Friday, 7 October 2016

चीन १

तर मुद्दलात राडा कसा आहे ते सांगतो.

तुम्हाला पी सी बी माहित आहे का? नाही नाही, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाही. मी म्हणतो ते प्रिंटेड सर्किट बोर्ड. तर पीसीबी हा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचा जीव कि प्राण असतो. म्हणजे डोअर बेल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, मायक्रोव्हेव या प्रत्येक घरगुती उपकरणात पीसीबी वापरतात. बरं तुमची बाईक असेल, कार असेल किंवा तुमचं विमान असेल तर या प्रत्येक वाहनात पीसीबी चं अनन्यसाधारण महत्व आहे. कोणत्याही मशिन्स, मेडिकल इक्विपमेंट यात पीसीबी असतातच. हे पीसीबी सिंगल लेयर आणि मल्टि लेयर अशा दोन प्रकारात येतात. मल्टी लेयर पीसीबी मुळे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची साईज लहान होत चालली आहे.

भारतात जितके इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं बनतात त्याला जे पीसीबी लागतात, त्याच्या फक्त १०% भारतात बनतात. आणि ८०% पीसीबी हे चीन मधून इम्पोर्ट होतात. आणि खरी गंमत पुढे आहे मित्रांनो. हे जे दहा टक्के पीसीबी भारतात बनतात त्याचं शंभर टक्के रॉ मटेरियल हे चीन मधून इम्पोर्ट होतं. आणि नुसतं भारताला च नाही तर जगाला चीन हे रॉ मटेरियल सप्लाय करतं. अख्ख्या भारताचं पीसीबी चं प्रोडक्शन जितकं आहे तितकं चीन मध्ये एक कंपनी करते आणि अशा किमान १५ कंपन्या आहेत.

अजून एक छोटा हिशोब सांगतो. ह्या पीसीबी इंडस्ट्री मध्ये स्पिन्डल लागतात. माझ्या अंदाजाने भारतात ५००० स्पिन्डल वापरले जात आहेत. चीन मध्ये एका छताखाली २००० स्पिन्डल असलेल्या किमान १० कंपन्या मला माहित आहेत.

कळतं का चीन कुठपर्यंत तुमच्या घरात घुसलं आहे ते. राष्ट्रभक्तीच्या वल्गना करताना जरा थोडा अभ्यास करा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा. नाहीतर आपलं उचललं बोट, अन दाबला की बोर्ड. केलं फॉरवर्ड. आणि हे तर मी तुम्हाला पीसीबी चं सांगितलं. अजून दोन उद्योगाबद्दल अशीच माहिती देऊ शकतो. अहो आपल्या इथे २०० किमी प्रति तास ही रेल्वे करण्याचा विचार आज आहे ना तिथे चीन मध्ये ३५० किमी प्रतितास इतक्या वेगाने रेल्वे पळत आहेत.

त्यामुळे मनगटात दम असेल ना तर हे पीसीबी सारखे प्रॉडक्टस भारतात चीन पेक्षा कमी भावात बनवून दाखवा.  अन हे शक्य आहे. आज भारताचा लेबर चीन पेक्षा अर्ध्या भावात मिळतो. पण त्याला जोड लागते ती सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती ची. ती नाही म्हणून हे असले बहिष्कार वगैरे पळपुटे आवाहन करावे लागतात. बाबा रामदेव परवडला. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून लिव्हर आणि पी अँड जी च्या उरात धडकी भरवली त्याने. एखाद्या प्रॉडक्ट ला संपवायचं असेल तर त्याच्या पेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून संपवता येतं, बहिष्काराने नाही.

काल सांगितलं तसं चीन देश म्हणून मला अजिबात झेपत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे.

तेव्हा असले मेसेजेस फॉरवर्ड करून स्वतः चे हसे नका करून घेऊ. चीन च्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्या ऐवजी, प्राचीन अन अर्वाचीन भारताच्या इतिहासाचा वृथा अभिमान सोडा. त्यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे.

शेवटच्या वाक्यात यमक सॉलिड जुळलं आहे

No comments:

Post a Comment