Sunday, 16 October 2016

Training

"Professionalizing business for sustainable growth" हो असाच विषय होता पॅनल डिस्कशन चा. या विषयावर बोलण्यासाठी मी विचार करत होतो. तेव्हा काही गोष्टी लक्षात आल्या. त्या साधारणपणे मांडल्या आहेत.

माझी कंपनी सध्या छोटी आहे. वर्षे सरतील अन कुणास ठाव ती मोठी होईल ही. पण ती फक्त मोठी होऊन कामाचं नाही तर तसं होताना काही मूळ सिद्धांतावर ती उभी राहिली पाहिजे असं माझं मत आहे. आता हे मूळ सिद्धांत कोणते अन त्यावर कंपनीचा डोलारा कसा उभा राहील हे समजून घेणं म्हणजे कंपनीला खऱ्या अर्थाने व्यावसायिक बनवणं. आणि तसं करणं हे कंपनीला लंबी रेस का घोडा बनवतं.

काही कंपनी आपल्याला माहित आहेच. टाटा, आज जवळपास १५० वर्षे झालीत, अत्यंत दमदार वाटचाल करत आहे. अमेरिकेत तर अशा कित्येक कंपन्या आहेत की ज्यांचं वय हे दोनशे वर्ष आहे. कशा चालत असतील या कंपन्या. 

हे सगळं आपल्याला कळणार कसं? एक केस स्टडी म्हणून मला स्वतः ला घेतलं, तर करिअर ची पहिली पाच वर्षे मी एस के एफ मध्ये काढली. म्हणजे तेव्हा मी अगदीच बाळ होतो. त्यानंतरची आठ वर्षे मी बंगलोर च्या रॊलॉन हायड्रॉलिक्स नावाच्या कंपनीत होतो. कंपनी बंगलोर ला अन मी पुण्याला. अन मी हार्ड कोअर सेल्स चा माणूस. सेल्स शिकलो पण व्यावसायिकता नाही. आणि त्यानंतर बिझिनेस. बरं घरात बिझिनेस चं वातावरण नाही. लहान भावाने व्यवसाय चालू केला पण ते ही माझ्यासारखं. आपल्यांनंतर कंपनीची लीगसी वर्षानुवर्षे असली पाहिजे असं वाटत होतं. पण ते कसं करायचं ते कळत नव्हतं. 

पण हि जी भावना आहे की "आपल्यानंतर कंपनीची लीगसी वर्षानुवर्षे असली पाहिजे" ही कंपनीला व्यावसायिक पद्धतीने चालवायच्या इच्छेची पहिली खूण  आहे. आणि या जोडीला "माझ्या नंतर माझ्या कंपनीची सूत्रे माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या (जावयाच्या) हातात असली पाहिजे" अशी इच्छा "नसणं" ही त्या व्यवसायिकतेची दुसरी खूण आहे. त्याच पद्धतीने मी कंपनी चालवली अन त्याचमुळे २०१२ साली जेव्हा मी कंपनी सेटको ला विकली तेव्हा माझ्या पोटातलं पाणी थोडं पण हललं नाही. बाकी सगळे आर्थिक व्यवहार सोडले तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे माझ्या कंपनीचं वय अचानक शंभर वर्ष झालं. कारण सेटको ची स्थापना अमेरिकेत १९१२ साली झाली आहे. 

पण तरीही एक मोठा पेन एरिया होता अन तो म्हणजे human asset management. म्हणजे कंपनी वाढत चालली आहे. लोकं वाढत चालली आहेत. आता ह्या सगळ्यांची ग्रोथ मोजायची कशी? हा एक मोठा प्रश्न होता.

म्हणजे पहिले दोन प्रश्न आणि हा तिसरा पेन एरिया. या प्रश्नांवरती उत्तर काय याच्या शोधात असताना मला एका ट्रेनर बद्दल माहिती झाली. आज नाव नाही लिहीत, पण ह्या ट्रेनर ची पद्धत वेगळी होती हे नक्की. त्याच्या आधी मला अनेक जण भेटून गेले. "One minute success" किंवा "एका दिवसात उद्योजक बना" अशा पद्धतीचे. मुळात उद्योजक असणं हे संपत नाही, तर तो एक प्रवास असतो. आपण आपल्या  एम्प्लॉईज ला ट्रेनिंग देतो, जेव्हा कारसाठी ड्रायव्हर बघतो तेव्हा त्याला कार व्यवस्थित चालवता येते का, ते बघतो. पण मग त्याच पद्धतीने स्वतः उद्योजक व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षित आहे का, हा प्रश्न तितक्याच तीव्रतेने विचारतो का? 

मला असं वाटतं की तो प्रश्न विचारायला हवा. आणि नुसता उद्योग चालवणं म्हणजे पैसे कमवायचे हाच जर उद्देश असेल तर अशा प्रशिक्षणाची गरज नाही. पण वर लिहिलेले तीन मुद्दे जर तुम्हाला व्यवसायात जोपासायचे असतील तर असं प्रशिक्षित होणं अत्यंत गरजेचं आहे. 

असा प्रशिक्षक निवडताना काळजी घ्यायला हवी हे नक्की. सगळ्यात आधी म्हणजे, त्या प्रशिक्षकाने हे सगळं सोसलं असलं पाहिजे. म्हणजे उद्योजकता प्रसवताना जो त्रास होतो तो एखाद्या बाळंतिणी पेक्षा कमी नसतो. आणि त्या ट्रेनर ने जर ते अनुभवलं असेल तर तो  तुम्हाला तो त्रास कसा सहन करायचा ते शिकवतो. हो, आणि एक.  जर कुणी तुम्हाला म्हंटल की  तुम्हाला त्रास होणारच नाही असं शिकवतो, तर तो फेकतो आहे हे खुशाल समजावं. त्रास होणारच, तो त्रास कसा सहन करायचा ह्याचं प्रशिक्षण घेणं म्हणजे उद्योगात व्यावसायिकता आणणे. 

मी जो कोर्स केला त्यात मूळ सिद्धांताविषयी (Core values) आणि मूळ उद्देश (Core purpose) बद्दल शिकवलं गेलं. हे किती महत्वाचं आहे, नाही? म्हणजे आपण आलो का या पृथ्वीवर? त्या कोर्स ची फी तगडी आहे. पण हे मूळ सिद्धांत आणि मूळ उद्देश हे माहिती होणं बेशकिमती आहे. अजोड आहे. याची किंमत होऊ नाही शकत. 

सगळ्यात मुख्य म्हणजे मला माझा विकनेस कळाला. आणि अर्थात स्ट्रॉंग पॉईंट पण. आता त्या माझ्या वीक पॉइंटवर मी जीव तोडून काम करतो आहे. 

आणि दुसरा एक मुद्दा आहे. मी हा कोर्स करतो आहे. आणि आपली मैत्री आहे. तर मी तुम्हाला हे सगळं शिकवू शकतो का? तर उत्तर आहे ........ "नाही". या ट्रेनर लोकांनी त्याचा एक स्ट्रक्चर्ड फॉरमॅट बनवला असतो. त्या लॉजिकल सिक्वेन्स ने ते शिकवत गेलं तर ते तुमच्या गळ्यात उतरतं. कदाचित उद्या मी "ट्रेनिंग"   हाच व्यवसाय केला तर शिकवू शकेल ही, पण आज नाही.

अन सगळ्यात शेवटी महत्वाचं: 

- अशी व्यावसायिकता आणली म्हणजे तुमची कंपनी अनेक दशकं चालेलच का?

- आणि व्यावसायिकता म्हणजे तुमच्या मुलाला किंवा मुलीला उद्योगाची सूत्रे द्यायचीच नाहीत का?

दोन्ही प्रश्नांची उत्तरं "नाही". असं ट्रेनिंग गॅरंटी कशाचीही देत नाही, पण शक्यता मात्र तयार होते. 

तसंही, जन्म मरणाच्या फेऱ्यात गॅरंटी फक्त जन्म आणि मरण याचीच असते. बाकी तर फक्त शक्यता असतात.   

No comments:

Post a Comment