Thursday 27 October 2016

धंदा १

तर अमोल चौधरी ने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मी दोन धंदे लिहिले होते. दुसऱ्या धंद्याबद्दल सांगायच्या आधी एक वस्तुस्थिती सांगतो.

रिक्षा........बारकाईने बघितलं तर आजच्या ऑटोमोबाईल मधलं सगळ्यात बंडल डिझाइन. ऊन, थंडी अन पाऊस यातून कुठलंही संरक्षण न करणारं, अपघात झालाच तर बॉडीची पूर्ण वाट लावणारं (म्हणजे, वाहनाच्या आणि माणसाच्या), वर्षानुवर्षे न बदललेलं, सगळ्यात मोठा चेंज काय तर फ्रंट इंजिन, रिअर केलं आणि आता सी एन जी आलं. पण अदरवाईज काहीच फरक नाही. बजाज आणि टी व्ही एस ची तरी चांगली आहे रिक्षा पण दोन ते तीन वर्षात पूर्ण खुळखुळा होणारा त्या पियाजो च्या मूळ डिझायनर ला साष्टांग प्रणिपात.

आणि या सगळ्यांवर कडी म्हणजे रिक्षाचा धंदा करणाऱ्या लोकांची वृत्ती. वर्षानुवर्षे एकाच गाडीवर त्याच पद्धतीने, की ज्यात बहुतेक व्हॅल्यू सिस्टम मध्ये लोकांना लुबाडणे, अरेरावी करणे, कस्टमर ला गरज असेल तेव्हा अडवणूक करणे असे गुण उधळले जातात. (अपवादानी स्वतः ला सन्माननीय समजणे). किंबहुना इतके सारे दुर्गुण असताना हा धंदा इतके वर्ष तगला हे आपल्या समाजाच्या पराभूत मानसिकतेचं एक लक्षण आहे.

पण आता वरील कारणामुळे या धंद्याला घरघर लागली आहे.  ओला अन उबर या लोकांनी धूम मचवली आहे. पण अजूनही धंद्यात स्कोप आहे असं मला वाटतं. पुण्यात एकूण ऐंशी एक हजार रिक्षा असाव्यात. पुढच्या दहा एक वर्षात रिक्षा पुणे आणि बऱ्याच शहरांच्या रस्त्यावर नसतील असा माझा अंदाज आहे. अन पब्लिक ट्रान्सपोर्ट वर्ल्ड क्लास बनायला किती दशकं जातील हे देव जाणे. विचार करा आज रस्त्यावर असणाऱ्या ६०००० रिक्षा नसतील तर टॅक्सी किती लागतील.

सरासरी पाच रु किमी इंधनाचा खर्च, पन्नास पैसे किमी मेंटेनन्स, २ रु किमी ड्रायव्हर आणि दोन रुपये किमी लोन इंटरेस्ट.  साडेनऊ रु प्रति किमी हा सेदान गाडीचा खर्च आहे. सध्या तिचा रेट १२ ते १४ प्रति किमी मिळतो. ड्रायव्हर ठेवून ही सरासरी २ रु प्रति किमी फायदा आहे. खर्च जाऊन रु २०००० प्रति महिना. त्यात स्वतः गाडी चालवली अन लोन नसेल तर सरळ रु ५०००० प्रति महिना कमाई.

उगाच नाही अमिताभ बच्चन अन रतन टाटा ओला मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत.

कष्ट आहेतच पण एका टॅक्सी मध्ये एका कुटुंबाला जगवायची ताकद आहे.  दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना आज कुणी साथ दिली असेल तर टॅक्सी धंद्याने.

बघा, विचार करा अन............स्टार्टर मारा. 😊😊

No comments:

Post a Comment