Thursday 27 October 2016

फर्स्ट ए सी

पुण्याहून अहमदाबाद ला निघालो आहे, ट्रेन ने. अहिंसा एक्स्प्रेस. (ट्रेन मध्ये आराम करायला मिळतो वगैरे कारणं झूठ आहेत. धंदा मंदीत असल्यामुळे विमानप्रवास परवडत नाही आहे). सेकंड ए सी अपग्रेड होऊन फर्स्ट ए सी मिळाला. मी पहिल्यांदाच फर्स्ट ए सी ने प्रवास केला.

फक्त दोन बर्थ असणारी केबिन मिळाली. अपर आणि लोअर बर्थ असणारी. इथे बर्थ ची रुंदी पण मोठी असते. केबिनला दरवाजा आहे. ज्याला आतून कडी लावता येते. आत कोण आहे हे बघण्यासाठी दरवाजाला काच आहे. पण तसं दिसू नये यासाठी आतून पडदा दिला आहे. ए सी चं तापमान अत्यंत आल्हाददायक ठेवलं आहे. मंद सुवास दरवळणारा रूम फ्रेशनर उडवला आहे. उबदार अशी दुलई दिली आहे. का कोण जाणे बर्थ सारखीच दुलई ची रुंदी पण मला सेकंड ए सी तल्या पेक्षा जास्त वाटते आहे.

रात्री पुणे स्टेशनवर टीसी म्हणाले, "सध्या एकटेच आहात. दरवाजाची कडी आतून लावू नका. रात्री कुणी प्रवासी आला तर तुमची झोपमोड होणार नाही"

रात्र झाली. गाडी पुढच्या स्टेशनवर थांबली. हा सिलसिला सकाळपर्यंत चालू राहिला. पण माझ्या केबिनमध्ये कुणीही आलं नाही.

तळटीप:

- फर्स्ट आणि सेकंड ए सी च्या बर्थच्या संरचनेत बदल असला तरी टॉयलेट च्या स्वच्छतेची लेव्हल सारखीच असते. (वेगळी का असावी, फर्स्ट ए सी तुन प्रवास केल्यावर तू गुलाबपाणी सोडतोस का? पार्टनर अशी कॉमेंट करेल)

- टीसी ने उल्लेख "प्रवासी" शब्द उच्चारला तेव्हा त्याच्या मनात तो शब्द पुरुषवाचक होता की स्त्रीवाचक याचा मी रात्रभर विचार करत होतो.

No comments:

Post a Comment