Thursday, 27 October 2016

पहिला इंटरव्ह्यू

साल १९८६. राम डिप्लोमा करून औरंगाबादहून पुण्याला आला. रिझल्ट लागायचा होता. रामचे वडील म्हणाले, नुसता काय टाईमपास करतोस. रिझल्ट लागेपर्यंत काही काम कर.

राम अशोकनगर ला राहायचा युनिव्हर्सिटी रोड ला. त्याच रोडला एक कंपनी होती. सुपर इंडस्ट्रीज नाव ठेवू यात तिचं. रामचे वडिलांनी कुणा ओळखीच्या माणसाला सांगितलं, सुपर मध्ये रामला काही दिवसासाठी जॉब मिळतो का ते बघ. त्या काकांनी चावी फिरवली अन रामला इंटरव्ह्यू चा कॉल आला.

राम इंटरव्ह्यू साठी कंपनीत गेला. तो त्याचा पहिलाच इंटरव्ह्यू. तळघरात कॉन्फरन्स रूम होती. दोन खुर्च्या मांडल्या होत्या. मध्ये टेबल. अन बाजूला टी पॉय. राम खुर्चीत जाऊन बसला.

इंटरव्ह्यू घेणारे संजय सर आले. ते त्यांच्या खुर्चीत बसले. बसल्यावर काही कळायच्या आत त्यांनी त्यांचे पाय बाजूच्या टी पॉय वर ठेवले. अन राम ला आय सी इंजिन बद्दल विचारलं. अन अजून काही प्रश्न विचारले. समोर ठेवलेले पायातले बूट बघत पहिलाच इंटरव्ह्यू देणाऱ्या आणि  गांगरलेल्या राम ने यथाबुद्धी उत्तरं दिली. प्रश्न संपल्यावर बायो डाटा समोरच्या टेबल वर फेकत संजय सर म्हणाले " तसं काही फार येत नाही तुला. पण त्या एम एस इ बी तल्या साहेबांनी शब्द टाकला म्हणून घेतो तुला. महिन्याचे ५०० रुपये देईल ट्रेनी म्हणून. परवा पासून ये कामाला"

टी पॉय वरचे पाय तसेच ठेवत त्यांनी रामला निरोप दिला.

घरी येऊन रामने वडिलांना सांगितलं की माझं सिलेक्शन झालं नाही. दोन दिवसांनी ते काका तणतणत घरी आले अन रामच्या वडिलांना म्हणाले "अहो काय तुमचा राम. सिलेक्शन होऊन ही जॉईन झालाच नाही" भास्कर रावांनी रामला बोलावलं आणि जरबेत विचारलं "काय रे काय म्हणतात काका. जॉईन का नाही झालास" राम म्हणाला "मला नाही आवडली ती कंपनी" तर काका म्हणाले "काम चालू न करताच तुला कसं कळलं कंपनी खराब आहे ते. तुझ्या वडिलांनी सांगितलं म्हणून मी शब्द........."

राम त्यांना अर्धवट थांबत म्हणाला "त्या सरांना इंटरव्ह्यू मध्ये लोकांशी कसं बोलायचं ते कळत नाही. जॉब करताना ते माझ्याशी काही नीट वागणार नाहीत" रामच्या नजरेतुन चीड ओसंडत होती. आणि राम तिथून निघून गेला.

नंतर भास्कर राव, रामचे वडील, रामच्या आईला सांगत होते "पोराला शिंगं फुटली आहेत. समजावा त्याला"

पुढे रामने भास्कररावांच्या सांगण्यावरून धनकवडी ला ३०० रुपये महिन्याला अशी नोकरी केली.

आज ३० वर्षे झालीत याला. उत्तर ऐकताना कुणी कानात काडी घातली म्हणून राम ने दिलेला जॉब पोराने नाकारला यात रामला काही वावगं वाटलं नाही. त्या पोराने मारलेले डायलॉग काल्पनिक असतीलही पण त्या पोराच्या नजरेत चीड रामला दिसली जी त्याच्या स्वतः च्या नजरेत ३० वर्षांपूर्वी वाहिली होती.

नजरेची भाषा फक्त प्रेमात बोलायची असं थोडीच आहे. व्ययवसायिक जीवनात पण वापरू शकता. 

No comments:

Post a Comment