Thursday, 6 October 2016

पाकिस्तानी

काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बंगलोर मध्ये IPCA ने अरेंज केलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात आम्ही भाग घेतला होता. आमच्या बूथ वर एक पाकिस्तानी एक उद्योजक व्हिजिटर म्हणून आला होता. त्याचं नाव आता आठवत नाही. झहीर ठेवू. पाकिस्तानचा म्हणून मला जरा कुतूहल वाटलं. मी त्याला बसायला खुर्ची वगैरे दिली. कॉफी मागवली. आणि पाकिस्तानातील औद्योगिक वातावरणाबद्दल काही प्रश्न विचारले. त्याने त्याच्या उर्दू भाषेत काही गोष्टी सांगितल्या.

"कुठला बिझिनेस अन कसलं काय साहेब. काही वर्षे मी इंग्लंड मध्ये जॉब करून स्वतः च्या देशात काही उद्योग थाटावा म्हणून पाकिस्तानात परत आलो. (EMS) काही लष्करी कॉम्पोनंट सोडले तर मॅन्युफॅक्चरिंग शून्य आहे. आमच्या देशात तुम्हाला जगातल्या उत्तमोत्तम कार्स दिसतील पण त्या डायरेक्ट इंपोर्टेड असतात. असं बेकार वातावरण आहे आमच्या इथे, कोण प्लांट टाकणार. मी इथे प्रदर्शनात आलो आहे. मला तुमचा सगळ्यांचा हेवा वाटतो. किती प्रोग्रेसिव्ह वातावरण आहे. आमच्या इथले सरकार लष्कराच्या हातातले बाहुले आहे. हिंदुस्थान विषय निघाला की त्यांना तुम्ही केलेली प्रगती दिसत नाही फक्त काश्मीर दिसतं." आणि बरंच काही बोलत होता तो.

जाताना म्हणाला "निघताना आपण घरी यायचं निमंत्रण देतो. मी पण देतोय. कधी वेळ आलीच तर मी मेहमाननवाजीत कमी पडणार नाही. पण मला माहित आहे, तुम्ही येऊ शकणार नाही. शेवटी स्वर्गातून नरकात कोण येईल"

त्याच्या हातातला हात सोडवून घेताना मला कसंसंच वाटलं. 

No comments:

Post a Comment