

तुम्हाला पी सी बी माहित आहे का? नाही नाही, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाही. मी म्हणतो ते प्रिंटेड सर्किट बोर्ड. तर पीसीबी हा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचा जीव कि प्राण असतो. म्हणजे डोअर बेल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, मायक्रोव्हेव या प्रत्येक घरगुती उपकरणात पीसीबी वापरतात. बरं तुमची बाईक असेल, कार असेल किंवा तुमचं विमान असेल तर या प्रत्येक वाहनात पीसीबी चं अनन्यसाधारण महत्व आहे. कोणत्याही मशिन्स, मेडिकल इक्विपमेंट यात पीसीबी असतातच. हे पीसीबी सिंगल लेयर आणि मल्टि लेयर अशा दोन प्रकारात येतात. मल्टी लेयर पीसीबी मुळे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची साईज लहान होत चालली आहे.

भारतात जितके इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं बनतात त्याला जे पीसीबी लागतात, त्याच्या फक्त १०% भारतात बनतात. आणि ८०% पीसीबी हे चीन मधून इम्पोर्ट होतात. आणि खरी गंमत पुढे आहे मित्रांनो. हे जे दहा टक्के पीसीबी भारतात बनतात त्याचं शंभर टक्के रॉ मटेरियल हे चीन मधून इम्पोर्ट होतं. आणि नुसतं भारताला च नाही तर जगाला चीन हे रॉ मटेरियल सप्लाय करतं. अख्ख्या भारताचं पीसीबी चं प्रोडक्शन जितकं आहे तितकं चीन मध्ये एक कंपनी करते आणि अशा किमान १५ कंपन्या आहेत.

अजून एक छोटा हिशोब सांगतो. ह्या पीसीबी इंडस्ट्री मध्ये स्पिन्डल लागतात. माझ्या अंदाजाने भारतात ५००० स्पिन्डल वापरले जात आहेत. चीन मध्ये एका छताखाली २००० स्पिन्डल असलेल्या किमान १० कंपन्या मला माहित आहेत.

कळतं का चीन कुठपर्यंत तुमच्या घरात घुसलं आहे ते. राष्ट्रभक्तीच्या वल्गना करताना जरा थोडा अभ्यास करा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा. नाहीतर आपलं उचललं बोट, अन दाबला की बोर्ड. केलं फॉरवर्ड. आणि हे तर मी तुम्हाला पीसीबी चं सांगितलं. अजून दोन उद्योगाबद्दल अशीच माहिती देऊ शकतो. अहो आपल्या इथे २०० किमी प्रति तास ही रेल्वे करण्याचा विचार आज आहे ना तिथे चीन मध्ये ३५० किमी प्रतितास इतक्या वेगाने रेल्वे पळत आहेत.

त्यामुळे मनगटात दम असेल ना तर हे पीसीबी सारखे प्रॉडक्टस भारतात चीन पेक्षा कमी भावात बनवून दाखवा.  अन हे शक्य आहे. आज भारताचा लेबर चीन पेक्षा अर्ध्या भावात मिळतो. पण त्याला जोड लागते ती सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती ची. ती नाही म्हणून हे असले बहिष्कार वगैरे पळपुटे आवाहन करावे लागतात. बाबा रामदेव परवडला. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून लिव्हर आणि पी अँड जी च्या उरात धडकी भरवली त्याने. एखाद्या प्रॉडक्ट ला संपवायचं असेल तर त्याच्या पेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून संपवता येतं, बहिष्काराने नाही.

काल सांगितलं तसं चीन देश म्हणून मला अजिबात झेपत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे.

तेव्हा असले मेसेजेस फॉरवर्ड करून स्वतः चे हसे नका करून घेऊ. चीन च्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्या ऐवजी, प्राचीन अन अर्वाचीन भारताच्या इतिहासाचा वृथा अभिमान सोडा. त्यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे.

शेवटच्या वाक्यात यमक सॉलिड जुळलं आहे

चीन २

आतापर्यंत जे अनुभवलं, वाचलं आणि ऐकलं त्यावरून माझ्याच चष्म्यातून..........चीन.

कालच्या आर्टिकल मध्ये राहुल अकोलकर आणि सौरभ परांजपे या युवा उद्योजकांनी कॉमेंट केल्या त्यावरून जे सुचलं ते लिहितो.

चीन च्या आणि आपल्या उत्पादनाचा जर तौलनिक अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की चीन हा लो कॉस्ट आणि हाय volume या असे प्रॉडक्टस आपल्याकडे पाठवतो. अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की याची क्वालिटी जर खराब असेल, आणि ती बहुतेकदा असतेच, तर त्याविरुद्ध दाद मारायला काही यंत्रणा नाही आहे. पण मुळात त्याची किंमत इतकी कमी असते की त्याविरुद्ध आवाज उठवण्याची आपली इच्छा होत नाही. मुख्य म्हणजे त्या खराब क्वालिटी चा आपल्या दैनंदिन जीवनात फार मोठं नुकसान होत नाही. आणि त्यामुळे आपण बेफिकीर राहतो. २००५ मध्ये मी चीन मध्ये एक लगेज आणि ब्लेझर घेतला होता. लगेज तर इथे येईपर्यंत तुटलं आणि तो स्वस्त ब्लेझर इतक्या भंगार क्वालिटी चा सापडला की मोन्यूमेन्ट म्हणून लटकवून ठेवला आहे.

ह्या उलट आपला भारत देश. लॉ व्हॅल्युम पण हाय कॉस्ट आणि क्वालिटी मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाची, अशा प्रॉडक्टस मध्ये जगभर पॉप्युलर आहे. याचं मोठं उदाहरण म्हणजे, राहुल ने सांगितलं ती ऑटोमोबाईल इंडस्ट्री. दशकापूर्वी मोठी बातमी आली होती, चायनीज उत्पादक येणार म्हणून. पण भारतीय उद्योजक लोकांच्या  कल्पकते समोर आणि राजकीय इच्छाशक्ती समोर चायनीज भारतात प्रवेश पण करू शकत नाही. इतकंच नाही तर ऑटोमोबाईल मध्ये लागणाऱ्या मेकॅनिकल पार्टस मध्ये सुद्धा भारतातील उत्पादकांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर वरचष्मा टिकवून ठेवला आहे.

मी ज्या इंडस्ट्री ला रिप्रेझेन्ट करतो तो मशीन टूल इंडस्ट्री. अतिशय कॅपिटल इंटेनसिव्ह. इथे सुद्धा चायनीज कंपन्या शिरकाव नाही करू शकल्या. त्या देशाचं captive कंझमप्शन हा जरी एक इश्यू असला तरी चायनीज प्रॉडक्ट ची खराब क्वालिटी हा एक मोठा मुद्दा आहे. आमच्या कडे चायनीज स्पिन्डल रिपेयरला येतात. अत्यंत दरिद्री क्वालिटी चे  असतात ते.

सगळ्यात बेकार गोष्ट या चायनीज लोकांची आणि ती म्हणजे अतिशय खालच्या पातळीची विश्वासार्हता. आमचे बीडकर काका आहेत फेबुवर. स्टॅंडर्ड हैड्रोलिक्सच्या पंजाबी उद्योजकाला चायनीज कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटर च्या डील मध्ये करोडो रुपयाला कसा गंडा घातला याची सुरस कथा त्यांच्याकडून ऐकावी. माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला एका निर्जन गावात बिझिनेस डील फायनल करण्यासाठी नेलं आणि धाकदपटशा करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. अक्षरश: जीव वाचवून पळून यावं लागलं होतं. मी सुद्धा तीस एक चायनीज बिझिनेस प्रोफेशनल्स बरोबर संवाद साधला आहे. इतक्या टीचभर लोकांशी बोलून सगळ्या देशाचा अंदाज बांधणं चुकीचं हे कळतं मला, पण मी ज्यांना भेटलो त्यातले बहुतेक सुमार बुद्धिमत्तेचे आणि आढ्यताखोर असे वाटले. चायनीज लोकांनी कसं गंडवलं याच्या अजून चार पाच कथा माझ्या पोतडीत आहेत. दुसऱ्यांच्या बौद्धिक संपदेचा आदर (ड्युरा सेल ची भारी स्टोरी आहे यावर) आणि आर्थिक शिस्त नावाचा प्रकार या चायनीज मंडळींच्या जवळपास ही फिरकत नाही. आपल्याकडे जे प्रॉडक्टस सप्लाय केले जातात ते खूप कमी प्रॉफिट मार्जिन वर बनतात. पण थोडंही काही बिघडलं की ते दिवाळखोरी घोषित करतात. पण ती केल्यावर त्यांना वाळीत टाकलं जात नाही तर तिथलं राजकीय सपोर्ट आणि बँकिंग सिस्टम त्यांना परत दिवाळखोरी करण्यासाठी उभं करते.

आपल्याला जे चांगले चायनीज प्रॉडक्टस मिळतात ते पाश्चात्य आस्थापनेखाली बनले जातात. त्याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे Apple. फॉक्सकोन नावाच्या तैवानीज काँट्रॅक्ट उत्पादकाबरोबर apple चे बिझिनेस मॉडेल बेजोड आहे.

हे आहे असं आहे.  चायनीज प्रॉडक्टस ला नाकारा ते त्यांची क्वालिटी भंगार आहे म्हणून ना की देशभक्तिच्या नावाखाली.  क्वालिटी बेकार आहे हा मेसेज चायनीज प्रॉडक्टस ला कायमचं हद्दपार करेल. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की चीन ने पाकिस्तानवर अटॅक केला तर त्यांचे गचाळ प्रॉडक्टस सुद्धा आम्ही आनंदाने वापरणार!?

अत्यंत राक्षसी म्हत्वाकांक्षेने झपाटलेल्या चीन ला मानवता विरोधी वर्क प्रॅक्टिसेस ची काळी किनार आहे. त्यांच्या एकुणात वर्क कल्चर पेक्षा आपल्या भारतात उन्नत मान व्हावी अशी वस्तुस्थिती आहे.

थोडक्यात सांगायचं तर चीन जसा आहे तसाच राहिला तर ते त्यांच्यासाठी कबर खणत आहेत. आणि तसं नाही झालं तरी त्यांची तथाकथित डोळे दीपावणारी प्रगती त्यांनाच लखलाभ. आपण भारतीयांनी आपली उद्योजकता वापरून, फ्रुगल इंजिनीअरिंगने, स्वस्त किमतीत उच्च दर्जाची क्वालिटी देऊन, Make in India आपल्या अंगात भिनवून आणि सगळ्यात महत्वाचे हे करताना एथिकल वर्क प्रॅक्टिसेस ची कास धरून या चायनीज प्रॉडक्टस ला हद्दपार करू यात.......... बहिष्काराने नव्हे.

माझ्या लेखी देशभक्ती किमती आहे. व्यापाराशी तिची सांगड घालण्याइतकी स्वस्त नाही आहे.

Thursday, 6 October 2016

डबल ढोलकी

एक देश म्हणून चीन मला अजिबात आवडत नाही. त्यांच्या काही प्रोडक्टस ची क्वालिटी दळभद्री आहे. ते मी वापरत नाही. पण काही प्रोडक्टस मात्र भारी आहेत. ते मी वापरणार.

सध्याच्या सरकारच्या बऱ्याच पॉलिसी मला आवडत नाही. पण  दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून पी ओ के मध्ये दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. त्याचे पुरावे मला मागावेसे वाटत नाही. पण जे मागतात, त्यांनाही ते मागण्याचा हक्क आहे असं माझं मत आहे. कारण ती त्यांची बुद्धी आहे. तसंही २० जुलै १९६९ रोजी अपोलो चंद्रावर गेलं नाही असे म्हणणारे महाभाग आहेत. ट्वीन टॉवर अमेरिकेच्या संरक्षण खात्याने उडवले असेही तारे लोकं तोडतात. उद्या ओसामा ला मारलं  नाही असं लोकं म्हणू शकतील. गांधी नावाचा फायदा घेण्यासाठी नेहरूंनी इंदिरा मॅडम ला फिरोज गांधींच्या प्रेमात पडायला भाग पाडलं हे ही लोकं बरळू शकतात. लोकांच्या अशा विचित्र स्टेटमेंट्स ला किती महत्व द्यायचं हे माझ्या हातात आहे. पण त्यांना शिव्या देण्याचा आततायी पणा माझ्याकडून होणार नाही याची गॅरंटी आहे.

साधारण पणे माझ्यासारख्या लोकांना डबल ढोलकी किंवा दांभिक म्हणतात. काही लोकं माझ्या सारख्याना षंढही  म्हणतात. त्यांना तसंही  म्हणण्याचा हक्क आहे असं मी मानतो.

बोलणाऱ्याचे तोंड अन काम करणाऱ्याचे हात तुम्ही पकडू शकत नाही. आम्ही हाताचा वापर करणारे कामगार. आम्ही शांतपणे काम करतो.

आता बोला! तुम्हाला तोंड दिलंय. पुढं काय.

पाकिस्तानी

काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बंगलोर मध्ये IPCA ने अरेंज केलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात आम्ही भाग घेतला होता. आमच्या बूथ वर एक पाकिस्तानी एक उद्योजक व्हिजिटर म्हणून आला होता. त्याचं नाव आता आठवत नाही. झहीर ठेवू. पाकिस्तानचा म्हणून मला जरा कुतूहल वाटलं. मी त्याला बसायला खुर्ची वगैरे दिली. कॉफी मागवली. आणि पाकिस्तानातील औद्योगिक वातावरणाबद्दल काही प्रश्न विचारले. त्याने त्याच्या उर्दू भाषेत काही गोष्टी सांगितल्या.

"कुठला बिझिनेस अन कसलं काय साहेब. काही वर्षे मी इंग्लंड मध्ये जॉब करून स्वतः च्या देशात काही उद्योग थाटावा म्हणून पाकिस्तानात परत आलो. (EMS) काही लष्करी कॉम्पोनंट सोडले तर मॅन्युफॅक्चरिंग शून्य आहे. आमच्या देशात तुम्हाला जगातल्या उत्तमोत्तम कार्स दिसतील पण त्या डायरेक्ट इंपोर्टेड असतात. असं बेकार वातावरण आहे आमच्या इथे, कोण प्लांट टाकणार. मी इथे प्रदर्शनात आलो आहे. मला तुमचा सगळ्यांचा हेवा वाटतो. किती प्रोग्रेसिव्ह वातावरण आहे. आमच्या इथले सरकार लष्कराच्या हातातले बाहुले आहे. हिंदुस्थान विषय निघाला की त्यांना तुम्ही केलेली प्रगती दिसत नाही फक्त काश्मीर दिसतं." आणि बरंच काही बोलत होता तो.

जाताना म्हणाला "निघताना आपण घरी यायचं निमंत्रण देतो. मी पण देतोय. कधी वेळ आलीच तर मी मेहमाननवाजीत कमी पडणार नाही. पण मला माहित आहे, तुम्ही येऊ शकणार नाही. शेवटी स्वर्गातून नरकात कोण येईल"

त्याच्या हातातला हात सोडवून घेताना मला कसंसंच वाटलं. 

पार्टनर १०

आमच्या एका ट्रेनर ने आम्हाला प्रश्न टाकला. "Tell me five things that you do which create wealth in your organisation".

मी विचार करत बसलो. काही सुधरलं नाही. शेवटी मग पार्टनर वर हा प्रश्न फेकला. पार्टनर म्हणाला दहा मिनिटे दे.

दहा मिनिटानंतर त्याने एक चिठ्ठी सरकवली. आणि त्यात खालील प्रमाणे लिहिलं.

Five things which will create wealth for organisation:

1. Invest in human asset management. Training, challenging conventional wisdom.

2. Work on creating transparent organisation to the best possible extent.

3. Work on processes and systems by which you will achieve customer delight, make suppliers happy and fulfill employees aspirations.      

4. Find innovative work practices and work on continuous improvement in processes.

5. Work on creating an organisation which is socially responsible.

हे वाचल्यावर माझ्या चेहऱ्यावर मोठं प्रश्न चिन्ह उभं राहिलं. ते पाहून पार्टनर म्हणाला "मला माहित होतं, तुला हे सुधारणार नाही. पण कसं आहे मित्रा, तुझी being rich (श्रीमंत) आणि being wealthy (संपन्न/समृद्ध) यामध्ये गल्लत होत आहे. श्रीमंती ही मूर्त असते तर संपन्नता अमूर्त. मुख्य म्हणजे कमावलेली श्रीमंती जर टिकवायची असेल तर माणूस संपन्न असणं गरजेचं आहे. तर मग श्रीमंतीला सुवास येतो. नाहीतर मग stinking rich किंवा filthy rich असं काही जणांच्या श्रीमंतीला संबोधलं जातं."

"तुझ्या मनात जी कामं आली होती ती श्रीमंत (rich) बनण्यासाठी होती. पण कंपनीला संपन्न (wealthy) बनवायचं असेल तर मला वरच्या गोष्टींवर काम करावं लागेल" पार्टनर म्हणाला.

हा पार्टनर जास्त डोक्यावर बसतोय. ह्याच्या बरोबर आता फारकत घ्यावी. खूप बिल झालं. 

क्रेझी इंडियन

आता अमेरिकेत व्हीटेरी नावाचा गृहस्थ भेटला होता. त्याचे प्रोडक्टस त्याला भारतात विकायचे होते. मला म्हणाला, तू विकशील का? मी म्हणालो, मला माझा उद्योग भरपूर आहे. अजून प्रॉडक्ट नाही विकू शकत.

पण त्याला सांगितलं "तीन मेजर इंडस्ट्रीयल सिटी त माझे रिप्रेझेंटेटीव्ह आहेत. मी तुझे प्रॉडक्टस त्यांना विकायला सांगू शकतो. ते माझ्या पे रोल वर नाही आहेत. तुझे प्रॉडक्टस त्यांच्या बास्केट मध्ये आले तर त्यांना फायदा होईल"

व्हीटेरी खुश झाला. म्हणाला "हे डील जमलं तर तुझी कन्सल्टन्सी फी काय आहे ते सांग. मी देईन"

मी म्हणालो "फी वगैरे ची काही गरज नाही. यात सगळेच विन विन सिच्युएशन मध्ये आहेत. तुला सेल्स ची माणसं भेटतील, माझ्या मित्रांना प्रॉडक्टस मिळतील धंदा वाढवायला"

तर तो म्हणाला "आणि तुला?"

मी बोललो "मानसिक समाधान. आणि मला माहित आहे, मला याचा फायदा भविष्यात नक्की होईल"

तो म्हणाला "काहीतरीच काय! असं नाही होत कधी"

मी त्याला किस्सा सांगितला

"साल १९९९९. मी तेव्हा बुसाक+शाम्बान ची सिल्स विकायचो. मला सुपर स्टील ने त्यांच्या मिल मध्ये हायड्रोलिक्स मध्ये आमचे सिल्स कसे बसवता येतील ते बघायला बोलावलं. त्यांचे ड्रॉइंग्स बघितल्यावर मला कळलं की त्यांचे हायड्रोलिक्स सिलिंडर आणि पॉवर पॅक चे सप्लायर्स त्यांना फुल लुटत आहेत. मी तिथल्या कदम साहेबाना सांगितलं कि तुमच्या सप्लायर्स ला काही कळत नाही आणि ते तुम्हाला फालतू माल सप्लाय करून लुटत आहेत. कदम म्हणाले, मग आता तूच सप्लायर्स दे. मी त्यांना लिहून दिलं. पॉवर पॅक साठी पुण्याची हैड्रोथर्म आणि सिलिंडर साठी मुंबई ची इंडियन हायड्रोलिक्स आणि फास्ट सिलिंडर्स.

कदम साहेबांनी मला खुश होऊन याबद्दल कन्सल्टन्सी फी ऑफर केली. मी बोललो, सर, मला फी काही नको. तुम्ही जो पर्यंत इथे आहात तो पर्यन्त आर एफ क्यू मध्ये बुसाक शाम्बान चे सील लिहायचे.

फास्ट आणि हायड्रोथर्म दोघांनी मला ऑर्डर मध्ये कमिशन ऑफर केलं. मी म्हणालो, मला कमिशन नको. एक खात्री द्या, की तुम्ही आमचे सिल्स निदान मी असे पर्यंत तुमच्या कंपनीत स्टॅंडर्ड कराल.

१९९९ ते २०१० पर्यंत सुपर स्टील ने या तीन सप्लायर बरोबर कमीत कमी १०० कोटी रुपयांचा बिझिनेस केला.

मला काय मिळालं.? मी २००२ मध्ये सिल्स विकणारी कंपनी सोडली. पण आज ही, म्हणजे १४ वर्षांनंतर तिन्ही कंपन्या आमचे सिल्स वापरत आहे.

सुपर स्टील्स च्या आर एफ क्यू मध्ये आज पण आमचे सिल्स स्पेसिफाय केले जातात.

पुण्याच्या हायड्रोथर्म चा ओनर देशपांडे माझा बिझिनेस मधील mentor आहे.

ठाण्यातील फास्ट सिलिंडर्स चे ओनर मला लहान भाऊ समजायचे.

आणि कदाचित इंडियन हायड्रोलिक्स च्या शुभेच्छा असतील कि माझा बिझिनेस जरा बरा चालू आहे.

या प्रकाराला मी traingular working म्हणतो. आणि सेल्स चं हे खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे. आणि तसंही जगण्याचा core purpose "To exchange knowledge and information to enhance brand "India"" हा आहे."

"आलं का तुझ्या लक्षात मला कन्सल्टिंग फी का नको ते"

हात मिळवून गेला तो. पण नजरेत त्याच्या विचित्र भाव होते. "This man looks to be crazy" असे काहीसे.

मी मनात म्हणालो "आम्ही इंडियन आहोतच असे.......क्रेझी"

सचिन पाठक

काल दिवसभर मनावर एक मळभ साचलं होतं. काय करणार मित्रा, सकाळीच तू गेल्याचा फोन आला. तुला निरोप दिल्यावर चेहऱ्यावर उसनं हसू आणत दिवस ऑफिस मध्ये घालवला. संध्याकाळी घरी आल्यावर नील ने नेहमीप्रमाणे मिठी मारली. मी जरा जास्तच वेळ त्याला धरून ठेवलं होतं. रात्री पोझिटिव्हीटी उधार घेत व्हीटेरी ची पोस्ट टाकली. थोडं धैर्य गोळा केलं आणि झोपलो. मग मात्र तुझं जाणं रंग दाखवायला लागलं.  रात्रभर तळमळत बसलो. तुझ्या जाण्याने अनेक आठवणी फसफसून वर आल्या.

नाही म्हणजे वय वाढत चाललं तसं जवळच्यांचे मृत्यू पचवत चाललो आहे. पण तुझा मात्र चाळिशीतला बाय बाय चटका लावून गेला मित्रा. तसं लौकिकार्थाने आपण गेल्या बारा तेरा वर्षात सात ते आठ वेळाच भेटलो असू. त्या भेटीतल्या मोजक्या गप्पा, आश्वासक हास्य अन एखादी गळाभेट इतकीच काय ती माझ्या जवळची पुंजी. पण तरीही रात्री कळवळलो, अनेकदा. माझ्या अत्यंत आवडत्या कुटुंबावर नियतीने केलेला हा दुसरा घाव मलाही घायाळ करून गेला. मन विदीर्ण झालं.

आमच्यासारखे किती जण असतात, छातीत दुखतं, पाठ दुखते, पाय दुखतात, वर्षभर सर्दी असते. पण तरीही आम्ही असतो, रडत खडत का होईना जगतो. आणि तू त्या आश्वासक हास्याचा मालक, आजारी पडतोस काय आणि आज नसतो काय! सगळंच विचित्र.

हे असं होतं खरं. कार्यबहुल्य, कम्युनिकेशन गॅप असल्या तोंडदेखल्या कारणाने तुझ्याशी घट्ट मैत्री करणं या जन्मात राहिलं यारा. याची चुटपुट मला आता आयुष्यभर लागून राहील.

दोस्ता, तुला मन:पूर्वक श्रद्धांजली

रियल पार्टनर

युके चा व्हिसा काढायला मी १९९९ ला मुंबई ला गेलो. मी आणि प्रदीप, माझा बिझिनेस पार्टनर, दोघे स्वित्झर्लंड हुन ऑफिशियल काम आटोपून प्रदीपच्या बहिणीला भेटायला युके ला जाणार होतो. इंटरव्ह्यू मध्ये व्हिसा ऑफिसरने विचारलं "are you traveling with someone?" मी म्हणालो "Yes, my partner" तर तो म्हणाला "what partner" मी म्हणालो "What do you mean" तर तो म्हणाला "I mean, do you share same bed". मी ताडकन उडालो. आणि म्हंटलं "No no, he is my business partner".

जोक्स अपार्ट, पण जितका वेळ आपण घरी जागे असतो, त्याच्यापेक्षा जास्त कंपनीत असतो. त्यामुळे बिझिनेस पार्टनर हा चांगला मिळणं हे भाग्याचं लक्षण. मी त्याबद्दल भाग्यवंत आहे. बरेच जण विचारतात, तुमची पार्टनरशिप कशी काय टिकली?

बाकी कुठल्याही मुद्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघातल्या विसंगती:

- आमच्या दोघातला वयाचा फरक. इतर नेहमीच्या पार्टनरशिप मध्ये बहुतेकदा समवयीन मित्रात एकत्र बिझिनेस करण्याची हुक्की येते. माझ्यात आणि प्रदीपच्या वयामध्ये तब्बल ११ वर्षाचं अंतर आहे. मग वयोपरत्वे असणाऱ्या महत्वाकांक्षेत फरक आहे.

- मी डोक्यापासून पायापर्यंत मराठी. तर प्रदीप मूळ गुजराती पण जन्मला आणि मोठा झाला पुण्यात.

- प्रदीप अत्यंत शिस्तशीर आणि वक्तशीर आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत बहुतेक दिवशी त्याच्या रुटीन मध्ये एका सेकंदाचा फरक नसतो. त्याने येण्याची वेळ द्यावी आणि आपण घड्याळ त्या प्रमाणे लावावं. गॉगल केस मध्ये ठेवणे, बॅगेत ठेवणे, त्याची झिप लावणे, ११:३० वाजता न चुकता काही तरी खाणे, दररोज तितकीच सिगरेट पिणे, तितकेच जेवणे आणि बरंच काही. मी याच्या बरोबर उलट. मी एकाच रस्त्याने चार दिवस घरून कंपनीला जाऊ नाही शकत.

- एखादी गोष्ट त्याच पद्धतीने करण्याच्या सवयीमुळे प्रदीप चं स्पिन्डल रिपेयर चं स्किल वादातीत आहे. आणि त्याचा आमच्या बिझिनेस ला खूप फायदा होतो. मी मात्र सगळ्याच गोष्टीचं थोडं थोडं ज्ञान बाळगून आहे. हो हो तेच jack of all........ त्यामुळे आमच्या कोअर स्किल मध्ये मी लक्ष घालत नाही आणि बाकी सपोर्ट सिस्टम मध्ये त्याला लक्ष घालायची गरज पडत नाही.

- बिझिनेस चालू केल्यापासून ते आतापर्यंत प्रदीप ने मला एक पैशाचा, and I mean it, एक पैशाचा हिशोब मागितला नाही आहे.

- कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना त्यातील संभाव्य धोके त्याला बरोबर लक्षात येतात. पण त्या धोक्यावर मात कशी करायची हे सांगितलं तर त्याच्या मतावर आडून राहण्याचा तो आडमुठे पणा करत नाही. मी सुद्धा काय करायचं यावर ठाम असतो पण कसं करायचं यावर वेगवेगळे मार्ग प्रयत्न  करायला फ्री ठेवतो.

- तो हात, पाय अन डोके शाबूत असेपर्यंत कंपनीत काम करणार आहे. माझी इंजिनियरिंग करिअर पुढील २-४ वर्षात थांबणार आहे. नाही, मी रिटायर नाही होणार, पण काही दुसरे प्लान्स आहेत. (नाही नाही, लेखक पण नाही होणार)

असे खरं तर अनेक मुद्दे आहेत. काही साम्य स्थळे पण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकांचे गुणदोष स्वीकारले आहेत. आमची भांडणं पण प्रचंड झाली आहेत. पण त्या सगळ्यांना ही पार्टनरशीप पुरून उरली आहे. नॉर्मल माणसात असतो तितका अहंकार दोघातही आहे, पण आमच्या पेक्षा कंपनी मोठी आहे हे दोघांच्या ही पक्के लक्षात आहे. नातेवाईक कंपनीत कामाला ठेवायचे नाहीत यावर दोघांचे एकमत आहे.

आज हे सगळं लिहायला हरकत नाही आहे. कारण पुढचं वर्ष हे आमच्या पार्टनर शिप चं रौप्य महोत्सवी वर्ष असणार आणि आता जे काय उरलेले काही वर्षे आहेत त्यात ती तुटणं आता तरी असंभव वाटतं.

आणि हो, तुम्हाला जो पार्टनर माहित आहे तो प्रदीप नाही आहे. तो तिसराच आहे अजून. त्याला भेटायचं असेल तर तुम्हाला कंपनीत यावं लागेल.



पाकिस्तान

मध्ये एका पोस्टवर एकाने प्रश्न विचारला की तुम्ही पाकिस्तान च्या कस्टमर शी बिझिनेस कराल का? प्राप्त परिस्थितीत अर्थातच "नाही".

पण मेख अशी आहे की पाकिस्तान ने जर आमच्या सारख्या लहान कंपनी बरोबर तिथल्या कंपनीने बिझिनेस रिलेशन्स डेव्हलप करण्याइतका व्यापार उदीम वाढवला असता तर तो देश आज च्या परिस्थितीत आहे, तसा असला असता का?

त्याचं ही उत्तर अर्थात नाहीच.

कर्म कसे करावे हे शिकण्यासाठी धर्म वापरला तर समाजाची, देशाची उन्नती होते. पण धर्माने लोकांना वापरायला सुरुवात केली की त्याचा पाकिस्तान होतो, सीरिया होतो.

धर्माच्या अति आहारी जाणं हे समाजासाठी मारक आहे हे धार्मिक तत्ववाद्यांनी लक्षात ठेवावेच. पण त्या पेक्षा जास्त त्यांच्या अनुयायांनी ध्यानात राहू द्यावे. 

माझा भारत

म्हणजे बघा

केरळची साक्षरता घेऊ यात.

कर्नाटकच्या KSRTC चं अनुकरण सगळ्या राज्यात करू यात.

रेल्वे शताब्दी अन राजधानी सारखी चालवू यात. (आम्हाला नको बुलेट ट्रेन वगैरे)

विमानसेवेला इंडिगो चा मापदंड लावू यात.

कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात चं उद्योजकतेचं मॉडेल सगळ्या राज्यात राबवू यात.

हरयाणा आणि पंजाब सारखी शेती करू यात.

शिरपूर चं आणि राजेंद्र सिंह यांचं जल संवर्धनाचं मॉडेल रेप्लिकेट करू यात.

चंदिगढ, भुवनेश्वर, जमशेदपूर आणि मैसूर चं टाऊन प्लॅंनिंग आणि स्वच्छता घेऊ यात.

दिल्लीची मेट्रो सगळीकडे चालवू यात.

श्रीनगर आणि नॉर्थ ईस्ट सारखं निसर्गाचं सौन्दर्य जीवापाड जपू यात.

आणि हो,

सोनोग्राफी क्लिनिक मध्ये गर्भनिदान करून मुलीचं येणं तिच्या येण्याआधी सगळे साजरे करू यात

सिंगापूर नको अन शांघाय नको

वरवर दिसणाऱ्या अप्रगत भारतात एक अत्यंत विकसित भारत लपलाय.

त्याच्या वरची साठलेली जळमटं साफ करून एक समृद्ध आयुष्य जगू यात.

म्हणजे, राज्यकर्त्यानो

बघताय ना