Friday, 28 October 2016

रिअल पार्टनर

युके चा व्हिसा काढायला मी १९९९ ला मुंबई ला गेलो. मी आणि प्रदीप, माझा बिझिनेस पार्टनर, दोघे स्वित्झर्लंड हुन ऑफिशियल काम आटोपून प्रदीपच्या बहिणीला भेटायला युके ला जाणार होतो. इंटरव्ह्यू मध्ये व्हिसा ऑफिसरने विचारलं "are you traveling with someone?" मी म्हणालो "Yes, my partner" तर तो म्हणाला "what partner" मी म्हणालो "What do you mean" तर तो म्हणाला "I mean, do you share same bed". मी ताडकन उडालो. आणि म्हंटलं "No no, he is my business partner".

जोक्स अपार्ट, पण जितका वेळ आपण घरी जागे असतो, त्याच्यापेक्षा जास्त कंपनीत असतो. त्यामुळे बिझिनेस पार्टनर हा चांगला मिळणं हे भाग्याचं लक्षण. मी त्याबद्दल भाग्यवंत आहे. बरेच जण विचारतात, तुमची पार्टनरशिप कशी काय टिकली?

बाकी कुठल्याही मुद्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघातल्या विसंगती:

- आमच्या दोघातला वयाचा फरक. इतर नेहमीच्या पार्टनरशिप मध्ये बहुतेकदा समवयीन मित्रात एकत्र बिझिनेस करण्याची हुक्की येते. माझ्यात आणि प्रदीपच्या वयामध्ये तब्बल ११ वर्षाचं अंतर आहे. मग वयोपरत्वे असणाऱ्या महत्वाकांक्षेत फरक आहे.

- मी डोक्यापासून पायापर्यंत मराठी. तर प्रदीप मूळ गुजराती पण जन्मला आणि मोठा झाला पुण्यात.

- प्रदीप अत्यंत शिस्तशीर आणि वक्तशीर आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत बहुतेक दिवशी त्याच्या रुटीन मध्ये एका सेकंदाचा फरक नसतो. त्याने येण्याची वेळ द्यावी आणि आपण घड्याळ त्या प्रमाणे लावावं. गॉगल केस मध्ये ठेवणे, बॅगेत ठेवणे, त्याची झिप लावणे, ११:३० वाजता न चुकता काही तरी खाणे, दररोज तितकीच सिगरेट पिणे, तितकेच जेवणे आणि बरंच काही. मी याच्या बरोबर उलट. मी एकाच रस्त्याने चार दिवस घरून कंपनीला जाऊ नाही शकत.

- एखादी गोष्ट त्याच पद्धतीने करण्याच्या सवयीमुळे प्रदीप चं स्पिन्डल रिपेयर चं स्किल वादातीत आहे. आणि त्याचा आमच्या बिझिनेस ला खूप फायदा होतो. मी मात्र सगळ्याच गोष्टीचं थोडं थोडं ज्ञान बाळगून आहे. हो हो तेच jack of all........ त्यामुळे आमच्या कोअर स्किल मध्ये मी लक्ष घालत नाही आणि बाकी सपोर्ट सिस्टम मध्ये त्याला लक्ष घालायची गरज पडत नाही.

- बिझिनेस चालू केल्यापासून ते आतापर्यंत प्रदीप ने मला एक पैशाचा, and I mean it, एक पैशाचा हिशोब मागितला नाही आहे.

- कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना त्यातील संभाव्य धोके त्याला बरोबर लक्षात येतात. पण त्या धोक्यावर मात कशी करायची हे सांगितलं तर त्याच्या मतावर आडून राहण्याचा तो आडमुठे पणा करत नाही. मी सुद्धा काय करायचं यावर ठाम असतो पण कसं करायचं यावर वेगवेगळे मार्ग प्रयत्न  करायला फ्री ठेवतो.

- तो हात, पाय अन डोके शाबूत असेपर्यंत कंपनीत काम करणार आहे. माझी इंजिनियरिंग करिअर पुढील २-४ वर्षात थांबणार आहे. नाही, मी रिटायर नाही होणार, पण काही दुसरे प्लान्स आहेत. (नाही नाही, लेखक पण नाही होणार)

असे खरं तर अनेक मुद्दे आहेत. काही साम्य स्थळे पण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकांचे गुणदोष स्वीकारले आहेत. आमची भांडणं पण प्रचंड झाली आहेत. पण त्या सगळ्यांना ही पार्टनरशीप पुरून उरली आहे. नॉर्मल माणसात असतो तितका अहंकार दोघातही आहे, पण आमच्या पेक्षा कंपनी मोठी आहे हे दोघांच्या ही पक्के लक्षात आहे. नातेवाईक कंपनीत कामाला ठेवायचे नाहीत यावर दोघांचे एकमत आहे.

आज हे सगळं लिहायला हरकत नाही आहे. कारण पुढचं वर्ष हे आमच्या पार्टनर शिप चं रौप्य महोत्सवी वर्ष असणार आणि आता जे काय उरलेले काही वर्षे आहेत त्यात ती तुटणं आता तरी असंभव वाटतं.

आणि हो, तुम्हाला जो पार्टनर माहित आहे तो प्रदीप नाही आहे. तो तिसराच आहे अजून. त्याला भेटायचं असेल तर तुम्हाला कंपनीत यावं लागेल.



No comments:

Post a Comment