Thursday, 25 May 2017

कमोड

वेस्टर्न टॉयलेट मध्ये कमोड ला दोन झाकणं असतात. पहिलं झाकण उघडलं की कमोड दिसतो. दुसरं झाकण हे वेस्टर्न टॉयलेट वर बसून करण्याच्या क्रिया करताना खाली असावं. पुरुष मंडळी जे साधारणपणे उभे राहून युरीनेट करतात त्यांनी त्यावेळेस हे झाकण वर करावं. म्हणजे नंतर ज्यांना कुणाला टॉयलेट वर बसून काही क्रिया करायची असेल तर थेंबांवर बसावं लागणार नाही. जर वॉटर जेट वापरला तर टॉयलेट पेपर ने त्या झाकणावर सांडलेले पाणी पुसून पेपर डस्ट बिन मध्ये टाकावा.

लिफ्ट ने वर खाली जाताना आपल्याला ज्या दिशेला जायचं आहे तेच बटन दाबावं. दोन्ही बाजूला दिसणारे ऍरो दाबू नये. हाय राईज बिल्डिंग मध्ये असं केल्यास येड पळतं.

विमानात, रेल्वेत, बस मध्ये लगेज ठेवताना असं ठेवावं की जागा कमी व्यापेल.

या अशा गोष्टी सार्वजनिक ठिकाणी कुठेही लिहिलेल्या नसतात. पण आपलं लॉजिक वापरायचं असतं. बाकीच्या लोकांसाठी आपलं वागणं सुसह्य होईल याचा थोडा विचार करावा.

आज आपण असा विचार करायला लागलो तर पन्नास वर्षांनी आपण पुढील पन्नास वर्षात आर्थिक महासत्ता कसे बनू यावर विचार करायला पात्र होऊ.

(एका महाशयांनी आधीच्या पोस्टवर कॉमेंट टाकली की खुर्चीवर लगेज ठेवून बसू नये असं कुठं लिहिलं आहे? हसावं का रडावं अशांच्या पुढे? म्हणून हा पोस्टप्रपंच)

Monday, 22 May 2017

मॅकडोनाल्ड

का कुणास ठाऊक, पण मॅकडोनाल्ड मला काही फार भावत नाही. मुळात आपण भारतीय अन त्यातल्या त्यात मराठी हे कुठल्याही गोष्टीत भावभावना शोधतात. मॅकडोनाल्ड मध्ये मानवी भावभावनांचं खूप यांत्रिकीकरण झाल्यासारखं वाटतं.
तिथली ऑर्डर घेणं, ती देणं, खाताना पाणी द्यायला उशीर करणं अन त्याऐवजी कोल्डड्रिंक विकून पाजणे, सॉस डिस्पेन्सर, तो पोचा मारणारा आणि खाल्ल्यावर निर्विकार पणे वेस्ट बिन ला ट्रे घेऊन जाणारा माणूस. सगळं कसं यंत्रवत. यायचं असेल तर या, खायचं असेल तर खा, जाताय तर जा असा सगळा मामला.

त्यांनी त्यांच्या बिझिनेसचं मार्केटिंग करताना सॉफ्ट टारगेट शोधलं अन ते म्हणजे लहान मुलं. त्यांच्यासाठी फुगे, खेळणी, वाढदिवसाच्या पार्ट्या असले उद्योग करतात. आणि मग पोरं आपल्या आईबापांना आपसूक ओढत आणतात. सगळ्या जगात त्यांच्या प्रकृतीस घातक अशा खाद्यपदार्थांची बोंबाबोंब होत असताना तेच पदार्थ थोपण्याची त्यांची अरेरावी उद्दाम आहे.

मी भारतात मॅकडोनाल्ड ला खूप कमी वेळा गेलो. सगळ्यात जास्त वापर केला तो चीन मध्ये. नॉन व्हेज खात असूनसुद्धा चीनमध्ये खायचे वांदे होतात. तिथे मी आठवड्या भराच्या वास्तव्यात पाच सहा वेळा मॅकडोनाल्ड मध्ये गेलो.

मला असं वाटलं त्यांच्या पदार्थांच्या क्वालिटीच्या निगेटिव्ह गोष्टींबद्दल वाचल्यामुळे माझ्या मनात एक अढी असेल. पण ती अढी का आहे हे मी फाऊंडर पिक्चर बघितल्यावर कळलं.

फाऊंडर.......

मॅकडोनाल्ड ची स्टोरी. रे क्रॉक, क्रॉक कुठला क्रोकडाईल च तो. समोरच्याला गिळंकृत करणारा.

अत्यंत पापभिरू अन इमानेइतबारे धंदा करणाऱ्या मॅकडोनाल्ड बंधूकडून त्याने हा बिझिनेस अक्षरशः हिसकावला. लुटलाच म्हणा. अर्थात काही जणांना रे चं वागणं पटेलही, पण मला नाही पटलं. श्रीमंत बनण्याच्या हव्यासापोटी आणि त्या वृत्तीला persistance, पाठपुरावा असं गोंडस नाव देऊन जगातली सगळी सुखे पायावर लोळवून घेतलेल्या रे चा मला रागच नव्हे तर तिरस्कार वाटला. ज्या ब्रूट मसल पॉवर बद्दल अमेरिका बदनाम आहे त्याचा अनुभव फाऊंडर बघताना ठायीठायी येतो. रे क्रॉक मॅकडोनाल्ड ची लूट करत असताना लाज अक्षरशः कोळून पितो. ०.५% वर्षाला रॉयल्टी द्यायच्या क्लॉज ला पानं पुसतो (आज मॅकडोनाल्ड कुटुंबाला त्यापोटी १८०० कोटी रु वर्षाला मिळाले असते), तो मॅक च्या तब्येतीची काळजी करत नाही, इन्व्हेस्टरच्या बायकोला पटवतो, राक्षसी स्वप्न पूर्ण करण्यासाठी बायकोला घटस्फोट देतो, ज्या मॅकडोनाल्ड बंधूनी बर्गर बनवण्याची स्पिडी सिस्टम बनवली त्यांचं नामोनिशाण गायब करतो अन अत्यंत मानभावीपणे डिक मॅकडोनाल्ड ला आपलं कार्ड देतो, रे क्रॉक, फाऊंडर, मॅकडोनाल्ड कॉर्पोरेशन.

कुठल्याही कंपनीची टॉप मॅनेजमेंट जशी वागते ती क्वालिटी अगदी कंपनीच्या खालच्या लेव्हल पर्यंत पाझरत जाते.  एखाद्याशी बिझिनेस व्यवहार करतानाचा निर्विकारपणा रे क्रोकच्या वागण्यातून जाणवतो अन मॅकडोनाल्ड च्या काउंटर वरील बारक्या पोरापोरींच्या वागण्यातून सुद्धा.

Saturday, 20 May 2017

नागरिकशास्त्र

गुरुवारी दिल्ली एअरपोर्ट वर होतो. तोबा गर्दी. दिवसभर त्या दिल्लीच्या गरम वातावरणात कार चालवून पकलो होतो. दमलेलो. बसायला खुर्ची शोधत होतो.

बऱ्याच जणांच्या बाजूच्या खुर्चीवर लॅपटॉप बॅग, रुमाल, मोबाईल अशा विविध वस्तू ठेऊन जागा अडवल्या होत्या. मी विचारायचो, कुणी बसलं आहे का?. हो सांगायचे.

एक नवश्रीमंत युवकाच्या शेजारच्या खुर्चीवर बॅग ठेवली होती. युवकाला मी विचारलं, कुणी बसलं आहे का?

तर छोकरा म्हणतो कसा "Do you want to sit?"

मी म्हणालो "Why are you asking this?. Chair is meant for people to sit and not for your bags."

जळजळीत नजर टाकत त्याने बॅग काढून खाली ठेवल्या. मी बसलो. युवक लॅपटॉप वर पिक्चर बघत होता.

अशीच खुर्ची शोधत एक सत्तरीचे गृहस्थ आले. मी साहजिक पणे त्यांना खुर्ची द्यावी म्हणून उभा राहिलो. ते करताना त्या मुलाला सांगितलं "Go back to your school and learn civics again"

नागरिकशास्त्र १०० मार्कंचं पाहिजे शाळेत.

Friday, 19 May 2017

त्रिगाव

पुण्यापर्यंत आयुष्याची गाडी पोहचेपर्यंत तीन थांबे घेतले होते. NAN, नासिक-औरंगाबाद-नागपूर. ते मंगळयानाला कसं एका लेव्हलला जाईपर्यंत फ्युएल लागलं होतं, अन नंतर त्याची स्वतः ची गती त्याला पुढचा प्रवास करण्यासाठी इंधन देतं, तसं मला या तीन गावांनी इंधन दिलंय. अर्थात माझं यान अजून तरी इथेच भरकटते आहे. ते असो.

तर सांगत होतो त्रिगावांबद्दल. या गावी जाण्यासाठी मी कधीही एका पायावर तयार असतो. रिफ्रेश होतो अगदी. परवा नाशिकला गेलो होतो. तसंच झालं.

दिवसभराची कामं आटोपून रात्री श्रीनिवास पत्की उर्फ टोटो ला भेटलो. तेहतीस वर्षांनंतर. भेटल्या भेटल्या गळाभेट झाली, त्या मिनिटभरात कालपटाची सगळी वर्षे गळून पडली. टोटो, खरंतर सीएट चा प्लांट हेड आहे तो, त्यामुळे ह्या नावाने त्याला बोलावणं कसं तरीच वाटतंय. तर टोटो आमच्या शाळेच्या पहिल्या बॅच चा विद्यार्थी. दोन वर्षाने पुढे. एकूणच या बॅच बद्दल कुतूहल होतं. त्या काळी पण टोटो बोलताना मी त्याच्या कडे कौतुक मिश्रित आदराने पाहायचो. (रादर त्या बॅच च्या प्रत्येकाकडे आमच्यातल्या प्रत्येकाला असंच वाटायचं) आज तेहतीस वर्षांनंतरही त्याच्या सहज बोलण्यात आणि मी ते कौतुकाने ऐकण्यात तसूभरही फरक पडला नाही. शाळा आणि शिक्षक यांच्या बद्दल प्रेमादर हा एक कॉमन आवडीचा विषय होता दोघांच्या. मनसोक्त गप्पा मारून मी हॉटेल पंचवटीला जाऊन झोपलो, वकील वाडीत.

दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक म्हणून मी चालू लागलो. यशवंत व्यायाम शाळेवरून मेन रोड च्या चौकातून रविवार कारंजा कडे आलो. मध्ये पेठे हायस्कुल नामक मंदिराचं दर्शन झालं. तिथून तांबट आळी कडे वळलो. एक सिमेंट चा रस्ता सोडला तर बरंच काही तसंच आहे अजून.  रविवार कारंजाच्या आमच्या स्टॉप वर येऊन उभा राहिलो. हाईट म्हणजे ते प्रभूइच्छा नावाचं दुकान पण दिसलं. साईबाबा चा वेष घालणारे ते पाटील काका मला आजही आठवतात.

पुढचा योगायोग अभूतपूर्व होता. वय विसरत भूतकाळाच्या गोधडीत शिरत मी त्या स्टॉप उभा राहिलो. तर पुढची सिटी बस मेरी म्हसरुळ. मला वाटलं आता ते चिडचिड करणारे घोलप ड्रायव्हर आणि तितकेच प्रेमळ पाटील कंडक्टर दिसतात की काय! अचानक पाठीवर मला दप्तर असण्याचा भास झाला अन कानात तांबट आळी तील "ठाक, ठाक" असा तांबे ठोकण्याचा आवाजही आला.

साला, आवंढा येणारा घसा आणि पाणी जमा होणारे डोळे या दोन अवयवांवर माझं अजिबात नियंत्रण नाही आहे. अदरवाईज मी खूपच चांगला आणि सभ्य माणूस आहे.

असो. एकंदरीत रविवार कारंजा आणि टोटो जसे होते तसेच आजही आहेत.

(टोटो आणि माझं "टीचर्स" बद्दल प्रेम हा पण एक कॉमन आवडीचा विषय होता 😊😊)

नियम

मी काही गोष्टी पाळतो. त्या दुसऱ्यांनी पाळाव्या असा माझा आग्रह नसतो.

उदा: सिग्नलला लाल रंगाचा दिवा लागल्यावर थांबणे. आणि आपल्याच समोरचा हिरवा झाल्यावर निघणे.

किंवा

धर्म, देव या संकल्पनेबद्दलचे विचार स्वतः जवळ ठेवणे.

किंवा झालं च तर

ज्या गोष्टीला आपण कारणीभूत नाही त्यासाठी अभिमान, गर्व वगैरे न बाळगणे

किंवा अगदीच फारच झालं तर

फेसबुकवर हेच का लिहिता अन तेच का लिहिता असे फुकटचे सल्ले न देणे.

इतकं पुरे.

अजून आठवले होते. पण फेसबुक चा पॉईंट आल्यावर बाकी विसरून गेलो.

एक्सझिबिशन

एक्सझिबिशन मध्ये भाग घ्यायचा म्हंटलं की माझ्या अंगावर काटा येतो. साहजिक आहे हो. बऱ्याच एजन्सीज बरोबर काम करावं लागतं. मटेरियल न्या, बूथ डिझायनर, साईट हॅंडलिंग, हॉटेल बुकिंग, येण्या जाण्याचा खर्च, कंपनीपासून आठवडाभर बाहेर अशा एक ना अनेक भानगडी. आणि हे सगळं करण्यासाठी होणारा बेधुंद खर्च. भरीस भर म्हणून या प्रदर्शनातून येणारे रिटर्न्स कॅल्क्युलेट करणं अवघड असतं. त्यात परत हे इमटेक्स सारखं प्रीमियम प्रदर्शन असेल तर त्यांचे बूथ चे चार्जेस अव्वाच्या सव्वा. आमच्या साईजचा छोटा उद्योजक अगदी मेटाकुटीला येतो.

पण एक्झिबिशन चे फायदे पण असतात. एकतर ब्रँडिंग जबरदस्त होतं. तिथे बहुतांश लोकं इंडस्ट्रीज चे येत असल्यामुळे बऱ्याच कस्टमर्स पर्यंत पोहोचता येतं. काही डायरेक्ट तर काही इंडायरेक्ट ऑर्डर्स मिळण्याची शक्यता तयार होते.

प्रदर्शनात भाग घ्यायचा की नाही याची बेरीज वजाबाकी केली असता बऱ्याचदा भाग घेण्यावर शिक्कामोर्तब होतं. प्रीमियम एक्झिबिशन मध्ये सहभाग घ्यायचा की सॅटेलाईट टाऊन मध्ये यावर खल होतो, पण गरजेनुसार सहभाग घेतोच.

असंच हे Imtex Exhibition. भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आमच्या क्षेत्रातील प्रीमियम प्रदर्शन. आज प्रजासत्ताक दिवशी चालू झालं आहे. वर्ष भराचा खुराक इथून मिळावा अशी इच्छा आहे. बघू काय काय घडतं ते!

हे असं आहे, काय मग

बऱ्याचदा सोशल मीडिया वर कसं व्यक्त व्हावं याबद्दल बराच उहापोह होतो. कधी वाखाणलं जातं, तर कधी हिणवलं जातं. कुणी कौतुक करतं तर कुणी खिजवतं. माझा स्वतः चा आव इथे माहितीच्या देवाणघेवाणी चा आहे. आणि त्यापासून फारकत घ्यायची मला सध्यातरी आवश्यकता वाटत नाही. अन तसं वाटणाऱ्या काही घटना पण घडल्या.

नोव्हेंबर महिन्यात सत्कार हॉटेलच्या बाहेर  विशीतला यशोधन मला भेटला अन म्हणाला "सर, तुमची कार पाहून पाऊण तास मी वाट बघत थांबलो आहे. तुमचे विचार वाचून एक दिशा मिळते जगण्याची" असंच काहीबाही बोलून झटकन पाया पडून गेला सुद्धा. अन मी हतबुद्ध होत त्याच्याकडे बघत राहिलो. हे एक वानगीदाखल उदाहरण.

बरं दुसरं असं की राजकारणाबद्दल काही लिहावं इतकी माझी पोच नाही. आकलनशक्ती नाही. मुख्य म्हणजे, बाजू तरी कुणाची घ्यावी. धार्मिक उन्मादाचा उघड किंवा छुपा पुरस्कार करणारी लोकं, की ज्यांच्याशी वैचारिक नाळ जुळते अशांनी घराणेशाहीच्या आहारी जाऊन राष्ट्रहिताला तिलांजली देणाऱ्यांची. एका बाजूला मुत्सद्दीपणातून भ्रष्टाचारी नेत्यांची फौज तयार करणारी लोकं तर दुसऱ्या बाजूला प्रदेशिकवादाची संकुचित प्रवृत्ती जोपणारी मंडळी.

दुसरं झालंय असं की समाजकारण सुद्धा माजकारण झालं आहे. क्षुल्लक गोष्टीवरून रस्त्यावर होणाऱ्या मारामाऱ्या, डॉक्टर्स ना मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड, गावगुंडाची चालणारी अरेरावी, स्त्रियांवर होणारे अत्याचार, स्मारकं, पुतळे, रस्त्याची नावं यावरून होणारे विध्वंसक वितंडवाद अन या सगळ्यांवर कडी करणारा, ज्याचं खरं तर निर्मूलन व्हायला पाहिजे तो जातीयवाद अन धार्मिक वाद. सोशल मीडिया मुळे असंतोष पसरत नाही या माझ्या प्रस्थापित विचारांना धक्का पोहोचवणाऱ्या घटना डोळ्यासमोर घडल्या आणि अशी सामाजिक तेढ दाराजवळ येऊन पोहोचली आहे याची भयानक जाणीव झाली.   आताच कुणीतरी बोललं की जाने भी दो यारो सारखा पिक्चर आज आला तर काय गजहब होईल!आणि या सामाजिक घसरणीला नुसते नेतेच नाहीत आपण सगळेही जबाबदार आहोत. ही उतरंड गेल्या काही वर्षात नाही तर काही दशकात झाली आहे.

मग अशा काळात माझ्यासारखा सामान्य माणूस आलिया भोगासी असावे सादर या उक्तीप्रमाणे समोर आलेल्या आव्हानांना सामोरे जात वाट काढत जातो. ज्या लोकांशी डायरेक्ट वा इंडायरेक्ट संबंध येतो त्यांनी या विषारी विचारांना दूर ठेवावं यासाठी माझ्या परीने प्रयत्न करतो. ज्या देशात आपण जन्मलो त्याची विविधता ही कॉम्प्लेक्स असली तरी स्थायीभाव आहे. तो जपणं हे माझं समाजाप्रती उत्तरदायित्व आहे. आणि ते ऋण फेडण्यासाठी मी प्रत्यक्ष जीवनात आणि सोशल मीडियावर कसं वावरायचं याची ढोबळ प्रणाली ठरवली आहे. त्यात मग राजकीय, धार्मिक विषयावर कमीत कमी भाष्य करायचं. कुठल्याही जातीबद्दल प्रत्यक्षात काडीचंही प्रेम वा अंशभरही द्वेष ठेवायचा नाही. आणि खरोखर सांगतो कोणत्याही जातीबद्दल ओलावा किंवा दुरावा हा मला प्रोफेशनल वा पर्सनल आयुष्यात परवडणारा नाही. त्यामुळे कोणत्याही जातीचा उल्लेख पोस्ट मध्ये तर काय पण कॉमेंट मध्ये पण करायचा टाळतो.

मग माझ्याकडे उरतं काय? तर अत्यंत चमत्कारिक परिस्थितीतून रांगणारा बिझिनेस. त्यातून येणारे चित्र विचित्र अनुभव. त्यात काही मानाचे, काही अपमानाचे, मूठभर प्रेमाचे, पसाभर द्वेषाचे, गुंजभर दुःखाचे अन मणभर सुखाचे क्षण. त्याची दवंडी पिटण्या चं सोडून माझ्याकडे काही नाही.

म्हणून म्हणतो, कुणी म्हणत पण असेल मला दीडशहाणा, म्हणो बापडे पण जे मी ठरवलं त्यापासून फारकत घेण्याची मला सध्यातरी गरज वाटत नाही.

शहरातल्या पहाट

आज पहाटेच मॉर्निंग वॉक ला निघालो. पाच ची वेळ.

उजवीकडच्या पहिल्या वळणाला एका दुकानाच्या पायरीवर ती आणि तो बसले होते. ती हमसाहमशी रडत होती, तो तिला काहीतरी जीव तोडून समजावत होता. त्यांच्यातला अजून एक मुलगा त्या दोघांकडे बघत सिगरेट पित उभा होता. प्रकरण काय ते कळलं नाही.

थोडं पुढे चालत गेल्यावर रस्त्यावर एक कुत्रा छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडला होता. रात्रीच कुणी वाहनाने उडवलं असेल त्याला. आतडी रस्त्यावर पडली होती. ज्यांच्या लक्षात येत होतं, ते त्याला चुकवून जात होते. ज्यांच्या नाही ते वाहनचालक त्यावरून जात होते अन त्याची विछिन्नता वाढवत होते.

पुढे चालत गेलो तर डिव्हायडर वर कार चढली होती. रात्री कधीतरी ऍक्सिडेंट झाला असावा.  रेडिएटर चं पाणी खाली दिसत होतं.

रस्ता परिचयाचा. चहाचं दुकान नुकतच उघडलं होतं. चहावल्याने दोन कप चहा आणि पाव जमिनीवर फेकला, नैवेद्य म्हणून. रोज फेकतो.

मॅकडोनाल्ड च्या समोरच्या फुटपाथवर दोन कुटुंब झोपली आहेत. त्यातलं दोन एक वर्षाचं नागडं मूल  आईला उठवायचा प्रयत्न करतंय.

२०० मीटर नंतर कचऱ्याचा ढीग असतो. त्यातून एक विचित्र दुर्गंधी येत असते. एखादं डुक्कर वगैरे मेलं असावं बहुधा.

मी रेसकोर्स ला येतो. त्याच्या गेट वर शूज, चपला आणि पाण्याच्या बाटल्या इतस्ततः विखुरलेल्या असतात. आदल्या दिवशी जवानांची भरती होती. गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली असावी.

शरीरात ऊर्जा येण्यासाठी मी सूर्य उगवायची वाट बघत राहतो.

शहरातल्या पहाट आजकाल रम्य बिम्य नसतात.

स्पर्धा

तर साधारण पणे १९९५-९६ ची गोष्ट असेल. एफ सी रोडच्या एका हॉटेल मध्ये मी माझ्या साहेबाचे रुमचे बुकिंग करायचो. त्यावेळेला एका रात्रीचे २५०० रु मोजायचो. सागर प्लाझा त्या काळात ३००० रु चार्ज करायचे एका रात्रीचे.

१९९७ साली मी दिल्ली ला प्लास्ट इंडिया साठी गेलो होतो. कॅनॉट प्लेस ला मरिना इंटरनॅशनल मध्ये राहिलो होतो तेव्हा एका रात्रीचे ३००० रु मोजले होते वट्ट. खाणं, लॉंड्री, राहणं मिळून इतकं बिल झालं होतं की माझी क्रेडिट कार्ड ची लिमिट क्रॉस झाली होती.

त्याच सुमारास बोनी, माझा बॉस, विमानाने यायचा बंगलोर हुन. दररोज विमान असायचं. पण एकच. एक दिवस एअर इंडिया चं (तेव्हाची इंडियन एयरलाइन्स) तर एक दिवस जेट चं. आणि भाडं असलंच काहीतरी ३००० रु वगैरे.

आज वीस वर्षे झालेत. ते एफ सी रोड च्या हॉटेल कडे ढुंकून पण बघत नाही कुणी. गुरगाव मध्ये लेजर इन २३०० रु मध्ये मिळतं, प्राईड जास्तीत जास्त ४५००. एरो सिटी चं असेल तर ५०००. हैद्राबाद चं मारीगोल्ड मिळतं ४००० ला तर चेन्नई चं जेपी नावाचं कोयंबेडू चं अफलातून हॉटेल २८०० रुपयेमध्ये.

आज पुणे बंगलोर मध्ये आज दिवसाला वीस एक फ्लाईट आहेत. ऍडव्हान्स मध्ये तिकीट काढलं तर २२०० मध्ये तिकीट मिळतं. परवा दिल्ली बंगलोर तिकीट २३५० मध्ये मिळालं.

नाही पण हे मी तुम्हाला का सांगतोय? लाल करायची म्हणून. ती तर करायचीच आहे, पण इथे महत्व अधोरेखित होतं ते कॉम्पिटिशन चं. ती झाली आहे म्हणून किमती कमी झाल्यात. पुरवठा आणि मागणी याची सांगड असली की ग्राहकाला स्वस्त भावात चांगली सर्व्हिस मिळते.

हो, पण आज का? काही नाही, आमचा पण एक स्पर्धक पुण्यात शॉप थाटतोय. सुरुवातीला धास्तावलो होतो. पण मग विचार केला, येतोय ते बरंच आहे. स्पर्धा नाही म्हणून येणारा बिझिनेस गिळून अजगरासारखा सुस्तावलो होतो. थोडी मोनोपोली ची सुखनैव भावना मनात रुंजी घालत होती. आता बरोबर पाय लावून पळेल. सर्व्हिस अजून चांगली देईन. किंमत पण वाजवी ठेवेल. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवेन.

स्पर्धा कितीही आली तरी एक वास्तव मात्र कुणीही हिरावू शकणार नाही, अन ते म्हणजे हा स्पिन्डल रिपेयरचा बिझिनेस organised पद्धतीने करणारी भारतातील आमची पहिली कंपनी. फक्त "Father of Low Cost Airlines" म्हणून गौरवले गेलेले कॅप्टन गोपीनाथ हे नाव स्पर्धेमुळे जसं अस्तंगत झालं तसं आमच्या कंपनीचं होऊ नये, हीच मनोकामना.......दिल से

कौतुकास्पद

कितीही प्रॉब्लेम्स असले तरीही

खेड्यातल्या केवळ एका प्रवाशासाठी पन्नास शंभर किमी ची फेरी मारणारी एसटी

एकुणात हजार एक रुपये बिल कलेक्शन होत असलं तरी कुठंतरी डोंगरात लाखो रुपयांची टेलिफोन लाईन टाकणारी बी एस एन एल

असंख्य खस्ता खाऊन अक्षरश: शंभर घरासाठी कुठेतरी दुर्गम भागात पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सकट वीज उपलब्ध करून देणारी एम एस ई बी

चार जण असले तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कित्येक किमी ची पायपीट करून मतपेटी पोहोचवणारे निवडणूक अधिकारी

आजच्या जगात ही ५० पैसे प्रति किमी भाडं घेणारी रेल्वे

हे माझ्यालेखी कौतुकास पात्र आहेत.

प्रार्थना

माझं सातवी पर्यंत अंकगणित एकदम कच्च होतं. आठवीपासून मात्र बीजगणितात आणि भूमिती त फटके बसू लागले आणि गणितात रुची वाढली. दहावी पर्यंत तर गणितात एक हुशार म्हणून गणला जाऊ लागलो. पुढे डिप्लोमा अन इंजिनियरिंग ला सगळ्यात जास्त साथ दिली ते गणितानेच. डेरिव्हिटीव्हज आणि इंटिग्रेशन हे बाकी मित्रांना किचकट वाटणारे विषय मला आवडू लागले. एकंच प्रॉब्लेम वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करण्यात मजा येऊ लागली. थोडक्यात नस बरोबर सापडली अन सातवी पर्यंत दुर्बोध वाटणारा विषय आता एकदम सुबोध झाला.

कविता अन शास्त्रीय संगीताचं तसंच झालं. मुळात इथे कवितेतल्या शब्दांचा अर्थ समजला पाहिजे हा अट्टाहास अनाठायी आहे. किंवा शास्त्रीय संगीतातला आरोह, अवरोह, गंधार, षड्ज हे माहितीच पाहिजे याची काही गरज नाही असं माझं मत आहे. मला बऱ्याचदा यातलं काही म्हणजे काही कळत नाही तरीही कविता वा शास्त्रीय संगीत हे आवडतं. बऱ्याचदा त्यातली गती, प्रवाह, लय हे  कानाला छान वाटतात. याउपर जर कधी अर्थ कळलाच तर सोने पे सुहागा.

दोन अणे

माझं सातवी पर्यंत अंकगणित एकदम कच्च होतं. आठवीपासून मात्र बीजगणितात आणि भूमिती त फटके बसू लागले आणि गणितात रुची वाढली. दहावी पर्यंत तर गणितात एक हुशार म्हणून गणला जाऊ लागलो. पुढे डिप्लोमा अन इंजिनियरिंग ला सगळ्यात जास्त साथ दिली ते गणितानेच. डेरिव्हिटीव्हज आणि इंटिग्रेशन हे बाकी मित्रांना किचकट वाटणारे विषय मला आवडू लागले. एकंच प्रॉब्लेम वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करण्यात मजा येऊ लागली. थोडक्यात नस बरोबर सापडली अन सातवी पर्यंत दुर्बोध वाटणारा विषय आता एकदम सुबोध झाला.

कविता अन शास्त्रीय संगीताचं तसंच झालं. मुळात इथे कवितेतल्या शब्दांचा अर्थ समजला पाहिजे हा अट्टाहास अनाठायी आहे. किंवा शास्त्रीय संगीतातला आरोह, अवरोह, गंधार, षड्ज हे माहितीच पाहिजे याची काही गरज नाही असं माझं मत आहे. मला बऱ्याचदा यातलं काही म्हणजे काही कळत नाही तरीही कविता वा शास्त्रीय संगीत हे आवडतं. बऱ्याचदा त्यातली गती, प्रवाह, लय हे  कानाला छान वाटतात. याउपर जर कधी अर्थ कळलाच तर सोने पे सुहागा.

Gratitude

आज आमच्या कंपनीत महिन्याला शेकडो स्पिन्डल भारत भरातून रिपेयर ला येतात. अर्थात ते येण्याअगोदर कस्टमर बऱ्याचदा आमचे क्रेडेन्शियल चेक करतो. कुणी कंपनीत येऊन इन्फ्रास्ट्रक्चर बघून जातं, कुणी दुसऱ्या कस्टमरला रेफेरन्स म्हणून फोन करतो, कुणी आधीच्या कामाचं टेस्टीमोनियल मागतं. आणि मग आम्हाला काम मिळतं.

यावेळेला मला ते तीन कस्टमर आठवतात, ज्यांनी १९९४ साली माझ्याकडे त्यांना दाखवायला काहीही नसताना त्यांनी काम दिलं. हा दिलेला स्पिन्डल त्यांच्याकडे परत मी देईल का, ही पण त्यांना गॅरंटी नसावी. पण तरीही त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला.

त्या ज्या तीन लोकांमुळे मी अनेक रेफरन्सेस बनवले, त्यांचा मी आजन्म ऋणी राहील.