Thursday 27 October 2016

तो

पहाटेची वेळ. साडे चार वाजले असतील. मी आळोखे पिळोखे देत हॉल मध्ये आलो. तो ही आला अन म्हणाला "चल, आटप लवकर. मॉर्निंग वॉक ला जायचं आहे." मी म्हणालो "हे दररोज चं काय आहे रे. तसंही दिवसभर ऑफिसमध्ये धावपळ होतेच की. चालणं म्हणशील तर सहा सात किमी चालतो मी दिवसभरात. तो व्यायाम नाही का मग". तर तो म्हणाला "अरे तो थोडी एक्सरसाईज. ते करताना तू टेन्शन मध्ये असतोस. एक्सरसाईज आणि टेन्शन हे बेकार कॉम्बिनेशन आहे. त्यालाच तर एक्सरशन म्हणतात"

मी पोहोचलो रामटेकडी वर. सव्वापाच साडेपाच ची वेळ. किर्र अंधार होता अन दाट झाडी. त्यातून जाणारी एकच पायवाट. चंद्राच्या प्रकाशात दोन एक फुटपर्यन्त अंधुक दिसत होतं. धीर केला अन चालू लागलो. तो होताच बरोबर.  मी म्हणालो "आपण  चालतोय अन समजा एखादा साप किंवा एखादं पिसाळलेलं कुत्रं अंगावर धावत आलं तर काय करणार. फाटेल माझी. त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं या विचारानेच माझा थरकाप उडतोय"

तो म्हणाला "हे तुझं असं आहे. म्हणजे तुला आव्हान घ्यायला आवडतं. पण त्या आव्हानाने प्रति आव्हान उभं केलं तर तुला प्रेशर्स असह्य होतात. आणि तुझी एखाद्या गोष्टीला hypothetical पद्धतीने हाताळण्याची विचारधारा. मग तुझ्या हृदयाच्या वाहिन्या तुंबतात. नशिबाने आता पर्यंतच्या आव्हानांना उत्तर देताना तुझी पावलं बरोबर पडली ते ठीक आहे. आता कसं मिणमिणत्या प्रकाशात का होईना काळजीपूर्वक पाऊल टाकतोस तसं तुला आयुष्यात ही प्रश्नांना उत्तर शोधताना छोटे छोटे थ्रेड मिळतात. अशा छोट्या धाग्यांनी मिळून एक मजबूत दोरी तयार होते अन मग तो विधाता त्या प्रश्नाच्या गर्तेतून तुला वर ओढतो.  Otherwise I can say that you like to take challenges but not pressures arising out of them"

मी म्हणालो "पण हे असं कुठपर्यंत चालू राहणार?"

तर तो म्हणाला "जब तक है जान. जोवर तुझा जीव कंपनीत आहे अन तुझ्या अंगात जीव आहे, तोवर हे चक्र चालू राहणार. दोनपैकी एक गोष्ट नसेल तेव्हा तुझी सुटका होणार"

"अरे, पण एखाद्याची कपॅसिटी......"

"तो विचार नको करुस. आपल्या हातून भव्य दिव्य"च" घडायला पाहिजे असं काही नाही आहे. हा जो "च" आहे ना, तो खूप प्रॉब्लेम्स घेऊन येतो आयुष्यात. Do not burn the bridges. तू जगात यायच्या आधी ही हे जग चाललं होतं अन नंतर ही चालणार आहे. स्वतः ला खूप जास्त सिरियसली घेतलं की दररोजच्या आयुष्यातल्या आनंदाला तिलांजली द्यावी लागते."

त्याच्याशी बोलता बोलता रामटेकडी पूर्ण पार झाली. त्या भरार पहाटवाऱ्याचा आस्वाद घ्यायला तिथे दुसरं कुणीच नव्हतं.

एव्हाना झुंजूमुंजू झालं होतं, तांबडं फुटलं होतं. अन त्या प्रकाशात मला समोरचा रस्ता आता स्पष्ट दिसत होता.

"तो" कोण तुम्हाला माहित आहे. तुमची ओळख झाली आहे त्याच्याशी. 

No comments:

Post a Comment