Friday 28 October 2016

इंटरव्ह्यू बुम रँग

आम्ही तिघे इंटरव्ह्यू घेत होतो. एक यंग डायनॅमिक पोरगं समोर होतं. विचारलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरं देत होतं. मी त्याला प्रश्न विचारला "How do you look at yourself five years from now?" प्रश्नाचं उत्तर तर त्यानं चांगलं चालू केलं अन अचानक त्याच्या आवाजातील धार कमी झाली. आणि त्यानंतरच्या डिस्कशन मध्ये ती पूर्वार्धातील तडफ नव्हती. तरी मी त्याला सेकंड इंटरव्ह्यू साठी बोलावलं. तो गेला अन एच आर चा माणूस आत आला अन म्हणाला "सर तो मुलगा सेकंड इंटरव्ह्यू ला येणार नाही असं म्हणतोय. तुम्ही बाहेर येऊन बोला त्याच्याशी"

मी बाहेर गेलो आणि का येणार नाही असं विचारलं. तर म्हणाला "सिलेक्शन झाल्यावर तुमच्या शेजारी बसलेले माझे बॉस असतील असं तुम्ही म्हणाला होतात" मी म्हणालो "हो बरोबर"

तर म्हणाला "पाच वर्षानंतर मी स्वतःला कसं बघतो या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देताना ते कानात काडी घालून कान साफ करत होते. हे करताना त्यांचे डोळे बंद होते. माझं स्वप्न जिथे मांडत होतो तिथे ते इंटरव्ह्यू घेणारे अत्यंत अजागळ काम करत होते. तुम्ही लोकं माझं करिअर काय बनवणार?"

मी काही बोलायच्या आत तो निघून गेला पण. मी अवाक झालो.

संध्याकाळी सगळे इंटरव्ह्यू प्रोसेस झाल्यावर एच आर चा माणूस आला आणि त्या पोराचीच मेल दाखवली.

त्यात लिहिलं होतं "तुमचा कॉल आल्यावर मी तुमच्या डायरेक्टरचं linked in आणि फेबु प्रोफाइल चेक केलं. इंटरव्ह्यू देताना कॅण्डीटेट ने कसं वागावं याचे खूप तारे तोडले आहेत तुमच्या साहेबाने. जरा इंटरव्ह्यू घेताना काय एकटिकेट्स आणि मॅनर्स पाळायचे याबद्दल ही तुमच्या साहेबांना विचार करून लिहायला सांगा"

खरंच तारे तोडणं सोपं असतं, नाही? 

No comments:

Post a Comment