Thursday, 21 December 2017

उपद्व्याप

ते मुखपृष्ठ प्रकाशकांनी मंजूर केलं आणि मी आधाशासरखं ते फेसबुकवर शेअर करून टाकलं. (ते ठीक आहे, पण पुस्तक लिहून झालंय  का, की फक्त कव्हरच बनवलं आहे).

तर शेवटी हे पुस्तक तयार झालंय. पोस्टवरच्या कॉमेंट्समधून काही मित्र पुस्तक काढ म्हणून सुचवायचे. मला स्वतःला ते काही झेपायचं नाही. कारण पुस्तक लिहायचं म्हणजे एक कमिटमेंट लागते. ती देता येईल की  नाही याबद्दल मी साशंक होतो. टायटनचे एमडी भास्कर भट आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया चे पहिले एमडी रवी वेंकटेशन यांच्यावर लेख लिहिल्यावर मीरा सिरसमकर यांनी फोन करून सांगितलं की या लिहिण्यात पुस्तक बनण्याची ताकद आहे. त्यावेळेस पहिल्यांदा मला असं वाटलं की हा पण उद्योग आपण करावा. ही तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. मनात आलं आणि नेहमीप्रमाणे मी विसरून गेलो. २०१६ संपताना मात्र दोघांचा अगदी कळकळीचा फोन आला. एक, सदानंद बेंद्रे आणि दुसरे अण्णा वैराळकर. दोघांनी सांगितलं की हे तू जे लिहितो आहेस ते संग्रही ठेवण्यासारखं आहे. पुस्तक नाहीतर पुस्तिका काढ. अण्णांजवळ मी माझ्याच लिहिण्याच्या साहित्यिक मूल्यांविषयी साशंकता व्यक्त केली. ते म्हणाले "तुला काही मापदंड प्रस्थापित करायचा आहे का? जे लिहिलं आहेस ते छाप. बाकी लोकांवरती सोड"

याच सुमारास मंगेश आणि सानिका वाडेकर, जे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत, मला येऊन भेटले. सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मी ब्लॉगचे लेख आणि बाकी अनुभव लिहीत हे पुस्तक पूर्ण केलं. थोडक्यात पुस्तकाचा ६०% कन्टेन्ट तुम्ही कधीतरी वाचला आहे. फक्त त्यात सुसुत्रता नव्हती. आता एका फ्लो मध्ये ते मी लिहून काढलंय. सानिका वाडेकर यांचाही हा पहिलाच प्रयत्न पूर्ण पुस्तक बनवण्याचा. त्यांचे मिस्टर मंगेश वाडेकर हे या व्यवसायात बरेच वर्षांपासून आहेत. त्यांनी सानिका वाडेकर यांना हे पुस्तक त्यांच्या मनाप्रमाणे काढायला पूर्ण मुभा दिली असावी.

ऋणनिर्देश करायचाच म्हंटलं तर मी सगळ्यात पहिले माझ्या बिझिनेसचं नाव घेईल. सेटको स्पिंडल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (जुनं नाव: अल्ट्रा प्रिसिजन स्पिंडल्स प्रायव्हेट लिमिटेड). या बिझिनेसच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येकाने मला काहीतरी शिकवलं आहे. मग ते कंपनीमध्ये काम करणारे माझे सहकारी असो, ग्राहक असो वा सप्लायर. मी व्यावसायिक नसलो असतो तर कदाचित हे पुस्तक लिहिलं नसतं.

आणि दुसरं नाव घेईल, ते तंत्रज्ञानाचं. ते नसलं असतं तर हा ब्लॉग नसता, फेसबुक नसतं आणि मग तिथे भेटलेले मित्र नसते, त्यांचे मेसेजेस नसते. आणि आता हे पुस्तक झाल्यावर सुद्धा फेसबुकमुळे संपर्कात आलेल्या मित्र मैत्रिणींनी मदत केली. पाहिलं प्रूफ रिडींग मीरा सिरसमकर यांनी केलं, जयंत विद्वंस याने ते पूर्ण वाचून काही सूचना केल्या, अमेरिकेतून शिल्पा केळकर ने खूप महत्वाची सूचना केली जिने पुस्तकाला चार चांद लागले, दत्ता जोशींनी पण अशीच एक अत्यंत महत्वाची चूक दाखवून दिली जी मी यथाबुद्धी दुरुस्त केली. पुस्तकाची प्रस्तावना देखील फेसबुकमधून संपर्कात आलेल्या एका इंडस्ट्रीच्या दिग्गजाला लिहायची विनंती केली आहे. ती येईलच. सानिका आणि मंगेश वाडेकर हे सुद्धा मला इथेच भेटले.

पुस्तकाचं मुखपृष्ठ हे सचिन दायमे यांच्या स्केलक्राफ्ट कंपनीतील कोमल केदार या मुलीने बनवलं आहे.

पुस्तक लवकर झालं ही असतं, पण बिझिनेस सांभाळताना फक्त रविवारी वेळ मिळाला आणि काही दिवशी संध्याकाळी  ७ ते ९, ते ही पुण्यात असेल तेव्हा. त्यामुळे ते रखडलं जरा, पण झालं शेवटी.

ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात ते पब्लिश होईल. प्रकाशनाची जागा, वेळ यथावकाश  येईलच.

पुस्तकाची किंमत आणि इतर कमर्शियल गोष्टी प्रकाशक सांगतीलच. (मी पुस्तक लिहून काढलं आहे, बाकी तुम्ही बघा बुवा.)

हे सगळं होऊन, प्रकाशन होईपर्यंत हे आता कवित्व चालू राहील. झेला थोडे दिवस.

बाकी तुम्ही मित्रत्वाच्या नात्याने चार गोष्टी ऐकून घेतल्या. हा उपद्व्याप पण सहन करा.

"पार्कातल्या कविता"

कालची संध्याकाळ अद्भुत गेली. स्वरूपा आणि नंदूचा "पार्कातल्या कविता" हा कार्यक्रम पु ल देशपांडे गार्डन मध्ये होता. कार्यक्रम विंदांना समर्पित होता. मला निमंत्रण होतं. विंदांच्या कविता मला आवडतात अन हे स्वरूपा ला माहीत आहे.

आठ  ताकदीचे कवी/कवियत्री होते. अन सगळ्यांनी नितांत सुंदर कविता पेश केल्या. काही गझल, मुक्तछंद, गेय कविता हे कवितेचे वेगवेगळे फॉर्म सादर झाले. सुप्रिया जाधव, निर्मिती, वैभव देशमुख यांना आधी ऐकलं होतं. बाकीच्यांना पहिल्यांदाच ऐकलं.

आणि मग नंदूने माझ्या नावाचा पुकारा केला. विंदांच्या कविता सादर करण्यासाठी. स्वरूपा ने निमंत्रण देताना थोडी कल्पना दिली होती. पण इतक्या तालेवार कवी/कववीयत्रीच्या मांदियाळीत मी खरं तर दबकलोच होतो. समोर म भा चव्हाण बसले होते, दत्तप्रसाद रानडे होते आणि त्यांचे वडीलही होते. बरं मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वाला माणूस. फार तर उद्योजकतेवर बोलणारा. कविता म्हणाल तर एक हौस म्हणून वाचतो. लोकांच्यासमोर म्हणाल तर खर्डेघाशीच्या एका कार्यक्रमात म्हंटलेल्या. पण ते आपले सगळे मित्रच.

इकडेतिकडे विखुरलेलं अवसान गोळा करत तीन कविता सादर केल्या. "माझ्या मना बन दगड", "असा मी कसा मी" आणि "तेच ते तेच ते". सुदैवाने तिन्ही कविता मला पाठ आहेत. लोकांना आवडल्या. अन मलाही आवडल्या.

नंतरचे पंचेचाळीस मिनिटं मात्र चांदण्यांची बरसात होत गेली. पहिले म भा चव्हाण सरांनी एकच पण वडिलांवर अफलातून कविता सादर केली.

आणि मग दादा रानडे, जे वयाने सत्तरीच्या घरात असतील,  यांनी पुढील अर्ध्या तासात कवितेच्या हर एक फॉर्मचा एकेक दागिना पेश केला, त्याने सारेच मुग्ध झालो. जागा सोडून त्यांचे कधी त्यांचे पाय धरले हे कळलंच नाही.

समारोप उत्तेकर यांनी तन्वीर सिद्दिकी च्या अत्यंत समर्पक कवितेने केला.

नंदूने कार्यक्रमाचा फ्लो मस्त मेंटेन केला.

तरंगत घरी आलो.

रात्री झोपल्यावर बरेच वर्षांनी कंपनी, बिझिनेस याव्यतिरिक्त वेगळीच स्वप्नं पडली.

अशी स्वप्नं अधूनमधून पदरात पाडून घ्यावी.

छान वाटतं.

डिजिटल मार्केटिंग

परवा आय के एफ ने आयोजित केलेल्या डिजिटल मार्केटिंग च्या सेमिनार ला गेलो होतो. एस इ ओ आणि इतर बाबींचं महत्व यावर चर्चा झाल्यावर सोशल मीडिया बिझिनेस साठी कसा उपयुक्त आहे यावर आयोजकांनी आणि काही प्रतिनिधींनी मतं मांडली.

मी म्हणालो "लिंक्ड इन ठीक आहे, पण फेसबुक वर धार्मिक, जातीय आणि राजकीय आदर्शवादावर घमासान युद्ध होतं. म्हणजे एखाद्या कस्टमर ला माझी राजकीय मतं आवडत नसतील तर तो माझी ऑर्डर कॅन्सल करू शकतो." पुढे जाऊन मी हे ही म्हणालो की एखादा आपला एम्प्लॉयीचं कडवं धार्मिक किंवा जातीवरचं मत मालकाला आवडत नसेल तर त्या नोकरदाराच्या नोकरीवर गदा येऊ शकते किंवा उलटं होऊ शकतं.

माझ्या या म्हणण्यावर असा प्रतिवाद केला गेला की प्रत्येकाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असतं. आठ तास नोकरी केल्यावर त्याने काय विचार करावा अन काय लिहावं, it is none of your business.

पटलं मला ते.

पण बरोबर हे ही मनात आलं की आपला समाज इतका प्रगल्भ असता तर आपण भविष्यात महासत्ता होऊ अशा आशेवर जगलो नसतो. तर आपण आज खरंच जागतिक महासत्ता असलो असतो.

चॉईस इज युवर्स

एका मित्राला अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला म्हणून प्रवास सोडून दिल्लीला एका पंचतारांकित हॉस्पिटल ला त्याला ऍडमिट करायला आलो आहे. त्याला अटेंड करताना अचानक एका बेड वरून पेशंटचा आरडाओरडा ऐकू आला. नर्स, बॉईज त्याला पाहून त्याच्या बेडपासून दूर पळत होते.

मी काही औषधं आणण्यासाठी बाहेर गेलो होतो तर त्या पेशंटचे मित्र त्याला धरून त्यांच्या कार मध्ये बसवण्यासाठी घेऊन जात होते. अन तो पेशंट हाताला हिसडे देत व्हायोलंट होत होता. तो घोषणा देत होता "हिंदुस्थान हमारा है" "कश्मीर कोई छिन नही सकता" "मंदिर वही बनाएंगे" बाकीचे मित्र तोंड दाबून त्याला चूप बसवायचा प्रयत्न करत होते.

मी आत डॉक्टरांना विचारलं "ऍडमिशन नाकारून कुठे पाठवलं?" तर म्हणाले "मेंटल हॉस्पिटल ला"

हे असं आहे. बुद्धी गहाण ठेवून जर धार्मिकतेचा असा अति पुरस्कार केला तर एकतर भरती मेंटल हॉस्पिटलमध्ये होते नाहीतर जेलमध्ये.

चॉईस इज युवर्स

डिजिटल मार्केटिंग

त्या डिजिटल मार्केटिंगच्या सेमिनार ला मला आयोजकांनी बोलावलं ते मी माझ्या बिझिनेस मध्ये डिजिटलचा वापर कसा केला ते सांगण्यासाठी. आशिष दलियाने, जो आय के एफ चा ओनर आहे, त्याने माझी कहाणी डिजिटल सक्सेस स्टोरी वगैरे म्हणून उपस्थितांना सांगितलं. ते ऐकून मीही चकित झालो. ते असो. पण जी गोष्ट मी तिथे सांगितली ती इथे सांगतो.

आपल्या बिझिनेसची माहिती जगाला व्हावी म्हणून मी माझी पहिली वेबसाईट बनवली २००३ साली. त्या वर्षी माझा टर्नओव्हर होता रु ११ लाख फक्त. आणि वेबसाईट वर खर्च केला होता वीस ते बावीस हजार. धाडसच ते. पण केलं.

ती बनते ना बनते तोच बिझिनेससाठी मी पहिली इआरपी बनवली. बनवणारे पण नवखे आणि मला तर इआरपी चा फुल फॉर्म पण माहीत नव्हता. सहा महिने अमृत नावाच्या डेव्हलपर बरोबर काम केलं आणि ती इन्स्टॉल केली. पुढे चार वर्षे वापरली. मला तिचा प्लॅटफॉर्म माहीत नाही, लँग्वेज माहीत नाही. पण बनवून घेतली. आजही मनात आणलं तर मी ती वापरू शकतो. मला आठवतंय टर्न ओव्हर ला जस्टीफाय करू शकेल अशी ही ऍक्टिव्हिटी नव्हती. तरी केली.

त्या नंतर परत आशिष नवीन प्रपोजल घेऊन आला. एस इ ओ. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. हा नवीन प्रकार होता माझ्यासाठी तेव्हा. पण याहू, गुगल, अल्टाव्हिस्टा या त्यावेळेसच्या फेमस सर्च इंजिन वर आपलं नाव पहिल्या पाचमध्ये दिसायला हवं यासाठी एस इ ओ सर्व्हिस घ्या. ती पण घेतली.

२०१२ पर्यंत मी त्यांची सर्व्हिस घेतली. बख्खळ पैसे ही मोजले. त्यांनतर सेटको ला आमची साईट डायरेक्ट झाली. एस इ ओ, गुगल ऍड वर्ड्स या सगळ्या खर्चातून माझी सुटका झाली.

आताही मी लिंक्ड इन, डिजिटल इ मेलर या द्वारे मार्केटिंग करतो. पैसे ही खर्च करतो. आशिष चं म्हणणं असं की माझी कंपनी ग्रो होण्यामागे हे प्रयत्न पण कारणीभूत आहेत. माझा आणि माझ्यासारख्या छोट्या उद्योजकांना हा नेहमी प्रश्न पडतो की खरंच या माध्यमातून धंदा वाढतो का? ते शोधण्याची काही सायंटिफिक पद्धत आहे का? की कंपनी वाढते म्हणून हे खर्च, एस इ ओ सर्व्हिस विकणारे त्याला गुंतवणुक म्हणतात, मी बोकांडी बसवून घेतो.

हे प्रश्न मी बरेच ठिकाणी विचारले. पण कुणीही समाधानकारक उत्तर देऊ नाही शकले.

My Life

मागील एक आठवडा मी एका अद्भुत वातावरणाचा साक्षीदार होतो. आमचे बिझिनेस कोच मनीष गुप्ता यांच्या एका अप्रतिम कोर्समध्ये सहभागी व्हायची मला संधी मिळाली. कोर्सचं नाव होतं माय लाईफ. हा कोर्स उत्तराखंड मध्ये मुक्तेश्वर नावाच्या डोंगराच्या पायथ्याशी सरांच्या घरीच झाला. आम्ही २२ सहभागी, सर, सरांच्या पत्नी आणि आमची एकहाती सरबराई करणारे सरांचे सत्तरीतले वडील. आणि सरबराई या शब्दाचा अर्थ जसाच्या तसा घ्यायचा. पंचवीस जणांचा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हा गृहस्थ एकट्यानं बनवायचा. (सरांची आई, मुलांची काळजी घ्यायला पुण्यात होती). जेवणासाठी लागणाऱ्या गोष्टींपैकी बऱ्याच गोष्टी अंकल त्यांच्या वीस एकर जागेवर स्वतः च पिकवतात. दुधाच्या मिठाई सकट. त्यासाठी आठ दुभत्या गाई आहेत त्यांच्याकडे.

पागल झालो आम्ही बावीस जण तिथे. वीस वर्षाच्या मुलामुलीपासून ते साठी पर्यंतचे स्त्री पुरुष तिथे सहभागी झाले होते. तिथला सूर्यास्त, नीरव शांतता, दर्याखोऱ्यातून निसर्गाचं विलोभनीय दर्शन, मुक्तेश्वरच्या डोंगरावरून हिमालयाचं दिसणारं भव्य रूप या प्रत्येकावर खरंतर स्वतंत्र लेख होतील.

एका सकाळी मी एकटाच खोल दरीत चालून आलो. भारावून परत आलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच हिंदीत लिहिलं. अक्षरशः एका बैठकीत पंधरा मिनिटात सरसर उतरत गेलं.  सर हिंदी भाषिक असल्यामुळे हिंदीत लिहावं वाटलं.

दहा मिनिटे इकडे तिकडे केल्यावर थोडं विचित्र वाटायला लागलं. जाणवलं की, माझं मराठी भाषेवर मनापासून प्रेम आहे. मग पटकन त्याचा मराठीत अनुवाद करून टाकला. तेव्हा कुठे शांत वाटलं.

एम जी सर, किती निष्ठुर माणूस आहात तुम्ही,
हो, हेच वाटलं आज सकाळी फिरताना
किती अस्वस्थ वाटत होतं मला
फुफुस्सात इतका सारा ऑक्सिजन भरल्यावर
बाहेर उभ्या कारचा एक्झॉस्ट चालू करता का
श्वास भरून कार्बन डाय  ऑक्साईड घेईन म्हणतो
बहुतेक बरं वाटेल मग मला

आज गेलो होतो त्या खोल दरीमध्ये
मातीत पडलेले वाळके पत्ते टोचत होते हो
स्पोर्ट्स शूजच्या सोलला छेदून जात
फुलांचा एक आगळाच गंध नाकाला स्पर्शून गेला
इथे तुम्ही न उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या कुंडीची व्यवस्था नाही करू शकत का, एम जी सर

आणि या पक्ष्यांचे आवाज
कसं वाटतं ना कानाला ही चित्र विचित्र किलबिलाट ऐकल्यावर
कशी जगतात लोकं इथे
लाऊडस्पीकर वरून पहाटे बेसूर आवाजात आपापल्या देवाला बोलावल्याशिवाय
आश्चर्य वाटतंय मला

आश्चर्य वाटतंय मला याचंही
कुणी एक सत्तरीतला तरुण असं कसं जगू शकतो
वीस एकरात फैलावलेल्या खडकाळ जमिनीचं 
वनराईत रूपांतर करत, एकहाती तिला सांभाळत
आणि वर आपल्या नातवंडांच्या वयाच्या मुलामुलींना 
प्रेमभराने जेवण बनवत, तृप्तीचे ढेकर देत

आणि हे काय लावलंय तुम्ही, एम जी सर
याच्या गळ्यात पड, त्याची उराउरी भेट घे
उद्याच्या ब्रेकफास्टमध्ये बाबांना सांगून
थोडा अहंकार, जरा चिडचिड द्यायला सांगा
आम्ही सज्ज होऊ मग आमचं जीवन जगण्यासाठी

छ्या एम जी सर, हे कुठे घेऊन आलात तुम्ही आम्हाला
जिवंतपणी स्वर्गवासीच झालो आम्ही तर

किती निष्ठुर माणूस आहात तुम्ही
एम जी सर.


एम जी सर, 

कैसे बेदिल इंसान हो आप
हाँ, यही लगा आज मुझे सुबह टहलते हुए
कितना अस्वस्थ लग रहा था
फेफड़ों में इतना सारा ऑक्सिजन भरने के बाद
बाहर खड़ी कार का एक्झॉस्ट चला सकते हो क्या?
साँसों में थोड़ा कार्बन डाय आक्साईड भरदूँ

आज गया था दूर वादियों में कहीं
सूखें पत्ते चुभ रहे थे मुझे
स्पोर्ट्स शूज़ के सोल को छेदते हुए
कोई फूलों की सुगंध नाक में टटोलते हुए निकल पड़ी 
यहाँ कोई कचरा ले जाने वाले ट्रक की व्यवस्था नहीं कर सकते क्या, एम जी सर !

और ये आवाज़ पंछियों की 
कैसा ग़लत लग रहा था कानो को ये सुरीलापन 
कैसे जीते है यहाँ के लोग
लाउड्स्पीकर की बेसुरी आवाज़ में अपने अपने भगवान को ना पुकारते हुए 

ताज़ुब लग रहा है मुझे
ऐसे भी जीता है कोई सत्तर साल का एक नौजवान ?
बीस एकर में फैली हुई एक बंजर ज़मीन को हरे खेती से भरकर
अपने पोते पोती की उम्र कि बच्चों को खाना परोसते हुए 
आनंद पाकर ख़ुद तृप्ति की डकार लेते हुए 

और ये क्या लगा दिया आपने कि इसके समा जाइए उसको अपने गले लगा लीजिए
कल के ब्रेक्फ़स्ट में पापाजी से कहके 
थोड़ा अहंभाव, ज़रा चिड़चिड़ापन हमें परोसिए
तो हम तैयार हो जाएँगे रोज़मरा ज़िंदगी जीने के लिए 

क्या एम जी सर 
ये कहा लेकर आगये आप हमें 
जीते जी आपने तो हमें स्वर्ग ही दिखा दिया 

कैसे बेदिल इंसान हो आप ?
एम जी सर

पाठलाग

मागच्या आठवड्यात मी रात्री दहा वाजता सारस बागेजवळ ट्राफिक जॅम मध्ये तुफान अडकलो. तिथून हळूहळू लक्ष्मी नारायण थिएटर जवळ पोहोचून वाहतुकीचा तिढा सुटण्याची वाट पाहत होतो. अचानक माझ्या दरवाजावर टकटक ऐकू आली. मी काही विचारायच्या आत त्या माणसाने कारचा दरवाजा उघडला आणि म्हणाला "सर, प्लिज पद्मावती कॉर्नर छोड दिजीए ना" मी म्हणालो "मित्रा, मी उजवीकडे नाही वळणार, तर सरळ जाणार आहे." तर म्हणाला "सर, हेल्प किजिए. साथ मे पेशंट आदमी है"

त्याने दाखवलेल्या दिशेने बघितल्यावर मला एक पायाला प्लास्टर घातलेला वॉकर घेऊन माणूस दिसला. साथीच्या माणसाने परत एकदा अजीजी केल्यावर मी दोघांना गाडीत घेतलं.

तर स्टोरी अशी होती की  दोन दिवसांपूर्वी रशीदचा वाघोलीत ऍक्सिडंट झाला होता. हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन रशीद त्याच्या गावी, म्हणजे बडोद्याला जाण्यासाठी पद्मावती कॉर्नरला त्याच्या मित्राबरोबर रिक्षाने चालला होता. स्वारगेट ओलांडल्यावर लक्ष्मीनारायणच्या चौकात रिक्षावाल्याने ट्राफिक जाम बघून त्या दोघांना सांगितलं, हाच पद्मावती कॉर्नर आहे. आणि लक्ष्मीनारायणच्या समोर सना कोंडुसकर स्टॅन्डला त्याची बस मिळेल असं सांगितलं. कारमध्ये बसल्यावर हेही कळलं की त्यांची बस सुटली होती.

रशीद मला ड्रायव्हरशी बोलायला सांगत होता. मी रशीदला म्हणालो "पहिले ह्या राड्यातून बाहेर निघू. मग मी बोलतो." पंधरा मिनिटे तो खिंड लढवत होता. ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याचे घरचे परेशान होते आणि त्याची नऊ वर्षाची मुलगी लवकर घरी या म्हणून अब्बाला फोन करत होती.

त्याच्या साथीदाराला सांगून मी पोलिसांद्वारे रस्ता काढण्याच्या प्रयत्नात होतो. तिथून बाहेर पडल्यावर सीन असा झाला होता की  बसने कात्रज स्टॉप सोडला होता आणि ड्रायव्हरने शीदला बसचा नाद सोडायला सांगितला.

मग मी फोन घेतला. ड्रायव्हर मराठी आहे हे बघून, त्याला सगळी परिस्थिती सांगितली. मी बोललो "गुरु, जिथं आहेस तिथं थांब. मी रामटवतो गाडीला." तो म्हणाला, नवले ब्रिजला थांबतो. पण फक्त दहा मिनिटे.

आणि मी न भूतो न भविष्यती अशी गाडी हाणली. दहाची बारा तेरा मिनिटे झाली, पण ती जीजे डीवाय ७ नंबरची व्हॉल्वो थांबलेली दिसली. मी गाडीतून उतरलो आणि पहिले ड्रायव्हरला धन्यवाद दिले. परत आलो तर रशीद डोळे पुसत उभा होता. त्याची गळाभेट घेत त्याला म्हणालो "जा भेट तुझ्या मुलीला उद्या सकाळी".

या सगळ्या घटनेत माझं दुःख वेगळंच होतं. लक्ष्मी नारायणच्या समोर त्या ट्राफिक जाम मध्ये एक जण कर्णकर्कश्श डॉल्बीच्या भिंतीवर "पप्पी दे, पप्पी दे पारू ला" या गाण्यावर शर्ट काढून नाचत होता. मलाही तसंच विचित्र अंगविक्षेप करत नाचायचं होतं. पण थोडे दिवसात ती इच्छा पूर्ण करू या भावनेने मी रशीदला घेऊन बाहेर पडलो.

नवले ब्रिज वरून कोंढवा मार्गे मी रात्री साडेअकरा ला घरी पोहोचलो. माझी स्टोरी झोपेत ऐकत वैभवी म्हणाली "या फेसबुकवर पोस्ट जमवण्यासाठी तू अजून काय काय उद्योग करणार आहेस देव जाणे" 😊😊

पाठलाग 

इंडियन रेल्वेज

तर झालं असं की मी एका ग्रुप बरोबर दोन आठवड्यापूर्वी रेल्वे ने दिल्लीला चाललो होतो. निझामुद्दीन एक्स्प्रेसने. २४ जण होतो. आमच्यातल्या एकाला, सुहास नाव ठेवू, रात्री दोन वाजता पोटात कळवळून दुखायला लागलं. काही काळ वेदना सहन केल्यावर त्याने मला तीन वाजता उठवलं. सुहासची तीन वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झाली होती. त्याची रात्री अवस्था बघून मला वाटलं की हार्टचाच प्रॉब्लेम आहे की काय! एक सव्वा तास जवळ असणाऱ्या पेनकिलर ने आम्ही ट्राय केला काही फरक पडतो का ते! पण नाही उपयोग झाला. शेवटी मी टीसी शोधला, प्रवाशांमध्ये कुणी डॉक्टर आहे का विचारायला. मराठी भाषक होता तो. कुणाही नावामागे डॉ असं लिहिलं नव्हतं.

टीसी म्हणाले "काळजी नका करू. साडेचारला इटरसी येईल. आपण इटारसी ला रेल्वे चा डॉक्टर बोलावू."

मी अवाक. सकाळी साडेचार ला रेल्वेचा डॉक्टर?

त्यांनी माझ्यासमोर इटरसीला फोन करून पीएनआर, बर्थ नंबर सगळं सांगितलं. आणि मला सांगितलं बर्थजवळ जाऊन थांबा.

डॉक्टर काही येणार नाहीत याच तयारीने मी बाकी काय करता येईल या विचारात आलो. ग्रुप मधील बाकी लोकं पण प्रयत्न करत होते. कुणी सुहासच्या बायकोशी फोनवरून त्याच्या आजाराबद्दल धीर देत होते, माहिती विचारत होते.

साडेचारला इटरसी आलं आणि टीसी, डॉक्टर, दोन माणसं असा लवाजमा आला. पन्नासच्या दशकातल्या पिक्चर मध्ये जशी डॉक्टर ची बॅग होती, तशी बॅग होती. डॉक्टर ने चार पाच वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या त्यातून काढल्या. त्यात वेदनाशामक गोळ्या, उलटीरोधक गोळ्या लिहून दिल्या. हार्टशी संबंधित काही नाही हे पण सांगितलं. हा सगळा प्रकार होईपर्यंत दहा मिनिटे गेले. रु २५० फीस घेतली, ऑफिशियल. आणि मगच रेल्वेला जायचा सिग्नल मिळाला.

डॉक्टरच्या अवतारावरून त्या औषधात काही दम नसावा असं वाटलं. पण चॉईस नव्हता. माझे अंदाज सपशेल चुकवत सुहासला चांगलं वाटू लागलं.

पुढे साडेसहाला भोपाळला आम्ही ट्रेन सोडली आणि सव्वा आठच्या फ्लाईट ने मी आणि सुहास दिल्लीला गेलो ती गोष्ट वेगळी. ते बरंच झालं.

पण सांगायचा उद्देश हा की रेल्वे मध्ये ही सर्व्हिस आहे आणि तिचा वापर फार इफेक्टिव्हली होतो.

इंडियन रेल्वेज

आय एम लव्ह इन इट.

(बाय द वे, मी विचारलं ही प्रभूंची कृपा वगैरे का. तर त्यांनी सांगितलं, नाही, ही सर्व्हिस खूप वर्षांपासून आहे. अगदी सी के जाफर शरीफ रेल्वे मंत्री होते तेव्हा पण होती.

हो, म्हणजे आधीच सांगून टाकलं)

फोटो

पुस्तक पब्लिश करण्याच्या प्रोसेसमध्ये वांदे झाले होते ते भलत्याच कारणासाठी. व्यावसायिक प्रवास दाखवण्यासाठी मला योग्य असे फोटो हवे होते. ते मिळवायला खूप कष्ट झाले. आता मी काही फोटो घुसडले आहेत पुस्तकात, पण त्यात तो मंडलिक दिसत नाही ज्याने उमेदीच्या काळात खूप घासली. म्हणजे मकवाना इंडस्ट्रीज मध्ये थर्ड शिफ्ट झाल्यावर जॉब तयार व्हायची वाट पाहत झोपणारा मी, ज्यावर सेल्स चा श्री गणेशा केला ती एम ८०, ५० स्क्वे फूट ऑफिस आणि १०० स्क्वे फुटचं पहिलं वर्कशॉप, अहमदाबादच्या रणरणत्या उन्हात उघड्या ट्रक मध्ये उभा राहून प्रवास केलेला २७ वर्षाचा इंजिनियर, स्वित्झर्लंड मधील पहिलं बेड अँड ब्रेकफास्ट वगैरे. असले काही अतरंगी फोटो सापडले असते तर आजच्या टाय सुटातल्या फोटोला एक वेगळे आयाम मिळाले असते. पण आपली कधी काळी जरा बरी चालणारी कंपनी असेल अन त्या अनुषंगाने येणाऱ्या अनुभवाचं पुस्तक निघेल असं अगदी वर्षभरापूर्वी पण वाटलं नव्हतं. पण हे घडलं खरं.

तेव्हा मित्रांनो, माझ्यासारख्या मास्टर ऑफ नन च्या आयुष्यात असं घडू शकतं तर अगदी कुणाच्याही आयुष्यात असं घडू शकतं. तेव्हा सेल्फी हाणा, मोबाईल मधून खच्याक फोटो काढा पण दोन चार फोटो वर्षातले जीवापाड जपा. कुणास ठाऊक, उद्या तुमचंही पुस्तक निघेल आणि मग त्यात फोटो टाकण्यासाठी तुमची पळापळ होणार नाही.

तुमच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा....दिल से

"हॅपी इंडिपेंडन्स डे"

सकाळी झेंडावंदन करण्यासाठी नीलच्या शाळेत चाललो होतो. नील ने कार मध्ये विचारलं

"पण ते टिळकांचे फ्रेंड असं का म्हणत होते की आपल्याला इतक्या लवकर फ्रीडम नको"

मी म्हणालो "कोण, आगरकर"

नील "तेच ते"

मी सांगितलं "अरे, आगरकरांना असं वाटत होतं की सामाजिक दृष्ट्या अजून आपण सुदृढ नाही आहोत. तेव्हा आधी समाजमन बदलू आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यावर एक प्रगल्भ समाज देशाला व्यवस्थित पुढे नेईल"

नील ने विचारलं "अच्छा, पण तुम्हाला कुणाचं बरोबर वाटतं"

मी म्हणालो "मला टिळक बरोबर वाटतात. कारण इंग्रज आपल्या देशाला लुटत होते. तोंडदेखली लोकोपयोगी गोष्टी जरी बनवत असतील तरी सांपत्तिकदृष्ट्या आपला देश गरीब होत होता. इथल्या व्यापारातून पैसे इंग्लंड मध्ये जात होते. आपला देश देशधडीला लागला होता. आणि ते थांबायचं असेल तर देशातून इंग्रज हद्दपार होणे याशिवाय काही पर्याय नव्हता"

टिळक बरोबर वाटतात असं म्हंटल्यावर त्याचा पुढचा प्रश्न "का" हे ताडून मी सांगितलं. हम्म म्हणत तो कारच्या बाहेर बघत राहिला. दोन मिनिटाने म्हणाला

"अभिषेक म्हणत होता की गांधीजींनी भगतसिंगना वाचवलं नाही म्हणून. खरं आहे का ते"

मी सांगितलं "हे असेलही अन नसेलही. तितका माझा अभ्यास नाही. असा विचार ऐकीव माहितीने करू नये. त्यासाठी मोठा झालास की डॉक्युमेंट शोध आणि मग मत बनव. त्या काळातील देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा उद्देश इतका उदात्त होता की त्यासाठी विविध लोकांनी जे मार्ग निवडले ते बरोबर की चूक यावर आज काथ्याकूट करण्यात काही मतलब नाही. मग ते मवाळ असो वा जहाल. आणि तो इतिहास झाला.

त्याचा अभ्यास तितका करावा ज्याने आपल्या आकलनशक्तीचा विकास होईल. पण इतिहासाला भूत बनवून आपल्या मानगुटीवर बसवू नये. तुझं, समाजाचं अन देशाचं स्थान हे वर्तमान अन भविष्यकाळावर जोखलं जातं. तेव्हा तू त्यावर लक्ष दे."

मी ड्रायव्हिंग करत बोलत होतो. अन शाळेचं गेट आलं. मी डावीकडे बघितलं तेव्हा नील भान हरपून माझ्याकडे बघत होता. शाळा आल्याची आठवण करून दिली त्याला.

उतरताना तो म्हणाला

"हॅपी इंडिपेंडन्स डे"

नीलला हाय फाय देत मी वॉर मेमोरियल सेंटर ला तिरंग्याला सलाम करण्यासाठी गाडी वळवली.

नील

महिन्याचे पंधरा दिवस झाले की आमची एक मिटिंग असते. बरेच उद्योजक आम्ही एकत्र भेटतो. काही गोष्टी शेअर केल्या जातात. बिझिनेस मॅनेज कसा करावा याबाबत एखादी केस स्टडी घेऊन चर्चा होते. एखादया बिझिनेस मधील हस्तीला बोलावलं जातं.

नील ला पण माहीत आहे या मिटिंग बद्दल. आज ती मिटिंग होती पण नीलची कन्सर्ट पण होती. काल त्याचं तिकीट काढायचं होतं. मी नीलला बोललो की मी मिटिंगला जात नाही अन त्याऐवजी कन्सर्ट ला येतो.

संध्याकाळी मला नील ने सांगितलं की माझं तिकीट त्याने नाही काढलं. मी का म्हणून विचारलं तर म्हणाला "ती मिटिंग  तुम्ही अटेंड करा. म्हणजे बिझिनेस मॅनेज कसा करावा याबद्दल काही शिकाल. तुम्हाला त्याची गरज आहे. धावपळ कमी होईल त्याने तुमची. कन्सर्ट पुढच्या वर्षी पहा"

हे असं आहे. तरुणपणी आईबाबांनी सणवार, नातेवाईकांचं लग्नकार्य यासाठी कधी म्हणून मला कामाला दांडी मार असं सांगितलं नाही. आणि आता पन्नाशीला आलो तर पोरगं पण कामावरून लक्ष ढळू देत नाही आहे.

आभार अन धन्यवाद

काय लिहू, किती लिहू, कशी सुरुवात करू यातच काल रात्रीपासून अडकलो आहे. शेवटी विचार केला मानसिक गोंधळानेच सुरुवात करू.

सगळ्यात प्रथम काल कार्यक्रमास उपस्थित असणार्यांचे मनःपूर्वक आभार. खरं सांगायचं तर मलाच वाटले नव्हते इतका मोठा मित्र परिवार जमेल असं. पुण्यातूनच नव्हे तर अनेक दूरदूर गावातून आलेल्या मित्रांचा वावर बघून मी विस्मयचकित तर झालोच आहे, पण तुम्हा सगळ्यांच्या प्रेमात आकंठ बुडालो आहे. फेसबुक जे आजकाल बऱ्याच विवादास्पद गोष्टींसाठी बदनाम झालं आहे त्याच फेसबुकच्या चावडीवर पिटलेल्या माझ्या दवंडीला तुम्ही जी ओ दिली तिने मी अक्षरशः भारावून गेलो आहे.

सकाळी जो मुसळधार पाऊस पडत होता त्याने वाटलं की कार्यक्रमाचा विचका होणार. कुणी येणारच नाही. पण तितक्यात मीरा ताईंनी ओळी लिहिल्या की पाऊसच पुस्तकाच्या स्वागताला आला. माझं टेन्शनच गेलं. आणि खरं सांगतो. रात्री मला वाटलं, बरं झालं पाऊस आला. त्यामुळे तरी काही जण येऊ नाही शकले नाहीतर मिस मॅनेजमेंट साठी शिव्याच खाव्या लागल्या असत्या.

सगळ्यात मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की  इतक्या दूरवरून आलेल्या मित्रांना मी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. ते पुस्तकावर सही घेण्याचं प्रकरण तसं बघायला गेलं तर किचकट आहे. त्यात अडकलो अन सगळा घोळ झाला. त्याबद्दल माझ्या बाहेर गावाहून आलेल्या मित्रांची तहे दिलसे माफी मागतो.

इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करायची माझी पहिलीच वेळ. त्यात काही चुका झाल्या. सगळ्यात मोठी चूक म्हणजे स्केलक्राफ्टचा, ज्यांनी पुस्तकाचं मुखपृष्ठ बनवलं आहे त्याचा सत्कार राहिला. मुख्य म्हणजे सचिन दायमे अन त्याच्या टीमनेच सगळा इव्हेन्ट मॅनेज केला होता. माझ्या कंपनीचा उल्लेख मनोगतात लिहूनही करायचा राहिला. नील आणि यशला प्रकाशनावेळी स्टेज वर बोलवायचं राहून गेलं. त्यांची पण माफी मागतो.

बाकी मनीष गुप्ता सर, मिलिंद सरवटे सर यांची भाषणं जोरकस झाली अन उद्योजकतेच्या ध्यासाला बळकटी देणारी होती. मीरा ताईंच्या खुसखुशीत भाषणाने "मी परभणीकर" यावर शिक्कामोर्तब झाले. मास्टर ऑफ सेरेमनी अण्णांनी बेअरिंग मस्त सांभाळलं. सानिका अन मंगेशने को होस्टच्या जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या.

एकंदरीत हा अडीच तासाचा सोहळा तुम्हा सगळ्यांच्या सहभागाने यादगार झाला. आयुष्यभराचं संचित मिळालं मला. ते १५० क्षण माझ्या आठवणींच्या कुपीत आता बंदिस्त झाले आहेत. त्या आनंदोत्सवात मी आता किती काळ डुंबत राहील कोण जाणे. कार्यक्रमाला दृष्ट लागू नये म्हणून पार्किंगचा अत्यंत व्हॅलीड प्रॉब्लेम घेऊन एक पुणेकर काजळाची तीट लावून गेला.

शुभेच्छा अन अभिनंदनाने वॉल ओसंडून वाहत आहे. व्हाट्स अप वर, मेसेंजर मध्ये, एस एम एस मध्ये खूप मेसेजेस आले आहेत. त्यामुळे अगदी जगन्मित्र वगैरे असल्याचा फील येतोय. काल लागलीच पोटापाण्याच्या उद्योगाला लागल्यामुळे उत्तरं द्यायची आहेत. आजपासून दिल्लीत आहे. पहाटेच पुणे एअरपोर्टवर जरा निवांत आहे. पुस्तकातील अनेक मजकुराप्रमाणे ही आभाराची पोस्ट विमानतळावर लिहावी हा भारी योगायोग आहे.

पुनश्च आभार अन धन्यवाद.

स्पाईसजेट......

स्पाईसजेट......

भारताच्या आकाशातील एक नाव. मला आठवतं कॅप्टन गोपीनाथांच्या एअर डेक्कन पाठोपाठ स्पाईस जेट पण नो फ्रिल्स एयरलाइन्स सर्व्हिस घेऊन आली. एअर डेक्कन आणि स्पाईस जेट या दोघांच्याही वेळ न पाळणे आणि गरीब लोकं यातून प्रवास करतात यावर जेट एयरवेज आणि किंगफिशर ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी यथेच्छ टिंगल केली.

पुढे काळाच्या ओघात कॅप्टन गोपीनाथ यांच्या एअर डेक्कन ला किंगफिशर ने गिळंकृत केलं तर किंगफिशरला त्यांच्या फाजील आत्मविश्वासाने. (किंगफिशर कडे बिझिनेस मॉडेल नाही, फक्त मॉडेल्स आहेत अशी बकवास कोटी पण ऐकली). जेट एयरवेज ला पण घरघर लागली होती पण इतिहाद ने त्यांना वर ओढलं.

स्पाईस जेटची मालकी त्याचे मूळ प्रवर्तक अजय सिंग यांच्याकडून एव्हाना राजकारणातील एक अतिमहत्वकांक्षी कुटुंब मारन यांच्याकडे गेली आणि त्याच सुमारास भारतातील विमान प्रवासातील कच्चे दुवे हेरत इंडिगो अवतीर्ण झाली. अत्यंत तरुण विमानाचा ताफा, विमानाचं टाइम टेबल काटेकोर पणे पाळण्याचा अट्टहास, कमालीची स्वच्छता यावर इंडिगो ने लागलीच या बिझिनेस मध्ये अग्रस्थान मिळवलं. हे होत असताना स्पाईस जेट मात्र या स्पर्धात्मक युगात तळाकडे ओढली जात होती.

युपीए च्या दुसऱ्या टर्म च्या उत्तरार्धात मारन कुटुंबाच्या टेलिकॉम आणि टीव्ही क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराच्या सुरस आणि चमत्कारिक कथा बाहेर येऊ लागल्या. स्पाईस जेट ची मालकी त्यांच्याकडेच होती. त्याचा शेअर मार्केट मध्ये झोपला होता. प्रवर्तकाचं बिझिनेस कडे लक्ष नसेल तर बिझिनेसची कशी वाट लागते याचं उदाहरण मारन दाखवत होते. आणि त्याच वेळेस त्यांना उपरती झाली आणि मारन कुटुंबाने आपले शेअर्स अजय सिंग यांना विकत स्वतः स्पाईस जेट मधून काढता पाय घेतला.

आणि मग चालू झाली स्पाईस जेट ची टर्न अराउंड स्टोरी. शेवटी ही कंपनी अजय सिंग यांचं ब्रेन चाईल्ड. आणि मग तिला योग्य मार्गदर्शन करत हळूहळू स्पाईस जेट स्थिर करत आणली. गेले दोन वर्षात स्पाईस जेट च्या एकूणच देहबोलीत विलक्षण आत्मविश्वास दिसतो. त्यांचा ऑन टाइम परफॉर्मन्स हा नंबर वन ला आहे. विमानात जागा मिळत नाही. विमानाची स्वच्छता पातळी पण वरच्या दर्जाची असते. या वर्षी स्पाईसजेट ने २४५ बोइंग विमानं आणि ५० बांबर्डीयर विमानांची शॉपिंग केली. (हे असे ट्रेड होतात म्हणून दोन देशातले संबंध चांगले राहतात.). याचा परिपाक म्हणून की काय पण इंडिगो पाठोपाठ आता स्पाईसजेट सुद्धा प्रॉफिट मध्ये आली आहे. मी शेअर मार्केट फॉलो करत नाही पण त्यांचा शेअर अपवर्ड ट्रेंड मध्ये असावा असा अंदाज आहे. नसेल तर येईलच. आणि हा मार्केट ऍनालिस्ट चा नाही, तर एका प्रवासी माणसाचा अंदाज आहे.

एके काळी हिणवली जाणारी नो फ्रिल सर्व्हिस ही मेन स्ट्रीम सर्व्हिस झाली आहे. इतकी की विमानाला बिझिनेस क्लास असतो हे ही आपण विसरत चाललो आहे. स्पर्धेला सकारात्मक भावनेने घेतलं तर आपली कामगिरी कशी सुधरवू शकतो याचं स्पाईसजेट हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि तळाशी जाऊन जेव्हा एखादी कंपनी जोमाने वर येते तेव्हा ती कशी चकाकून झळकते हे सुद्धा स्पाईसजेट कडे बघून जाणवतं.

भारतीय आकाशातील हा अनुभव एसटी ने घ्यावा अन त्याने के एस आर टी सी ला फॉलो करत आपली सर्व्हिस क्वालिटी सुधारावी. किंवा भारतीय रेल्वे ने विमान सर्व्हिस ला स्पर्धक म्हणून पाहावं अन प्रवाशांना अधिकाधिक सोयी सुविधा द्याव्यात. सामान्य माणसाला अच्छे दिन आले तर त्याने येतील.

(सदर लेख हा केवळ प्रवास करत असताना जे अनुभव आले त्यातून लिहिला आहे. स्पाईसजेट मधेच बसून. मी काही एयरलाइन्स बिझिनेस चा अभ्यासक वगैरे नाही)

राजा

माझ्याकडे सेल्स मध्ये माणूस जॉईन झाला की मी पहिल्यांदा त्याला जॉब प्रोफाइल ची माहिती देतो. त्यामध्ये सेल्स कॉल करताना कसं हँडल करायचं याबद्दलही चार शब्द सांगतो.

"आपल्याला सेल्स वाढवायचा आहे. पण त्यासाठी कस्टमर समोर लाचार व्हायची गरज नाही. सेल्स कॉल करायचा पण तो डिग्निफाईड पद्धतीने. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की कस्टमर हाडतुड करतोय तिथे त्याला फोन करणं बंद करा. कस्टमर महत्वाचा आहेच पण सेल्फ एस्टीम तितकाच सांभाळायला हवा. त्याला ठेच पोहचू देऊ नका. टेलिफोन वर अपॉइंटमेंट घ्या. इंडस्ट्रीत जाऊन मेन गेट वर जाऊन बोलू शकता. पण कस्टमरला भेटायचं नसेल तर त्याच्या गळ्यात पडू नका. जर तुमचं प्रॉडक्ट वा सर्व्हिस दर्जेदार असेल तर कस्टमर कधी ना कधी तुमच्या जाळ्यात अडकेलच. तेव्हा कस्टमरकडे जाताना तुमच्या बोलण्यातून आत्मविश्वास झळकू द्या. लक्षात ठेवा Customer is the king....So you are. तू सुद्धा राजाच आहेस."

तरीही सांगतो, स्वतः ला राजा समजणं जमत नाही बऱ्याचदा. अगदी तुमचं नाव राजेश असलं तरीही.

😊😊😊

राम19

तो तसा पापभिरू माणूस. आपण बरं आपलं काम बरं. कुणाच्या अध्यात नाही अन मध्यात नाही. तुम्हाला कसं जगायचं ते जगा पण मी मात्र माझ्या टर्म्स वर जगणार. साधारण अशा धाटणीचा तो.

छोटासा व्यवसाय आहे त्याचा. फिरावं लागतं वेगवेगळ्या प्रदेशात अन देशात. तिथेही जाणार, काम करणार मान खाली घालुन अन परत येणार.

छानछोकी म्हणजे काय तर कधीतरी बियर तर कधी वाईन घेणार, तेही मित्रांच्या गराड्यात. नॉन व्हेज आवडतं त्याला.

त्याचा एक मित्र दिल्लीत आहे. संदीप नाव त्याचं. काही बिझिनेस रिलेशन्स त्यांचे. मधल्या काळात त्यांचे व्यावसायिक संबंध तुटले पण त्याच्याशी मैत्री बरकारार राहिली. गेल्या चार पाच वर्षात संदीपचा बिझिनेस ठीक ठाक पण बाकी काय चालू हे त्याला माहिती असण्याचं कारण नव्हतं.

काल तो गुरगाव मध्ये होता. संदीप भेटला सायबर हब ला त्याला. तो म्हणाला संदीपला "हल्दीराम मध्ये जेवण करू". संदीप म्हणाला "एमजीं रोड ला सहारा मॉल आहे तिथल्या हल्दीराम मध्ये जेवू" तो ठीक आहे म्हणाला.

सहारा मॉल मध्ये दुसऱ्या मजल्यावर एका कोपऱ्यात संदीप ने त्याला उभं केलं अन कुपन घेऊन आला. डिस्को चे कुपन. बियर विकत घेण्याचे. नाचणं त्याला वावगं नव्हतं. पण संदीपच्या बोलण्यातून त्याला कळलं की काही तरी गडबड आहे. संदीप त्याला ओढत आत घेऊन गेला.

आत मिणमिणत्या प्रकाशातला हॉल. अन वेगवेगळ्या वयातल्या उत्तान पोरी अन बायका. त्याने हा प्रकार आधी बघितला नव्हता. त्याने संदीप ला विचारलं "हे काय आहे" संदीप डोळा मारत त्याला म्हणाला ऐश कर. बियर ची बॉटल हातात घेऊन तो कोपऱ्यात उभा होता. पोरी यायच्या, त्याचा हात हातात घेऊन कोच वर घेऊन जाण्यासाठी आग्रह करायच्या. तो ढिम्म उभा. शेवटी संदीप एका उफाड्याच्या पोरीला घेऊन आला, आणि तिला सांगितलं, ह्याला पटव. ती काहीबाही चाळे करू लागली त्याच्याबरोबर. एक दोन  मिनिटे झाल्यावर त्याने शेवटी त्या पोरीला बाजूला घेतलं अन तिचे दोन्ही खांद्यावर हात ठेवत थेट तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला

"पोरी, तू समजते तसा हा जीव नाही. पैसे देऊन सुख भोगणारं माझं मन नाही. ह्या पद्धतीने सुख मिळवायचं संदीप ने ठरवलं अन तू द्यायचं ठरवलं. ते तुम्हा दोघांना लखलाभ. मला ओढू नका"

त्या अंधारातही त्याला तिच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव दिसले. त्याचा खांद्यावरचा हात आपल्या हातात घेत ती ओढत त्याला एका कोपऱ्यात घेऊन गेली अन म्हणाली
"आप यही खडे रहीये. तुला कुणी हात लावणार नाही"

तो पाच मिनिटे एकटा त्या माहोल मध्ये उभा होता. तिथलं वातावरण त्याला असह्य झालं. पैशाच्या जीवावर दिसणारा नंगा नाच त्याला अस्वस्थ करून गेला. गलबलून आलं. डोळ्यात तरारून पाणी आलं. तो संदीप ला एकटं सोडून खाली निघून आला.

चेहऱ्यावर पाण्याचे भपकारे मारले अन तो परतीच्या प्रवासाला निघाला. तितक्यात संदीप चा मेसेज आला
"गुरुजी, कुठे आहात. घाबरट आहात तुम्ही. जिंदगी मे थोडा तो मजा लिजीए"

त्याने काहीच उत्तर न देता उबर च्या ड्रायव्हर ला द्वारकेकडे घ्यायला सांगितलं.

तो......घाबरट....... तुमचा मित्र........अन माझा पार्टनर....... राम

युनिफॉर्म

मला काही दिवसांपूर्वी एक मेसेज आला.

"तुम्ही सेटको चे ओनर आहात की तिथे कामाला आहात?"

मी म्हणालो "मी काम करणारा ओनर आहे. (तसंही पेपर वर सेटको यूएसच ओनर आहे)." मी पुढे जाऊन विचारलं "का हो? का विचारला हा प्रश्न?"

तर ते म्हणाले "मला आश्चर्य वाटतंय की तुम्ही कंपनीचे एमडी असून युनिफॉर्म घालता".

(या ठिकाणी एक विचित्र प्रश्न विचारायची इच्छा झाली, पण स्मायली वर संभाषण संपवलं)

हे युनिफॉर्म घालण्याबाबत मी फेबुवरच नाही तर नातेवाईकात पण बदनाम आहे. पार्कातल्या कविता या कार्यक्रमाला पोहोचल्यावर स्वरूपा म्हणाली "मी घाबरले होते, युनिफॉर्म मध्ये येतोस की काय!" खूप खिल्ली उडवतात. एकदा गोव्याला फॅमिली बरोबर गेलो होतो. दोना पावला वर फोटो काढताना सेटकोचा टी शर्ट पाहून घरचे खूप खदखदले. युनिफॉर्म सतत घालण्याचं मुख्य कारण आहे, की माझ्याकडे दुसरे कपडे खूपच कमी आहेत. दिवसातले बारा तास मी कंपनीच्या मोहिमेवर असतो. सणवार नाही, पूजा अर्चा नाही. कशाला पाहिजेत दुसरे कपडे?.

हा झाला गमतीचा भाग. पण युनिफॉर्मला एक आगळं महत्व आहे. शक्यतो, शर्टच्या खिशाच्या वर कंपनीचं नाव लिहिलं असतं. हृदयाच्या जवळ. "मी हे काम करणार" असं म्हणताना आपसूक आपला हात छातीवर लिहिलेल्या कंपनीच्या नावावर जातो. कळत न कळत आपण कंपनीची शप्पथ खाऊन काम पूर्ण करण्याचं आश्वासन देतो.

हे करत असताना मनात एक विश्वास पण असतो की ह्या कामाची पूर्तता करताना मदत होणार आहे त्या कंपनीची, तिथल्या लोकांची. म्हणून मग सतत हृदयाजवळ असणारी ह्या कंपनीसमोर आलेलं कुठलंही आव्हान पेलण्यास हे खांदे समर्थ आहेत ही भावना अंगभर सरसरत जाते.

ही वर लिहिली आहेत इमोशनल कारणे. युनिफॉर्म आवडण्यामागे अजून एक वेगळं कारण आहे. खूप वर्षांपूर्वी माधुरी दिक्षितची मुलाखत ऐकत होतो. बोलताना ती स्वप्नपरी म्हणाली "I love men in uniform" एअरफोर्स च्या लोकांना उद्देशून जरी तिने ते म्हंटलं तरी ते वाक्य ऐकल्यापासून मी नेहमी युनिफॉर्म मधेच असतो.

😊😊

My Life

आपलं मन हे जर आपल्या व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू असेल तर आपण त्या केंद्रबिंदूपासून लांब एका त्रिज्येच्या कक्षेत भ्रमण करत असतो. एक माणूस म्हणून जेव्हा इव्होल्युशन प्रोसेस योग्य दिशेने घडत राहते तेव्हा ती त्रिज्या हळूहळू कमी होत जाते. आणि आपला प्रवास त्या केंद्रबिंदूच्या दिशेने होत राहतो.

आयुष्यात अशा काही घटना घडतात की आपलं बाह्यरूपावर काम करणारं मन मग त्या केंद्रबिंदूपाशी घुटमळत राहतं. एकवेळ अशी येते की मग त्रिज्या होते शुन्य आणि मग आपलं मन हे बिंदू न राहता ब्रह्मांड होतं.

मनाची ही अवस्था आली की "माझं आयुष्य" हे माझं न राहता तुझं होतं, त्याचं होतं. नव्हे, ते साऱ्या विश्वाचं होतं.

(हलकेच घ्या रे. मी व्यवस्थित आहे. सुचलं म्हणून लिहिलं) 😊😊

थॉट प्रोसेस

मी तसा ग्रोथचा भोक्ता. म्हणजे मला दरवर्षी टर्नओव्हर वाढलेला आवडतो. कंपनीची साईझ वाढावी, तिथं लोकं वाढावीत, असलेल्या लोकांनी शक्य तितकं जास्त वर्षे आपल्याबरोबर काम करावं, त्यांचीही ग्रोथ व्हावी. साधारण अशी वर्किंग स्टाईल. आपल्यानंतर कंपनी कोण सांभाळणार याचा विचार न करता कंपनीत बाहेरच्या कंपनीला मेजॉरिटी स्टेक दिला. मायक्रो लेव्हल चा का असेना पण भांडवलशाहीचा पाईक. माझ्यासारखा स्वभाव असणारी लोकं मला भावतात.

माझा एक भोसरीत मित्र आहे. साधारण माझ्या इतकाच त्याचाही बिझिनेस होता. पण हळूहळू त्याने त्याचा बिझिनेस कमी करत नेला. त्याला एक मुलगी आहे. तो म्हणतो माझ्यानंतर कोण सांभाळणार हा बिझिनेस? मग तो त्याच्या लोकांना सरळ सांगतो, "तू जे काम करतोस, त्याचे मी इतकेच पैसे देऊ शकतो. तुला दुसरी नोकरी बघायची असेल तर बघ". काही थांबतात, बरेच सोडून जातात. ग्रोथ ची फारशी चिंता नसल्यामुळे कस्टमर समोर पण एकदम कडक. माझ्या अगदी विरुद्ध स्वभाव. पण मला हासुद्धा मित्र भावतो.

याचं कारण थॉट प्रोसेस मध्ये स्पष्टपणा आहे. लुकाछुपी नाही.

काही लोकं मात्र आव व्यवसाय वाढवण्याचा ठेवतात, पण ऍक्शन मात्र रडक्या ठेवतात. आपल्या नाकर्तेपणाला कुणी अभिमानाचं अधिष्ठान देतं तर कुणी "काय करणार इतकं कमावून?" असलं कुचकामी कारण देतं. कुणी दुसऱ्यांच्या आशा आकांक्षाना पायदळी तुडवत स्वतः च्या तुंबड्या भरत राहतं.

बिझिनेस करताना आपण हे "का करतोय" याबाबत विचारात स्पष्टता असली की "काय आणि कसा व्यवसाय करायचा" याचे योग्य मार्ग दिसत जातात.

तसं नसलं की व्यावसायिक स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करत राहण्यात धन्यता मानतो.

अल्प संतुष्ट

२०१० ची गोष्ट असेल. माझा एक मित्र आहे समीर. इंडस्ट्रीयल आयटम ट्रेड करतो. ठीक ठाक बिझिनेस करायचा. मुंबईला नागदेवी स्ट्रीट ला अडीचशे स्क्वेफूट चं ऑफिस. वडिलोपार्जित धंदा. भाऊ मदतीला. (ऑफिसच्या आकारावर जाऊ नका. नागदेवी स्ट्रीटचा अडीचशे फुटचा गाळा म्हणजे करोडपतीच तो).

सम्या म्हणजे अगदी टिपिकल. कालच्या पोस्ट मध्ये सांगितला तसा. आव आणायचा बिझिनेस वाढवायचा पण त्यावर ऍक्शन, त्या दृष्टीने घ्यायचा नाही.

एक दिवशी माझ्याकडे आला. म्हणाला "ट्रेडिंग करण्यासाठी अजून एखादा इंडस्ट्रीयल आयटम सांग की". माझ्याकडे होता, रोटरी जॉईंट. माझ्या लाईनला पूरक प्रॉडक्ट. भारतात कुणी बनवायचं नाही. मी त्याला म्हणालो "याची जर्मनीतून सप्लाय चेन बनवू आणि इथे विकू यात. काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करू यात. माझ्या कंपनीचा ब्रँड तयार झाला आहे. अल्ट्रा. त्या नावाने विकू. सोपं पडेल." समीरला आवडली आयडिया. सहा आठ महिने काम केलं. जर्मनीत प्रॉडक्ट डेव्हलप केला. डिसेंबर २०१० ला आम्ही प्रॉडक्ट लॉन्च करायला तयार झालो. समीरने प्रॉडक्ट विकायचं. आमचा ब्रँड वापरण्यासाठी अल्ट्रा ला १०% कमिशन द्यायचं ठरलं.

२०११ ला आमचं इमटेक्स प्रदर्शन होतं जानेवारीत. मी सम्याला बोललो "माझा बूथ आहेच. हे प्रॉडक्ट ठेवू यात तिथे आणि तू ही थांब स्टॉल वर. इन्कवायरीज मिळतील. काम करू" समीरच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसले अन पहिलं रडगाणं तो गायला "धंद्यात मंदी आहे. बुथचं काँट्रिब्युशन द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत" मी म्हणालो "ठीक आहे यार. अशी किती जागा लागेल तो प्रॉडक्ट डिस्प्ले करायला. अल्ट्रा करेल सगळा खर्च. तू स्टॉल वर रहा हजर सगळे दिवस"

त्या औद्योगिक प्रदर्शनात धमाल आली. २००९ ची मंदी संपून तेजीला सुरुवात झाली होती. स्पिन्डल, त्याची रिपेयर सर्व्हिस आणि समीरचा नवीन प्रॉडक्ट रोटरी जॉईंट. (हो, आता तो समीरचा प्रॉडक्ट झाला होता) सगळ्यांना खुप इन्कवायरीज मिळाल्या. रोटरी जॉईंट कन्झ्युमेबल असल्यामुळे त्यासाठी तर ऑर्डर पण मिळाल्या.

प्रदर्शन संपल्यावर पहिला महिना समीर रोटरी जॉईंट विकण्यात खूप बिझी झाला. ते चालू असतानाच मी एकदा मुंबईला समीरला भेटलो आणि सांगितलं "प्रॉडक्ट भारी झालं आहे. याला व्यवस्थित मार्केट करू. काही टिपिकल मार्केट झोन आहे जिथे हा प्रॉडक्ट खूप खपेल. तू सप्लाय व्यवस्थित सेट कर. त्याचे मॉडेल निवडुन ऑर्डर करून स्टॉक मध्ये ठेव. आयपीएफ, सर्च सारख्या मॅगेझिन मध्ये त्याची ऍड देऊ. त्याबद्दल आर्टिकल छापू. तुझीअजून वेबसाईट नाही आहे. ती बनवू आणि हा प्रॉडक्ट तिथेही डिस्प्ले करू. संधी मिळाली आहे तर तिचा फायदा उठवू" समीरने मान हलवली. पण ती ज्या पद्धतीने हलवली तिथेच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

माझी शंका खरी ठरली. ऑर्डरचा पहिला पूर ओसरल्यावर समीरकडे रोटरी जॉइन्टचा खडखडाक झाला. स्टॉक ठेवण्यासाठी जे प्लॅंनिंग करावं लागतं ते समीरने केलंच नाही. प्रॉडक्ट चांगलं होऊनही मार्केटिंग न केल्यामुळे ग्राहकापर्यंत ते पोहोचलं नाही. इंडस्ट्रीयल मॅगेझिन मध्ये ऍड नाही, इमटेक्स नंतर छोट्या प्रदर्शनात सहभाग नाही. अत्यंत चांगलं आणि उपयोगी प्रॉडक्ट असूनही ते लोकांच्या विस्मरणात गेलं. वर्ष दीड वर्षात समीरच्या ऑर्डरचा फ्लो घटला. अपेक्षित सेल झाला नाही म्हणून जर्मनीच्या कंपनीने काँट्रॅक्ट नाकारलं.

आज सहा वर्षे झालीत. समीर त्याच ऑफिसमध्ये बसून त्याचे वडिलोपार्जित प्रॉडक्टस विकतो आहे. तोच रोटरी जॉईंट अहमदाबादच्या मुकुलने त्याच मॅन्युफॅक्चरर कडून डेव्हलप केलाय. हा लेख, मी अहमदाबादच्या फ्लाईट मध्ये बसून लिहितोय. हो, मी चाललोय मुकुल ला भेटायला, काँट्रॅक्ट साइन करण्यासाठी. दरवर्षी २० लाखाचे रोटरी जॉइन्ट्स मलाच लागणार आहेत, ते फायनल करायचं आहे.

(सम्या लिहिलं म्हणून तो मराठी माणूस आहे असा ग्रह करून त्याची धुलाई करू नका. 😊😊)

अल्प संतुष्ट 

स्पर्श.

स्पर्श....

आपल्याला असलेल्या सेन्सेस पैकी एक. किती महत्वाचा आहे खरं तर. पण कन्फेशन देतो. अगदी आता पर्यंत मानवी स्पर्शाची माझी संकल्पना ही अत्यंत बुरसट अशा प्रकारची होती.

म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूंचा स्पर्श मला आवडतो. नवीन कपडे, एखादं पुस्तक, मोबाईल फोन, सर्व्हिस होऊन आलेल्या कारचं स्टिअरिंग. एकदम भारी वाटतं.

पण मानवी स्पर्श. एक वेळ मी पुरुष वर्गाशी खुलून भेटत पण असेल. ते ही टाळ्या वा पाठीवर थाप इतपत. गळाभेट वगैरे लांब. आणि स्त्री वर्ग. तोबा तोबा. इथे तर टाळ्या पण दूरची गोष्ट. आपल्या स्पर्शाचा अर्थ कसा घेतला जाईल याबद्दल कॉन्फिडन्स नसायचा.

त्याला काही कारणं पण असावी. घरात बहीण नाही. स्त्री म्हणाल तर फक्त आई. परत जन्म ६८ चा. म्हणजे पौगंडावस्था आली ती ऐंशी नंतर. त्या काळात मी डिप्लोमा ला हॉस्टेल ला. कॉलेज मध्ये स्त्री वर्गाचा दुष्काळ.

निरिच्छ वृत्तीचा स्पर्श समजायला खूप वर्षे गेली. त्यामुळे मीच घाबरायचो. कारण माझ्या स्पर्शाची क्वालिटी काय, तो ओंगळवाणा तर नाही ना याबद्दल सारखा संभ्रम असायचा.
परत फॅन्टसीच्या रुपात मनात लपून बसलेलं हिंस्त्र जनावर कधी कधी डोकं काढायचं. आणि मागे म्हंटल्याप्रमाणे आपण एकटे असताना जे वागतो ते कॅरेक्टर. ते मार खायचं.

पण मग हळूहळू थॉट प्रोसेस क्लिअर व्हायला लागली. स्वच्छ स्पर्श हा स्वच्छ मनोवृत्तीचा परिपाक आहे याची जाणीव व्हायला लागली. ते मनाचं क्लिंजिंग ही एक इवोल्युशन प्रोसेस आहे. खूप कष्ट पडतात. पण एक सुदृढ मन घडवायचं असेल तर ते कष्ट उचलायला हवेत.

गेली काही वर्षे त्यावर प्रयत्नपूर्वक काम केलं. ते मनातलं हिंस्त्र जनावर हळूहळू मारून टाकलं. आता विश्वास आला आहे माझ्यावरच की ते जनावर पूर्ण मेलं आहे.

आता कसं एकदम स्वच्छ वाटतंय. जगण्यात काही सुवर्ण क्षण असतात, आयुष्यभर जपून ठेवावे असे. माय लाईफ मोमेंट म्हणतात त्याला. ही अनुभूती पण तशीच.

सुट्ट्या

मागच्या आठवड्यात अहमदाबाद एअरपोर्ट ला होतो. गणपती विसर्जनाच्या दिवशी. एका पिलरला फोन चार्जिंग ला लावला होता. (सांगायचं म्हणून सांगतो, अहमदाबाद एअरपोर्ट एकदम दलिंदर एअरपोर्ट आहे, अगदी आपल्या पुण्यासारखं)

एक फोन आला म्हणून बोलायला चालू केलं. गाडी बोलताना गणपती विसर्जनाच्या सुट्टीवर गेली. मी चालू झालो "हो ना राव! गणेश चतुर्थी ची सुट्टी, मग विसर्जनाची. तिथे ईद पण आली मध्ये. ते झालं की नवरात्र. गरब्याची झिंग उतरत नाही तोवर आम्ही पन्नास फूट उडणाऱ्या रॉकेट ला काड्या लावायला तयार. या आपल्या देशाची उत्पादकता सणांनी पार मारून टाकली आहे. मला तर कधी कधी वाटतं फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीची सुट्टी द्यावी आणि मग पोरांना सांगावं की आठ दिवस हवी तेव्हा सुट्टी घ्या. मग दिवाळीला घ्या, ईदला घ्या, नाहीतर नवीन वर्षाला घ्या."

बोलताना आवाजाची पट्टी वाढली होती बहुतेक. फोन ठेवला अन इतका वेळ पिलरकडे तोंड करून उभा असलेला मी मागे वळलो. मागे वळून बघतो तर आजूबाजूचे काही लोकं माझ्याकडे भूत बघितल्यासारखं बघत होते. सणांना सुट्ट्या नाही, हा कन्सेप्ट त्यांना काही झेपला नसावा.

सुट्ट्या

कालच्या पोस्टवर काही कॉमेंट्स अशा होत्या की ज्यातून असं प्रतिध्वनीत होतंय की मी सुट्ट्यांचा विरोधक आहे. खरंतर मी पोस्टमध्येच लिहिलं होतं की सणवाराना सुट्टी घेण्याऐवजी तीच सुट्टी नंतर एकत्र घ्यावी.

माहितीस्तव सांगतो, माझ्या कंपनीत कॅज्युअल लिव्ह, सिक लिव्ह आणि अर्न लिव्ह या सगळ्या नियमाप्रमाणे देतो. याची टोटल बेरीज साधारण ३० दिवस होते. इतकंच नाही तर, माझ्या इथे लिव्ह एनकॅश करता येते. म्हणजे तुमच्या अर्न लिव्ह जर जमा झाल्या तर तुम्ही त्या विकू शकता. यात नवल काहीच नाही, पण माझ्या साईझच्या कंपनीमध्ये ही सुविधा फार कमी ठिकाणी मिळते.

आता सणांच्या सुट्टीबद्दल. त्या सुट्टीमुळे उत्साह वाढतो वगैरे हे मला पटत नाही. आमच्या कंपनीतला एक जण ढोल ताशा पथकात गेला होता. विसर्जनानंतर तीन दिवस सुट्टी घेतली. पकला होता पार. ढोलच्या व्हायब्रेशन्स मुळे रक्ताच्या वाहिन्या एक्सपांड होतात हे प्लिज सांगू नका राव! किंवा मिरवणुकीत उडवलेला गुलाल फुफुस्सात जाऊन अस्थमा बरा होतो हि पण थिअरी सांगू नका.

सण साजरे करण्याची आपली पद्धती एनर्जी सॅपर आहे. आमच्या इथे गौरी रात्री बारानंतर बसतात. रात्री बाराला आवाहन केल्यावर कोण आपली प्रॉडक्टिव्हिटी दुसऱ्या दिवशी दाखवू शकतं. नवरात्रीला बेधुंद नाचल्यावर दुसऱ्या दिवशी काम करण्याची ताकद असते, असं जर कुणी म्हणत असेल तर तो धादांत खोटं बोलत आहे.

दुसरं म्हणजे आता पूर्वीसारखी कुटुंब व्यवस्था नाही राहिली. विभक्त पद्धतीमुळे घरातल्या अनेक कामासाठी सुट्टी घेण्याची गरज असते. त्यासाठी सुट्ट्या खात्यात जमा असणं गरजेचं असतं. पब्लिक सण आणि नंतरच्या दिवसाला जोडून सुट्ट्या घेतात आणि मग जेव्हा खरंच गरज असते तेव्हा मग खोटंनाटं बोलून सुट्टी घ्यावी लागते.

कॅज्युअल लिव्ह ८, सिक लिव्ह ८ आणि सुट्ट्या ९ या एकूण २५ म्हणजे महिन्यात दोन सुट्ट्या घेतल्या तर पीएल वर्षाला १५ या जमा व्हायला पाहिजेत. पाच वर्षे सर्व्हिस झाली तर ७५ पी एल जमा पाहिजेत. त्या नसतात.

अठ्ठेचाळीस तास आठवड्यात काम हे देशाचं स्टॅंडर्ड आहे. विकसनशील आहोत. विकसित होण्यासाठी सध्यातरी इतकं काम करणं गरजेचं आहे. एकदा झालो की करू पाच दिवसांचा आठवडा. चीन आणि तैवान मध्ये झालाच की तो.

बस इतकंच.

आय रेस्ट माय केस मिलॉर्ड

सुट्ट्या 

अतिरेक सुविचारांचा

शप्पथ सांगतो, हे व्हाट्स अप च्या सकाळच्या मेसेजेसनी लोकांची मत मारली आहे. नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने हे मेसेजेस फिरतात आणि लोकं अलंकारिक भाषा वापरत इकडे तिकडे फिरत बसतात.

असाच आमच्या कडे एक गृहस्थ सध्या येतो. त्यांचं आडनाव, नको नाहीतर नाव ठेवू सुहास. सुहास कंपनीत आले की इन्स्पिरेशनल वाक्याचा भडिमार करतो. कधी कधी तर इतका अतिरेक होतो की मला वाटतं की ही स्पिन्डल ची कंपनी बंद करून मंगळावर जायचं यान वगैरे बनवायची फॅक्टरी टाकावी.

या सुविचारांच्या ही लोकं इतकी अधीन झाले असतात की यांना आपण बोलताना काय उदाहरण देतो आहे ते पण लक्षात येत नाही आणि ते लक्षात ठेवावं याचीही त्यांना गरज भासत नाही.

सुहासला आमच्या कंपनीच्या संदर्भात काही काम करायचं आहे. तर त्याबद्दल बोलताना सुहास म्हणाला

"मला हे काम करायला तुमच्या कंपनीत येऊन बसावं लागेल. चार दिवस मी इथेच येईन, जेवण करेल आणि काम पूर्ण करेन. हो, माझी अशीच पद्धत आहे"

पुढचं वाक्य खतरनाक होतं.

"म्हणजे कसं, कचरा साफ करायचा तर कचराकुंडीतच बसून काम करावं लागतं"

मी: आँ

खरंतर त्या कामाचा अन कचऱ्याचा दुरान्वयेही संबंध नव्हता आणि सुविचार चिकटवण्याच्या नादात तो माझ्या कंपनीला कचराकुंडी म्हणून गेला हे सुहासच्या गावीही नव्हतं.

"बाय द वे" हे तीन शब्द वापरत सुहास बऱ्याच काही गोष्टी फेकतो. मी काही बोलायच्या आत, तेच वापरत तो पुढचा सुविचार जुळवायच्या मागे लागला.

(मत मारली म्हणजे मती. नाहीतर तुम्हाला दुसरं काहीतरी वाटायचं)

अतिरेक सुविचारांचा 

राम18

राम आणि मी कार ने चाललो होतो. तासाभराचा प्रवास झाल्यावर राम ने मला विचारलं

"हा ए सी तू सारखा बंद चालू का करतोस?"

मी म्हणालो "त्याने फ्युएल कंझम्पशन चांगलं मिळतं. आणि कारपण खूप गार झाली असते. तिचं टेम्परेचर पण जागेवर येतं" 

राम म्हणाला "येडा आहेस तू. या पद्धतीने फ्युएल कंझम्पशन वाढतं. कारण ए सी बंद करून तू जेव्हा परत चालू करतोस तेव्हा कारला गार करण्यासाठी एसी ला जास्त एनर्जी आणि पॉवर लागते. तेव्हा जे तुला कम्फर्टेबल तापमान आहे ते एकदाच सेट कर. मग भले ते २५-२६° असो वा१८-१९°. आणि तिथे सिस्टम ला सोडून दे. जास्तच गार गरम झालं तर त्या दुसऱ्या नॉब ने तापमान कमी जास्त कर पण एसी बंद चालू नको करु. एकदा तापमान सेट झालं की त्याचा आनंद घे. काहीतरी काड्या करून ती सिस्टम बिघडवू नको."

पुढे जाऊन म्हणाला "आयुष्यही असं जग. बऱ्याच कष्टाने टक्के टोणपे खाऊन जीवन सेट होतं. परिस्थिती त्याला कधी बिघडवेन हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे एकदा स्टेबिलिटी आली की त्या काळाचा आनंद घे. स्वतःहून काड्या करून अनकम्फर्टेबल करू नकोस. कारण परिस्थिती त्या काड्या करतच असते. मग तेव्हा तिच्याशी दोन हात करायला एनर्जी उरत नाही"

हा राम कशाचा संबंध कशाला लावेल याचा काही भरवसा नसतो.

सुविधा

काही दिवसांपूर्वी सुट्ट्यावर एक पोस्ट टाकली त्यावर काही प्रतिक्रिया आल्या. त्यात एक होती की सुट्टीमुळे आपली उत्पादकता कमी नाही तर ती कमी आहे ते आपण १००% इफिशियन्सी ने काम करत नाही म्हणून.

तार्किक दृष्ट्या बरोबर आहे ते. पण असं विधान करताना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा सोयीस्कर विसर पडतो. मुख्य म्हणजे आपल्या मूलभूत सुविधा. म्हणजे बघा १९ किमी येण्यासाठी मला पूर्ण एक तास लागतो. बरं मी तरी एसी कारमधून येतो. पण जेव्हा एखादा ट्रॅफिकमध्ये तास भर टू व्हीलर चालवून ऑफिसला येतो तेव्हा तो अर्धमेला झाला असतो. आमच्या कंपनीत या एकदा. अगदी छोटी का असेना पण एफडीआय आणली आम्ही. पण हाडं खिळखिळी करणारा रस्ता आहे आमचा. मग कधी लाईट नाही तर कधी पाण्याचा प्रॉब्लेम. परत कामावर आला की तिथली परिस्थिती. लोकांना मुतायला धड टॉयलेट कंपनीचे मालक बनवत नाही ना जेवायला व्यवस्थित जागा असते. उन्हाळ्यात शॉप फ्लोअर तापलेलं असतं.

कामावर असेल तेव्हा बाकी भानगडी. कधी कुरियर जागेवर मिळत नाही. आणि ते कस्टम्स डिपार्टमेंट. दिवसातले चार पाच तास तर आमच्या माणसाचा सी अँड एफ ला फोन करायला जातो. तो काय दगड इफिशियन्सी ने काम करेल.

ऐंशी टक्क्यांच्या वर इफिशियन्सी ने काम करायचं असेल तर कंपनीची नाही तर पूर्ण समाजाची, राज्याची आणि पर्यायाने देशाची इको सिस्टम तशी असावी लागते. नुसतं वर्किंग क्लास कडे इफिशियन्सी नाही अशी बोंब मारणं सोपं आहे. ती आणण्यासाठी मालक वर्गाची, सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती नाही ही वस्तुस्थिती आहे.

(नवीन सरकार उद्योगधार्जिण आहे वगैरे असा डिंडोरा पिटला जातो. त्यात शून्य तथ्य आहे. उद्योगधंद्यांला काहीही मदत या चालू सरकारच्या ध्येय धोरणातून मिळत नाही)

(वरील कंसातील चालू सरकार म्हणजे running government. आपलं मराठीतील चालू नाही. आधीच क्लिअर केलेलं बरं नाहीतर आहे नोटीस.....) 😊😊

सुविधा 

आहे हे असं आहे.

नॉर्मली अशी पोस्ट टाकावी लागत नाही, पण वर्षातून एकदा असं निवेदन येऊ द्यावं. त्याला कारण पण असतं. एका मित्रवर्याने कॉमेंट केली की "तुम्ही कॉमेंट ला प्रतिसाद देत नाही फक्त लाईक करून बोळवण करता".

याच्यामागे दोन कारणं आहेत.

एक म्हणजे, तुमचा विश्वास बसतो वा नाही, पण इतका वेळ माझ्याकडे नसतो. त्यामुळे कॉमेंट वाचून एक पोचपावती म्हणून लाईक मारतो पण त्यावर प्रतिसाद देऊ शकत नाही. मग ते पोस्टला समर्थन असो वा प्रतिवाद.

आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे, अन त्यात प्रतिवाद करणारी कॉमेंट असेल तर, मी तुमचं मत खोडून काढण्याचा फायदा काय? तर शून्य. कारण तुम्हीही सज्ञान आहात. मी डोक्याने नसलो तरी कायद्याने नक्कीच सज्ञान आहे. तुमची एव्हाना मतं ठाम आहेत. माझी सुद्धा विचार वगैरे करून मत बनवली आहेत. त्यामुळे मी पोस्ट टाकतो. माझं काम तिथं संपतं. त्यावर तुम्ही काही प्रतिक्रिया व्यक्त करता. त्यावर मात्र मी पुढे काम करू नाही शकत.

आणि त्यात विषय राजकीय असेल तर प्रश्नच मिटला. २०१४ साली मी भाजप विरोधक होतो, आजही आहे. माझे एकूण एक मित्र माझी टिंगल उडवायचे. पण म्हणून त्यांच्या वादाला प्रतिवाद करत बसलो असतो तर त्यांना दुरावलो असतो. आजही काही शिवसेना समर्थक भाजप विरोधातील पोस्ट शेअर करताना दिसतात. मूळ पोस्टकर्त्यांची शिवसेनेबद्दलची मतं या समर्थांकांनी वाचली तर डोक्याला हात लावून बसतील. मला असला दांभिकपणा जमत नाही. माझी काही मतं आहेत जी काँग्रेसी विचारसरणीची आहे. आणि ती मला प्रिय आहेत..........पण माझ्या मित्रांपेक्षा नाहीत. I love my political idols........But not more than my friends.

आहे मी असा आहे. मी तुम्ही काय लिहावं, काय लिहू नये यावर सहसा मत प्रदर्शित करत नाही. एखादा अपवाद असेल, पण फेसबुकोनिषद मधील ऋचा बनवायला मी माझी बुद्धी खर्च करू शकत नाही. तो तुमचा चॉईस आहे. मी काय लिहितो, कॉमेंटवर प्रतिसाद म्हणून काही लिहावं की नाही हा माझा चॉईस आहे.

आहे हे असं आहे.

प्रतिमा

तर आज एकाला भेटलो. मार्टिन नाव त्याचं. एकदम चकाचक कंपनी आहे त्याची, जर्मनीतल्या एका खेड्यात. जर्मनी बाहेर एक्स्पान्शन करायची खूप इच्छा आहे त्याची. तीन वर्षांपूर्वी भारतात आला होता. नॉर्थ मध्ये अशोक नावाच्या एका उद्योजकाबरोबर तीन महिने राहिला होता. म्हणाला "तुमच्याइथली गरिबी पाहून मी थक्क झालो. आणि ज्या पद्धतीने अशोक त्यांच्या लोकांना कमी पगारात देत होता आणि काम करवून घेत होता, ते पाहून मी त्याला विचारलं की इतक्या कमी पैशात लोकांचं भागतं का? तू जास्त पगार का देत नाहीस". तर तो अशोक नावाचा प्राणी म्हणाला म्हणे "त्यांचं नशीब त्यांना इतके तरी पैसे मी देतोय, नाहीतर यांना हाकलून अजून कमी पगाराची लोकं मी इथे ठेवू शकतो".

त्या अशोकवर भयानक चीड आली होती. अशोकसारखे मूठभर भांडवलदार हे गरीबांची शोषण करत राहतात अन देशाची प्रतिमा जगात बिघडवण्याचं काम करतात. कितीही भांडवलशाहीचा डंका पिटवला तरी मनाने सॊशालिस्ट असणं ही काळाची गरज आहे. उत्पादित होणाऱ्या संपत्तीचं असं वितरण झालं नाही तर गरीब वर्ग हा गरीबच राहणार आणि श्रीमंत हे अजून श्रीमंत होत राहणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि जर एका मोठ्या वर्गाकडे जर भौतिक संपत्ती आली नाही तर देश विकसित होणार हे दिवास्वप्न राहणार.

मार्टिन म्हणाला "तो सगळा प्रकार बघून मला भारताची अक्षरशः किळस आली. एक माणूस दुसऱ्या माणसाला असं वागवू शकतो यावरून मी निर्णय घेतला की भारतात धंदा करण्यासाठी परत पाय ठेवणार नाही. अशोक ने माझा सॉलिड पाहुणचार केला पण त्याचं शॉपफ्लोअर एकदम घाणेरडं होतं"

अशोक मुळे तयार झालेली भारताची प्रतिमा मार्टिनच्या मन:पटलावरून काढून टाकायला मला तब्बल एक तास लागला. आणि शेवटी यशस्वी झालो. "पुढील एका वर्षात तुझ्या कंपनीबरोबर मी प्रोजेक्ट करणार" असं त्याने मला आवर्जून सांगितलं.

तो प्रोजेक्ट होईल ना होईल हे काळच सांगेल कारण त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत. कदाचित माझ्याऐवजी कुणा दुसर्याबरोबर त्याचा प्रोजेक्ट होईल.  पण भारतातील लोकांबरोबर उद्योग करण्याची त्यांची लायकी नाही ही प्रतिमा पुसून टाकण्यात बऱ्याच अंशी यश मिळालं....

.......हे ठीकच झालं.

नमस्कार

माझा एक मित्र चांगल्या कंपनीत पंचवीस वर्षे काम करत होता. त्यानंतर काहीतरी वादावादी झाली आणि त्याने कंपनी सोडली. त्याला उडवलं की त्याने सोडली हे गुलदस्त्यात होतं.

कधीही भेटला की तो त्याच्या जुन्या कंपनीचा विषय छेडायचा. आणि ती कंपनी आता किती प्रोब्लेममध्ये आहे त्याच्या मनघडन कहाण्या सांगायचा. ज्या कंपनीत या पठ्ठ्याने पंचवीस वर्षे घासली तिथे आता याला किती अनप्रोफेशनलिझम आहे त्याचा साक्षात्कार होऊ लागला.

त्याची आधीची कंपनी माझी ग्राहक आहे. एकदा तिथे जायच्या आधी माझा मित्र म्हणाला "जरा माझा विषय काढ रे. काय म्हणतात ते बघू"

मी बोलताना तिथल्या एमडीशी बोलताना संजयचा, माझ्या मित्राचा, उल्लेख केला. त्या एमडीने संजय काय म्हणतो इतकं विचारून पुढे सरकला. संजयची त्याने निंदा तर केलीच नाही, उलट निघताना त्याला नमस्कार सांगितला.

आपण एखादी कंपनी सोडल्यावर तिथे आपल्याबद्दल काही आकस वगैरे नसतो. आपण तिथे नाही म्हणून त्या कंपनीला प्रॉब्लेम आहे वगैरे गोड गैरसमजात कुणी राहू नये.

वैयक्तिक माणसापेक्षा संस्था, ऑर्गनायझेशन ह्या नेहमीच मोठ्या असतात.

राम 17

"बरं, परवा अगदी टेचात लिहिलंस, लोकांनी कंपनी सोडून गेल्यावर कसं वागायला पाहिजे ते" राम म्हणाला.

"हो, मग! चुकीचं काय आहे त्यात" मी म्हणालो.

"अच्छा, पण जेव्हा एखादा माणूस तुझी कंपनी सोडून जातोस, तेव्हा तुझी वागणूक त्याच्याबद्दल कशी असते" रामने विचारलं.

"अं... म्हणजे.....अं, तसं बघायला गेलं तर....म्हणजे कसं......" मी शब्द जुळवत होतो.

राम म्हणाला "उत्तर बनवायला त्रास होतोय ना!"

मी सावरत म्हणालो "तसं नाही, म्हणजे मी फारसा कधी विषय काढत नाही त्यांच्याबद्दलचा."

राम म्हणाला "त्यांना कधी फोन करतोस का, की कसे आहात वगैरे"

मी म्हणालो "मी कशाला विचारू? कंपनी सोडली त्यांनी मग माझा काय संबंध त्यांच्याशी"

राम म्हणाला "एका वर्षाच्या आत जे सोडून जातात, त्यांच्याबद्दल ठीक आहे पण जे तीन, पाच वर्षापेक्षा जास्त काळ तुझ्या कंपनीत घालवतात, त्यांनी काही काँट्रिब्युशन केलं असतं, कंपनी वाढवण्यासाठी. त्यांच्याबद्दल तुझ्या मनात इतकी रुक्ष भावना नको. सोडून गेलेल्या लोकांबद्दल चांगली भावना मनात ठेवली की बरोबर काम करणाऱ्या लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण होतो. ती लोकं समोरून आलेच तर कधी चहा वगैरे पित त्यांच्या सध्याच्या जॉब बद्दल चर्चा करण्याची सद्सद्विवेक बुद्धी ठेव."

मी गप्प बसलो.

"दुसऱ्यांबद्दल पोस्ट टाकायला मजा वाटते. आता कसली मिरची लागली ना!" राम म्हणाला.

"कुणालचा नंबर शोध रे" मी आमच्या एच आर ला सांगितलं.

जर्मनी डायरी

परदेशात चाललो आहे याची कुठल्याही टाईपची दवंडी फेसबुकवर पिटणार नाही हे बायकोला दिलेलं आश्वासन एक आठवडा कसोशीने पाळलं पण एका आठवड्यानंतर तेजलला भेटलो आणि मग त्या घोषणेला हरताळ फासला.

तेजल कृष्णकुमार राऊत. एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर कनेक्ट होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यात ती व्यक्ती वयाने लहान असेल तर नक्कीच. पण तेजलच्या घरात पाय ठेवल्यावर मला मोजून पंधरा सेकंद लागले आणि जणू तेजल व एमिल यांच्या लग्नात मी तेजलच्या मागे तिचा मामा वगैरे म्हणून उभा होतो की काय इतक्या आत्मीयतेने मी दोघांशी बोलू लागलो. त्यांच्या दोघांच्या लव्ह स्टोरी पासून सुरू झालेल्या गप्पा ह्या सव्वापाच ला टॅक्सी ड्रायव्हर ने तो आल्याचा सिग्नल दिल्यावर थांबला. तेजल नॉन स्टॉप सेन्सफुल बोलते आणि एमिल खूप मोठे पॉज घेत सेन्सफुल बोलतो. फेसबुकच्या शिरस्त्याप्रमाणे इथे फक्त तेजल असते आणि एमिल त्यावेळेस निद्राधीन झाला असतो. अफलातून बिर्याणी बनवली होती, आणि ती एमिलने बनवली होती असं कुठंही बोलायचं नाही हा माझा आणि तेजलचा करार आहे. लिहायचं नाही असा करार नव्हता. तीन तास तीन मिनिटात संपले.

शनिवारी फ्रँकफूर्ट ला आलो. वैभवीचा भाऊ अमोल गेले सात वर्षे जर्मनीत राहतो. सुरुवातीला पुण्यात अडखळत चालू झालेली अमोलची कारकीर्द इथे जर्मनीत फुललेली पाहून मस्त वाटले. अमोल आणि प्रीतीने अत्यंत नेटका संसार उभा केला आहे. प्रोफेशनल यशाबरोबर मराठी लोकांशी अमोलने केलेलं नेटवर्किंग अफलातून आहे. आणि त्यातून त्याने मग छोटीशी मैफल बनवली. हरफनमौला अजित रानडे, माझा नातेवाईक आणि सध्या जर्मनीत प्रोजेक्ट वर असणारा महेश देवळे, वैभवीचा सख्खा मित्र आणि एका मल्टी नॅशनल कंपनीचा उच्च पदाधिकारी पण त्याची हलकीशी सुद्धा भनक न लागू देणारा डॉक्टर  हृषीकेश कुलकर्णी आणि त्याची तितकीच सुविद्य पत्नी प्रज्ञा,  ज्याच्या वडिलांशी माझी जितकी वर्षे मैत्री त्याचं साधारण तितकं वय असलेला ओंकार पुरोहित आणि त्याची बायको, नागपूर-कोल्हापूर या दोन टोकाच्या शहरांना जोडणारे अमित आणि शिल्पा हे कपल आणि एकदम शांत पण बोलण्यात खोली असणारा यंग टर्क इंद्रजित या सगळ्यांशी त्याने आवर्जून संवाद साधून दिला. अनेकविध विषयावर बोललो. आणि यात भरीसभर वैभवीचे आई वडील पण तिथेच होते. पुण्यात मी हाताला लागत नाही म्हणून इथे "हा काय बिझिनेस करतो बुवा" हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.

पाहिले सहा दिवस तंगडतोड काम आणि नंतर तीन दिवस मूहतोड काम, म्हणजे गप्पा असे अजब जर्मनीतले दहा दिवस घालवले.

(रविवारी पारले जी चे दोन बिस्कीट चहात बुडवून खाल्ले. म्हणजे त्यादिवशी पुण्यात आलो आहे)

जर्मनी डायरी 

काव्यदिंडी

तन्वीर सिद्दिकी ची ओळख इथे मी करून द्यायची गरज नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तन्वीर ने प्रोफेशनल आयुष्यात एक स्थान निर्माण केलं आहे. त्यायोगे येणाऱ्या भौतिकतेची चव घेताना आपली संवेदनशीलता बरकरार ठेवली आहे. खरंतर तिला अजून आगळी किनार लाभली आहे.

त्याच्या खाली दिलेल्या कवितेत गजबची कल्पनाशक्ती आहे. आजच्या समाजव्यवस्थेचं इतकं यथार्थ चित्रण, वास्तववादी असलं तरी कुणाचीही मन न दुखावता त्याने सहज केलं आहे.
ते वाचल्यावर भावना वगैरे न दुखावता आपण खालमानेंने अपराधी म्हणून उभे राहतो त्या जगनियंत्यासमोर कटघरात. शेवट वाचताना तो प्रश्न आणि त्याचं भन्नाट उत्तर असं पटकन समोर येतं की आपण चकित व्हावं.

माझ्या खूप आवडत्या कवितांपैकी एक. तन्वीर कवितेचा गझल हा फॉर्म ज्या सहजतेने हाताळतो तितकंच मुक्तछंद सुद्धा.

तुमच्या माहितीसाठी सांगतो

एक कवीसंमेलन जमले होते
त्यात
अल्लाने क़ुरान नावाची कविता वाचली
कृष्णाने गीता
येशुने बायबल
बुद्धाने त्रिपिटक
नानक ने आदिग्रंथ
वाचल्यावर सगळ्यांना वाटले की 
सगळ्या कविता सारख्याच आहेत
- चोरली की काय संकल्पना बाकी सर्वांनी 
- कमी, आधिक ?
काय झाले असेल नंतर?
शंका, राग, अपमान, घृणा ?
च्छे, सगळे नुसतेच हसले
कवितेचे कागद बाजूला सारले 
टाकून दिले पायाशी - पृथ्वीवर 
आणि सगळे मित्र गप्पा मारू लागले

पण
आता रोज त्यांच्या गप्पात भंग होतोय 
खाली पाहुन - पृथ्वीवर 
हसणारे, आनंदी मित्र एकदुसरयाकड़े पाहतात
संशयाने, रागाने, अपमानित नजरेने, घृणेने, कीव येऊन

आणि विचारतात 
स्वतःला
एक दूसरयाला 
खाली पृथ्वीला उद्देशुन ही 
की 
चूक केली का हो कविता लिहून ?

मला त्यांचा प्रश्न रोज ऐकू येतो 
मी रोज म्हणतो त्यांना,

नाही ! 
तुम्ही फ़क्त
कवितेखाली आपलं नाव टाकायला नको हवे होते

हेच चुकलयं तुम्हा सर्वांच ! 

कविता वाईट नाहीये ! 

तुम्हालाही एक दिवस ऐकू येईल प्रश्न
उत्तर तयार ठेवा 

तुम्हाला कवितांची जाण आहे अस ऐकले आहे मी.....

उत्तर तयार ठेवा !

तनवीर सिद्दिकी
________________________________________________________________________________


फेसबुकवर काही कवी फारच ताकदीचे आहेत. त्यात एक नाव आहे शुभानन चिंचकर. त्यांनी रस्ता ही थीम ठेवून ज्या रचना रचला तो एक अफलातून प्रकार होता. 

गद्यात लिहायला जिथे पानं खर्ची पडतील तिथे बऱ्याचदा ही कवी मंडळी पाच सहा कडव्यात सगळं उतरवतात. शुभाननची एक कविता मला बंगलोर मध्ये अचानक वाचायला मिळाली. आणि वाचतानाच मी चकित झालो. अत्यंत आशयघन, आणि शेवटचे दोन कडवी तर संवेदनशीलतेच्या कळस आहेत. ती वाचल्या वाचल्या मी संग्रही ठेवली. आणि जितक्या वेळेस मी वाचली, त्या प्रत्येक वेळेस मी स्तिमित झालो. 

तुम्हालाही आवडेल. 

तू जन्मतोकडी कविता, 
मी व्यापक आशय नाही
या जन्माआधी अपुला
 का झाला परिचय नाही

का धुंद पाप मी टाळू 
ते जर का क्षणीक आहे
का पुण्य करू मी फसवे 
ते जर का अक्षय नाही

पदरात झेलला तू हा 
प्राजक्त विरागी भोळा
अन कळले- माझी नियती 
तितकीही निर्दय नाही

पावले दवाने भिजली 
अन झाले हे मन ओले
जीवना तुझ्या वणव्याचे 
उरलेच मला भय नाही

तू नेत्रबोलक्या ओळी... 
मी अर्थआंधळा जोगी
हे दोन ध्रूव जोडाया 
कुठलेही अव्यय नाही

त्या अगतिक जनुकांमधुनी 
ऐकला क्षीणसा टाहो
ज्योतीचे बीज रुजाया 
उरले गर्भाशय नाही

डोळ्यात गरीबी पाहुन 
नुसतेच दिले मी पैसे...
नेणत्या कळीला म्हटलो, 
"अद्याप तुझे वय नाही!"

शुभानन चिंचकर (Shubhanan Chinchkar )
______________________________________________________________________________



काव्यदिंडीत पुढच्या कवितेला टॅग करायचं म्हणजे Swaroopa ला. पर्याय नाही. ही कविता का कुणास ठाऊक मला पाठ आहे. ती म्हणताना खूप मजा येते. पण त्याचा आनंद खऱ्या अर्थाने स्वरूपा ती ऐकताना घेते. 

वरवर दिसताना विंदा करंदीकर यांनी दररोजच्या जीवनाच्या त्याच त्याच पणाला कंटाळून ती लिहिली असं वाटतं. मी अर्थ लावायचा प्रयत्न केला, पण अण्णा म्हणाले की प्रत्येक कवितेचा अर्थ शोधायलाच पाहिजे असं नाही. (अण्णा म्हणजे वैराळकर, नाहीतर तुम्हाला हजारे वाटायचे). मग मी त्या दिवसांनंतर त्या भानगडीत पडलोच नाही. 

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !! 
माकडछाप दंतमंजन, 
तोच चहा तेच रंजन 
तीच गाणी तेच तराणे, 
तेच मूर्ख तेच शहाणे 
सकाळपासुन रात्रीपर्यंत 
तेच ते तेच ते 

खानावळीही बदलून पाहिल्या 
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. 
काकू पासून ताजमहाल, 
सगळीकडे सारखेच हाल 
नरम मसाला, गरम मसाला, 
तोच तो भाजीपाला 
तीच ती खवट चटणी, 
तेच ते आंबट सार 
सुख थोडे दु:ख फार 

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे 
त्या स्वप्नाचे शिल्पकार, 
कवि थोडे कवडे फार 
पडद्यावरच्या भूतचेष्टा; 
शिळा शोक, बुळा बोध 
नऊ धगे एक रंग, 
व्यभिचाराचे सारे ढंग 

पुन्हा पुन्हा तेच भोग 
आसक्तीचा तोच रोग 
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती ' 
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती ' 
तेच ओठ तेच डोळे 
तेच मुरके तेच चाळे 
तोच पलंग तीच नारी 
सतार नव्हे एकतारी 

करीन म्हटले आत्महत्त्या 
रोमिओची आत्महत्त्या 
दधीचिची आत्महत्त्या 
आत्महत्त्याही तीच ती 
आत्मा ही तोच तो 
हत्त्याही तीच ती 
कारण जीवनही तेच ते 
आणि मरणही तेच ते

- श्री विंदा करंदीकर

_________________________________________________________________________________


काव्यदिंडीत Megha यांनी मला चार आवडत्या कविता पोस्ट करायला सांगितल्या. त्यापैकी ही पहिली

मध्ये एकदा साने सर (Rajan Sane) म्हणाले की सोशल मीडियात ताकदीच्या कविता वाचायला मिळत नाहीत. म्हणून मग त्यांना खाली लिहिलेली कविता पाठवली. त्याचे कवी ऋत्विज फाटक माझ्या मित्र यादीत नाही आहेत. मला ही कविता आर बी डी (Renukadas Balkrishna Deshpande) यांनी पाठवली होती. 

वाचल्या वाचल्या ती मनात रुतली. अत्यंत चपखल शब्दरचना, आणि तितकाच वेग प्रत्येक कडव्यात आहे अन आवेगही. 

फार विचारगहन कविता मला झेपत नाही. ही तसं म्हंटलं तर अगदी सोपी आणि म्हंटलं तर अर्थ शोधायला लावणारी. 

मला तर आवडली, तुम्हालाही आवडेल. 

कुठे खोल शून्यात तो गुंतलेला..
तिने हात हातांमध्ये गुंफलेला
मिठीला उतावीळ होईल तोही
असे वाटलेले तुलाही, मलाही..

तिने पाठवावीत रंगीत पत्रे
लिहावीत त्यानेसुधा स्वप्नं काही
म्हणावे तिला 'मी तुझा फक्त आहे'
असे वाटलेले तुलाही, मलाही..

नसेना जरा चारचौघांप्रमाणे
दिसेना जरा रुक्ष, संन्यासयोगी
तरी चिंब प्रेमात रंगेल तोही
असे वाटलेले तुलाही, मलाही..

कधी चांदण्यातील एकांत रात्री
निराकार वैराग्य संपेल सारे
नव्या स्पंदनांनी शहारेल तोही
असे वाटलेले तुलाही, मलाही..


निघालाच होता घरातून तेव्हा
तिला शांत झोपेत सोडून मागे
दिशाहीन व्हावे दिशांनीच दाही
तसे वाटलेले तुलाही, मलाही..

- ऋत्विक् फाटक

_______________________________________________________________________________

लंडन डायरी

लंडन जवळ पूल नावाचं गाव आहे. तिथल्या वेस्टविंड नावाच्या कंपनीला आम्ही भारतात रिप्रेझेन्ट करतो. गेले दोन वर्षे त्यांचा काही थांग लागत नव्हता. आता जर्मनीत आल्यासरशी त्यांनाही भेटून यावं म्हणून युके ट्रिप प्लॅन केली.

सकाळी साडेसातला लंडन ला पोहोचायचो ते दुपारी अडीचला पोहोचलो. लागलीच चार वाजता माझा जुना मित्र स्टीव्ह वॉर्नर, खास भेटायला आलेला. त्याला भेटुन पुढच्या भेटीसाठी सेंट्रल लंडन मध्ये गेलो.

फेसबुक हे एक असं माध्यम आहे की थोरा मोठ्यांना आपण मित्र म्हणून संबोधू शकतो. म्हणजे इथे ओळख नसली असती तर कदाचित या लोकांच्या आसपास पण मी पोहोचू शकलो नसतो. अशा लोकांपैकी एक नाव म्हणजे ललिता जेम्स. जिवंतपणी दंतकथा बनलेल्या  एम एस ओबेरॉय यांच्या ईस्ट इंडिया हॉटेल्सचं लंडन ऑफिसची सर्वेसर्वा. पण इतक्या मोठ्या पोस्टवर असूनही पाय जमिनीवर असणारी, आणि दोन सेकंदात कनेक्ट होणारी ललिता. टाटा सन्स च्या बिल्डिंगमध्ये गेलो तेव्हा रुसी मोदी, नानी पालखीवला, अजित केरकर आणि बरीच नावं बोर्ड वर वाचूनच हरखलो होतो. तसंच ललिता जेम्स यांच्या ऑफिस मधील ओबेरॉय यांची केबिन पाहून शहारलो. (ते कशाला याचं उत्तर हवं असेल तर Dare to Dream हे पुस्तक जरूर वाचावं).

दुसऱ्या दिवशी वैभवीची जिवलग मैत्रीण मंजुषा संत यांच्याकडे खास गप्पा मारायला गेलो. त्या गावातली शांतता पाहून आणि एकूणच निसर्ग सौन्दर्य पाहून पगलावलो. इथलं वर्क कल्चर अन त्या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न आणि बरंच काही हा गप्पांचा विषय. आणि त्या बरोबर मराठमोळं व्हेज जेवण असा फर्मास बेत.

दुसऱ्या दिवशी परत येताना संकेत कुलकर्णी आणि अमोल क्षत्रिय या तोपर्यंत फेबुवर मित्रयादीत नसलेल्या पण कनेक्टेड असलेल्या तरुणांची भेट झाली. संकेत चं इतिहासावरचं काम बघून चकित झालो तर अमोल चं इतक्या लहान वयात लंडनमध्ये व्यवसाय टाकायची डेअरिंग बघून.

आणि याशिवाय ज्यांच्याकडे राहिलो म्हणजे वाघेलाचे सोयरे, मकवाणा कुटुंब. सत्तरीत हे कुटुंब लंडनला आलं. काही जण व्यावसायिक झाले तर काही नोकरीत स्थिरावले. लंडनमध्येच त्यांनी मिनी इंडिया बसवलं आहे. ते जितका वेळ मला लंडन मध्ये देतात, तितका वेळ मी ते भारतात आले की देत नाही ही रामची माझ्याबद्दल तक्रार आहे.

(बाकी युरोपमध्ये बाहेर फिरताना शूज आपोआप पॉलिश होत जातात. टूर वर नेलेलं शु पॉलिश जसं आहे तसं परत आणलंय. हा प्रकार मला फार आवडला)

लंडन डायरी 

मराठी भाषेवर अतीव प्रेम

कामाच्या निमित्ताने माझं बरंच फिरणं होतं. भारतात मी ज्या राज्यात म्हणून कारखाने आहेत त्या सर्व राज्यात फिरलो आहे. अगदी उटीला पण कामासाठी, म्हणजे व्यावसायिक, गेलो आहे. त्यातल्या त्यात मी गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात मी सर्वात जास्त भेटी दिल्या आहेत. इतक्या की मनात आणलं असतं तर मी गुजराती, तामिळ आणि कन्नड या तिन्ही भाषा सहज शिकलो असतो. पण.....

पण इथंच तर मेख आहे. माझं मराठी भाषेवर अतीव प्रेम आहे. म्हणजे त्या भाषेमुळे माझ्या सर्व सांस्कृतिक, बौद्धिक, व्यावसायिक गरजा भागल्या जातात, तर मग अजून वेगळी भाषा कशाला शिकायची, हा प्रश्न मला पडतो आणि मी नवीन शिकण्याचा नाद सोडून देतो. (तुझी बौद्धिक गरज ती काय, असा नाठाळ प्रश्न मनात आणू नये). अगदी तांत्रिक बाबींवरील भाषणं ठोकताना मला जर श्रोता वर्ग म्हणाला की मराठीतून बोला, तर खूप हायसं वाटतं. म्हणजे त्या भाषा पण कानाला छान वाटतात आणि आवडतात. पण सगळीच लहान मुलं छान असतात पण आवडतं आपलंच मूल. तशी मला मराठी भाषा आवडते.

व्यवसायाची गरज म्हणून मी इंग्रजी बोलतोही. पण त्या भाषेला मी गरजेपुरतं वापरतो. इंग्रजीचा वापर, मग ते मौखिक असो वा कागदावर असो, फक्त व्यवसायाच्या संदर्भात करतो. बाकी सर्व ठिकाणी आपली माय मराठी. इंग्रजीला मावशी म्हणू फारतर.

हे सगळं खरंतर काहीजणांचा हेवा वाटला म्हणून लिहिलंय. माझा मेव्हणा अमोल, फेबु मैत्रीण तेजल हे काय सुंदर जर्मन बोलतात! एकदम अस्खलित. विचार केला कधी जर्मनी, फ्रांस, तैवान (मुद्दाम चीन ऐवजी तैवान लिहिलं. चीन मध्ये राहणं याचा मी विचारही करू शकत नाही) या सारख्या देशात राहावं लागलं असतं तर मी तिथली भाषा शिकलो असतो का? मराठीच्या मी इतक्या प्रेमात आहे की कदाचित त्या देशाची भाषा शिकणं जमेल तितकं टाळलं असतं. मला माहित आहे या स्वभावामुळे जगातल्या उत्तमोत्तम साहित्याला, चित्रपटांना मी मुकतो. पण सध्यातरी त्याला इलाज नाही. कदाचित उरल्या सुरल्या आयुष्यात मनात आलं तर करेलही प्रेम दुसऱ्या भाषेवर. पण सध्या आहे हे असं आहे.

जाता जाता: सुरेश भट रचित आणि कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं मराठी प्रेमगीत हे खूप आवडणाऱ्या गाण्यांपैकीं एक आहे. हो, मी त्याला अभिमानगीत म्हणत नाही.

Secret

माझ्यापाशी असली कोणतीही गोष्ट नाही की जी मला दुसऱ्याला सांगताना घाबरायला होतं की तो वा ती अजून कुठं सांगेल. अर्थात याचा अर्थ असा नाही की मी सगळ्याच गोष्टी दुसर्यांना सांगतो. आयुष्यात काही गोष्टी अशाही आहेत की त्या फक्त माझ्या आहेत. त्यात मी अतीव प्रेमळ आहे, अतिशय हलकट ही आहे, काहीवेळा तत्वनिष्ठ आहे आणि काही वेळा माझी तत्व खुंटीला टांगून ठेवली आहेत. ज्या वेळेस मला अगदी हलकी भनक लागली की समोरचा माणूस हे कुठंतरी बरळेल तर मी त्याच्या समोर ते बोलतच नाही. आणि एकदा बोललो तर समोरची माणूस कुठेही बकला तरी त्याचा फार विचार करत नाही. रादर मी तर अशाच ठिकाणी कुणाला न सांगण्याचा डाव टाकतो जिथं मला वाटतं हे त्याने/तिने कुठे तरी बोलावं. आणि लोकं साथ देतात. जिथं पोहोचवायचा तिथं मेसेज बरोबर पोहोचवतात.

समोरच्या माणसाने माझ्याशी असंच वागावं अशी माझी अपेक्षा असते. म्हणजे एखादे वेळेस सांगितलं तर ठीक आहे पण बोलताना सारखं कुणी म्हंटलं की कुणाला सांगू नकोस की मी अन कम्फर्टेबल होतो. लोकांच्या पोटात अशा गोष्टी असल्या की त्यांना सहन होत नाही, मी कुठलेही तथा कथित सिक्रेट्स पोटात ठेवून ढेकर देऊन वावरू शकतो.

अजून एक गोष्ट. अशा ज्या सो कॉल्ड सिक्रेट गोष्टी असतात त्या कुठे फुटल्या तर ९०% वेळा कुणालाही फरक पडत नाही.

असं असलं तरी एखादा मित्र वा मैत्रीण जेव्हा शेयर केलेल्या आपल्या मनातल्या गोष्टींची सार्वजनिक चव्हाट्यावर खिल्ली उडवतात तेव्हा वाईट वाटतं हे ही तितकंच खरं.

त्यामुळे बोलताना एकतर विचार करून बोलायचं आणि एकदा बोललं की फारसा विचार करायचा नाही.

आणि हो......इतक्या दीड शहाणपणाच्या गोष्टी लिहिल्या तरी मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कुठे सांगणार नाही याची गॅरंटी नाहीच. कारण बासुदा म्हणतात तसं की मी ज्या गोष्टी लिहितो त्याला माझं समर्थन असण्याचं काहीच कारण नाही आहे.

टूर

बऱ्याच लोकांना, त्यातल्या त्यात वैभवीला असं वाटतं की  माणूस, म्हणजे मी टूर वर जातो म्हणजे ऐश करतो. तिला असं वाटतं एखाद दुसरा कॉल करायचा, सहा एक वाजता हॉटेलला यायचं, मस्त साग्रसंगीत फोर कोर्स जेवण करायचं आणि मग........

करणारे करत पण असतील, पण माझ्यासारखे बरेच कमनशिबी पण असतात. काम करायचं, हॉटेलच्या ढाबळीत यायचं. अंगात अगदीच जान असेल तर एखादी बियर घ्यायची, ते पण कुणी कालिग असेल तर. ही म्हणजे खूप एन्जॉयमेन्ट ची परिसीमा. दिवसभर काम करून दमला असतोच माणूस. झोपायचं. साधारण असा खाक्या.

हे असं असताना परवा कोईम्बतुरला हॉटेलवर मला जो प्रश्न विचारला त्याने माझे स्वतः बद्दलचे सर्व गैरसमज दूर झाले.  रात्री दोनला कोईम्बतुरला पोहोचलो. एअरपोर्टहुन हॉटेल ला जायला अडीच वाजले. सकाळी सहाला माझा कालिग येणार होता, म्हणून मी डबल रूम बुक केली होती. मी काउंटरच्या माणसाला सांगितलं की "Second person is coming at 6 am".

तर म्हणतो कसा "Is other person male?"

नाही म्हणायला मनात गुलाबी विचार आले, पण इतका पराकोटीचा अभिनय करूनही आपल्या चेहऱ्यावर साळसूद भाव काही दिसत नाही याचं वाईटही वाटलं.

प्रिया प्रभुदेसाई.

तिला मी चार एक वर्षांपूर्वी रिक्वेस्ट पाठवली होती. त्या काळी स्त्री वर्ग मला मित्र आज्ञा पाठवायच्या नाहीत. मलाच नेहमी मित्र विनंति पाठवावी लागायची. तिचं मी वाचायचो. भारी असायचं. कधी गाण्याचं निरूपण, तर कधी मानवी नातेसंबंधातले कंगोरे, सैराट आणि बाजीराव मस्तानीची तिची परखड मतं, स्त्री पुरुष संबंध हा तसा नाजूक विषय पण त्याला संयमित शब्दात पण ठाम मतं मांडणारी.

सैराटचं तिचं परीक्षण मला पटलं नाही मग मी पिक्चरच्या बाजूने लिहिलं. अशा काही गोष्टी आहेतही, जिथे तिची आणि माझी मतं जुळत नाही. पण अर्थात त्याने मैत्री कधी बाधित झाली नाही. अन त्या मैत्रीला ही तिने अगदी आदबशीर निभावलं आहे. अगदी आतापर्यंत आम्ही एकमेकांना अरे तुरे करत नसू. माझ्या समवयीन अनेक जणांना ती अरे तुरे ने संबोधायची. मला कळायचं नाही. शेवटी मी कटाक्षाने तिला एकेरी संबोधू लागलो. मग तिचा पण नाईलाज झाला.  एखाद वर्षाने वयाने मोठी असूनही ती मला आजही चुकून आदरार्थी संबोधन करते. हे गणित काही मला उकलत नाही.

अशी अनेक जणांची तशीच माझीही सख्खी मैत्रीण, खूप जणींची आवडती दी, जितक्या ताकदीने ती पोस्ट लिहिते, तितक्याच खुसखुशीत कॉमेंट टाकणारी, तिच्या पोस्टवरच्या प्रत्येक कॉमेंटला योग्य प्रतिसाद देणारी, प्रतिवादाला ठामपणे सामोरी जाणारी, फेसबुक सारख्या माध्यमाचा व्यक्त होण्यासाठी अत्यंत संतुलित वापर करणारी प्रिया प्रभुदेसाई.

४ नोव्हेंबर २०१७ रोजी तिच्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. "जुळल्या सगळ्या आठवणी, स्वर आले दुरुनी" असं समर्पक नाव असलेलं. त्या बद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन. गाण्याच्या तिच्या अभ्यासाबद्दल मी काही बोलावं अशी परिस्थिती नाही. एखादं गाणं उलगडून सांगताना ती मुळात एक तालेवार गाणं निवडते आणि मग एखादा गवई गाणं फुलवत समेवर येतो तसं ती गाण्याला गद्यात फुलवते आणि ते जेव्हा वाचून संपतं तेव्हा मन त्या शब्दांभोवती घुटमळत राहतं. त्यात जेव्हा भावभावनांचा विषय जुळतो तेव्हा तिच्या प्रतिभेला धुमारे आणि लेखणीला धार येते. अशा अनेक गाण्यांची माळ तिने या पुस्तकात ओवली असावी असा नावावरून अंदाज बांधू शकतो. हा अंदाज चुकला तरी पुस्तक वाचनीय आहे हा अंदाज बरोबर आहे याबद्दल मला जराही शंका नाही.

परत पुस्तक प्रकाशित करतोय तो हर्षद बर्वे. म्हणजे दुधात साखर. ज्या  वेगाने तो पुस्तकं आणतोय, त्यावरून लवकरच त्याचं डीन ऑर्निश च्या रिव्हर्सिंग हार्ट डिसीज च्या सारखं रिव्हर्सिंग फेल्युअर्स असं पुस्तक येण्याची दाट शक्यता वाटते आहे.

४ नोव्हेंबरला भेटूच सकाळी १० वाजता, पत्रकार संघाच्या हॉल मध्ये नवी पेठ, पुणे इथे.

नील: स्टीफन कोवे.

दिवाळीचं बाहेरगावी निघालो होतो. दोन गाड्या. एक गाडी मी चालवत होतो, माझ्याबरोबर नील आणि माझी आई दोघेच. बाकी मंडळी भावाच्या गाडीत.

गप्पा मारता मारता नील ला मी बिझिनेसचे काही प्रॉब्लेम्स सांगत होतो. आणि त्याने कसा मानसिक त्रास होतो ते ही सांगू लागलो. माझं बोलणं संपल्यावर नील म्हणाला

"त्याचं काय आहे पप्पा, तुमच्या लाईफची गाडी जरा जुनी झाली आहे. त्यात तुमचे गियर्स अडकत आहेत. तुम्हाला पाहिजे तेव्हा नीट बदलता येत नाही. त्यामुळे तुम्ही फर्स्ट गियर वर १०० चा स्पीड आणायला बघता. त्यामुळे तुमच्या गाडीला पेट्रोल जास्त लागतं. पण एनर्जी म्हणून तुम्ही तितकं इनपुट टाकत नाही आहात"

नील, वय वर्षे १३.

च्या मारी पोरगं जन्माला आला आहे की स्टीफन कोवे.

दिवाळी प्रकाशमय झाली

व्याज

किस्सा मागच्या दिवाळीचा.

एका मित्राला मी काही वर्षांपूर्वी पैसे उधार दिले होते. मी कधी साधं भेटायला गेलो तरी मला तो पैसे परत देणार याबद्दल शाश्वत करायचा. खरंतर मी फारसे कधी पैसे मगितलेही नाही परत, पण तोच चालू व्हायचा

"काळजी करू नकोस तू. पैसे देणार परत. अगदी व्याजासहित परत देणार. तुझे पैसे सेफ आहेत असं समज"

चहा प्यायला भेटलो तरी तेच अन बियर प्यायला भेटलो तरी तेच. एके दिवशी कंटाळून, अन थोडं चिडून मी त्याला बोललो

"व्याजाचं सोड रे. मुद्दल दे लवकर म्हणजे पुरे"

त्या मुद्दलीतली शेवटची रक्कम देताना माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून, मी काही बोलायच्या आत मित्र म्हणाला

"मी तर बोललो होतो तुला, व्याज देतो म्हणून. तूच म्हणाला, व्याज सोड म्हणून" अन म्हणाला "चल, एक बियर पिऊ"

मान डोलवत मी त्याच्या बरोबर हॉटेल मध्ये गेलो.

दिवाळी प्रकाशमय अशीही होते.

नवीन धंदा

एक नवीन धंदा कळला. म्हंटलं, तुमच्या बरोबर शेअर करू यात.

कंपनी लोकांना युनिफॉर्म देते. साधारण पणे वर्षाकाठी २. पण तसं बघितलं तर ते पुरत नाहीत. आठवड्यात दोन तीन दिवस नॉर्मल ड्रेस घालून जावं लागतं.

तर बिझिनेस असा आहे की, कंपनीतल्या लोकांना युनिफॉर्म सप्लाय करायचे. त्याची लॉंड्री सर्व्हिस, इस्त्री सकट सप्लायर ने द्यायची. दररोज कपडे कलेक्ट करून स्वच्छ इस्त्री केलेला ड्रेस द्यायचा.

विचार करा. धंदा स्केलेबल आहे. ब्रॉडर लेव्हल ला धंदा सांगितला आहे. फायनर पॉईंट्स वर्क आऊट करता येतील. भारतात अशी सर्व्हिस माझ्या तरी ऐकवात नाही.

Rule of business

इंदोरला गेल्यावर मी ओला बुक केली. दिवसासाठी. काहीतरी १५०० रुचं पॅकेज होतं. त्या ओला ड्रायव्हर ने फोन केला, म्हणाला "हे बुकिंग कॅन्सल करा मी १२०० रु मध्ये पर्सनल सर्व्हिस देतो".

मी नाही सांगितलं.

मी हो म्हणू शकत होतो. पण टॅक्सी काही कारणामुळे बंद पडली असती तर कदाचित ओलाचा सपोर्ट असता, तो देऊ शकला नसता. किंवा ऍक्सिडंट झाला तर कदाचित ओला ची इन्शुरन्स स्कीम असेल. ओला कडून बिल मिळेल जे अकौंटिंग ला सोपं पडेल.

माझ्याकडे मशीनचं एक काम करायला बाहेरचा माणूस यायचा. त्याच्याकडे सतीश नावाचा माणूस होता. त्याने ती कंपनी सोडली आणि म्हणाला "मी कंपनीच्या अर्ध्या रेट मध्ये काम करतो. मला डायरेक्ट काम द्या" मला त्याच्या कंपनीकडून ठीक ठाक सर्व्हिस होती.

त्याला सांगितलं "जो पर्यंत तुझी कंपनी एक ग्राहक म्हणून मला टोपी लावत नाही, तोपर्यंत मी काही तुला काम देऊ नाही शकत." तीन वर्षांनी जेव्हा कंपनीने गोलमाल केला तेव्हा मी सतीशला काम दिलं.

मूळ ऑर्गनायझेशन ला डावलून एखाद्याने सांगितलं की कमी पैशात काम करतो, तो मागणाऱ्याचा गुन्हा असतोच. पण दोन पैसे कमी पडतात, म्हणून ते ऍक्सेप्ट करणारा त्यापेक्षा येडा असतो.

राम 16

मी तणतणत केबिन मध्ये आलो. धाडकन खुर्चीत बनलो. समोर राम बसलाच होता. मला विचारलं त्याने "काय रे, इतका भडकला का आहेस?"

मी म्हणालो "काय सांगायचं राव. इतक्या सुविधा देतो आपण. पण ही पोरं चिंधीचोरगिरी करायचं सोडत नाही. त्या शरद ने बघ, हॉटेल चं बिल रु २१० आयडिया करून रु ५१० केलं. आता असे पैसे देऊन कंपनी गरीब होत नाही पण करणाऱ्याच्या हे लक्षात येत नाही की तो पण श्रीमंत होत नाही"

राम शांतपणे पेपरवेट फिरवत बसला होता. मी चिडून म्हणालो "अरे, बोल की काहीतरी. नुसता बसला आहेस का?"

राम ने शांतपणे बोलायला चालू केलं

"असं म्हंटलं जातं की ऑफिसच्या कामावर बाहेरगावी असलेल्या ऑफिसर चं टीए डीए शीट आणि इन्कम टॅक्स रिटर्न यात काहीतरी गोलमाल असतोच. पण अशा या गोष्टीला क्षुल्लक समजायचं का त्यावरून गोंधळ माजवायचा हे प्रीमियर च्या हातात असतं.  आता डोळेझाक कर.  किमान तशी करतोस हे दाखव. पण हे करताना एक जोरकस मिटिंग घे आणि शरदला एकट्याला न बोलता सगळ्यांनाच कंपनीत इमानेइतबारे काम करायचं आवाहन कर."

दोन घोट पाणी पीत तो पुढे म्हणाला

"या अशा वेळेस कंपनी चालवणाऱ्या माणसाचा कस लागतो. कारण या तसं बघायला गेलं तर क्षुल्लक वाटणाऱ्या चुकीला किती महत्व द्यायचं हे त्यावेळेसच्या परिस्थितीवर अवलंबून असतं."

मी त्याला थांबवत म्हणालो

"पण तुला असं वाटत नाही का की ही विषवल्ली पुढे वाढू नये म्हणून जागेवर ठेचणं हे पण संयुक्तिक नाही का?"

तर राम म्हणाला "ठेच. पण सारासार बुद्धी जागेवर ठेवून. आततायी पणे निर्णय घेऊ नकोस ज्याने एकूण कंपनीचं मोराल डाऊन होईल"

मग आढ्याकडे बघत एकटाच बोलत राहिला

"बऱ्याचदा असं होतं की काही लिडर्स काही छोट्या गोष्टीवर अडकून बसतात. तो किती वाजता आला, कधी गेला, जेवायला कुठे गेला, कुणाबरोबर गेला या शंकांनी त्यांचं डोकं भणाणून उठतं.  जर तुम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा असेल तर काही छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता यायला हवं. जर तुम्ही या गोष्टींवर प्रमाणाबाहेर काम करत असाल एकतर तुमची वृत्ती संकुचित असते किंवा मग तुम्ही नुसतं मोठेपणाच्या गावगप्पा मारत असता पण मनात काही वेगळं चालू असतं. या छोट्या गोष्टींवर तू घोटाळत राहिलास तर कदाचित तू व्यावसायिक उद्दिष्ट्य पूर्तीच्या आनंदांवर तू पाणी फेरतोस हे, लक्षात ठेव"

मी कॉफी बनवली अन शांतपणे एकेक घोट कॉफी घेत राहिलो.

राम सुद्धा समोर कॉफीच घेत बसला होता.

चॉईस

त्याचं  काय आहे मित्रा, जगात घडणाऱ्या नैसर्गिक गोष्टीवर तुझं नियंत्रण नाही हे ठीक आहे. उदा: सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. ठराविक वेळेला समुद्राला भरती येणे  आणि ओहोटी येणे, या गोष्टींच्या तुझ्या आवाक्याबाहेरच्या आहेस इथवर मान्य आहे. पण तुझी स्वतःची परिस्थिती, मग ती मानसिक सुखदुःखाची असो वा भौतिकतेच्या अस्तित्वाची असो त्यावरही तुझा काहीच कंट्रोल नाही हे मला झेपत नाही.

ही भौतिक सुखं ज्या बिझिनेसमुळे तुझ्या आयुष्यात येतात त्या बिझिनेसच्या चढ उतारावर जर तू म्हणत असशील की तुझं काहीच नियंत्रण नाही आहे तर काही तरी चुकतंय. जर धंद्यात काही कारणामुळे मंदी आली असेल, तुमचा परफॉर्मन्स हा व्यवस्थित झाला नसेल तर काही स्टेप्स चुकल्या हे स्वीकारण्यात शहाणपण आहे. आणि मग त्या चुका अभ्यासपूर्वक निस्तरल्या तर हुकलेली गाडी परत ट्रॅक वर येऊ पण शकते. आणि जेव्हा धंदा तेजीत येतो, त्यात नशिबाचा भाग नसतो तर त्यामागे इंटेलिजंट प्रयत्न आणि हार्ड वर्क असतं. तू जर म्हणत असशील, नाही बुवा यात आपला काहीच सहभाग नाही आहे तर समज तुझी नैया एकतर डुबण्याच्या मार्गावर आहे नाही तर कुणीतरी दुसरं तिला वल्हवत आहे.

तू जसा आहेस ते बाय चान्स नसतं मित्रा, तर ते बाय चॉईस असतं, हे लक्षात घे.

(एका चर्चेचा सारांश)

दारू

हर्षद आणि श्रीनिकेत ने दारूचा रेफरन्स घेऊन पोस्ट लिहिल्या. मला बरेच दिवसांपासून ड्रिंक्स या विषयावर लिहायचं होतं. अधून मधून पोस्ट मध्ये बियरचा/ड्रिंक्स चा उल्लेख येतो. एका मित्राने परवा ते दाखवून दिलं की आजकाल काही पोस्टमध्ये बियरचा उल्लेख येतो. माझ्या मित्रांबरोबर सुद्धा मी ड्रिंक्स बद्दल आढेवेढे घेत नाही. महिन्यातून एक दोन वेळा घेतो सुद्धा. पण त्यांच्या बरोबर असताना माझा अविर्भाव असा असतो की मला हा प्रकार आवडतो.

आज इथे मनातली गोष्ट सांगूनच टाकतो.

खरंतर मी ड्रिंक्स वा दारू याचा मनस्वी तिरस्कार करतो. आणि तो तिरस्कार हा दारू हे द्रव्य म्हणून नसतो तर ती पिऊन माणसं जी बिनडोक चाळे करतात त्याचा असतो.

दोन चार मित्रांची मैफल जमावी आणि त्यांच्या बरोबर एखादा पेग वा एक दोन ग्लास वाईन/बियर प्यावी. बाजूला संगीत असावं आणि गप्पाटप्पा माराव्यात. हे त्याचं ठीकठाक सुसह्य रूप. पण दुर्दैवाने असं होत नाही. दोनाचे तीन, चार, पाच कधी होतात आणि गप्पांचा सूर बेसूर कधी होत जातो हे कुणाला कळत नाही आणि मग रंगाचा बेरंग होऊन जातो.

या दारूपायी लाचार होणारी माणसं मी ठायीठायी बघतो. त्यापायी ते अवहेलना, अपमान सहन करतात. स्वतःच्या अभिमानाला तिलांजली देण्याइतकी या दारूत ताकद का असावी? आपल्या जवळच्या लोकांना ही दारू फक्त दुःख देते. आणि हे घडताना मी पाहिलं आहे.

डोक्याला मुंग्या जर येणार नसतील तर दारू प्यायची कशाला, हा एक विचित्र युक्तिवाद लोकं करतात. त्यांना कळत नाही की या मुंग्या त्यांच्या मेंदूचा ताबा कधी घेतात ते. आणि मग अतिशय निर्बुद्ध बरळणं, वेळेचा अपव्यय करणाऱ्या मूर्खासारख्या चर्चा आणि मग त्यातून होणारा डोक्याला मनस्ताप याशिवाय हाताला काही लागत नाही. कुठून ही रात्रीची पार्टी अटेंड केली असं दुसऱ्या दिवशी मनात येतंच.

ड्रिंक्स ज्यांच्या सोबत मी घेतो आणि एन्जॉय करतो असे इनमिन सात आठ मित्र आहेत. आम्ही भेटतो, सुखदुःखाच्या, बिझीनेसच्या गप्पा मारतो. डोकं आणि मन हलकं होतं. त्यांच्या सोबत मी भेटण्यासाठी म्हणून भेटतो. त्यात ड्रिंक्स च्या ऐवजी कॉफी असेल तरी काही फरक नाही. किंबहुना ते काही नसेल तरी चालतं.

एक आपलं सिम्पल गणित आहे. माझं आयुष्य हे माझं आहे. माझ्या मेंदूवर माझ्याशिवाय कुणाचंही नियंत्रण नाही पाहिजे.

मग ती दारू असो

वा

फेसबुक.

उपरती

तर मागच्या आठवड्यात रुटीन चेक अप साठी डॉक्टरांकडे गेलो होतो. ते म्हणाले "एकदम चकाचक दिसतो आहेस. ही अशीच लाईफ स्टाईल ठेवलीस तर तुझ्या दोन अँजिओप्लास्टी झाल्या आहेत ते विसरून जा".

आयुष्याच्या मध्यान्ही झालेल्या काही उपरती:

- कोणताही आजार होऊ नये यासाठी अत्यंत स्वस्त पण पूर्णपणे दुर्लक्षित औषध व्यायाम आहे. काही व्यायाम तर फुकट शिकू शकतो. पण त्यासाठी पैसे खर्च करावे लागले तरी काळजी करू नका. बिनधास्त करा. कारण ते आज खर्च केले नाहीत तर उद्या हॉस्पिटलचं बिल द्यायला खर्च होतातच.

- हेल्दी फूड कॉस्टली असतं असं म्हणतात. पण शरीराला जितकं लागेल तितकं हेल्दी फूड ह्याची किंमत, हे आपण जे अनावश्यक अनहेल्दी पदार्थ ज्या प्रमाणात खातो, तितकीच असते. जो जास्त खातो तो आयुष्यात कमी खातो अन जो कमी खातो तो आयुष्यात एकूण जास्त खातो.

- Exercise with tension त्याला exertion म्हणतात. त्यामुळे दिवसभर तुम्ही जी पळापळ करता त्याला व्यायाम समजू नका. ते एक्झर्शन असतं.

- उद्योजकाने जितकं बिझिनेस वर लक्ष देणे महत्वाचं असतं तितकंच तब्येत चांगली ठेवणं आवश्यक आहे. त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती ही स्टेबल असणं व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे व्यायामामुळे सकाळी ऑफिसला जायला थोडा उशीर होत असेल तर त्याची काळजी करू नका. अनस्टेबल मन आणि धाप लागणारं शरीर घेऊन बारा तास काम करण्यापेक्षा आनंदी मन आणि चांगली तब्येत यांनी आठ तास काम करा. आउटपुट जास्त मिळतं.

- स्वगत

इंटरेस्टिंग व्हिडियो

देवदत्त पटनायक यांचा एक खूप इंटरेस्टिंग व्हिडियो पाहिला. त्याचं शब्दरूप करण्याचा प्रयत्न करतोय.

आपण जेव्हा बिझिनेस करतो, तो कुठेतरी पोहोचण्यासाठी. ज्याला आपण प्रॉमिस लँड म्हणतो. पुराणात अशा तीन प्रॉमिस लँड सापडतात. स्वर्ग, कैलास पर्वत आणि वैकुंठ.

स्वर्गाचा अधिपती इंद्र आहे. स्वर्गात आर्थिक सुबत्ता आहे, पण कायम असुरक्षितता असते. कुणी राजा प्रबळ झाला की इंद्र लागलीच घाबरतो, कुणी तप केलं की त्याची पळता भुई थोडी होते, कुणी ऋषी तपश्चर्या करू लागले की इंद्र लागलीच रंभा नाहीतर उर्वशीला ते भंग करायला पाठवतो. थोडक्यात स्वर्गात आर्थिक सुबत्ता आहे पण मानसिक स्थैर्य नाही आहे. इथे इंद्राला पहिले त्याची भूक मिरवायची पडली असते.

कैलास पर्वत जे शंकराचं निवासस्थान आहे. शंकराचा प्रचलित फोटो बघितला तर लक्षात येईल, की  तिथे मोर आहे, शंकराच्या गळ्यात साप आहे, गणपतीचा उंदीर आहे, नंदीबैल आहे आणि पार्वतीचा वाहक सिंह पण आहे. मोर सापाला खाऊ शकतो, साप उंदराला खाऊ शकतो, सिंह बैलाला खाऊ शकतो. पण कुणी कुणाला खात नाही आहे. सर्वानी आपल्या भूकेवर विजय मिळवला आहे. आणि पार्वती शंकराला नेहमी सांगते की  तुम्ही जरी भूकेवर विजय मिळवला तरी तुम्ही बाकी लोकांचा विचार करायला पाहिजे.

तिसरी प्रॉमिस लँड म्हणजे वैकुंठ आहे. जिथे प्रीमियर विष्णू असतो. तो निवांत पहुडला आहे. आजूबाजूला संपन्नता आहे आणि प्रचंड स्थैर्य आहे. विष्णूला सुद्धा नेहमी पृथ्वीवरच्या लोकांची पडलेली असते. त्यांचं भलं होणं यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. मग तो कधी वराह बनतो, कधी मासा बनतो, कधी कृष्णाच्या रूपात येतो तर कधी गरीब माणसाच्या रूपात. स्वतःच्या भुकेआधी त्याला समोरच्या माणसाची भूक मिटवण्याची काळजी असते.
___________________________________________________________________________________________

माणूस हा एक असा प्राणी आहे ज्याची भूक तीन प्रकारानी डिफाइन करता येते.

१. माणसाला आजची भूक तर मिटवायची असतेच, पण उद्याची, परवाची, एक वर्षानंतरची, मरेपर्यंत भुकेची सोय करायची असते. इतकंच काय, पण त्याला मेल्यांनतरची पण सोय करून ठेवायची इच्छा असते.

२. दुसरं असं  की आपली भूक मिटवायला अन्न तर लागतं पण आपल्याला त्याबरोबर स्टेटस ची पण भूक असते. प्रॉपर्टी लागते, कार लागते, पॉवर लागते. बरं ती प्रॉपर्टी आपल्यापुरतीच नाही तर आपल्या मुलांसाठीची पण करायची असते आणि शक्य झालं तर नातवासाठी सुद्धा.

३. आणि तिसरी गोष्ट आपण सेन्सिटिव्ह असतो. मनात आणलं तर आपण दुसऱ्याच्या भुकेची काळजी घेऊ शकतो. ती घेतो की  नाही ही गोष्ट वेगळी. लहानपणापासून आपल्याला शिकवलं असतं की आपलं पोट भरल्याशिवाय दुसऱ्याच्या भुकेची काळजी घेता येत नाही. आधी स्वार्थ मग परमार्थ. हे असलं तरी आपण दुसऱ्याचा विचार करू शकतो हे नक्की. ज्याला इंग्रजीत आपण एम्पथी म्हणतो.

__________________________________________________________________________________________

थोडक्यात काय, तर स्वर्गात पहिले माझी भूक मिटली पाहिजे हा भाव असतो.
कैलास पर्वतावर हा एकुणात स्वतःच्या भूकेवर विजय मिळवला असतो.
आणि वैकुंठात पहिले समोरच्याच्या भुकेची काळजी घेतली जाते. वैकुंठाचा अधिपती आधी इतरांचा विचार करतो.

____________________________________________________________________________________________

व्यवसाय करण्याची तीन सूत्र आहेत.

तुमची बिलीफ सिस्टम
ज्यातून तुमचं बिहेवियर ठरतं
आणि त्यातून बिझिनेस करण्याची पद्धत जन्माला येते.

आता तुमची बिलीफ सिस्टम बिझिनेस हेड म्हणून तुम्ही स्वतःची भूक आधी मिटवत असाल तर तुम्ही इंद्र आहात, जर तुम्ही स्वतःच्या भुकेवर विजय मिळवला असेल तर शंकर आहात आणि जर दुसऱ्याच्या भुकेचा विचार तुमच्या आधी करत असाल तर विष्णू आहात.

आणि एक लक्षात ठेवाल, मंदिरात पूजा एकतर शंकराची केली जाते नाहीतर विष्णूची. इंद्राची नाही.

आणि एम्प्लॉयीज ने पण लक्षात ठेवलं पाहिजे की सुख स्वर्गात नाही तर वैकुंठात आहे.

स्विफ्ट

पाच एक वर्षांपूर्वी मी जेव्हा एटीओस घेतली तेव्हा माझा एक मित्र म्हणाला "अरे, मोठी गाडी घे जरा. काय असा कंजूसपणा करतोस" त्या मित्राने त्याच सुमारास मोठी गाडी घेतली होती. त्याची कंपनीही माझ्या इतकीच, किंवा थोडी मोठीच असेल.

मी काही बोललो नाही. पण माझे प्लॅन्स फिक्स होते. त्यावेळेस दोन एटीओस घेतल्या. जुनी एक स्विफ्ट ठेवली. पुण्यात, चेन्नई आणि दिल्लीत अशा तीन अल्टो घेतल्या.

आज कंपनीत सातवी गाडी दाखल झाली. स्विफ्ट, आमच्या प्लांट हेड साठी.  ताफा वगैरे म्हणतात तसा तयार झाला. सेल्स आणि आफ्टर सेल्स ची माझी मुलं कारनेच कॉल्स अटेंड करतात.

आणि मित्राच्या कंपनीत एकच कार आहे.

आणि एकदा स्टिअरिंग वर बसलो की गाडी कुठलीही असो, आपल्यासाठी बी एम डब्ल्यू च ती.
-----------------------------

दोन आठवड्यापूर्वी नील म्हणाला "पप्पा, तुमची कार कुठे आहे" मी बोललो "माझी कुठली कार" तर म्हणाला, एटीओस.

मी म्हणालो "ती माझी कुठे आहे. ती तर सेटकोची आहे"

नील हसला आणि म्हणाला "काय वेडं समजता का मला"

आता त्या लहानग्या जीवाला काय सांगू की कंपनीच्या या भौतिक आणि मूर्त गोष्टीशी डीटँचमेंट ठेवली की कंपनी बद्दल प्रेम, बिझिनेस प्रति अभिमान वगैरे अमूर्त गोष्टीची अँटँचमेंट वाढत जाते.

प्रायश्चित्त

बऱ्याचदा मित्र सुचवतात की एखादी घटना तू पूर्ण उलगडून सांगत नाही. त्यामुळे जो रिझल्ट मिळाला त्यामागील खऱ्या ऍक्शन्स कळत नाही. पण अनेक कारणांसाठी मी त्या नाही सांगू शकत नाही. पूर्ण पत्ते ओपन कसे करू शकणार? आपल्या सगळ्याच गोष्टी सांगत सुटल्या तर त्या तुमच्या विरोधात काम करू शकतात अशी एक इंग्रजी म्हण आहे.

त्या ओपन न करण्या मागे एक वेगळी किनार आहे.

या गोष्टीत काही दुःख, अपमान लपलेले असतात. आणि हे माझे झालेले नाहीतर मी दुसऱ्याबद्दल केलेले. इतकंच काय तर काही चुका अन काही गुन्हेही. हे सगळं माझं पर्सनल आहे. ती दुःख, अपमान, चुका, गुन्हे माझ्याच बरोबर संपतील. कुणालाही कळणार नाहीत.

आपल्याला असं वाटतं की आज जे आपण आहोत ते योग्य निर्णय घेण्याची क्षमता असल्यामुळे किंवा आपण काही चांगली कामं करतो म्हणून. असेलही तसं कदाचित. पण मी ज्यांना दुःख दिलं, अपमान केले त्या व्यक्ती माझ्या विरोधात व्यक्त झाल्या नाही हे ही त्यामागचं कारण असू शकतं. किंबहुना आहेच.

आयुष्यात ज्या काही म्हणून चुका केल्या, काही गुन्हे ही केले, जाणतेपणी, अजाणतेपणी,  त्या, त्यावेळेला उघडकीला आल्या नाही हे नशीब. ते जर जगाला कळलं असतं तर आयुष्यातून उठलो असतो. जी लोकं आज फुलं उधळत आहेत त्यांनी त्यावेळेस तोंडात शेण घातलं असतं.

कोणत्याही यशस्वी गोष्टीमागे छोटा वा मोठा गुन्हा लपलेला असतो असं इंग्रजीत म्हणतात ते उगाच नाही.

त्यामुळे आज जर चांगलं जगण्याचा चॉईस मिळत असेल तर तो गत आयुष्यात माझ्या चुकांवर पांघरूण घालण्याचा चॉईस काही लोकांनी वा जगनियंत्याने केला होता, त्यामुळे आहे हे निर्विवाद सत्य आहे.

या गोष्टीची मला पूर्ण जाणीव आहे. तशा चुका, गुन्हे उर्वरित आयुष्यात करायच्या नाहीत हे ठरवलं आहे.

त्या गोष्टींचं प्रायश्चित्त भोगता येत नसल्यामुळे त्याशिवाय दुसरा चॉईस तरी काय आहे?

घराणेशाही

घराणेशाही ही काही फक्त राजकारणाची मक्तेदारी आहे असं नाही. प्रायव्हेट सेक्टर बिझिनेस हाऊसेस मध्ये पण ही आम गोष्ट आहे. एक समाधानाची बाब अशी आहे की बऱ्याच इंडस्ट्रीअलिस्ट ची पुढची पिढी ही ताकदीची लोकं आहेत.

बिर्ला ग्रुपची धुरा आदित्य विक्रम बिर्ला यांच्यानंतर समर्थपणे सांभाळणारे कुमारमंगलम बिर्ला, आपल्या वडिलांनी बनवलेल्या वटवृक्षाचे महाकाय वृक्षात रूपांतर करणारे मुकेश अंबानी, सामन्यत: आपल्याला न पटणारी पण त्याची थॉट प्रोसेस क्लीअर असणारे राहुल बजाज यांचे सुपूत्र राजीव बजाज, ज्यांची दुसरी पिढी थोडी कमी कर्तृत्ववान निघाली पण तिसऱ्या पिढीने परत उचल खाल्ली त्याचे प्रतिनिधी अतुल किर्लोस्कर, केशुब महिंद्रा यांची लिगसी अगदी प्रोफेशनली पुढे नेणारे आनंद महिंद्रा अशी अनेक उदाहरणे आपल्याला सापडतात. टिव्हीएस चे वेणू श्रीनिवासन यांचं नाव लिहायचा मोह इथे आवरतो कारण ते आता रिटायरमेंट ला असतील किंवा त्यांची पत्नी, मालिका ज्या अमलगमेशन ग्रुपच्या हायर आहेत. (परत त्यांची मुलगी नारायणमूर्तीची सून झाली होती पण दुर्दैवाने लग्न टिकलं नाही आणि त्यांच्या मुलाने एलएम डब्ल्यू च्या चेअरमनच्या मुलीशी लग्न केलं. बाबो! एकदम हाय फाय. एल एम डब्ल्यू चा शेयर बघा एकदा)

अशी घराणेशाही नसलेले काही कंपन्या आहेत त्यापैकी दोन बिझिनेस हाऊस. एक टाटा आणि दुसरं लार्सन अँड टुब्रो. अर्थात टाटा आडनाव नसलेले दोन्ही चेअरमन हे टाटांचे सगळ्यात अयशस्वी प्रीमियर गणले जातात हा योगायोग. हालसेक लार्सन आणि टुब्रो या दोन डॅनिश अभियंत्यांनी चालू केलेली ही कंपनी इंजिनीअरिंग मधील एक अजूबा आहे हे निर्विवाद. आणि ती पुढे नेली ती एस डी कुलकर्णी, ए एम नायक आणि वाय एम देवस्थळी या वंदनीय त्रिकुटाने.

अर्थात या घराणेशाही फसलेल्यांचे शिरोमणी आहेत विजय विठ्ठल मल्या.

पण जगातल्या अगडबंब कंपन्या हे डायनास्टी पाळत नाही हे जाणवतं. म्हणून मग मायक्रोसॉफ्ट सांभाळतात सत्या नाडेला आणि गुगलचा अस्ताव्यस्त पसारा सांभाळतात सुंदर पिचाई. सिटीबँक या दोनशे वर्षापेक्षा जास्त वय असलेली बँक काही वर्षे विक्रम पंडितांनी सांभाळली. ऍपल चा फाऊंडर स्टीव्ह जॉब्ज असला तरी काही काळ कंपनीतून उडवला होता. ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक फोर्ड सोडली तर जीएम आणि क्रयसलार या दोन्ही कंपन्या चालवणारे आणि संस्थापक यांचा काही संबंध असेल असं वाचनात नाही.

अजून एक निरीक्षण. युरोप मध्ये फॅमिली मॅनेज बिझिनेस जोरात आहेत. पण त्या कंपन्या क्वालिटी मध्ये एक नंबर असल्या तरी खूप मोठ्या नाही झाल्या. ज्या मोठ्या झाल्या त्यांनी आपले सक्सेसर मुलगा वा जावई निवडला नाही हे तितकंच खरं.

पोस्टचा इंफरन्स हवा तसा काढू शकता. एका ठिकाणी झालेल्या चर्चेत हे बोललो


युनिक क्वालिटी

१. प्रत्येक माणसात अनेक गुण असतात. तो जेव्हा टीम मध्ये काम करतो, तेव्हा बाकी टीम मेंबर पेक्षा एका कुठल्या तरी स्किल सेट मध्ये टीम मधला एक जण उजवा असतो.

२. इतकंच नाही तर माणसातल्या अनेक गुणांपैकी एक क्वालिटी ही त्याच्या इतर क्वालिटीज वर मात करणारी असते.

आपण जेव्हा आपली क्रमांक १ आणि क्रमांक २ मधील क्वालिटी शोधली तर त्याला युनिक क्वालिटी म्हणता येईल.

एक उद्योजक म्हणून आपण या युनिक क्वालिटीचा वापर करून ज्या दिवशी कामावर लक्ष केंद्रित करतो, त्या दिवशी आपण कंपनीच्या प्रोग्रेस साठी काम करत असतो.

आणि विश्वास ठेवा, असे महिन्यातून फक्त पाच किंवा सहा दिवस असतात.

या थेअरी चा एक भारी फायदा आहे. व्यावसायिकाला वाटत असतं की तो ३६५ दिवस मरमर करत असतो. पण खरंतर तो वर्षातून ८० ते १०० दिवस काम करत असतो त्यामुळे व्यवसायाची खऱ्या अर्थाने ग्रोथ होईल.

"वेळच नाही राव", "वाट लागली आहे काम करून", "असं वाटत दिवसात २५ तास असावे" हे डायलॉगज बिझीनेसमन नेहमीच मारत असतो. एकदा वरचा हिशोब लागला की सायकॉलॉजीकल प्रेशर मधून तो मुक्त होतो. त्याला लक्षात येतं की आपण जेवढे स्वतःला बिझी समजतो तितके नाही आहोत.

फक्त आपली युनिक क्वालिटी शोधता यायला पाहिजे.

आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एक वेगळी युनिक क्वालिटी ही टीम मधील दुसऱ्या कुणाकडे आहे यावर विश्वास पाहिजे आणि त्याला त्या गुणाचा वापर करू देण्याची धमक उद्योजकामध्ये हवी.

(ती धमक आली की मग अशी लांबलचक पोस्ट लिहायला वेळ मिळतो 😊😊)

प्रिया प्रभुदेसाई

व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेल्या मित्रा मैत्रिणींनो

सगळ्यात प्रथम "जुळल्या सगळ्या आठवणी, स्वर आले दुरुनी' या पुस्तकाबद्दल लेखिका प्रिया प्रभुदेसाई आणि प्रकाशक हर्षद आणि ऋचा बर्वे यांचे हार्दिक अभिनंदन.

मी जेव्हा पहिल्यांदा प्रियाचं लिखाण वाचलं, त्या नंतर काही दिवसातच तिला फेस बुकर प्राईज विजेती म्हणून डिक्लेयर केलं होतं. आता पुढची स्टेप इनबॉक्स. झालं का जेवण. असं तिला वाटलं असावं. कारण ती सुरुवातीला माझ्या कॉमेंटवर फार काही घास टाकायची नाही. दबकूनच असायची जरा. पण मी मात्र तिचं वाचत माझ्या मतावर ठाम होत गेलो आणि तिच्या स्नेह सुलभ स्वभावामुळे विविध विषयांवर आम्ही बोलू लागलो.

त्या ठाम होण्यामागे काही स्पेसिफिक कारणं आहेत. पहिले आपण तिच्या समाजकारणाच्या पोस्टबद्दल बोलू.  सगळ्यात पहिलं कारण म्हणजे विषयाची तर्कसुसंगत मुद्देसूद मांडणी. ती विषयाची मांडणी इतकी अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक करते की त्यावर आपल्याला प्रतिवाद करायचा असेल तरी जरा दबकत आणि परत विचार करून लिहावा लागतो. सोशल मीडिया वर विचार करून लिहावं लागायचं महाकठीण काम तिच्या पोस्टवर करावं लागतं. म्हणजे उचललं बोट आणि दाबलं की बोर्डवर असं तिथं होत नाही. म्हणजे करू शकत नाही. सोशल मीडियावर असं विचारांना उद्युक्त करणारं लिखाण खूप कमी जणांचं  आहे त्यात प्रियाचं स्थान वरती आहे.

समाजकारण झालं, आता तिच्या राजकारणाच्या पोस्ट बद्दल बोलू. पोटात खड्डे पडले ना! माझ्याही घशात अडकल्यासारखं झालंय. घाबरू नकोस प्रिया, मी यावर काहीच बोलणार नाही आहे. आणि मी तुला काय घाबरू नकोस म्हणून सांगू,मीच सटपटलो आहे.

हीच प्रिया जेव्हा ललित आणि त्यातल्या त्यात मानवी नातेसंबंध या विषयावर लिहिते तेव्हा निग्रही प्रिया अम्मा, तिचे सासरे, वडील यांच्याबद्दल तरल लिहिताना भावुक होते, तर अलका गांधी असेंरकर यांच्या कवितेचा विस्तार करताना पुरुषांच्या व्यक्तिमत्वावर खट्याळ पणे व्यक्त होते, आणि  सोशल मीडियाच्या अनुषंगाने तिला काही कहाण्या कळतात तिच्यावरचे भाष्य, इमरोज, अमृता प्रीतम आणि साहिर या त्रिकोणावरचे तिचे विश्लेषण, तिचे नुकतेच आलेले ती सध्या काय करते ही सिरीज, असे विविध विषय ती अगदी लीलया हाताळते. त्या लिहिण्यात एक प्रवाह असतो. हे लिहिताना जेव्हा ती वाक्य संपलं की चार पाच डॉट्स टाकते. ते कशाला टाकते हे माहीत नाही, पण त्यामुळे आपणही थबकतो आणि त्या प्रवाहात हलकी डुबकी घेतो आणि उत्सुकतेने पुढचं वाचायला सज्ज होतो. फेसबुकची वॉल ही संज्ञा जेव्हा म्हणून वापरतो तेव्हा ज्या वॉल वर मनसोक्त बागडता येतं अशी प्रियाची वॉल आहे.


आता तेंडुलकर बद्दल बोलायचं म्हणजे स्ट्रेट ड्राइव्ह बद्दल बोलणं क्रमप्राप्त आहे. आपण सामान्य माणसं साधारणपणे गाणं म्हंटलं की संगीताशी कनेक्ट होतो. प्रिया संगीताबरोबर शब्दांशी कनेक्ट होते. तिचा गाण्याचा अभ्यास तगडा आहे आणि त्या बरोबर तिची आकलन शक्ती अफाट आहे. ती गाण्याच्या ओळीतील शब्दांचा अर्थ तर सांगतेच पण त्या ओळींमध्ये दडलेला अर्थ जेव्हा उलगडून सांगते तेव्हा बहार येते. बरं हे विश्लेषण म्हणजे गाण्याची चिरफाड नसते तर अत्यंत नजकातदार अन सर्जनशील निरूपण असतं ते गाण्याचं. मला खात्री आहे, प्रियाने गाण्याचं रीतसर शिक्षण घेतलं असावं. त्याशिवाय त्या गाण्याच्या तांत्रिक बाजू ती सांगू शकणार नाही. आणि वर तिची मराठी शब्दांवर हुकूमत आहे अन भाषेवर प्रेम. मग एकदा अशा तंत्रिकतेला सुयोग्य शब्दांचं कोंदण लाभलं की जे उतरतं ते अफलातून असतं. म्हणजे तिचे या विषयावरचे काही लेख असे असतात की संपूच नये. तिने लिहीत राहावं आणि आपण वाचत जावं. मान दुखते पण मन थकत नाही. साधारणपणे सोशल मीडियावर वाचताना स्क्रीनच्या साइज प्रमाणे लेखाची रुंदी कळते आणि स्क्रोल करत गेलं की लांबी कळते. शब्दांची खोली ज्या मूठभर लोकांची कळते त्यात प्रिया आहेच हे निर्विवाद. पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही काळी अक्षरं उमटत जाताना ह्या दोन रंगामध्ये ज्या इंद्रधनुषी रंगांची अशी उधळण होते की आपण स्तिमित व्हावं.

हे पुस्तक आणलंय हर्षद बर्वेनी. त्याचं हाऊ टू फेल इन लाईफ आणि हाऊ आय किल्ड बिझिनेस ही दोन आगळ्या नावाची आणि वेगळ्या कंटेंटची पुस्तकं आली आहेत. त्याची पाच अजून वेगळ्या विषयाची पुस्तकं पण आली आहेत. त्याशिवाय माझ्या माहितीत चार दुसऱ्या मित्रांची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. ज्या वेगाने तो पुस्तकं आणतो आहे, त्यानुसार त्याने आज पासून पाचवं पुस्तक रिव्हर्सिंग फेल्युअर्स नावाचं असावं अशी माझी आंतरिक इच्छा आहे. त्यासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा.
इतकं बोलल्यावर प्रिया माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आली नाही यावरचा राग माझा शांत झाला आहे असा तिचा गैरसमज झाला असेल. पण तो राग एखादी शिक्षा दिल्याशिवाय शांत होणार नाही. तर तिच्या दहाव्या पुस्तकाच्या प्रकाशनाला सुद्धा मी अशीच १२-१३ मिनिटं खाणार हीच तुला आणि हर्षद ला शिक्षा.

आता थांबतो. हर्षद ने आज्ञा देतानाच मला सांगितलं होतं की भाषण देताना फेसबुकच्या पोस्टसारखी लांबण लावू नका. त्याने हे त्याच्या पोस्ट बद्दल म्हंटलं असेल हे समजून मी हसलो होतो. कारमध्ये बसल्यावर जाणवलं की तो हे कदाचित माझ्याच बद्दल ही म्हंटला असेल. त्यामुळे बरोबर आठ मिनिटात भाषण संपवतो आहे.

पुन्हा एकदा प्रिया, हर्षद आणि ऋचा चे हार्दिक अभिनंदन.